स्नेहवन

आळंदीजवळचं (कोयाळी फाटा) स्नेहवन. आम्ही उन्हाळ्याच्या सुटीत गेल्यामुळे बरीचशी मुलं घरी गेली होती. तिथे असलेल्या पवन आणि ओम ह्या दोन छोट्या मुलांनी आम्हाला संस्थेच्या आवारात फिरवलं, संस्थेबद्दल माहिती दिली. दोघांमधला एक; खूप बोललं की तोंड दुखतं म्हणून जरा कमी बोलत होता :-). दोन्ही मुलांचं ऐकण्यात आम्ही सगळ्या (जाऊ, नणंद, मुलगी) इतक्या रमलो की चित्रीत करायला विसरलो. थोडीफार प्रकाशचित्र मात्र काढली.  

अशोक देशमानेंनी चांगली नोकरी सोडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील, अनाथ आणि गरजू मुलांसाठी “स्नेहवन” संस्थेची स्थापना केली. संस्थेत अनेक गरजू मुलं आहेत. मात्र खर्‍याअर्थी गरजू असणार्‍यांनाच इथे प्रवेश मिळतो हे देशमाने अर्जातल्या बाबींबद्दल सांगत होते तेव्हाच लक्षात येतं. फक्त अर्ज केला की इथे प्रवेश मिळत नाही. मुलांशी बोलणं होतं, त्यानंतर त्यांच्या घरी देशमाने प्रत्यक्ष जातात आणि मगच ते मूल संस्थेत दाखल होतं. 

येथे मुलांच्या केवळ शालेय शिक्षणावर भर दिला जात नाही, तर संस्कार, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वासही विकसित केला जातो. स्नेहवनमध्ये ग्रंथालय, संगणक प्रशिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, योग, मल्लखांब, संगीत, शेती आणि विविध कौशल्य प्रशिक्षणाच्या सुविधा आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करत सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण आणि सेंद्रिय शेती यांनाही येथे महत्त्व दिले जाते. देशमानेंनी बोलता बोलता सांगितलं की एकदा गाडीसाठी चालक मिळत नव्हता तेव्हा त्यांनी ठरवलं की ज्यासाठी अडतं ते सारं मुलांना शिकवायचं. ह्या भावनेतूनच तिथले अनेक अभ्यासक्रम सुरु झालेले आहेत.

मुलांसह शिक्षकांनाही पुस्तकं वाचणं बंधनकारक आहे. वाचलेल्या पुस्तकांबद्दल बोलणं हेही. बक्षिस म्हणून पुस्तक वाचलं, त्याबद्दल बोललं की मुलांना चित्रपट पाहायला मिळतो असं देशमांनेंच्या बोलण्यात आलं. पुस्तक वाचून त्यावर मुलं, शिक्षक बोलतात हे अतिशय भावलं आणि मुलंच संस्थेंबद्दल माहिती देतात हेही. ओम आणि पवनने जवजवळ तासभर फिरुन संस्था दाखवली, माहिती दिली आणि लेकीकडून अमेरिकेबद्दलची घेतली. 

अशोक देशमाने हे मूळचे शेतकरी कुटुंबातील आणि वारकरी परंपरेचे संस्कार लाभलेले कवी आणि लेखक आहेत. पुण्यात IT क्षेत्रात नोकरी करत असताना, दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील आणि गावाकडच्या शेतकर्‍यांच्या व्यथा, कर्जबाजारीपणा, आत्महत्या ह्यातून आलेल्या अस्वस्थतेतून आणि वेदनेतूनच त्यांच्या अनेक कविता कागदावर उतरल्या, स्नेहवनची स्थापना झाली. त्यांची पत्नी, आई – वडीलही त्यांच्याबरोबरीने काम करतात.

स्नेहवनला जरुर भेट द्या आणि स्नेहवनबद्दलची माहितीही जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवा. 

स्नेहवन संकेतस्थळ – https://www.snehwan.in/home

Read More 

What do you think?

Written by Mohana Joglekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

ज्योतिष आणि कौन्सेलिंग आणि नमुना नमुना माणसं