in

माझी सोनुली-सोनुली

 माझी सोनुली-सोनुली

       


                                 फोटो साभार: गुगल



         नको नको, पाहू या नंतर म्हणत ढकलत पुढे नेलेला माझ्या आयुष्यातील तो सोनेरी क्षण आला. माझ्या माहेरच्या अंगणाची सय संपली. २५ मे १९८० रोजी माझा भैय्या सौ. बिस्मिल्लाशी व मी मन्सूरसाहेबांशी एकाच मंडपात, एकाच मुहूर्तावर विवाहबध्द झालो. मला समजून घेणारे समजूतदार-समंजस, आमच्याप्रमाणेच गरिबीचे चटके सोसलेले जीवनसाथी मला लाभले. सुखा समाधानाचा संसार सुरू झाला. आर्थिक परिस्थितीची रेल्वे सुधारणेच्या रूळावरून झुक् झुक् करत धावू लागली. हे सबरजिस्ट्रार ऑफिसमध्ये क्लार्क पदावर विटा ता. खानापूर जि. सांगली येथे कार्यरत होते. माझी प्रेमळ आजी लग्नानंतरही माझ्यासोबत होती कारण हे वीकएंडला इकडे यायचे. ‘आजीची फार लाडकी आहेस नांदायला जाताना बरोबर नेणार का ?’ असे लहानपणी लोक विचारायचे. त्यांना आता मी म्हणून दाखवायची ‘बघा आजीला आणलय की नाही सासरी’.


        मातृत्व हा स्त्रीला मिळालेला सर्वात श्रेष्ठ, सर्वांत सुंदर अलंकार आहे. १९८२ सालाच्या सुरूवातीलाच मला मातृत्वाची गोड चाहूल लागली. दोन्ही परिवार आनंदात बुडून गेले. सर्वांनी खूप कोडकौतुक केले. माहेरच्यांनी आर्थिक ओढाताण असतानाही थाटामाटात डोहाळजेवण केले. माझी आई डिलेव्हरीसाठी माळवाडीला नेण्यासाठी आली. हे आईला म्हणाले, “तुमच्या गावात दवाखान्याची सोय नाही. इथेच राहू द्या तिला तुम्हीच इकडे या रहायला.” आई म्हणाली, “जावईबापू आमच्या गावात दवाखाना नाही म्हणता हे अगदी बरोबर आहे पण आमच्या गावातील सर्व स्त्रियांच्या डिलेव्हरी सुखरूप होतात म्हटलं, तुमच्या बायकोची व बाळाची आम्ही काळजी घेवू.” आईच्या या वक्तव्याने हे निरूत्तर झाले व मला आई माळवाडीस घेवून गेली.


        ६ सप्टेंबर १९८२ रोजी परमेश्वराने मला पहिल्यांदा आई होण्याचा बहुमान दिला. अतिशय अशक्त असलेली मी पहिलटकरीन असून घरात सुईणीच्या देखरेखीत आई झाले. आईवडिलांना खर्च नको, त्रास नको या तीव्र इच्छाशक्तीमुळे डिलेव्हरीच्या अनंत यातना सोसण्याचं बळ देवाने दिले. एका छान, नाजूक, गोऱ्यापान गुलाब कळीने माझ्या पोटी जन्म घेतला. बाळाचं सुहास्य मुख पाहताच सर्व वेदना विसरून गेले. आई झाल्याच्या धुंदीत मी स्वर्गीय आनंदात डूंबून गेलेली असतानाच बाळाला न्हायला घालताना तिच्या पाठीवर जखम असल्याचे निदर्शनास आले. आई-आजी-वहिनी आपसात कुजबुजू लागल्या. फॅमिली डॉक्टरांना दाखवताच ते गंभीर झाले व माझ्या काळजात चर्र झाले त्यांनी तिला सांगलीतील चिल्ड्रन स्पेशालिस्ट डॉ. करमरकरना दाखवा असे सांगितले. मला व बाळाला घेवून स्पेशल गाडी करून जाण्यासारखी परिस्थिती नसल्याने गावात मुक्कामाला येणाऱ्या एकुलत्या एक एस.टी.ने माझी आई व मावस बहीण बाळाला घेवून गेल्या. डॉक्टरांनी सांगितले की या बाळाला लवकरात लवकर सिव्हील हॉस्पिटलला एडमिट करा. खूप चिंता वाटली. हे आल्यावर पाचव्या दिवशीच एस.टी.ने सिव्हिल हॉस्पिटलला घेवून गेलो. 


       एवढ्याशा चिमुकलीला घेवून एक्स रे, ब्लड टेस्ट, युरिन टेस्टसाठी इकडे तिकडे फिरावे लागले. बाळाला घेवून मी पाचव्या दिवशीच भरभर जीने चढत धावू लागले. पुढचे बारा दिवस एडमिट करावे लागले. बाळाला चिल्डून यार्डात एडमिट करावे लागल्यामुळे त्या ठिकाणी फक्त बाळासाठी तयार केलेले कॉटस होते. मला त्यावर झोपता येत नव्हते. हवं असेल तर तुम्ही डिलेव्हरीच्या वार्डात एडमिट व्हा. बाळ इथेच राहील असे सांगण्यात आले. इवल्याशा बाळाला तिथे सोडून जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे मी दिवसभर बाळाजवळ बसून रहायची. परमेश्वराचा धावा करत. दर पंधरा मिनिटाला शिकावू डॉक्टर यायचे, स्पेशालिस्ट यायचे, तपासायचे, तपासणी केल्यावरचे त्यांचे चेहरे पाहूनच बाळाच्या तबेत्तीची गंभीरता माझ्या लक्षात येवू लागली. बाळ एक पाय हलवत नसल्याचेही लक्षात आले. काळजी वाढू लागली. माझा छोटा भाऊ सांगलीला कॉलेजला यायचा. येताना जेवणाचा डबा घेवून यायचा पण तो पोहोचायचा साडेआठ वाजता. सकाळी ८ ते १२ वार्डमध्ये एका नातेवाईकाशिवाय कुणालाही थांबायची परवानगी नव्हती. त्यामुळे आई स्टोव्ह तांदूळ घेवून खाली जायची व मी बाळाजवळ थांबायचीं पहाटे उठून केलेला डबा बारानंतर मला मिळायचा. एवढं गार जेवण बाळंतिणीने खायचे नसल्यामुळे मी थोड्याशा गरम् भातावरच भागवत असे. संध्याकाळीही फक्त भातच खावा… लागायचा. हे सर्व मी आनंदाने सहन करत होते. माझ्या  लाडक्या बाळासाठी.


        मला वाटायचे एखाद्या डॉक्टरांनी यावे व म्हणावे या बाळाला काहीच झाले नाही. थोडासाच दोष आहे व तो औषधाने बरा होण्यासारखा आहे. मी बरं करू शकतो या बाळाला. मी डोळ्यात जीव आणून, कान टवकारून उभी असायची आणि डॉक्टर काही न बोलताच निघून जायचे. मी उदास व्हायची. तोपर्यंत बाळ रडायचे, तिला भूक लागलेली असायची. हे पाहून मला माझे बाळ नॉर्मल नाही हे लक्षातच येत नव्हते. तिला बरी कर हे देवाला परोपरीने मी सांगत होते. प्रार्थना करत होते.


       पहिल्यांदा मातृत्वाचं वरदान लाभलेली मी चिंतेचं मोठं गाठोडं डोक्यावर घेऊन परमेश्वराकडे आर्त विनवणी करत होते. बारा दिवसानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधून डिसचार्ज मिळाला. या कालावधीत यांच्या ऑफिसमध्ये असेलेल्या देवर्षी मॅडम् बाळाला बघण्यासाठी आल्या. येताना एक भाकरी, वरण व भेंडीची भाजी घेऊन आल्या. त्या भाकरीची गोडी एवढ्या वर्षानंतरही मी विसरू शकले नाही. बाळाला मिळालेल्या थोड्याशा पाण्यातच माझेही अंग पुसून घ्यायची. अंगाला पाणी व डोळ्यांना झोप क्वचितच मिळाली. हे सर्व सहन करण्याची क्षमता दिल्याबद्दल देवाचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत…


       बघता बघता चाळीस दिवस संपत आले. बाळाला पाळण्यात घालून तिचे नांव, मलिका ठेवले. पाठीची जखम दररोज ड्रेसिंग केल्यामुळे बरी होऊ लागली. मी शाळेत हजर होण्यासाठी जयसिंगपूरला आले. बाळाला न्हायला घालायचे, ड्रेसिंग करून आजीच्या स्वाधीन करून शाळेत जायची. बाळाला बघण्यासाठी मैत्रिणी, ओळखीच्या स्त्रिया यायच्या बाळाला बघून त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव मी टिपण्याचा प्रयत्न करायची. त्याचवेळी मला समजायचे माझं बाळ अशक्त आहे. बघायला येणारे प्रत्येकजण वेगवेगळ्या डॉक्टरांबद्दल सांगायचे, आणि दुसऱ्याच दिवशी बाळाला घेऊन आम्ही तिथे हजर रहायचो. मिशन हॉस्पिटलमध्ये खात्रीपूर्वक इलाज होतात हे ऐकून तिथे बाळाला घेवून गेलो. तपासणी नंतर डॉ. यजुर्वेदीनी वस्तुस्थिती सांगितली व हसत हसत म्हणाले, ‘मॅडम हिला आहे तोपर्यंत सांभाळा व दुसरा चान्स घ्या’. डॉक्टरांचे ते बोलणे ऐकून आभाळ कोसळले, चक्कर आली. पण मी आशा सोडली नव्हती, आयुर्वेदिक, होमिओपॅथीक सर्व डॉक्टरांना भेटले बरं करा हो माझ्या सोनुलीला असे कळवळून सांगितले. डॉक्टर म्हणायचे, ‘प्रयत्न करू या’ चिल्ड्रन स्पेशालिस्ट डॉ. आनंद भिंगे यांना भेटले व सांगितले, ‘डॉक्टर वाट्टेल ते करा, ऑपरेशन करा पण हिला बरी करा.’ दोन दिवसांनी त्यांचे मित्र पुण्याहून येणार होते. त्यांना दाखवून बघू या असं डॉक्टरांनी म्हणताच मला आशेचा किरण दिसला, डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेपूर्वीच बाळाला घेऊर हजर झाले. त्यांनी तपासणी केल्यावर सांगितले, ‘ऑपरेशन करून फारसा उपयोग होईल असे वाटत नाही, उलट आहे त्या स्थितीत औषधोपचार ठेवले तर कदाचित थोडीफार सुधारणा होईल. फॅन चालू असताना दुरुस्ती करणे जितके अवघड तितके हे ऑपरेशन अवघड आहे.’ अश्रुंचा बांध आवरत घरी आले. बाळाला मांडीवर घेऊन म्हणू लागले.


बाळा! तुझ्यासाठी स्वर्गात जाऊन मागितली असती दाद

पण जन्म घेतलास कलियुगात, येथे घेतो कोण कुणाची दाद


        ईश्वरा, तुला तरी ऐकू येईल कारे माझा साद! दिवसामागून दिवस जात होते. बाळाच्या पाठीची जखम पूर्ण भरली. खूप बरे वाटले, पण तो केवळ आभास होता. जखम बरी झाल्यावर बाळाच्या डोक्याचा आकार वाढू लागला. तिला दवाखान्यात नेऊन दाखवणे चालूच होते. १४ जानेवारी १९८३ हा संक्रातीचा दिवस होता. शाळेला सुट्टी होती. बाळाला डॉ. जमादार यांच्याकडे घेऊन जायचे ठरले होते. बाळ पहारटे उठले होते, दुग्धपान करून झोपवताना टकमक बघत होते. आजी म्हंणाली ‘तू लाल स्वेटर घातला आहेस म्हणून बघत असेल’. तिला झोपवून मी ही झोपले सकाळी ६.३० ला आजीने उठवले. मी . उठल्यावर हात हलवणारी मलिका हात का हलवली नाही म्हणून बघते तर माझी मलिका माझा डोळा चुकवून देवाघरी निघून गेली होती. शेजारचे लोक जमा झाले. हे त्यावेळी आटपाडीला होते. फोनची सुविधा नव्हती. आक्रंदन करणाऱ्या मनाला शांत करून, नव्हे काळजावर दगड ठेवून मी शेजाऱ्यांना सांगितले की बाळाचा अंत्यविधी माझ्या माहेरात होईल. तुम्ही आटपाडीला ग्रामपंचायतीतं फोन करा व माळवाडीला येण्यास सांगा व एक रिक्षा ठरवून द्या. शेजाऱ्यांनी फोन करून रिक्षा आणली व शेजारच्या १४-१५ वर्षाच्या रघूला आमच्यासोबत पाठविले. दुःखाने गर्भगळीत झालेली. हातपाय गळालेली आजी थरथर कापत होती. तिला आधार देत, लाडक्या सोनुलीचं कलेवर छातीशी घट्ट धरून मी माहेरी निघाले होते. माझं बाळं पूर्वजांच्या सोबत रहावं. ईदच्या नमाज नंतर नातेवाईकांकडून तिच्या मृतात्माला सलाम मिळावेत ही अपेक्षा ठेवूनच मी माहेरी जाण्याचा निर्णय घेतला; कारण माझं सासर माहेरच्या मानाने खूप लांब होते. माहेरात गेल्यावर आईच्या गळ्यात पडून हंबरडा फोडला..


       त्यावेळी मला जाणीव झाली की जगात अनेक दुःखे आहेत पण सर्वात मोठे दुःख कोणते असेल? तर आई-वडिलांच्या देखत त्यां अपत्याचा मृत्यू. सर्वजण मत्वा धीर देण्याचा प्रयत्न करत होते. पण उपयोग होत नव्हताः: माझे आक्रंदन अखंड सुरू होते. हे पण खूप चिंतेत होते बाळ तर निघून गेलं आता हिला काय झालं तर? माझे भाऊं बहिणी माझ्याजवळ बसून समजावत होत्या. रात्री दहाच्या सुमारास माझा भैय्या शेवटच्या एस.टी.ने आला. मला समजावत स्वतःच खूप रडला. माझ्या डोक्याला हात लावताच माझे डोके खूप गरम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. धाकट्या भावाला सोबत घेऊन बॅटरीच्या उजेडात एरंडीची पाने त्यांनी शोधून आणली. पानांना तेल लावून डोक्यावर रूमालाने बांधली व डोके मांडीवर घेऊन बसला. दिवसभराच्या आकांताने ग्लानी आली. पहाटे जाग आली पहाते तरं काय भैय्या डोके मांडीवर घेऊन बसल्या बसल्या झोपला होता. मनू पायांना तेल लावत बसला होता. भावांच्या या असीम प्रेमामुळेच हे पर्वताएवढे दुःख मी सहन करू शकले.


       परमेश्वराशी संवाद साधताना म्हणत होते असूनी कुशल कलावंत, का पाहिलास माझा अंत। द्यायचे, नव्हते मला सबळ मातृत्व, तर कां घालविलेस व्यर्थे कर्तृत्व ! मलिका ! गेलीस का? मलिका देवाघरी जणू दाद मागण्यासाठीच निघून गेली असावी. तिच्यानंतर मोहसीनसारखा राजबिंडा पुत्र व अरमान यास्मीन या दोन कोमल कलिका आमच्या संसार वेलीवर उमलल्या. जीवनाला अर्थ आला या तिघांमुळेच….!


Read More 

What do you think?

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा – १० : नव्या व्यवस्थेकडे