in

मी एक नाट्यप्रेक्षक

आमच्या वर्धेला नाटक फारसे व्हायचे नाहीत. झाले तर कोकणातील दशावतारी नाटकांसारखे रामायण किंवा महाभारताचे रात्रभर चालणारे प्रयोग व्हायचे. मी बहुदा चौथीत असेल वर्धेला राधाबाई बुधगावकर संचाच्या ‘सदूचे लग्न’ या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग होता. प्रयोग खुल्या मैदानात होता. नाटकाची भरपूर प्रसिद्धि झाली होती. आमच्या वाड्यातली सर्व मंडळी नाटकाला गेली होती. वडिलांनी पैसे न दिल्याने मी जाऊ शकणार नव्हतो पण सारेच जात आहेत तर आपणही जायला पाहिजे असा विचार करुन तिथे पोहचलो. त्या पटांगणाला तारेचे कुंपण होते त्याच्या आता पांढरे पडदे लावले होते त्याच्या आत नाटक सुरु होते. तिकिट न काढता आत जायचे म्हणजे ते तारेचे कुंपण वर करुन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. इथवर आलो तर कुंपण ओलांडायलाच हवे. मी तारेच्या कुंपण वर करुन आत जात असताना कुणीतरी बघितले. तो ओरडला मी त्याची पर्वा न करता आत शिरलो. त्या धावपळीत माझा शर्ट त्या तारेत अडकला. तार आणि शर्टाचे कापड दोघांनाही त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार वर्तन केल. तो शर्ट फाटला. मला तिकडे बघायला वेळ नव्हता. मी दुर्लक्ष करीत पुढचा पांढरा पडदा वर करुन नाटकाला आलेल्या गर्दीत मिसळलो. आत गेल्यावर माझ्या लक्षात आले की शर्ट मानेपासून पाठीपर्यंत चांगलाच फाटला होता. मी तसाच फाटका शर्ट घालून संपूर्ण नाटक बघितले. नाटक विनोदी होते नाटकातील  मुख्य कलाकार तृतीय पंथी पात्राची भूमिका करीत होता. त्यानी मिळविलेल्या हशा आणि टाळ्या आजही लक्षात आहेत. नंतर हे सार हुंड्याचे प्रकरण आहे हे लक्षात येते आणि तेच तृतीय पंथी पात्र इन्सपेक्टरच्या रुपात पुढे येते. तरीही टाळ्या पडतात. नाटक संपून घरी जायला उशीर झाला. घरी आल्यावर वडिल वाट बघतच होते. आमच्या घरी एक कुणी घरजोडे नावाचे व्यक्ती येऊन गेली होती. त्यांची एक वेताची काठी ते आमच्या घरी विसरले होते. ती काठी आम्हा मुलांसाठी शाप होता. वडील ती काठी हातात घेऊनच वाट बघत होते. घरी यायला उशीर झाला चौथीतला पोरगा रात्री दहा वाजता घरी येतो म्हणजे उशीरच झाला होता. त्यात फाटका शर्ट तेंव्हा कुठे गेला होता? इतक्या रात्री काय करत होता? हे प्रश्न विचारायचा धीर त्यांच्याकडे नव्हता. त्यांच्या हातातली काठी वळवळत होता. कुठलाही प्रश्न न विचारता आधी पाठीत जोरात धपाटा दिला. मग त्या वेताची काठीने पायावर सपासप मार पडत प्रश्नांचा भडिमार सुरु झाला. कुठे गेला होता? काय करीत होता? कुठे जाऊन मारामारी करुन आला होता की शर्ट फाटला? सारा प्रकार खराखरा सांगतिला. दुसरा पर्याय नव्हता. त्याचा परिणाम भरपूर पिटाई होण्यात झाला. त्यानंतर फुकट जाऊ द्या पण पैसे देऊन सुद्धा नाटक बघायचे म्हटले की तो मार आठवत होता. ते पायावर पडलेले वळ आठवत होते. सदूच्या लग्नाचा असा परिणाम झाला की स्वतःच्या लग्नात शर्ट फाटायची भिती वाटत होती. शर्ट फाटला तर मार पडणार भलेही मी नवरा का असेना. अशा रितीने सदूचे लग्न या नाटकापासून माझा नाट्य प्रेक्षक म्हणून प्रवास सुरु झाला.

थोडं अवांतर पण महत्वाच. राधाबाई बुधगावकर या सांगली भागातील पण काही कारणांनी पूर्वीच्या संयुक्त आंध्र मधील अदिलाबादला स्थिरावल्या. अदिलाबाद महाराष्ट्राला अगदी लागून आहे. विदर्भ संपल्यानंतर  तेलंगणातले पहिले गाव म्हणजे अदिलाबाद किंवा तेलंगण प्रातांतले शेवटले मोठे गांव म्हणजे अदिलाबाद. राधाबाई बुधगावकर यांनी सामाजिक विषयावरील मराठी विनोदी नाटके केली. विनोदासोबत समाज प्रबोधन असा त्यांच्या नाटकांचा आशय असायचा. सदूचे लग्न हे प्रचंड गाजलेले नाटक होते. त्यांच्या नाटकांचे प्रयोग विदर्भातील हिंगणघाट, भांदक, राजुरा अशा तालुक्याच्या ठिकाणी देखील मोठ्या पटांगणात हाऊसफुल होत असत. हजारो प्रेक्षक बघत असत. हैदराबाद आणि तेलंगणा प्रांतातील बऱ्याच गावात त्यांनी हाऊसफुल प्रयोग केले. सदूचे लग्न या नाटकाचे हजाराच्यावर प्रयोग झालेत. आज महाराष्ट्रातील बहुतांश जनतेला राधाबाई बुधगावकर यांचेविषयी माहिती नाही. सरकारी मानसन्मान देखील फारसे मिळाले नाही. मराठी म्हणून आंध्र सरकारने दखल घेतली नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणून महाराष्टाच्या सरकारने दखल घेतली नाही. मला वाटते अमराठी भागातील मराठी कलाकारांची ही शोकांतिका सर्व क्षेत्रात आणि सर्व प्रांतात साऱखीच आहे.

मी शाळेत असताना एका नाटिकेत भूमिका केली ती देखील नाट्यप्रेक्षकाचीच होती. त्यात खरोखरच प्रेक्षकांत बसायचे होते आणि प्रेक्षकात बसून ‘एक हजार’ येवढेच म्हणायचे होते. तसे एका छोट्या नाटिकेत दादोजी कोंडदेव यांची भूमिका केली होती. थांबला तो संपला या नात्याने आपण जर संवाद बोलताना थांबलो तर विसरुन जाऊ अशी भिती होती. मी स्वतःचेच काय सर्वांचेच संवाद पाठ केले. नाटकात सारी वाक्ये नॉन स्टॉप ट्रेन सुटल्यासारखी धडधड म्हटली. पुढचा थांबला तर त्याच्या वाक्यापासून सुरु करुन आपले संवाद म्हटले. त्या ट्रेनचा वेग असा प्रचंड होता की कुणाला ते ऐकायला देखील वेळ मिळाला की नाही.  लिखाणाचा प्रयोग देखील शाळेत असतानाच करुन बघितला.  एक विनोदी नाटिका लिहिली आणि आमच्या वर्ग शिक्षेकेला वाचायला दिली. शिक्षिकेनं फक्त ‘हूं’ असे म्हटले आणि न वाचताच परत केली. साभार परत हा शब्द त्यावेळी ऐकला नसेल तरी त्या शब्दाचा अर्थ मात्र तेंव्हाच समजला. शाळेत असतानाच कानाला खडा लावला यापुढे नाटक बघण्याचा किंवा त्यात काम करण्याचा किंवा लिहिण्याचा प्रयत्न करणार नाही. शाळा संपेपर्यंत हे कटाक्षाने पाळले.

नाटक हा प्रेक्षकांत बसून बघण्याचा, मनमुराद आनंद लुटण्याचा प्रकार आहे हे मुंबईला गेल्यावर उमजले. मुंबईला असताना आम्हा मित्रमंडळींना सिनेमा पेक्षाही नाटक बघायला आवडायचे. त्याकाळात सुरु असलेली बहुतेक सर्वच नाटके बघितली. नाटकाव्यतिरिक्त नाटक बघायचे आणखी एक कारण होते नाटकाला येणारा सुंदर प्रेक्षकवर्ग. नाटक कंटाळवाणे झाले तर फक्त नजर फिरवायची मग कधी सलवार तर कधी जिन्स, कधी शेपटे तर कधी पिन कुठेतरी मन रमायचे. तिकिट वसूली होऊन जायची.  मुंबईच्या त्या लोकलच्या गर्दीत हे सोंदर्य कुठे हरवते आणि अचानक नाटकाच्या गर्दीत किंवा मंदिरांच्या रांगेत कसे उगवते हे आजपर्यंत न उलगडलेले कोडे आहे. पार्ल्यात राहत असताना व्यसन लागल्यासारखे दर शनिवार रविवार नाटक बघत होतो. एकदा जाऊ बाई जोरातचा दुपारचा प्रयोग दादरला आणि गेला माधव कुणीकडेचा रात्रीचा प्रयोग पार्ल्याला बघण्याची कसरत केली होती. पार्ल्यात असताना प्रशांत दामले यांचे  ‘एका लग्नाची गोष्ट’ हे नाटक जोरात चालू होते. त्याकाळात त्या नाटकाचा पार्ल्यातील प्रयोग कधी चुकवल्याचे आठवत नाही. तसेही त्या नाटकात प्रशांत दामले यांचे टायमिंग, रंगमंचावर कविता लाड आणि प्रेक्षकांत पार्ल्यातील मुली याशिवाय काय बघण्यासारखे आहे असे आम्हा मित्रमंडळींचे मत होते. पुढे पार्ल्याहून बोरीवलीला शिफ्ट व्हावे लागले. तिथेदेखील त्याच कारणांसाठी एका लग्नाची गोष्ट बघत होतो पण त्याकाळच्या बोरीविलीत नाटक कधी रंगले नाही.  त्यामुळे आम्ही एका लग्नाची गोष्ट बघायला पार्ल्यात जायचो. बोरीवलीत मजा यायची ‘यदाकदाचित’ किंवा ‘वस्त्रहरण’ बघायला. ‘वस्त्रहरण’ बघताना प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या वास्तूला हशा आणि टाळ्यांमुळे तडे जातात की काय असे वाटायचे. हळूहळू आमचे गणित ठरले. खास मराठी मध्यमवर्गीयासाठी लिहिलेली घरगुती धाटणीची नाटके असली तर आम्ही पार्ल्यात येऊन बघत होतो. वस्त्रहरण. यदाकदाचित सारखी नाटके असेल तर  बोरीविलीत बघत होतो.

विनोदी नाटकांसोबत काही गंभीर नाटके देखील बघितली पण त्यात मजा येत नव्हती. असे एकदा सहज म्हणालो तर माझ्या कंपनीतील एक गोखले नावाचा माझा सहचारी माझ्यावर भडकला. त्याने माझे अभिरुची, अभिव्यक्ती, अभिनय संपन्नता, आशयघन अशा जड विषयावर अर्धा तास बौद्धिक घेतले. आमची बौद्धिक कुवत फार कमी त्यामुळे आमच्यावर त्या बौद्धिकाचा फार परिणाम झाला नाही. गोखले सुनावत होता “तुमच्या सारख्या अभिरुचीहिन प्रेक्षकांमुळे मराठी नाटकांचा दर्जा खालावत चालला आहे. असेच चालत राहिले तर काही दिवसांनी मराठी नाटक म्हणजे फक्त रंगमंचावर करायच्या कसरतींचा खेळ होईल. आशय हा नाटकाचा गाभा आहे. आशयहिन कसरतीच बघायच्या असतील तर सर्कस काय वाईट आहे.” हे कोणत्या नाटकातले वाक्य आहे असे विचारायची माझी खूप इच्छा होत होती पण मी स्वतःला आवरले. गोखले खूप भडकला होता. नाटक हा गोखलेचा जिव्हाळ्याचा विषय होता त्याविषयी त्याची मते प्रचंड आग्रही होती. माझ्यासारखे प्रेक्षक नाटक बघतात त्यामुळे बिचाऱ्या गोखलेसारख्या दर्दी प्रेक्षकांची पंचाईत होते असा विचार मी कधी केला नव्हता. काही क्षण वाईट वाटले. आता डोळ्यात पाणी वगैरे येते की काय असे उगाच वाटले. थोड्याच वेळात आमच्यातला कोडगेपणा जागा झाला. मनाने मनाची समजूत काढली अरे गोखले जर दर्दी पेक्षक असेल तर आपण बेदर्दी प्रेक्षक आहोत. त्याला जे आवडते ते तो बघणार मला जे आवडते ते मी बघणार.

चंद्रलेखाने त्याकाळी फुलराणी नाटक अधिक श्रीमंत करुन रंगमंचावर आणले होते. त्यावर वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरुन त्यातले नेपथ्थ, प्रकाश योजना, गाणी याचे कौतुक छापून येत होते. मी नाटक बघितले पण मला ते तितके आवडले नाही. अमृता सुभाषचा आवाज पोहचत नाही आणि अविनाश नारकर जास्त स्टाईल मारतो एवढीच आमची तक्रार होती बाकी ठिकठाक होते. फारिस्टाच्या शापामधले गाणे मात्र प्रचंड आवडले होते. नाटक बघून आल्यावर एक दिवस मी गोखलेची चावी फिरविली

“काय गोखले फुलराणी बघितले की नाही तुमच्या सारख्या दर्दी प्रेक्षकांसाठी आहे. पुलंचे अभिजात नाटक श्रीमंत करुन रंगमंचावर आणलेय ” गोखले काय भडकला म्हणून सांगतो.

“श्रीमंत? एखाद्या उत्तम कलाकृतीचे कसा कचरा करावा याचे याहून चांगले उदाहरण सापडणार नाही.”  गोखलेच्या या पलटवारामुळे मी दचकलोच.

“मूळ कुणी लिहिले आहे माहिती आहे.”

“नाही” खरतर शॉने लहिले माहिती होते पण उगाच अज्ञानाचे पांघररुन पांघरले की पुढचा आणखीन सुटतो हा अनुभव गाठीशी होता.

“जॉर्ज बर्नाड शॉ.  पण पुलंनी त्याचे काय अप्रतिम मराठीकरण केले. मराठी माणसाला ती कथा आपली वाटते तरीही मूळ कथेला कुठेही धक्का पोहचत नाही.”

“ठिक आहे रे. यांनी यांच्या पद्धतीने केले” माझे चावी फिरविणे सुरुच होते.

“शॉ आला होता तुमच्या घरी का पुल आले होते सांगायला माझे नाटक करा म्हणून मग कशाला शहाणपणा करताय.” लेखकांने निर्मात्याची घऱी जाऊन चपला घासल्याशिवाय निर्माते नाटक करीत नाही हे खरे असले तरी पुलं किंवा शॉ कुणाच्या घरी जाणार नाही.

” मोठे सेट केले, मधेच आठदहा गाणारे येऊन गाणं म्हणतात आणि निघून जातात. हा काय सिनेमा आहे की संगीत नाटक त्याने कथा पोहचत नाही.” खरतर मला नाटकातील गाणी आवडली होती गोखलेला नेमकी तिथेच आपत्ती होती.

” वस्त्रहरण बघा एक साधी गोष्ट किती मस्त फुलविली आहे. एका गावात स्त्री पात्र करायला नट मिळत नाही बास. पुढे फक्त टीमवर्क. याला म्हणतात नाटक. तुम्ही काय करताय कशाशी काहीच सुसंगत नाही.”

गोखले अर्धा तास तरी बोलत होता. गोखलेला वस्त्रहरण मालवणी नाटक आवडते हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. नाटक विनोदी आहे की गंभीर, ते मालवणी आहे की प्रमाण मराठीत याविषयी गोखलेची तक्रार नव्हती तर ते कशाप्रकारे प्रेश्रकांसमोर येते यावर त्याला आपत्ती होती. गोखले खरोखर मराठी नाटकांचा दर्दी प्रेक्षक होता आमच्यासारखा नव्हता. खरंतर गोखलेने आम्हाला आमची पायरी दाखवली होती पण त्याचे वाईट वाटले नाही. शेवटी प्रेक्षक हाच नाटकाचा केंद्रबिंदू आहे हेच खरे आहे. रिकाम्या प्रेक्षागृहात नाटक कुणासाठी करणार. प्रत्येक नाटकाला सदूचे लग्न सारखे हजारो प्रेक्षक यायलाच हवे असे नाही. नाटक ज्या प्रेक्षकांसाठी केले आहे त्यांच्यापर्यंत मात्र ते पोहचायला हवे हे खरे आहे. एकच नाटक प्रेक्षक डोक्यावर घेउन नाचतो तर तेच नाटक प्रेक्षक पहिल्या अंकातच बसवतो. हा प्रत्यय पुढे लग्नानंतर पुण्याला आलो तिथेही आला. मी बायकोला घेऊन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरुडला ‘यदाकदाचित’ नाटक बघायला गेलो होतो. नाटकाला येऊन दोन तीन वर्षे झाली होती त्यामुळे अर्ध्याहून जास्त नाट्यगृह रिकामे होते.  आमची तिकिटे दुसऱ्या रांगेतली होती पण पुढची रांग पूर्ण रिकामी असल्याने तिथे बसलो. नाटक पूर्ण थंड गेलं, प्रेक्षकांतून हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. बायकोला तर अजिबात आवडलं नाही. बायकोच्या मनात माझ्या अभिरुचीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मला देखील बोरीवलीत यायची तशी मजा आली नाही. भक्तीगीतांची अपेक्षा ठेउन आलेल्या प्रेक्षकांसमोर लावणी सादर झाल्यानंतर जो धक्का बसेल तसे भाव प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर होते. कुणी हसतच नव्हते. मला हसायला आले तरी मी जोरजोरात हसू शकत नव्हतो. शेवटी नाटक हे प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात यावरच उभ राहतं. एकाच वाक्याला किंवा प्रसंगाला दोन प्रेक्षक सारखाच प्रतिसाद देतील असेही नाही.  बडा खयाल गाताना गवयी तानावर ताना घेतोय पण टाळ्या किंवा वाहवा मिळाली नाही तर पुढची तान घ्यायची त्याची इच्छा होईल का. तसेत प्रेक्षक जर नाटकांत गुंतला नाही तर कलाकारांना देखील काम करण्यात मजा येणार नाही. गायकांकडे लगेच तिहाईवर यायचा पर्याय असतो नाटकवाल्यांचे बिचाऱ्यांचे तसे नाही.  

प्रेक्षक नाटकांत रमला नाही तर नाटक रंगत नाही याचा अनुभव मला हैदराबादला मोसंबी नारंगी हे हिंदी नाटक बघताना देखील आला होता. व्योमकेश बक्षीकार रजित कपूर सारखे कलाकार असूनही नाट्यगृह अर्थेच भरले होते आणि मध्यंतरानंतर अर्धे प्रेक्षक घरी गेले. तांत्रिक दृष्ट्या  नाटक उत्तम होते, विशेषतः ध्वनी निर्मिती आणि प्रकाश योजना उच्चकोटीची होती असे असले तरी सलग कथा नसल्याने नाटक प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकत नव्हते. याचा अर्थ प्रयोग करु नये असा होत नाही प्रत्येक प्रयोगाला किती प्रेक्षक येऊ शकतील हे महत्वाचे आहे. अगदी दशावतारी नाटकांच्या प्रयोगांपासून ते समांतर नाटक चालूच राहिले पाहिजे ज्याची जी आवड आहे तो प्रेक्षक येतच राहणार. आपला प्रेक्षक कोण आहे याची जाण नाटक करणाऱ्याला असली पाहिजे.

मी हैदराबादला आल्यावर काही मंडळींनी मला नाटकात काम करायची संधी देण्याची जोखीम उचलली. बिचारे तोंडघाशी पडले मी तोंड वर करुन बोलल्याने त्यांना तोंड दाखवयला जागा उरली नाही. हा चेहराच तसा आहे कितीही रंग फासा काही उपयोग होत नाही. छोट्या नाटिकेमधे चेहऱ्याला रंग फासून रंगमंचावर प्रवेश करण्याचा प्रयोग पूर्णपणे फसला. मला स्वतःला देखील फार आवडले नाही. नाटकात एंट्रीच्या आधी जो पोटात गोळा येतो, जी धडधड वाढते, संवाद विसरण्याची भिती वाटते, ब्लँक होत ते आठवले की वाटते नको रे बाबा. त्यापेक्षा मी कुठेतरी कुणाच्या लक्षात येणार नाही असा कोपऱ्यात बसतो, वाक्य आवडले की अगदी मनापासून जोरात टाळ्या वाजवतो, हसायला आले की मनमुराद दिलखुलास असतो. एक नाट्यप्रेक्षक म्हणून मला जो निर्भेळ आनंद मिळतो तो नाटकासंबंधित इतर भूमिकांमधून मला मिळेल असे मला वाटत नाही. म्हणून मी सदैव एक नाट्य प्रेक्षक.    

​Read More 

What do you think?

Written by Mitraho

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

पुत्र लाभला ऐसा.

‘चोरबागान’ दुर्गापूजेचा इतिहास आणि उत्सवाला लागलेले गालबोट!