in

पळून गेलेल्या एका काळ्या गुलामाचे मालकिणीस पत्र –

अमेरिकेतील गुलामगिरीच्या पद्धतीचा बराच अभ्यास मी केला त्याला कारण होते नॉर्थप यांच्या एका पुस्तकाचा अनुवाद. या काळात मला हेही कळले की अफ्रिकेच्या किनारपट्टीवर असलेले राजे/जमीनदार आतील भागातून गुलाम आणून किनाऱ्यावर विकत व बोटीवर चढवत. थोडक्यात गोऱ्यांचा व काळ्यांचा गुलामगिरीच्या पापात सहभाग होता. अर्थात गोऱ्यांनी जास्त अत्याचार केले हे निर्विवाद. असो. त्या पुस्तकातील काही भाग खाली देत आहे, पण काही गुलाम पळूनही जात आणि ज्या राज्यात गुलामीच्या प्रथेस कायद्याने बंदी असे त्या राज्यात आसरा घेत. असाच एक गुलाम कॅनडाला पळून गेला. त्याचा आणि त्याच्या मालकिणीचा पत्रव्यवहार शेवटी दिला आहे…

माझ्या गुलामीची १२ वर्षे या पुस्तकातून –

….“ तू माझा गुलाम आहेस ! मी विकत घेतलंय तुला.” त्याने हेही सांगितले की आता तो मला न्यु-ऑर्लिऑन्सला पाठवणार आहे.”

मी त्याला हेही ठणकावून सांगितले की मी एक स्वतंत्र नागरिक आहे आणि साराटोगामधे माझी बायकामुले आहेत व तीही स्वतंत्र आहेत. मी मला मिळणार्‍या अमानुष वागणुकीचा जोरदार निषेध केला व सुटल्यावर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली. त्याने अर्थातच मी एक स्वतंत्र माणूस आहे हे स्पष्टपणे नाकारले व शपथपूर्वक सांगितले की मी जॉर्जियाचा आहे. मी त्याला वारंवार चिडून सांगत होतो की मी कुणाचाही गुलाम नाही आणि त्याने बर्‍याबोलाने माझे साखळदंड काढावेत. प्रत्येक वेळा माझा आवाज चढल्यावर मला तो गप्प करीत असे. बहुधा त्याला माझा आवाज बाहेर ऐकू जाईल अशी भीती वाटत असावी. पण मी गप्प बसायचेच नाही असे ठरवले होते. मला कोठडीत टाकणार्‍या त्या हलकटांचा मी उद्धार करीत राहिलो. मी गप्प बसत नाही हे पाहून त्याच्या रागाचा पारा चढला. शिव्या देत त्याने माझा खोटारडा निग्रो म्हणून उद्धार केला व मी जार्जियामधून पळून आलेला एक गुलाम आहे हे मलाच सांगितले. त्यानंतर सुरु झाला अत्यंत खालच्या पातळीवरील शिव्यांचा भडिमार. इतक्या घाणेरड्या शिव्या की त्याची वाचक कल्पनाही करू शकणार नाहीत व मी त्या इथे लिहूही शकत नाही.

हा सगळा प्रकार होईपर्यंत रॅडबर्न शांतपणे बाजूला उभा होता. त्याचे काम या कोंडवाड्यावर लक्ष ठेवणे एवढेच होते. गुलाम आले की त्यांना जिवंत राहण्यापुरते अन्न द्यायचे, गरज पडल्यास त्यांना चाबकाने फोडायचे एवढे काम तो प्रत्येक गुलामामागे दोन शिलिंग घेऊन करे. त्याच्याकडे पहात बर्चने त्याला पॅडल व कॅट-ओ-नाईन टेल्स आणायला फर्मावले. तो त्या दारामागे अदृष्य झाला अणि थोड्याच वेळात ती छळाची अवजारे घेऊन परतला. पॅडल म्हणजे काय हे मला तो पर्यंत माहीत नव्हते. छोट्या बोटीच्या जुन्या पद्धतीच्या वल्हाच्या आकाराचे हे एक मजबूत फळकूट असते. याची लांबी दोन फुटापेक्षा कमी असते. गुलामांच्या व्यापारात हे अस्त्र सगळ्यांना चांगले परिचित असते. या फळकुटाला सात आठ भोके पाडलेली असतात व जेव्हा याने गुलामांना बडविले जाते तेव्हा यातून रक्ताच्या चिळकांडया उडतात. कॅट म्हणजे एक चाबूक असतो ज्याला गाठी मारलेल्या नऊ शेपट्या असतात. या चाबकाने जेव्हा गुलामाला फोडले जाते तेव्हा एका फटक्यात नऊ चाबकांचे काम होते.

चाबूक आणि पॅडल आल्याआल्या त्यांनी मला त्या दोघांनी धरले आणि माझे कपडे ओढून काढले. माझे पाय त्या जोखडात अडकले होते हे मी सांगितलेच आहे. त्या नालायकांनी मला बाकावरून ओढून खाली पाडले व हातातील साखळदंडावर दोन मनगटांच्यामधे त्याचा बूट ठेवला. त्या साखळ्या माझ्या मनगटात रुतल्या व मला प्रचंड वेदना झाल्या. त्या फारच सौम्य म्हणायला हव्यात एवढा भयानक प्रकार पुढे होणार होता. त्या पॅडलने बर्चने माझ्या नग्न शरीरावर फटके मारण्यास सुरवात केली. त्याचा हात भरून आल्यावर तो थोडावेळ दम खाण्यासाठी थांबला आणि मला विचारले,

“ तुझे अजूनही तू एक स्वतंत्र माणूस आहेस असे म्हणणे आहे का?”

“ हो !” मी ठामपणे असे उत्तर दिल्यावर संतापून तो परत माझ्यावर तुटून पडला. थोड्याचवेळात दमल्यावर त्याने तोच प्रश्न विचारला. माझ्याकडून तेच उत्तर मिळाल्यावर त्याने परत निर्दयपणे मला मारण्यास सुरुवात केली. यावेळी मात्र मारताना त्याने अर्चाच्य शिव्या देण्यास कमी केले नाही. शेवटी ते फळकूट तुटून त्याच्या हातात फक्त त्याचे दांडके राहिले. तरीही मी त्याला शरण गेलो नाही. एवढा मार खाऊनही माझ्या ओठातून ते असत्य बाहेर पडण्यास तयार नव्हते. शेवटी हातात उरलेला दांडूका खाली फेकून त्याने तो चाबूक हातात घेतला. पहिल्या शिक्षेपेक्षा हा प्रकार जास्त भयंकर होता. मी सुटण्याची व्यर्थ धडपड केली, दयेची भीक मागितली. माझ्या प्रत्येक विनवणीबरोबर माझ्या पाठीवर एक वळ उठत होता. क्षणभर मला वाटले की या वेदना सहन करण्यापेक्षा येथेच त्या चाबकाखाली मेलेले बरे. आजही त्या वेदना आठवल्या की माझ्या पाठीचे मांस कुणीतरी कुरतडतंय असा मला भास होतो. माझ्या पाठीत आगडोंब उसळळला होता. माझ्या वेदना नरकातील वेदनांपेक्षाही भयंकर होत्या.

शेवटी रडून भेकून माझा आवाज बंद पडला. वेदनेने माझ्या तोंडातून शब्दही फुटेना. पण त्याचा हात मात्र थांबला नव्हता. प्रत्येक फटक्यानंतर माझ्या मांसाचे तुकडे उडत होते व हाडे उघडी पडत होती. कुठलाही माणूस एखाद्या कुत्र्यालाही असे मारू शकला नसता. अखेरीस रॅडबर्नने यापुढे मला बडविण्यात अर्थ नाही असे म्हटल्यावर बर्चने वाकून माझ्यापुढे त्याच्या वळलेली मुठ नाचवली व मला धमकी दिली, “जर परत तू ‘मी स्वतंत्र आहे किंवा मला पळविण्यात आलेले आहे’ किंवा असले काही बडबडलास, किंवा तोंडातून शब्द जरी काढलास तर आत्ता मिळालेली शिक्षा काहीच नाही अशी तुझी अवस्था करेन.” त्याने शिव्यांच्या भडीमारात सांगितले, “गप्प बसला नाहीस तर मी तुला ठार मारेन !” या प्रेमळ संभाषणानंतर माझ्या हाताच्या बेड्या पायातील बेड्यांपासून सोडविण्यात आल्या, पण माझे पाय अजूनही खोड्यात होते. खिडकीची झडप लाऊन घेण्यात आली. बाहेर जाऊन त्या नालायकांनी कुलूप लाऊन घेतले. आत मी आणि फक्त अंधार उरलो… पूर्वीसारखा..

आता पळून गेलेल्या गुलामाला आलेले पत्र वाचू आणि त्याबे दिलेले उत्तरही –

साल होते १८३४. एका २१ वर्षाच्या गुलामाने त्याच्या मालकाच घोडा चोरला आणि कॅनडाला पळ काढला. त्याचे नाव होते जार्म लॉग. थोडक्यात सांगायचे तर त्याने स्वतःची गुलामगिरीतून सुटका करून घेतली. त्याचे बहीण भाऊ आणि आई याच गुलामगिरीत गेले अनेक वर्षं खितपत पडले होते. दुर्दैवाने त्याचे इतर कुटुंबीय पळून न जाता आल्यामुळे डेव्हिडसन काऊंटीमध्येच अडकून पडले. २६ वर्षांनंतर जार्म न्युयॉर्कमध्ये प्रस्थापित झाला. कसा ते विचारू नका कारण मग ही कथा बरीच मोठी होईल. न्युयॉर्कमध्ये त्याने त्याचे नाव बदलले व जर्मिन लॉग्वेन केले. त्याने मग नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्न केले. त्याला समाजकार्याची आवड असल्यामुळे त्याने काळ्या मुलांसाठी अनेक शाळा सुरू केल्या. त्याने स्वतःचे आत्मचरित्रही लिहिले. त्याने गुलामीची पद्धत नष्ट करण्यासाठी चळवळ उभी केली. एक दिवस लॉग्वेनला एक पत्र आले. ते वाचून तो चक्रावला. हे पत्र आले होते त्याच्या मालकाच्या बायकोचे. त्यात तिने निर्लज्जपणे त्याच्याकडे १००० डॉलर्स नुकसान भरपाईची मागणी केली होती. ती मागणी होती त्याने जो घोडा पळवला होता त्याबद्दल. लॉग्वेनला ते वाचून संताप आला पण त्याने मोठ्या संयमाने त्या बाईला उत्तर लिहिले. या पत्रात त्याने संयम सोडला नाही पण तिला चांगलेच झोडले होते. दोन्ही पत्रे नमुनेदार आहेत.

सारा लॉगचे जार्मला पत्र –

जार्म यास,

आज तुला पत्र लिहिण्याला मुहूर्त लागला. आम्ही सगळे ठीक आहोत. सध्या मला धड चालता येत नाही, पण मी थोडीशी का होईना हिंडू फिरू शकते. बाकीजण ठीक आहेत. चेरी आणि कॉमनही ठीक आहेत. आम्ही कुठल्या परिस्थितीत आहोत हे तुला कळावे म्हणून मी हे पत्र लिहिते आहे. अर्थात त्याला कारणीभूत तूच आहेस. तू ओल्ड रॉक घेऊन पळालास तेव्हापासून आमच्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. जरी आम्हाला ती घोडी परत मिळाली असली तरी ती परत आल्यावर कुचकामी झाली आहे. सध्या मला पैशाची गरज असल्यामुळे मी तुला विकायचे ठरवले आहे. मध्ये एक प्रस्ताव आला होता, पण मला तो फारसा फायद्याचा वाटला नाही. तू जर मला १००० डॉलर्स दिलेस तर मी तुझ्यावरचा हक्क सोडून देईन. माझा हा प्रस्ताव मिळाल्या मिळाल्या मला उत्तर देणे. तू पळून गेल्यावर, मला ॲबे, ॲन आणि १२ एकर जमीन विकावी लागली. या जमिनीची किंमत तू मला चुकती करावीस. ते पैसे मिळाल्यावर मी तुला त्याची रीतसर पावती व कागदपत्रे पाठवून देईन. हे जर तुला मान्य नसेल तर मला नाईलाजाने तुला कोणाला तरी विकावे लागेल. नंतर थोड्याच काळात तुझी काय अवस्था होईल याची तुला कल्पना आहेच. हे पत्र मिळाल्यावर लगेचच उत्तर पाठवणे. पत्र बिगबायव्हील, माओरी काऊंटी, टेनेसी या पत्त्यावर पाठवणे. बऱ्याबोलाने माझी विनंती मान्य करावीस हे उत्तम.

माझ्या कानावर आले आहे की तू आता पाद्री झाला आहेस. आपल्या येथे निरक्षर लोकांची संख्या एवढी असताना तू येथे येऊन त्यांना उपदेश करण्याची आवश्यकता आहे. तुझी जुनी साथीदार तुझी आतुरतेने वाट पाहात आहेत. तू बायबल वाचतोस ना? मग मला सांग चोराला जर पश्चात्ताप झाला नाही तर त्याला काय शिक्षा सांगितली आहे बायबलमध्ये? आंधळा जर आंधळ्याच्या मागे गेला तर काय होईल हे मी तुला सांगायला नको. आधिक काही लिहिण्याची काही गरज आहे असे मला वाटत नाही. शहाण्याला शब्दाचा मार ! चोर आणि खोटारड्यांना काय शिक्षा मिळते हे तुला माहीत असेलच. तुला आम्ही आमच्या मुलांसारखे वाढवले. आम्ही तुला कधीही शिविगाळ केलेली नाही. तू पळून जाण्याआधी मालकांनी तुला विचारले होते की तुला दुसरीकडे जायचे आहे का? तेव्हा तू म्हणाला होतास की मला तुम्हाला सोडून कुठेही जायचे नाही… हे लक्षात ठेव. असो.

सारा लॉग.

प्रती –

सारा लॉग,

तुझे २० फ़ेब्रुवारीचे पत्र मिळाले. त्या पत्रासाठी धन्यवाद! बराच काळ लोटला, मी माझ्या म्हाताऱ्या आईची खबरबात ऐकली नव्हती. ती अजून जिवंत आहेस हे ऐकून आनंद झाला. तू लिहिले आहेस की ‘‘चेरी इज ॲज वेल ॲज कॉमन’’ या वाक्याचा मला खरा अर्थ कळला नाही. तू माझ्या आईबद्दल (चेरी) अजून सविस्तर लिहायला हवे होतेस.

तू एक स्त्री आहेस, पण तुझे हृदय जर एखाद्या स्त्रीचे असते तर, तुला, एका भावाला ‘तुझ्या एकुलत्या बहीण भावाला मी विकले आहे’ असे सांगण्याची लाज वाटली असती. त्या भावाचा एवढा घोर अपमान तू केला नसतास. आता मी तुझ्यापासून दूर आहे म्हणून नाहीतर तू माझेही रुपांतर पैशातच केले असतेस यात माझ्या मनात तीळभरही शंका नाही.

१२ एकर जमीन, माझा भाऊ ॲबे आणि बहीण ॲन यांना मी पळून गेलो म्हणून तू विकलेस असं म्हणतेस आणि आता निर्लज्जपणे मला परत येण्यास सांगतेस, तुझी गुलामी पत्करण्यास सांगतेस किंवा त्याबदल्यात १००० डॉलर्सची मागणी करतेस. कशासाठी तर तुला ती जमीन परत मिळवायची आहे म्हणून, पण तू माझ्या बहीण भावाबद्दल एक चकार शब्दही लिहिला नाहीस. त्यांना परत आणण्याबद्दल तू विचार केला असतास तर कदाचित मीही परत येण्याचा विचार केला असता. तू तुझ्या तब्येतीचा कांगावा करते आहेस. हे तू माझी अनुकंपा मिळवण्यास लिहिले आहेस याची मला कल्पना आहे कारण माझ्या स्वभाव तसा आहे हे तुला चांगले माहीत आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला तुझी हृदयापासून कीव येते हे मात्र खरे आहे. असे असले तरी मी ज्यांच्यावर प्रेम केले त्यांना तू अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वागवलेस. तुझ्या लंगडण्याची मला कीव आलीही असती, पण तू आम्हाला सुळावर चढवलेस, आमची ताटातूट करून आमची हृदये छिन्नविछिन्न केलीस त्याबद्दल मला शब्दात व्यक्त करता येणार नाही इतका राग आणि चीड आली आहे. दुष्ट आणि नीच स्त्री! लक्षात ठेव, मला माझे स्वातंत्र्य माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. कृपया माझ्या आई आणि भावंडांबद्दल एक चकारही काढू नकोस. माझ्या स्वातंत्र्याची किंमत तुझ्या शरीरापेक्षा जास्त आहे. एवढेच काय या आकाशाखाली असलेल्या सर्व गुलाम मालकांच्या आणि अत्याचारी मालकांच्या एकत्रीत संपतीपेक्षा जास्त आहे.

तू म्हणतेस की तुला माझ्यासाठी बऱ्याच लोकांनी चांगली किंमत देऊ केली आहे आणि जर मी तुला १००० डॉलर्स पाठवले नाहीत तर तू मला विकून टाकशील. त्याच ओळीत एका श्र्वासाचीही उसंत न घेता तू लिहितेस, ‘‘तुला आम्ही मुलाप्रमाणे वाढवले आहे.’’ मला सांग तू तुझ्या मुलांना विकण्यासाठी वाढवले होतेस का? एखाद्या जनावराप्रमाणे? त्यांनी चाबकाचे फटके खात, विव्हळत, त्यांचा मृत्यू होण्यासाठी तू त्यांना वाढवले आहेस का? त्यांच्या पायात साखळदंड अडकवून त्यांना चालवत नेण्यासाठी तू त्यांना वाढवले आहेस का? माझे बहीण आणि भाऊ कुठे आहेत? सांगू शकशील? त्यांना उसाच्या शेतात राबवण्यासाठी कोणी पाठवले? तेथे त्यांना चाबकाने फोडले जाते, त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या जातात, ते जेव्हा विव्हळत पडतात तेव्हा त्यांचे विव्हळणे ऐकण्यासाठी कोणीही जवळचे आसपास नसते. तेव्हा त्यांची कीव कोणासही आली नाही आणि येत नाही. ते मेल्यावर त्यांच्या अंत्यविधीसही कोणी उपस्थीत नसते. नीच बाई, हे सगळे तू केले नाहीस असे तू म्हणू शकतेस का? नसशील केले तर तुझ्या नवऱ्याने निश्चित केले आहे आणि त्याला तुझा पाठिंबा होता. हे जे पत्र तू लिहिले आहेस त्याने हेच सिद्ध होत आहे की तुझा त्याला पाठिंबा होता. तुला हे लिहिताना थोडीशी तरी शरम वाटली पाहिजे. असो.

पण तुझा नवरा कुठे आहे? त्याचे तू नावही काढले नाहीस, म्हणजे बहुधा तो केलेल्या पापांचा हिशेब चुकवण्यासाठी वर गेला असावा. बिचारा ! त्याला आता वर माझे बांधव भेटतील, ज्यांना त्याने ठार मारले आहे. ते त्याला त्याने केलेल्या पापांचा जाब विचारतील. त्याच्या दुर्दैवाने आकाशात न्याय आणि स्वातंत्र्य हेच मालक आहेत.

पळून जाताना मी तुझी म्हातारी घोडी घेतली म्हणून तू मला चोर म्हणतेस. तुझ्या नवऱ्याचा – मॅनसेथ लॉगचा त्या घोडीवर जेवढा अधिकार होता, त्यापेक्षा जास्त अधिकार माझा आहे. एखादी घोडी चोरणे हे मोठे पाप आहे की आईच्या पाळण्यातून मूल चोरणे हे मोठे पाप आहे? जर तू आणि तुझ्या नवऱ्याने असा निष्कर्ष काढला असेल की मी पळून गेल्यामुळे मी तुमच्यावरचा माझा सगळा अधिकार गमावून बसलो आहे, मग मी असा निष्कर्ष का काढू नये, की तुम्हीही माझ्यावरील सर्व अधिकार गमावून बसला आहात? मानवी हक्क हे परस्परांविषयी वाटणाऱ्या आदराने निर्माण होतात. जर तुम्ही माझे स्वातंत्र्य आणि हक्क हिरावून घेतलेत, तर तुम्हालाही तोच न्याय लागू पडतो. हे तुम्ही केव्हा शिकणार? परमेश्र्वराच्या दरबारात असा एक तरी कायदा आहे का, जो एका माणसाला लागू होतो आणि दुसऱ्याला नाही?

जर तुमच्यापैकी कोणाला किंवा तुमच्या दलालांना मी माझे हक्क कसे जपतो हे पहायचे असेल तर तुम्हाला येथे येऊन मला जबरदस्तीने पकडून परत एकदा गुलाम करावे लागेल. तुम्हाला काय वाटले, पैसे किंवा परत गुलामी, असल्या धमक्या मला देऊन तुम्ही मला घाबरवू शकाल? मी तुमच्या या प्रस्तावाचा तिरस्कार करतो. हा प्रस्ताव म्हणजे माझा घोर अपमान आहे. मी माझ्या निर्णयापासून एक तसूभरही मागे हटणार नाही. मी आज स्वतंत्र माणसांमध्ये ताठ मानेने उभा आहे आणि ते मानवी हक्कांविषयी अत्यंत जागरुक आहेत. ते ठामपणे माझ्या मागे उभे आहेत आणि त्यासाठी मी परमेश्र्वराचे आभार मानतो. जर तुमचे गुंड येथे आले आणि जर त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर माझे या शहरातील आणि या राज्यातील मित्र मला सोडवतील आणि त्याचा सूडही घेतील एवढे लक्षात ठेव…

तुझा,

जे. लॉग्वेन.

– जयंत कुलकर्णी

​Read More 

What do you think?

Written by Jayant Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा – परिशिष्ट : ‘पदार्पण’ – एक कल्पनाविस्तार (उत्तरार्ध)