in

‘चोरबागान’ दुर्गापूजेचा इतिहास आणि उत्सवाला लागलेले गालबोट!

कोलकाता येथील ऐतिहासिक ‘चोरबागान सर्वोजनिन दुर्गा पूजा समिती’च्या मांडवाच्या एक्झिट गेटपाशी चेंगराचेंगरी होऊन 19 लोकांना आपला जीव गमवावा लागला ही माहिती एव्हाना सर्वांपर्यंत पोहोचली असेलच. ह्या दुर्गा पूजा समितीच्या यंदाच्या आगळ्या वेगळ्या दुर्गा मूर्ती विषयी आणि चोरबागान विषयीची ही पोस्ट.

सोबत दिलेल्या फोटोवरून लक्षात येते की, मातीच्या नैसर्गिक स्वरूपात दिसणारी दुर्गा मूर्ती अगदी निःशस्त्र आहे! चोरबागान मंडळाच्या 91 व्या वर्षाच्या उत्सवा निमित्त एका विशेष उद्देशाने मातीच्या रंगाची आणि शांत रूपातील मूर्ती स्थापित केलीय.

यंदाच्या पूजा मंडळाची संकल्पना ‘अ-रव’, म्हणजेच आवाजापलीकडील शांतता किंवा शांत वातावरण, ही आहे. पारंपारिक महिषासूरमर्दिनीच्या रौद्र, आक्रमक किंवा युद्धोत्सुक रूपाऐवजी, येथे देवी दुर्गा आणि तिची मुले अत्यंत गहन ध्यानमुद्रेत लीन असल्याचे दाखवलेय.

जगभरात सुरू असलेला हिंसाचार, युद्ध आणि शत्रुत्वाच्या वातावरणात शांतता, संयम आणि स्थिरता यांचा प्रसार व्हावा, असा संदेश या मूर्तीद्वारे आणि संपूर्ण पंडालच्या रचनेतून देण्यात आला होता. यामध्ये महिषासूरसुद्धा देवीसमोर आपली शस्त्रे समर्पित करताना दाखवलाय.

देवीच्या, ध्यानस्थ आणि शांत भावनेला अधोरेखित करण्यासाठी मूर्तीला नैसर्गिक मातीचा रंग देण्यात आलाय. शहरांमधील वाढता कोलाहल आणि गोंगाट, यापासून दूर जाऊन मानवाला आत्मपरीक्षण आणि आंतरिक शांतता मिळावी, हा यामागचा हेतू होता.

मात्र लोकांनी या थीमचे मातेरे केले. रात्री पाऊणे आठच्या सुमारास जोराचा पाऊस आला आणि मांडवाबाहेरचे लोक जगबुडी होणार असल्यागत गोंगाट करत एकाएकी आत शिरले! आतल्या लोकांना पावसाचा अंदाज नव्हता मात्र काहीतरी घडतंय या भीतीने आतले लोक एक्झिट गेटकडे पळाले. त्याचवेळी एक्झिटगेट मधूनही मोठ्या संख्यने आत शिरले. तिथे किंकाळ्यांचा कोलाहल झाला!




दुर्गा पूजा पंडालमध्ये अतिशय नीरव शांतता आणि स्तब्धता अपेक्षित असल्याने आतली प्रकाश योजना त्यास अनुकूल होती. प्रखर लाईट्स टाळून साधी आणि शांत शीतल उजेड देणारी प्रकाशयोजना वापरली होती. त्यामुळे आत नेमके काय घडतेय हे अगदी प्रखर स्पष्टपणे दिसत नव्हते. आत आलेल्या माणसांच्या अफाट लोंढ्याने स्टेजचा एक भाग कोसळला आणि त्याची उलटसुलट माहिती पसरल्याने चेंगराचेंगरीत भर पडली. 19 जणांना प्राण गमवावे लागले.

जिथे ‘अरव’ शांतता अपेक्षित होती तिथे किंकाळ्या आणि कर्कश्य कोलाहलाने गोंधळ माजवला! केवळ भडक रंगांचा वापर न करता नैसर्गिक मातीच्या रंगाचा वापर करून मानवी मनाला शांततेचा आणि आध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव देणे हा या मंडळाचा मुख्य उद्देश होता, त्याला लोकांनी हरताळ फासला! असो. आपण त्यासाठी कुख्यात आहोतच!

आता थोडं चोरबागानविषयी. हा जुन्या कोलकत्यातील उत्तरेकडच्या भागातला परिसर. जुन्या काळात कोलकाता शहराची लोकसंख्या वाढण्यापूर्वी तेथील श्रीमंत नागरिक स्वतःसाठी अतिशय मोठी घरे बांधत. या घरांसोबत मोठी बाग असणे अनिवार्य मानले जाई. बंगाली भाषेत बागेला ‘बागान’ म्हणतात. यामुळे ज्या भागात अशा बागांची अधिकता होती, त्या भागांना ‘बागान’ असे नाव पडले. जसे की, चाल्टाबागान, हत्तीबागान, पायराबागान आणि चोरबागान!

अभ्यासकांच्या मते, चोरबागान परिसराअंतर्गत ‘कालाबागान’ आणि ‘ठणठणीया’ हे भाग होते. त्या काळात ‘कालाबागान’ हे नाव बनावट चलन तयार करणाऱ्या लोकांमुळे पडले होते, तर ‘ठणठणीया’ भागात रस्त्यावरील जादूगार, हातचलाखीचे खेळ करणारे लोक, दरवेशी आणि मदारी राहायचे. त्यांच्याच सोबतीला या शेजारच्या भागात चोरांची मोठी वस्ती किंवा वावर असायचा.

चोरांच्या वस्तीचा इतिहास रंजक आहे. हा भाग शहरीकरण होण्याआधी घनदाट वृक्षराजीने सुसह्य होता, जंगलासारखा इलाखा असल्याने त्या काळचे ठग, पेंढारी, डाकू, चोर ह्या भागात लपत. नागरीकरणानंतर त्यांच्यातले काही लोक इथेच वास्तव्यास राहिले. रात्रीच्या वेळेस त्यांचा वावर वाढला की घंटा वाजवल्या जात. त्या घंटांच्या ठण ठण आवाजाने निनादत असलेला इलाखा म्हणजे ‘ठणठणीया’! त्याच्या लगत असलेल्या अवैध काळे धंदे करून जगणाऱ्या लोकांची वस्ती म्हणजे ‘कालाबागान’!

आणि ह्या सर्व चोर आणि लबाड लोकांच्या या एकत्र वास्तव्यामुळे या भागाला ‘चोरबागान’ हे नाव पडले. हा एक प्रकारे विशिष्ट जातीच्या लोकांना चोर ठरवण्यासारखा अमानुष प्रकार होता. कारण इथे बेदीया अथवा बाजीगर, आणि नट समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर राहत. आपल्याकडे जे खेळ डोंबारी सादर करतात तेच खेळ, तीच कला हे लोक सादर करतात. मात्र त्यांना हातचलाखी करणारे आणि चोर मानले गेले. ह्यात मदारी, दरवेशी देखील आले. मात्र नागरीकरणानंतरचे खरे चोर, हे लोक नव्हते!

जुन्या कोलकत्यातील श्रीमंत बाबू आणि जमीनदार आपल्या वाड्यांमध्ये, जसे की प्रसिद्ध मार्बल पॅलेस, शक्ती पॅलेस आदी ठिकाणी करमणुकीसाठी या नट आणि बाजीगरांना पाचारण करायचे. चोरबागानच्या आसपासच्या रस्त्यांवर आणि मोकळ्या मैदानांमध्ये हे डोंबारी खेळ नियमितपणे सादर केले जायचे. प्रसिद्ध जादूगार पी. सी. सरकार सारख्या दिग्गजांचेही या भागातील पारंपरिक कलाकारांशी जवळचे संबंध होते.

ठणठणीया कालीबाड़ी भागात एक पुरातन काली मंदिर आहे. डाकू देखील इथे दर्शनाला येत. परिसरातला घंटानाद आधी इथूनच केला जाई. इथे अजूनही मंत्र तंत्र साधना आणि कथित, प्रसिद्ध बंगाली काळी जादू आदी गोष्टी केल्या जातात. त्यामुळे ह्या इलाख्याच्या गूढतेत भर पडली. चोरबागानपासून जवळच माणिकतळा आणि सियालदा मासळी बाजार आहे, आणि राज्यातले सर्वात विशाल असे फळांचे ड्राय फ्रुट्सचे मार्केट असलेला मचुआबाजार देखील जवळच आहे. परिणामी इथे सामान्य माणसांचा राबता कायम असतो. त्यामुळे इथे चोरांना सहज सावज गवसते असे मानले जायचे, मात्र ते वास्तव नव्हते!

चोरबागानचा इतिहास येथील प्रसिद्ध ‘मित्र बारी’, बंगालीमध्ये मित्र बाडी, म्हणजेच मित्र कुटुंबाशी जोडलाय. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने फोर्ट विल्यमसाठी जमीन ताब्यात घेतली, तेव्हा अयोध्यराम मित्र हे मचुआबाजार भागात आले होते. त्यांचे नातू रामसुंदर मित्र, जे ‘ख्याँदाराम मित्र’ म्हणूनही प्रसिद्ध होते, त्यांनी सुमारे 350 वर्षांपूर्वी चोरबागानमध्ये भव्य बागांनी सजलेले हवेलीवजा घर बांधले.


 
रामसुंदर मित्र, हे एक मोठे सावकार होते आणि ते थेट लॉर्ड क्लाइव्हला देखील व्याजाने पैसे देत असत. इंग्रज अधिकाऱ्यांखेरीज कोलकत्त्यातील अनेक प्रतिष्ठित कुटुंबे या चोरबागानच्या मित्र घराण्याकडून कर्ज घेत. ज्यांनी इंग्रजांना व्याजाने पैसे दिले, त्यावर पैसे कमावले त्यांना समाज थोर म्हणतो आणि ज्यांचा जन्म एका विशिष्ट जातीत झाल्याने त्यांना चोर मानतो, हा चोरबागानचा विरोधाभास आहे. असो.

ह्याच चोरबागानमध्ये, चोरबागान सार्वजनिक दुर्गा पूजा समिती आहे. मात्र ह्या समितीने आजपर्यंत नवनवे विचार लोकांमध्ये रुजवले आहेत. अनेक पथदर्शी कामे मंडळामार्फत केली गेलीत. बंगालच्या दुर्गा पूजा उत्सवात मानाचे स्थान असलेले हे एक महत्वाचे मंडळ आहे. त्यांनी इतक्या चांगल्या थीमचा उत्सव यंदा केलेला असताना लोकांनी विरोधी टोकाची भूमिका घेतली. लोकांच्या आततायीपणामुळे, भयगंडाने पछाडलेलं असल्याने आणि सार्वजनिक शिस्तीची बेपर्वाई केल्याने एक मोठी दुर्घटना घडली. बंगालच्या दुर्गापूजेला गालबोट लागले!

– समीर गायकवाड


​Read More 

What do you think?

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

मी एक नाट्यप्रेक्षक