‘यमुना पर्यटन’ ही मराठी साहित्यातील पहिली सामाजिक कादंबरी मानली जाते, बाबा पद्मनजी हे तिचे लेखक. जन्माने हिंदू असणारे मात्र वयाच्या पंचविशीत ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे बाबा पद्मनजी यांचे मूळ नाव, बाबा पद्मनजी मुळ्ये. कर्नाटकातील बेळगाव येथे एका कोकणी मराठी त्वष्टा कासार कुटुंबातला त्यांचा जन्म. वडील पद्मनजी माणिकजी मुळे यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न, धार्मिक संस्कारांची वीण घट्ट असलेले आणि तत्कालीन ब्राह्मणी सांस्कृतिक प्रभावाच्या जवळचे होते. पदमनजींच्या बालपणीच्या जगात हिंदू धार्मिक आचार, कर्मकांड आणि परंपरा होत्या; पण त्याचबरोबर बदलत्या काळाची चाहूलही होती. त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी विलक्षण संघर्षमय आणि अभूतपूर्व लक्षणीय होत्या.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र हा वरकरणी पाहता जुनाट परंपरांच्या सावलीत उभा असलेला समाज होता; पण त्या सावलीच्या आत कुठेतरी नव्या विचारांची पालवी फुटू लागली होती. इंग्रजी शिक्षण, मिशनरी शाळा, मुद्रणालये, नव्या ज्ञानाचा प्रसार, सामाजिक सुधारणेचे विचार, जातिभेदाविरोधातील अस्वस्थता, विधवांच्या दारुण जीवनाचा प्रश्न आणि धर्माच्या स्वरूपाबद्दल सुरू झालेली बौद्धिक चर्चा, या सगळ्यांनी त्या काळातील तरुण मनांना अस्वस्थ केले होते. याच अस्वस्थ काळातून पुढे आलेले बाबा पद्मनजी हे केवळ धर्मप्रचारक नव्हते; ते लेखक होते, निबंधकार होते, कोशकार होते, मुद्रक होते, समाजसुधारक होते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या श्रद्धेशी आणि विवेकाशी सतत झगडणारे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.
बेळगावच्या सरकारी मराठी शाळेत आणि लंडन मिशनच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले, जिथे त्यांचा ख्रिस्ती धर्माशी पहिला परिचय झाला. 1849 मध्ये उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या विल्सन स्कूल अर्थात बॉम्बे स्कॉटिश मिशन, आणि नंतर फ्री चर्च इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. त्या काळी मुंबई, केवळ व्यापाराचे शहर नव्हते; ते विचारांच्या नव्या देवाणघेवाणीचेही केंद्र बनत होते. मुद्रणालये, वृत्तपत्रे, व्याख्याने, इंग्रजी शिक्षण आणि सामाजिक सुधारणेच्या चर्चांनी तरुण पिढीच्या मनात जुन्या जगाबद्दल प्रश्न निर्माण केले होते. पद्मनजींच्या मनातही तेच प्रश्न आकार घेत होते.
ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याआधी त्यांनी, जातिभेद निर्मूलनासाठी काम करणाऱ्या ‘परमहंस मंडळी’ ह्या गुप्त सामाजिक चळवळीसाठी काम केले. ही चळवळ जातिभेद, मूर्तिपूजा आणि रूढ सामाजिक बंधनांविरुद्ध विचार करणाऱ्या तरुणांची होती. मंडळीच्या बैठकीत जातिभेद मोडण्याच्या प्रतीकात्मक कृती केल्या जात; जसे की, ख्रिश्चन किंवा इतर धर्माच्या लोकांच्या हाताचे पाव / ब्रेड अथवा मांस खाऊन जात तोडण्याची शपथ घेत असत. एकत्र अन्न घेणे, परस्परांतील जातभेद झुगारणे अशा कृतींना महत्त्व होते.
मात्र परमहंस मंडळीचे विचार एकसंध, सर्वमान्य आणि स्पष्ट धार्मिक तत्त्वज्ञानाच्या रूपात विकसित झाले नव्हते. त्यामुळे चळवळीत काम करणारे सदस्य बैठकीतून बाहेर पडताच समाजात आणि घरात पुन्हा कर्मठ हिंदूंसारखे वागत. हा सामाजिक ढोंगीपणा बाबा पद्मनजींना सहन झाला नाही. पद्मनजींना चळवळीच्या काही विचारांशी, विशेषतः धर्म आणि ईश्वरासंबंधीच्या भूमिकेशी अस्वस्थता वाटू लागली. या दुटप्पी वर्तनाचा उघड खुलासा करून त्यांनी संघटनेशी नाते तोडले. या अनुभवाचा त्यांच्या पुढील वैचारिक प्रवासावर मोठा परिणाम झाला. याचे सविस्तर वर्णन ‘अरुणोदय’ ह्या त्यांच्या आत्मचरित्रात आहे. हिंदू धर्मातील काही रूढी-परंपरा आणि अंधश्रद्धांबद्दल वाटणारा असंतोष त्यांनी उघडपणे मांडला.
ख्रिस्ती धर्माचा सखोल अभ्यास केल्यामुळे, हिंदू असतानाही त्यांची फ्री चर्च हायस्कूलमध्ये बायबल शिकवण्यासाठी नियुक्ती झाली, ह्या दरम्यान लोक त्यांना बायबल मास्तर म्हणत असत. प्रदीर्घ वैचारिक संघर्षानंतर, अखेरीस 3 सप्टेंबर 1854 रोजी बेळगावच्या मिशन चॅपेलमध्ये रेव्हरंड टेलर यांच्या हस्ते त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्या वेळी त्यांचे वय अवघे तेवीस वर्षांचे होते.
मुसळधार पावसात झालेल्या त्या बाप्तिस्म्याच्या वेळी मोठी गर्दी जमली होती, असे त्यांच्या जीवनावर झालेल्या संशोधनात नमूद आहे. हा केवळ एका तरुणाच्या धर्मांतराचा प्रसंग नव्हता; तो तत्कालीन समाजव्यवस्थेला हादरा देणारा सार्वजनिक प्रसंग होता. ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित होत असताना त्यांच्या मनात ‘पाप’ आणि ‘मुक्ती’ या संकल्पनांवरून प्रचंड वैचारिक गोंधळ सुरू होता. आपण केवळ भावनेच्या भरात नाही, तर बुद्धिप्रामाण्यवाद आणि ‘सत्याचा शोध’ घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारत असल्याचा प्रामाणिक खुलासा त्यांनी केला.
धर्मांतराची किंमत मात्र मोठी होती. पद्मनजी विवाहित होते. त्यांचे लग्न 1848 मध्ये झाले होते. धर्मांतरानंतर पत्नीशी असलेले नाते ताणले गेले आणि अखेरीस 1857 मध्ये त्या विवाहाचा काडीमोड झाला. ‘पत्नीने त्यांना नाकारले आणि संबंध तोडला’ एवढ्या सरळ वाक्यात ही घटना सामावून घेता येत नाही. उपलब्ध संशोधनानुसार पत्नीवर तिच्या कुटुंबाचा दबाव होता; पुढे पद्मनजींनी या वियोगाकडे मोठ्या वेदनेने पाहिले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील हा धक्का पुढे त्यांच्या लेखनातील स्त्रीजीवनाच्या प्रश्नाशी अधिक खोलवर जोडला गेला. पुढे जाऊन कुटुंबाने आणि समाजाने त्यांना पूर्णपणे वाळीत टाकले. एका बाजूला ख्रिस्ती धर्माची ओढ आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाचा दुरावा, या दोन टोकांवर जगताना झालेल्या प्रचंड मानसिक त्रासाचा आणि भावनिक कोंडीचा खुलासा त्यांनी ‘अरुणोदय’मध्ये केलाय.
तत्पूर्वी 1857 मध्ये त्यांनी ‘यमुनापर्यटन’ ही मराठी साहित्यातील पहिली स्वतंत्र सामाजिक स्वलिखित कादंबरी प्रकाशित केली. यमुना ही ‘यमुनापर्यटन’ची केवळ कथानायिका नाही; ती त्या काळातील स्त्रीजीवनाच्या बंदिस्त चौकटीतून बाहेर पडणाऱ्या एका प्रश्नाची प्रतिमा आहे. पती विनायकसोबत प्रवास करताना तिला विविध ठिकाणी भेटणाऱ्या विधवांचे जीवन दिसते. त्यांचे दुःख, सामाजिक अवहेलना आणि त्यांच्या शरीरावर व मनावर लादलेली बंधने तिच्या जाणिवेला हादरवतात. पुढे स्वतः विधवा झाल्यावर तिच्यावरही केशवपनाची सक्ती करण्याचा प्रयत्न होतो; पण ती त्याला विरोध करते.
शेवटी ती पुनर्विवाह करते आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारते. त्यामुळे कादंबरी एकाच वेळी स्त्रीसुधारणेचा आग्रह आणि पद्मनजींच्या ख्रिस्ती धर्मावरील श्रद्धेचा प्रचार, ह्या दोन्ही गोष्टी घेऊन पुढे जाते. या कादंबरीतून त्यांनी हिंदू समाजातील विधवा महिलांच्या दुःखाला वाचा फोडली आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. विशेष बाब म्हणजे धर्मपरिवर्तनामुळे त्यांच्या पत्नीने त्यांचा त्याग केला होता आणि तिच्याविषयी कोणताही किंतू मनामध्ये न ठेवता त्यांनी स्त्रियांची दुःखे ह्या कादंबरीत शब्दबद्ध केली होती हे विशेष होय! मात्र त्यांच्या कादंबरीची नायिकादेखील त्यांच्या खऱ्या आयुष्यात जसे धर्म परिववर्तन घडले होते तसे धर्म परिवर्तन करते, त्यामुळे कादंबरीच्या प्रयोजनावर साहजिकच प्रश्नचिन्ह उमटते.
त्यांनी ‘यमुना पर्यटन’मध्ये तत्कालीन समाजातील स्त्री शिक्षणाचा विरोध आणि विधवा महिलांवर होणारे अन्याय, जसे की सक्तीचे केशवपन यावर अत्यंत परखड भाष्य केलेय. ‘यमुनापर्यटन’चे मूल्यमापन करताना एकांगी गौरव किंवा एकांगी नकार, दोन्ही टाळावे लागतात. तिच्यात आधुनिक कादंबरीच्या रचनेतील काही मर्यादा आहेत. अनेक अभ्यासक तिला मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी मानतात, तर काही तिच्या कादंबरी फॉर्मॅटबद्दल प्रश्न उपस्थित करतात. मात्र तिच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल शंका घेणे कठीण आहे. तिने स्त्रीजीवन, विधवा पुनर्विवाह आणि धर्म या प्रश्नांना कथात्मक रूप दिले आणि मराठी गद्याला एका नव्या सामाजिक क्षेत्रात नेले.
7 एप्रिल 1867 रोजी त्यांना फ्री चर्चचे ‘पास्टर’ (धर्मोपदेशक) म्हणून दीक्षा देण्यात आली आणि त्यांनी 1872 पर्यंत त्यांनी पुण्यात सेवा दिली. 1877 मध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्मग्रंथ ‘बायबल’चा, भाष्यासहितचा अनुवाद ‘नवा करार’ New Testament ह्या नावाने प्रकाशित केला. 1870 च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी बायबल सोसायटी आणि ट्रॅक्ट सोसायटीशी संबंधित संपादकीय काम केले. मुंबईत त्यांनी स्वतःची व्हिक्टोरिया प्रेस चालवली आणि अनेक नियतकालिकांशी व प्रकाशनसंस्थांशी ते जोडले गेले. शंभरहून अधिक ख्रिस्ती धार्मिक व सामाजिक ग्रंथांचे लेखन त्यांनी केले.
एखाद्या धर्माचा दीर्घकालीन सखोल अभ्यास करताना माणूस त्याकडे खेचला जाण्याची शक्यता अधिक असते आणि त्या दरम्यान त्याच्या परिघात त्यास पोषक अशा घटना घडल्या तर त्याचे मनपरिवर्तन होते, पुढे जाऊन त्याचा कल धर्मपरिवर्तनाकडे झुकतो! आजही धर्मांतरविषयक मानसचित्रण करायचे झाल्यास त्यात फारसा बदल दिसून येणार नाही. काही रूढी परंपरा कमी झाल्या असतील मात्र नव्या परंपरांनी त्यांचे स्थान घेतलेय हे नाकारता येत नाही. दीडशे वर्षांपूर्वीचा समाज कृती आणि अभिव्यक्ती ह्याबाबत अधिक परिपक्व होता असे मानायचे का, असा प्रश्न ह्या अनुषंगाने पडतो. ह्याचे उत्तर व्यक्तीसापेक्ष भिन्न येईल कारण प्रत्येकाची जडणघडण समान नसते.
त्यांच्या आयुष्याचा सर्वांत महत्त्वाचा साहित्यिक दस्तऐवज म्हणजे ‘अरुणोदय’. हे आत्मचरित्र १८८८ मध्ये प्रसिद्ध झाले. ह्यामध्ये त्यांनी, युरोपियन ख्रिश्चन मिशनरी आणि हिंदू समाजसुधारक या दोन्हींच्या मधोमध अडकलेल्या भारतीय ख्रिश्चनांची समाजात कशी घुसमट व्हायची, यावर प्रकाश टाकलाय. जन्मापासून बाप्तिस्म्यापर्यंतचा त्यांचा वैचारिक आणि धार्मिक प्रवास त्यांनी त्यात मांडला. ‘अरुणोदय’चे हे एका धर्मांतरित व्यक्तीचे आत्मकथन इतकीच त्याची ओळख नसून एकोणिसाव्या शतकातील शिक्षणव्यवस्था, धर्मचर्चा, जातिसंबंध, मिशनरी प्रभाव, कुटुंबव्यवस्था आणि भारतीय ख्रिस्ती व्यक्तीची मानसिक कोंडी यांचेही दर्शन त्यात घडते. म्हणूनच ते मराठी आत्मचरित्रपरंपरेतील एक महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे ‘धर्मांतरविषयक मानसचित्रण’ करणारे पहिलेच आत्मचरित्र ठरते.
पद्मनजींच्या काळात महाराष्ट्रात विचारांचे एक मोठे संक्रमण सुरू होते. लोकहितवादींची ‘शतपत्रे’, दादोबा पांडुरंगांचे सुधारक विचार, ज्योतिराव फुले यांची जातिव्यवस्थेवरची कठोर चिकित्सा, विष्णुशास्त्री पंडितांचा विधवा पुनर्विवाहाचा आग्रह, प्रार्थना समाजाचा उदय, स्त्रीशिक्षणाची चर्चा आणि पुढे आगरकर-टिळकांच्या पिढीकडे जाणारा सार्वजनिक वादविवाद, या सर्व प्रक्रियांच्या पार्श्वभूमीवर पद्मनजींचे लेखन समजून घ्यावे लागते. त्यांच्या विचारांमध्ये आधुनिकतेची ओढ होती; पण त्याच वेळी त्यांची आधुनिकता प्रोटेस्टंट ख्रिस्ती श्रद्धेने खोलवर आकारलेली होती. म्हणून त्यांचे समाजसुधारक रूप आणि धर्मप्रचारक रूप वेगळे करता येत नाही.
हीच त्यांची ताकद आणि मर्यादा दोन्ही होती. स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह, जातिभेद, सामाजिक रूढी यांच्यावर त्यांनी निर्भीडपणे लिहिले; पण हिंदू समाजावरील त्यांची टीका अनेकदा प्रखर धार्मिक भूमिकेतून आलेली होती. दुसरीकडे त्यांच्या लेखनात ख्रिस्ती धर्माला सामाजिक आणि नैतिक सुधारणेचे माध्यम म्हणून पाहण्याची ठाम भूमिका होती. त्यामुळे त्यांचे साहित्य वाचताना त्यांच्या काळातील मिशनरी वातावरण, वसाहतवादी सत्ता, भारतीय सुधारकांची अंतर्गत मतभिन्नता आणि धर्मांतराच्या राजकारणाचा संदर्भ विसरता कामा नये. आधुनिक अभ्यासकांनी पद्मनजींच्या या गुंतागुंतीवरच विशेष प्रकाश टाकला आहे.
पदमनजींच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक मोठा पैलू म्हणजे त्यांची भाषिक आणि प्रकाशनविषयक धडपड. त्यांनी कोश तयार केले, अनुवाद केले, नियतकालिके संपादित केली, मुद्रणालय चालवले आणि शंभराहून अधिक मराठी ग्रंथ लिहिले. त्यांचे लेखन आजच्या साहित्यिक कसोटीवर सर्वत्र समान दर्जाचे वाटेलच असे नाही; परंतु त्यांनी ज्या विषयांना मराठी गद्याच्या केंद्रस्थानी आणले, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे. त्यांनी धर्म, स्त्रीजीवन, शिक्षण, जात, नैतिकता आणि सामाजिक सुधारणेला मुद्रित शब्दाचे रूप दिले. मराठी ख्रिस्ती वाङ्मयाला स्वतंत्र ओळख देण्यात त्यांचा वाटा म्हणूनच निर्णायक मानला जातो.
स्त्रीविद्याभ्यास निबंध, व्याभिचार निषेधक बोध, निबंधमाला, शब्दरत्नावली ह्या त्यांच्या महत्वाच्या साहित्यकृती. यातील साहित्यमूल्ये भलेही खूप कसदार नसतील मात्र त्यांचे आशय विषय विलक्षण दमदार होते. इंग्रजी आणि मराठीचा सर्वसमावेशक कोश, त्यांनी निर्मिला. 1906 साली आजच्या तारखेस 29 ऑगस्टला त्यांचे निधन झाले. ते आताच्या काळात जन्मले असते तर त्यांच्या साहित्याचे आणि त्यांचे काय झाले असते हा प्रश्न काहींना अस्वस्थ करेल तर काहींना त्यात स्वारस्य नसेल.
बाबा पद्मनजींकडे आज मागे वळून पाहताना त्यांना केवळ ‘पहिले मराठी कादंबरीकार’ किंवा ‘ख्रिस्ती धर्मप्रचारक’ या एका चौकटीत बंदिस्त करणे योग्य ठरणार नाही. ते एका संक्रमणकाळाचे प्रतिनिधी होते. एका बाजूला जन्मजात धर्माच्या रूढींवर प्रश्न उपस्थित करणारा तरुण, दुसऱ्या बाजूला मिशनरी शिक्षणातून आलेली नवी श्रद्धा, तिसऱ्या बाजूला जातिभेद आणि स्त्रीदास्याविरुद्धचा संताप आणि चौथ्या बाजूला वसाहतवादी सत्तेच्या सावलीत उभे राहून भारतीय समाजाचे पुनर्रचन करण्याची आकांक्षा, या सगळ्यांचा संघर्ष त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सतत चालू होता.
त्यांच्या धर्मांतराचे समर्थन किंवा निषेध करण्यापेक्षा त्यांचा काळ समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. कारण बाबा पद्मनजींची खरी कहाणी धर्मांतराची नाही; ती विचारांच्या शोधात निघालेल्या एका तरुणाची, त्या शोधासाठी मोजावी लागलेल्या वैयक्तिक किंमतीची आणि त्या संघर्षातून मराठी भाषेला मिळालेल्या एका नवेपणाची कहाणी आहे असे मनोमन वाटते. त्यांच्या जीवनाकडे आजच्या काळातून पाहताना काही प्रश्न अस्वस्थ करतात. धर्म बदलला की माणूस खरोखरच बदलतो का? सामाजिक सुधारणा आणि धार्मिक प्रचार यांची सीमा कुठे आखायची? एखाद्या समाजातील दोषांवर टीका करताना त्या समाजाच्या सांस्कृतिक गुंतागुंतीशी न्याय कसा करायचा? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, व्यक्तीच्या विवेकाला कुटुंब, जात, समाज आणि धर्म यांच्या सामूहिक अपेक्षांपासून किती स्वातंत्र्य असावे? पद्मनजींचे आयुष्य या प्रश्नांची अंतिम उत्तरे देत नाही; पण ते प्रश्न विचारण्याचे धैर्य नक्कीच देते.
‘यमुनापर्यटन’ने मराठी कादंबरीच्या दारावर पहिल्यांदा जोरदार टकटक केली; ‘अरुणोदय’ने आत्मचरित्राला धर्मांतराच्या अंतःकरणातील संघर्षाचे नवे परिमाण दिले; आणि बाबा पद्मनजींच्या कोशकार, संपादक, मुद्रक आणि लेखक या अनेक भूमिकांनी मराठीच्या आधुनिक सार्वजनिक जीवनाला एक वेगळी दिशा दिली. म्हणून त्यांचे स्थान केवळ मराठी ख्रिस्ती वाङ्मयाच्या इतिहासात नाही; ते एकोणिसाव्या शतकातील भारतीय आधुनिकतेच्या अस्वस्थ, वादळी आणि प्रश्नार्थक प्रवासात आहे.
– समीर गायकवाड


GIPHY App Key not set. Please check settings