X, Y, Z च्या घरातली आई

घर बसल्या तेही अमेरिकेत सातासमुद्रापलिकडून मी भारतातल्या जेन – झीवर लक्ष ठेवून होते. आधी तर जेन – झी प्रकरण काय तेच कळत नव्हतं. पण माझ्या मुलीसारखीच तरुण मुलं, कपडे आणि भाषा असलेली मुलं रस्त्यावर दिसल्यावर ही मुलं जेन – झी हे कळलं.  आपण कोण हा प्रश्न पडलाच. नेहमीप्रमाणे कानात बोंडं खुपसून बसलेल्या लेकिला ओरडून विचारलं.

“मी कोण आहे गं?” सात – आठ वेळा बेंबीच्या देठापासून ओरडल्यावर तो प्रश्न खोलीत घुमून  माझ्यावरच आदळत राहिला. मी कोण? मी कोण….? तेवढ्यात तो लेकिच्या कानावरदेखील आदळला.

“तुझं वय काय?” जेन- झी तारस्वरात.

“ओळख.” अशी घोडचूक कधी करायची नाही हे लक्षात येण्याआधी तीर सुटला होता. 

“बुमर.” वरुन जोरात आवाज आला.

“आमचा वयोगट बुमर? म्हणजे?”

“गुगल…” जेन – झी ओरडली.

“ए, उगाच माझं वय काय वाढवतेस? मी जेन – एक्स आहे. मी गुगलत म्हटलं.” 

“व्हॉटेव्हर.” ती जेन – झीच्या स्वरात म्हणाली.

आता मी X,Y, Z मध्ये गुंतले. नशिब, जे काही आहे ते एका रांगेत आहे. लक्षात राहायला सोपं. आमच्याच घरात तिन्ही आहेत हे लक्षात आलं आणि आमच्या चौघांच्या whatsapp कट्ट्यावरची संभाषणंही. आम्ही X, मुलगा – सून Y आणि मुलगी Z. नेहमी तिथे आदळणारे शब्द.

“Bruh”

“WF”

“दिवाळी आली. का करतात ठाऊक आहे ना?”

सुनेचं लगेच,

“आये, इंग्लिश.”

“अगं बये, आये नाही आई.” असं तातडीने लिहिणं ते तितक्याच तातडीने पुसणं. मुलं मला आई…म्हणताना आयेऽऽऽ सारखा पुकारा करत असणार बहुतेक.

“Sheeeesh” 

“मुस्काट फोडेन.” असं खूपदा लिहावंसं वाटतं पण सुनेला कसं समजेल आणि इंग्रजीत काय म्हणायचं ते समजत नाही. पर्याय म्हणून घरातच मोठ्याने ओरडते. आवाज उठवल्याचा आनंद माझा मीच अनुभवते. 

हे सगळं आठवलं आणि वाटलं असंख्य जागरूक नागरिकांनी ह्या जेन – झीच्या वागण्याविरुद्ध आवाज उठवला तसा आवाज तर मी रोज आमच्या कट्ट्यावर उठवते. भाषा, भाषा असा एकच शब्द तीन, चार वेळा मराठीत आणि दोन वेळा सुनेसाठी इंग्रजीत टाकते. एकच गोष्ट दहावेळा सांगितली की माझ्या मुलांना समजते. 

भारतात तुमच्यासारख्या मुलांच्या वागण्याला असंच पाहिजे असं म्हणतायत सगळे असं पुन्हा दहावेळा ओरडून सांगत लेकीला कानातले बोळे काढायला मी भाग पाडलं. ते दोन हातात धरुन ती माझ्यासमोर उभी राहिली.

“काय झालं?” जेन – झीचा आक्रमकपणा तिच्यात होता. घाबरले पण तरी म्हटलंच.

“तुम्हाला वाटतं मीच तुम्हाला नावं ठेवते. आता अख्खं जग ठेवतंय.” ती अमेरिकेत राहते त्यामुळे तिला अमेरिका म्हणजेच जग वाटतं. भारतातल्या जेन – झीचं आंदोलन, भाषा अवाक होऊन तिने ऐकलं. खूष झाली.

“prish”

“प्रिशबिश काय करतेयस. कपडे बघा तुमचे, भाषा तर काय… काही बोलायची सोय नाही.” माझं एक वाक्य होईपर्यत तिने जेन – झीची दहा – बारा ’रिळं’ बघितली होती.

“आई, तुम्ही कधी केलं होतं का असं जेन – झी होता तेव्हा?” तिने अगदी पेचात टाकणारा प्रश्नच बाणासारखा फेकला.

“म्हणजे आंदोलनं?”

“प्रोटेस्ट.” 

“हा, तेच. नाही बाई, आम्ही नाही केलं असलं काही पण भाषणं करायचो.” 

“म्हणजे स्पीच. ते वेगळं. ते म्हणजे इथे घरात बसून करतेस ते.”

“आगाऊ” मी दातओठ खात म्हटलं तर तिच्या बाबाने नेहमीप्रमाणेच नको तिथे बोलण्याचा नेहमीचाच विडा उचलला.

“घरात बसून तू निषेध नोंदवतेस असं म्हणतेय ती.”

“आता ती बोललेलंच काय परत सांगतोस तू.” नेहमीप्रमाणेच सगळं रंगणार तेवढ्यात लेक म्हणाली,

“खरंतर अमेरिकेत असं काहीतरी पेटायला हवं.”

“पेटवा पण घरात बसूनच पेटव. बाहेर पडलीस तर कपडे नीट घालायचे लक्षात ठेव. काय ते भोकंभोकं असलेलं घालता. माझी आई तर बाबांचे, म्हणजे तुझ्या आजोबांचे गंजीफ्रॉक भोकात हात घालून टरकावून टाकायची.”

“गंजीफ्रॉक? बनियन म्हण गं.” नवरा माझ्या भाषेवर घसरला.

“आता तुम्ही दोघं ह्यावर भांडणार?” लेक परत कानात बोंडं घालायला लागली. तिला थांबवत म्हटलं.

“पेटून उठण्याआधी भाषा, कपडे हे लक्षात असू दे.”

“आम्ही आवाज उठवतो तसा तुम्हीही उठवा की. जेन – झी असताना नाही जमलं. बुमर म्हणून?

“जेन – एक्स.” मी आवाज उठवला. तिकडे दुर्लक्ष करुन झी म्हणाली,

“पुढच्यावेळी आपल्याकडे मोर्चा निघाला तर भाग घेशील ना?” मी ’आगाऊ’ म्हणायच्या आत लेकिने कानात बोंडं घालून तिथून पळ काढला. 

मी पुन्हा आमच्या whatsapp कट्ट्यावर  language, भाषा…असा माझा शांततामय निषेध नोंदवायला सज्ज झाले. 

Read More 

What do you think?

Written by Mohana Joglekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा – ५ : सहजीवन आणि अर्थकारण