in

घरातली हिरवाई

   घरातली हिरवाई 

          बागकाम हा माझ्यासह सर्व कुटूंबियांचा छंद आहे. आम्ही बंगला अर्थात घर बांधले. त्या ठिकाणची जागा मुरमाड व खडकाळ आहे. अशा जमिनीत आम्हाला बाग फुलवायची होती. रिकाम्या जागेत ठराविक अंतरावर खड्डे खोदून घेतले. दगड , मुरूम बाजूला करून माती घातली. त्यात नारळाची चार झाडे, कडिलिंब, आवळा, पेरू, चिक्कू ,लिंबू, अशोक ही झाडे लावली. मोठ्या झाडांच्या मध्ये गुलाब, जाईजुई, मोगरा अबोली इ.फुलांची व तुळस, गवती चहा, अडुळसा इ.औषधी वनस्पती लावल्या. नळाला पाणी कमी आले तर जवळच्या हापसा बोअरिंगचे पाणी घालण्याचे काम सर्व कुटूंबियांनी केले. नारळाच्या झाडांना तुरे आले.  शहाळी  लागल्या ते पाहून सर्वांना खूप आनंद झाला.  पण एकाएकी शहाळी गळून पडू लागल्या. नारळाची झाडे निस्तेज दिसू लागली. जाणकारांच्या सल्ल्याने खोडांवर पत्रे मारून घेतले.  झाडांना इंजेक्शनस् दिले पण झाडे टिकली नाहीत. खूप वाईट वाटले.


       थोड्याच दिवसानंतर सफाई करून त्याठिकाणी सीताफळ, पपई, शेवगा, सोनचाफा इ. झाडे लावली. पुन्हा खतपाणी घालून  झाडे वाढवू लागलो. भाज्यांचे देठ, सुकलेली पाने व माती घालून  कंपोस्ट खत तयार करून घालू लागलो. झाडांना प्रोटिन्स मिळावेत म्हणून अंड्यांची टरफले, केळीच्या सालींचे तुकडे,  चहा गाळून राहिलेली चहापावडर घालून झाडे वाढवू लागलो.


         आज आमच्या बागेतील चार झाडांना गाभेदार सिताफळे लागतात. लिंबूचे  झाडही खूप पसरले असून भरपूर रसाळ लिंबू निघतात. आवळ्याच्या झाडाला वर्षातून दोनदा भरमसाठ आवळे लागतात. घरी खाऊन पाहुणे व स्नेह्याना फळे देताना मनस्वी आनंद होतो. अचानक सत्कार समारंभाला निघताना माझी सून हिना कर्दळ, गुलाब, उपलब्ध फुलापानांनी सुंदर बुके तयार करून देते. मोगरा , कुंदा अबोली इ. फुलांचे गजरे करून मैत्रिणीना देतांना खूप आनंद वाटतो. आमच्या बागेत अळूची व खाऊची कलकत्ता पाने आहेत.  अळूची पाने वडीसाठी शेजारी जातात.  खाऊची पाने देवपूजेला    जातात. ऐन उन्हाळ्यात मोगरा फुलतो. दुसऱ्या मजल्यावर बेडरूमच्या खिडकीतून सुगंधाची बरसात होते, ते दिवस सोनेरी असतात.


       कोरोना लॉकडाऊनच्या काळात बातम्या ऐकून मन विषण्ण व्हायचे अशावेळी मी बागेत जात असे. झाडेवेली माझ्याशी बोलायच्या ‘ का दुःखी होता तुम्ही? आम्ही बघा ऊन, वारा, पाऊस झेलून कसे आनंदाने जगतो. फुले म्हणायची  आमचं आयुष्य एकदोन दिवसाचं तरी आम्ही आनंदाने फुलतो, डुलतो. या संवादाने मनाला धीर मिळायचा.


      माझे चिरंजीव मोहसीन व सून हिना प्रत्येक वाढदिवसाला एकमेकांना रोप लावलेली एक कुंडी भेट देतात. त्यामुळे बागेत ऍडेनियम, अलमांडा, काॉसमास,  सदाफुली, अनंत व विविध शोच्या कुंड्यानी वरच्या मजल्यावरच्या गॅलरीला सुशोभित केले आहे. गूळवेल,मनी प्लँट या वेलीनी बाग  नटली आहे.


      आमचे स्नेहीजन आमच्या घराला कोकणातील घर म्हणतात. ते ऐकून मन आनंदाने बहरते. असे आहे आमचे घर हिरवाईने नटलेले, मग येताय ना घरी ?

 दैनिक सकाळ ‘मैत्रीण ‘ या विभागातील ‘ घरातली हिरवाई ‘ या सदरात १८/६/२०२६ रोजी प्रकाशित झालेला लेख.

Read More 

What do you think?

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

स्नेहवन