in

ट्यूजडेज विथ मॉरी – जीवन मरणाचे रहस्य!


मॅारी श्वार्ट्झ हे अमेरिकेतील ब्रानडाईस विद्यापीठातले समाजशास्त्राचे प्राध्यापक. त्यांचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं. ते आठ वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचं दुःखद निधन झालं. त्यांच्या धाकट्या भावाला पोलिओची बाधा झाली, नि तो विकलांग झाला.

 
त्यांचे वडील चार्ली श्वार्ट्झ हे रशियन ज्यूईश मिश्र वंशीय होते. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अनिवार्य केली गेलेली लष्करी भरती टाळण्यासाठी त्यांनी रशियामधून पलायन केलं.
या सर्व धावपळीत चार्ली यांची प्रिय पत्नी आजारी पडली, त्यातच तिने कायमची हाय खाल्ली. संसार अर्ध्यात टाकून ती निघून गेली.

पोलिओग्रस्त मुलाची काळजी घेण्यासाठी चार्ली श्वार्ट्झ यांनी दुसरं लग्न केलं. इवा ही रोमानियन तरूणी त्यांची दुसरी पत्नी. मात्र तिच्यापासून त्यांना सुख लाभलं नाही. त्यांचे संतुलन ढासळत गेले. त्यातच एके दिवशी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.

आई आणि वडील गमावून बसलेले तरूण मॅारी रूग्णसेवेकडे आकर्षित झाले. मानसोपचार रूग्णालयात संशोधक म्हणून काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की, या क्षेत्रात खूप मोठे काम बाकी आहे. त्यासाठी आधी समाजाचा दृष्टीकोन प्रगल्भ व्हायला हवा. परिणामी त्यांनी समाजशास्त्रात डॅाक्टरेट करण्याचे निश्चित केले.

ब्रानडाईस विद्यापीठातच त्यांनी डॅाक्टरेट केलं. तिथेच ते प्राध्यापक म्हणून रूजू झाले. मिच ॲल्बम हा तरुण, त्यांना विद्यार्थी या नात्याने इथे भेटला.

मॅारी श्वार्ट्झ यांनी वृद्धांच्या मनोवस्थेबद्दल संशोधन केलं, वाढत्या वयाबरोबर मृत्यूची भीती कशी वाढत जाते याची गृहितके मांडली.

समाजातला मोठा हिस्सा वयस्क व्यक्तींचा असून त्यातही आजार, व्याधीग्रस्त अनेक लोक भवताली आढळतात. त्यांच्याविषयी सहानुभूती असली पाहिजे, याकरिता मॅारी श्वार्ट्झ आग्रही होते.

मात्र पुढे जाऊन त्यांना एका विलक्षण दुर्धर आजाराने ग्रासलं. स्नायू व मांसपेशींवरचं नियंत्रण नष्ट करणारा मोटर न्यूरॅान्सचा आजार त्यांना झाला.

ते अगदी परावलंबी होण्याच्या बेतात आले, मृत्यूच आपली सुटका करू शकतो याची खात्री झाल्यावर ते इच्छा मृत्यूबद्दल बोलू लागले. त्याविषयी आग्रही राहिले. त्यांची पत्नी शार्लेट आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना पाठिंबा दिला.

मॅारी श्वार्ट्झ, आपलं म्हणणं मांडण्यासाठी एबीसी न्यूज या प्रसिद्ध वाहिनीच्या ‘नाइटलाईन‘ या कार्यक्रमात गेले. हा शो मिच ॲल्बमच्या पाहण्यात आला.

आपल्या आवडत्या शिक्षकास अशा अवस्थेत पाहून त्याला वाईट वाटलं. त्यानं त्यांची भेट घ्यायचे निश्चित केलं. दरम्यान, मॅारी श्वार्ट्झ यांच्यावर लिहिलेला ‘ए प्रोफेसर्स फायनल कोर्स – हिज ओन डेथ’ हा लेख त्याच्या वाचनात आला, लेख वाचून तो मुळापासून हादरला. या काळात वर्तमानपत्रात सामुदायिक हरताळ सुरू झाला; प्रत्येक मंगळवारी मिच ॲल्बमला आपसूकच सुट्टी मिळाली.

सलग चौदा मंगळवार तो मॅारी श्वार्ट्झना भेटला. त्यांच्याशी झालेल्या भेटींना त्याने पुस्तक स्वरूप दिलं. ‘ट्यूजडेज विथ मॅारी‘ हे ते पुस्तक! जगभरातील बेस्ट सेलर पुस्तकापैकी एक असा नावलौकिक या पुस्तकास लाभला. ॲागस्ट 1994 मध्ये वयाच्या 77व्या वर्षी मॅारी श्वार्ट्झ यांचे निधन झाले, तेव्हा मिच ॲल्बम 36 वर्षांचे होते.

माणूस वृध्द होतो म्हणजे काय, मृत्यूचे वृद्धापकाळाशी असलेले नाते, वृध्दत्वातलं तारूण्य, मानसिक वृद्धत्व आणि कितीही कसलेही आजार व्याधी झाले तरीही सुखाने मरण्याचा मार्ग यावर त्यांनी मांडलेली मते वाचनीय माननीय आहेत.

मनाने खचून जाणं टाळता येतं, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिलं. आयुष्याचा सर्वात मोठा धडा कोणता आहे, याविषयी ते विलक्षण गृहितक मांडतात.

न्युयॅार्क टाइम्सच्या नॅानफिक्शनल टॅाप सेलर बुकलिस्टमध्ये हे पुस्तक तब्बल 206 आठवडे अग्रस्थानी होतं यावरून याची लोकप्रियता लक्षात यावी.

वृद्धांचं समाजातलं स्थान, त्यांचा सन्मान आणि त्यांची उचित दखल याविषयी आपल्याकडे भयंकर अनास्था आहे. अनेकजण अकाली वृद्ध दिसताहेत तर काही ऐन तारुण्यात खचून जाताहेत.

वयाने वृध्दत्व आलं तरी मनाने तरूण राहिलं पाहिजे हा आपल्याकडं केवळ सुविचार आहे प्रत्यक्षात आपली परिस्थिती विपरीत आहे.

वृध्दांना मनापासून जपलं पाहिजे हे आपल्या प्राधान्यक्रमात नसते. मॅारी श्वार्ट्झ यांच्यावरचे पुस्तक जगण्याचा नवा दृष्टिकोन बहाल करते.

आज ‘जागतिक वृध्द दिन‘ आहे. आपल्या भोवतालच्या वृद्धांशी आपण प्रेमाने, आपुलकीने आस्थेने वागलं पाहिजे. त्यांचा मान राखला पाहिजे.

ते आपल्यासाठी झटले आहेत, निदान यासाठी तरी त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे!
इतकं तर आपण करू शकतो!

– समीर गायकवाड

‘ट्यूजडेज विथ मॉरी’ हे पुस्तक मराठीत अनुवादित झाले आहे. विख्यात लेखिका अनुवादक शुचिता नांदापूरकर फडके यांनी त्याचा अनुवाद केला आहे.

(सोबतच्या फोटोमध्ये मॅारी श्वार्ट्झ, मिच ॲल्बम त्यांची पत्नी जेनीसह)

​Read More 

What do you think?

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

गांधीजींना नोबल पुरस्कार का मिळाला नाही?