सीताकांत महापात्र हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ओडिया भाषेतले कवी. 1990 साली त्यांनी एक कविता लिहिली होती आणि त्या कवितेत जे जे काही लिहिले होते ते सर्व काही दोन दशकांनी खरे होत गेले. ‘झरे सुकले, जंगल लयास गेले आणि गाणी लुप्त झाली, तर उरलेली संपत्ती कोणासाठी? असा आर्त सवाल ह्या कवितेत होता.
ज्या लोकांनी ही कविता आणि त्यातला करुण संघर्ष सत्यात आणला त्यातील खूप कमी लोकांना लिहिता वाचता येत होतं, कारण ते सर्व अतिशय दुर्मीळ अशा भटक्या आदीवासींपैकी होते. विराट डोंगरांच्या पोटात दडलेल्या खाणी आणि त्या डोंगरांचे रक्षक, त्यांचे भूमीपुत्र यांचा लढा त्या कवितेत होता.
कविता लिहिली गेली तेव्हा केवळ अनुमान लावले जात होते की इथे आता उत्खनन होईल. त्या डोंगरांशी भावनिक नाते असलेल्या महापात्रांचा जीव कळवळला. त्या वेदनेच्या आर्त जाणिवेतून त्यांना कविता स्फुरली! Niyamgiri, Khambasi Gaan Ra Chaurasi Barsara Budhira Akatha Kahani हे त्या कवितेचे शीर्षक होते. ‘नियमगिरी, खांबसी गावातील चौऱ्यांशी वर्षांच्या वृद्धेची न सांगीतलेली कथा’ हा याचा स्वैर मराठीत अनुवाद.
कवितेच्या सुरुवातीच्या पंक्तीतले शब्द लक्ष वेधून घेतात. “ये जंगल, ये पहाड़ / सात पुश्तों से, अति पवित्र!” या दोन ओळींत संपूर्ण नियमगिरी सामावते. सीताकांत महापात्र यांच्या कविता आपल्या जाणिवा समृद्ध करतात, आपल्या संवेदनेस ते करुण साद घालतात! यापूर्वीही त्यांच्या काही कवितांचा मराठी अनुवाद मी इथे डकवला होता.
ह्या कवितेचा इतिहास इतका तेजस्वी आहे की, नियमगिरी डोंगररांगांचे खोदकाम सुरु झाले होते मात्र सर्वोच्च न्यायालयाने ते थांबवले आणि त्यासाठी आधार घेतला तो ह्या भागातील आदिवासींच्या ग्रामपंचायतींच्या ठरावांचा! ही एक क्रांतिकारी गोष्ट होती, कारण ह्या निकालामुळे एक नवीन कायदा अस्तित्वात आला. जो आजही ओडिशामधील आदिवासींच्या जगण्याचा आधार झालाय. अलीकडील काळातील मराठी साहित्यात अशी एखादी कविता आहे का, जिच्यामुळे अशी क्रांतिकारक गोष्ट घडलीय? असल्यास त्या कवितेच्या दोन ओळी किंवा नाव किंवा कवीचे नाव कमेंटमध्ये लिहावे.
या कवितेच्या आशयाला समांतर असणाऱ्या काही कवितांची नावे विनासायास समोर आली. Ravi Korde रवी कोरडे यांचा ‘भुंड्या डोंगराचे दिवस’, Avinash Poinkar अविनाश पोइनकर यांचा ‘दंडकारुण्य’ हे कविता संग्रह त्वरित आठवले. आदिवासींच्या रोजच्या जगण्याची लढाई मराठी कवितेत अपवादानेचे दिसते.
सीताकांत महापात्र लिहितात की, ‘उद्या माझ्या धूसर डोळ्यांना झाडे दिसली नाहीत, झऱ्यांत पाणी दिसले नाही, झाडाखाली देव दिसला नाही आणि मुलांच्या बासरीत गीत ऐकू आले नाही, तर तुम्ही मिळवलेली ती सारी संपत्ती नेमकी कोणासाठी असेल?”
सीताकांत महापात्र ओडिया ब्राह्मण आहेत. ते एक प्रभावी आणि कर्तृत्ववान आयएएस अधिकारी म्हणूनही ओडिया जनतेस परिचित आहेत. त्यांनी ज्या नियमगिरी डोंगरातील आदिवासींची कविता लिहिली, तो डोंगरिया कोंध हा समुदाय भारत सरकारने Particularly Vulnerable Tribal Group (PVTG) म्हणून नोंदीकृत केला आहे. त्यांचे पारंपरिक जीवन डोंगराळ शेती, बागायती, जंगलातील लघुवनोत्पादने, पाण्याचे स्रोत आणि वनाधारित अर्थव्यवस्थेशी जोडलेले आहे. महापात्र यांनी ही कविता का लिहिली आणि त्यातले संदर्भ इतके अचूक कसे होते याची एक स्वतंत्र कथा आहे! असो.
काही कविता एखादी गोष्ट सांगत नाहीत; त्या एखाद्या प्रदेशाचा आत्मा आपल्या हाती ठेवतात. सीताकांत महापात्रांची ‘नियमगिरी, खांबसी गावातील चौर्याऐंशी वर्षांच्या वृद्धेची न सांगितलेली कथा’ ही त्याच प्रकारची कविता आहे. तिच्या केंद्रस्थानी एक वृद्ध स्त्री आहे; पण ती एकटी नाही. तिच्या मागे सात पिढ्यांचे जगणे आहे, डोंगर आहेत, जंगल आहे, महुआची फुले आहेत, सालाची पाने आहेत, झरे आहेत, देवता आहेत, शेती आहे, तरुणांच्या बासरीतले सूर आहेत आणि एका येऊ घातलेल्या संकटाची चाहूल आहे. तिचे वय 84 वर्षे आहे; पण तिच्या स्मृतींचे वय सात पिढ्यांइतके आहे.
कवितेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या वृद्धेसाठी डोंगर हा काही तिचा भूगोल नाही. तसेच तिच्यासाठी ती जंगल अर्थसंपदाही नाही. ते तिचे घर आहे! त्यात अन्न आहे, देव आहे, पूर्वजांच्या स्मृती आहेत. त्यातल्या उंच सालाच्या झाडांची पाने ताटे आणि द्रोण बनतात; तिथल्या बरड जमिनीवर गळून पडलेल्या महुआच्या फुलांची महुली बनतात आणि तरुण मुलींच्या वेण्यातही सजतात. म्हणजेच तिथे निसर्ग आणि माणूस यांच्यात, मालक आणि मालमत्ता असे नाते नाही. निसर्गाचा एक भाग अन्नात जातो, दुसरा दैनंदिन जीवनात, तिसरा सौंदर्यात आणि चौथा श्रद्धेत. या चारही गोष्टी वेगळ्या नाहीत; त्या एकाच जीवनपद्धतीच्या चार छटा आहेत. सीताकांत महापात्र विलक्षण तन्मयतेने ही जीवनसूत्र शब्दबद्ध करतात! ही युनिक आहे!
नियमगिरीच्या डोंगरांकडे बाहेरच्या जगाची नजर ज्या दृष्टीकोनातून पाहतेय आणि कवितेतील वृद्ध स्त्री ज्या पद्धतीने पाहतेय, त्यांत मूलभूत फरक आहे. एका दृष्टीला डोंगराच्या पोटात बॉक्साइट आणि इतर खनिजे दिसतात; दुसऱ्या दृष्टीला त्या डोंगराच्या माथ्यावर देवता दिसते, उतारावर शेती दिसते, झाडांवर उपजीविका दिसते आणि झऱ्यांत पुढच्या पिढीचे पाणी दिसते. एका दृष्टीने डोंगर म्हणजे संपत्तीचा साठा; दुसऱ्या दृष्टीने तो स्थानिकांचा जीवनमार्ग आहे. याच ठिकाणी महापात्रांची कविता पर्यावरणाच्या नेहमीच्या भाषेच्या पलीकडे जाते. “झाडे वाचवा”, “पाणी वाचवा”, “जंगल वाचवा” अशा घोषणांमध्ये निसर्ग अनेकदा बाहेरची वस्तू बनतो, म्हणजे ‘आपण’ आणि ‘निसर्ग’ अशी दोन स्वतंत्र अस्तित्वे समोर येतात. पण नियमगिरीच्या वृद्ध स्त्रीसाठी हा भेदच नाही. तिच्या दृष्टीने, झऱ्याचे पाणी वाचवणे म्हणजे स्वतःचे जीवन वाचवणे. कुलदेवतेचे स्थान वाचवणे म्हणजे आपल्या स्मृतीचे घर वाचवणे. महुआची फुले वाचवणे म्हणजे अन्न, श्रम आणि सण यांना वाचवणे. म्हणून तिचा संघर्ष पर्यावरणीय असण्यापूर्वी सांस्कृतिक आणि अस्तित्वाचा आहे.
कवितेतील सर्वांत अस्वस्थ करणारा क्षण तो आहे, जेव्हा वृद्ध स्त्री भविष्यात डोकावते. आजूबाजूचे झरे लखलखत आहेत; पण ती उद्याचे चित्र पाहते—“मिळू शकणार नाही उद्या एकही थेंब!”. आज पाणी आहे, पण उद्या नसू शकते. आज सालाची झाडे आहेत, उद्या नाहीत. आज झाडाखाली कुलदेवता आहे, उद्या त्या देवतेसाठी झाडच उरणार नाही. आज तरुणांच्या बासरीत गोड राग आहे; उद्या तो स्वरही थांबू शकतो. असे तिला जाणवते.
महापात्रांच्या कवितेतील वृद्धेला बॉक्साइट किती आहे, खाणीतून किती पैसा मिळेल, उद्योगाला किती फायदा होईल याची भाषा माहीत नाही. तिला दुसरे गणित माहीत आहे. “एक मूठ तांदळाच्या कणां”इतकाही अन्नसाठा उरणार नाही, अशी तिची भीती आहे. बाजरी नसेल तर आंब्याच्या कोयींपासून रस काढून जगण्याची वेळ येईल, अशी प्रतिमा ती उभी करते. ही प्रतिमा दारिद्र्याचे रोमँटिकीकरण करत नाही; उलट ती विकासाच्या नावाने होऊ शकणाऱ्या विस्थापनाची भूक दाखवते.
आणखी एक महत्वाची नोंद – नियमगिरीच्या लोकांनी ज्या अतिबलाढ्य कंपनीला वाकवले ती आजदेखील मस्तवाल आहे! वेदांता ग्रुपला ह्या लोकांनी झुकवले आणि आपला वारसा वाचवला!



GIPHY App Key not set. Please check settings