बरीच वर्ष मी माझी रास मेष आहे म्हणून लोकसत्तामधलं भविष्य वाचायचे. दर आठवड्याला त्यातलं सगळं जुळतं असंही वाटायचं. मुळात माझा भविष्यावर विश्वास आहे की नाही हे माझं मलाच अजूनही कळलेलं नाही; पण झालं काय खूप वर्षांनी कळलं की माझी रास मेष नाहीच ती वृषभ आहे. मग ह्याला काही अर्थ नाही म्हणत मी दोन्ही राशींचं भविष्य वाचून एकत्र करायला सुरुवात केली. हळूहळू तेही खरं आहे असं वाटायला लागलं. आता हे मी का लिहिते आहे? चपराक अंकासाठी मंजिरी तिक्का अमेरिकेतल्या ’नाटक’ वाल्यांवर लिहित होती, उदयन आपटेने माझं नाव सुचवलं आणि तिच्याशी ओळख झाली. पुण्यात आले की भेटायचं असंही आम्ही ठरवलं. पुण्याला गेल्यावर, ह्यावेळी भेट होणं कठीण आहे असं मी तिला कळवलं आणि तिने; ठरवलं तर सगळं जमतं असं :-). निघायच्या एक दिवस आधी अखेर तिची निगडीच्या घरी भेट झाली. तिने तिची २ पुस्तकं मला भेट म्हणून दिली. ज्योतिष आणि कौन्सेलिंग आणि नमुना नमुना माणसं.
संजय मनोहर ह्यांना पत्रिकेच्या आधारे असंख्य लोकांना मार्गदर्शन करताना आलेल्या अनुभवांना मंजिरीने कथारुपात सादर केलं आहे. अगदी खरं सांगायचं तर हातच लावू नये असं वाटत असताना इतक्या प्रेमाने दिलेलं पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून मी हातात घेतलं आणि नकळत त्यात गुंतले. कधी प्रश्न पडले खरंच असं होत असेल का तर कधी वाटलं ज्योतिष हे शास्त्र म्हणतात तसं असलं पाहिजे. काही असो, पुस्तकातले अनुभव, घटना विविधांगी आहेत आणि सुरुवातीलाच संजय मनोहरांनी लिहिलेलं मला अगदी मनापासून पटलं, ते म्हणतात, ’ज्योतिषविषयक मार्गदर्शन करताना येणार्यांना देवाधर्माचं करायला न सांगता माझं त्याच्यांशी काळाशी आणि त्यांच्या प्रश्नांशी सुसंगत अशा गप्पा मारत समुपदेशन करणं त्यांना भावतंय, त्याचा त्यांना फायदा होतोय हे लक्षात आलं होतं.’
नमुना नमुना माणसं हे नावच ’सार’ सांगून जातं. पुस्तकातीला किस्से हलकेफुलके, कधी आपण स्वत:बद्दलच वाचतोय असं वाटायला लावणारे, माणसाच्या स्वभाव, वागण्यावर रंजक पद्धतीने भाष्य करणारे आहेत. अति बोलणारी, अबोल, स्वच्छतेचा अतिरेक करणारी माणसं, भिडेपोटी उद्बभवणारे प्रसंग अशा विविध विषयांवरचं हे हलकंफुलकं पुस्तक वाचण्यासारखं आहे.


GIPHY App Key not set. Please check settings