A)17 सप्टेंबर 1999. खोली नंबर 8, दुसरा मजला, देविका बिल्डिंग, जोगेन दत्त लेन, सोनागाची कोलकता. थंडीचे दिवस होते. अधून मधून पावसाची एखादी सर पडून जात होती. अख्ख्या सोनागाचीमध्ये बायकांच्या गलक्याने आणि विविध प्रकारच्या आवाजांनी एकच गहजब माजवला होता. आसमंतात सतराशे साठ प्रकारचे गंध दरवळत होते. दाटीवाटीने वसलेल्या त्या कोंदट वस्तीत मधूनच वाऱ्याची एखादी शीतल झुळूक येऊन गेली की बरे वाटे. कानाकोपऱ्यातून आलेले हजार तऱ्हेचे पुरुष हव्या त्या बाईच्या शोधात फिरत होते. ‘बुरी’ला त्या दिवशी खूप लवकर झोप लागली होती कारण मागच्या काही दिवसात तिला थकवा जाणवत होता. बुरी उर्फ छाया रानी पॉल हिच्या आयुष्यातली तीस वर्षे सोनागाचीच्या रेड लाइट एरियात गेली होती, तिथल्या भल्या बुऱ्या गोष्टींना ती पुरती जाणून होती.
मागील काही वर्षांपासून बुद्धदेव कर्माकर हा अट्टल गुन्हेगार तिच्याकडे यायचा. तिला जबरी भोगायचा, कधी पैसे दयायचा तर कधी तसाच निघून जायचा. कधी कधी मारहाण देखील करायचा. मात्र त्याच्यासोबत तिचे नाव जोडले गेल्याने तिला इतरांचा त्रास कमी झाला होता. तरीही त्याचे पाशवी वागणे तिला असह्य व्हायचे. त्याचा स्पर्शदेखील नकोसा वाटायचा. त्याच्या तोंडाला येणारा दारूचा वास आणि घामेजलेलं अंग ह्याची तिला तिडीक बसली होती. त्याला हाकलून दिले पाहिजे असे तिला राहून राहून वाटत असे.
17 सप्टेंबरच्या दिवशी ती थकलेल्या अवस्थेत दुसऱ्या मजल्याचा जिन्याखाली झोपली होती. कारण खोलीत लोक वासनेचा कार्यभाग उरकत होते, तिच्या आठ नंबरच्या खोलीतही तेच चालले होते. ती म्लान अवस्थेत पडून होती आणि इतक्यात बुद्धदेव तिथे आला. येताच त्याने तिच्याशी जिन्याखालीच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ती आरडा ओरडा करू शकत नव्हती, तिने त्याला अंगावरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सैतानी ताकदीसमोर तिचे काही चालले नाही तेव्हा ती हातपाय झाडून त्याला विरोध करू लागली. तिच्या अनपेक्षित प्रतिकाराने संतापलेल्या बुद्धदेवने तिला दोन्ही हातात गच्च धरून उचलले आणि जिन्यालगत असणाऱ्या दगडी भिंतीवर तिचे डोके अनेकदा आपटले! तिचा जागीच मृत्यू झाला. सोनागाची तिच्या खुनामुळे हादरली,
ती वस्ती एका दिवसासाठी संतापली, शोकमग्न झाली आणि दुसऱ्याच रात्री पुन्हा चमेली मोगऱ्याच्या गजऱ्यात हरवून गेली, रात्रभर तिचे कपडे उतरत राहिले. छाया रानी पॉलचे मरण त्यांच्यासाठी शोककारक होते मात्र त्या हतबल होत्या! बुद्धदेवला अटक झाली. त्याच्यावर खटला भरण्यात आला. सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवले, कोलकता उच्च न्यायालयानेही त्याला दोषी ठरवले; मग तो सर्वोच्च न्यायालयात गेला, २०११ साल उजाडावे लागले त्याच्या जन्मठेपेसाठी!
खरे तर बुद्धदेव निर्दोष सुटला असता मात्र आशा खातून नावाची वेश्याच ह्या प्रकरणाची आय विटनेस होती, तिच्यावर भयंकर दबाव टाकण्यात आला तरीही तिने जबानी बदलली नाही. तिच्या साक्षीमुळेच बुद्धदेवला जेलची हवा खावी लागली. आशा खातूनवर नंतर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मात्र ती डगमगली नाही. तिथल्या कित्येक बायका बरीच वर्षे तिची मिसाल देत होत्या. बुद्धदेव जेलमध्येच आहे आणि छाया रानी नंतर आठ बायकांची हत्या केली गेली. मात्र कठोर सजा कुणालाच लागली नाही. बुद्धदेवची केस महत्वाची ठरली.
B)1988 बंगळूर. पुरुषांच्या बलात्कारामागची मानसिकताच मुळात स्त्रियांवर दहशत पसरवण्याची आणि त्यांच्यावर काबू मिळवण्याची असते. जोवर स्त्रिया याला बळी पडत राहतील तोवर बलात्कार पिडीत महिला स्वतःला दोष देत जीव देण्याची भाषा करत राहील. या मनोवृत्तीत बदल घडवून आणण्यासाठी सुनीता कृष्णन महत्वाची वाटते…
एका सधन उच्चभ्रू उच्चजातीय वर्गातलं सुनीताचं कुटुंब होतं. घरी सगळी सुखे पाणी भरत होती. समृद्धी नांदत होती, कुठे नाव ठेवायला जागा नव्हती. मात्र एके दिवशी त्यांच्या कुटुंबास मोठा हादरा बसला. पंधरा वर्षे वयाच्या कोवळ्या सुनीतावर आठ नराधमांनी बलात्कार केला.
कुटुंब पुरतं थिजून गेलं. पण सुनीता धीट होती. तिने त्या परिस्थितीचा सामना केंला. मनोबल वाढवत स्वतःला आणि कुटुंबाला सावरलं. तिच्यावर झालेला बलात्कार जाणीवपूर्वक आणि नियोजित होता ! याचं कारण महत्वाचं आहे.
वयाच्या आठव्या वर्षी तिने शोषित घटकातील मुलींसाठी नृत्याचे वर्ग सुरु केले होते जे तिथल्या दलालांना आणि कुंटणखान्याच्या मालकिणींना मान्य नव्हतं. ही हकीकत आहे सुनीता कृष्णनची.
सुनीताचे वडील नकाशे बनवण्याच्या विभागात होते. त्या कामानिमित्त त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची देशभर भ्रमंती झाली होती. आईवडिलांसोबत राहणाऱ्या सुनीताने या काळात त्या त्या भागातील वंचित शोषित घटकावर जीव लावला. यातून तिच्या मनात मायेचा आस्थेचा करुण झरा सदैव पाझरत राहिला.
सुनीताच्या बलात्कारास त्या कुटुंबाने नव्या दृष्टीकोनातून पाहिलं. ते त्याला चिकटून राहिले नाहीत. त्यातून ते घट्ट उभे राहिले.सुनीताने बंगळूरुमधील सेंट जोसेफ महाविद्यालयातून पर्यावरण विज्ञान विषयातून पदवी घेतली. मंगलोरमधील रोशनी निलयमधून तिने एमएसडब्ल्यू केलं.
1996 साली ती हैदराबादेत असताना मेहबूब गली रेड लाईट एरियातील वेश्यांना त्यांच्या राहत्या घरातून बेदखल करण्यात आलं. तेंव्हा तिने एक जोरकस पाऊल उचललं. या बायका पोरींना तिने आश्रय दिला. त्यांच्यासाठी तिने लढा उभारला. या क्षेत्रात सुनीताचं नाव झालं. प्रज्वला नावाची एनजीओ तिने स्थापन केली.
2004 मध्ये सुनीताने सर्वोच्च न्यायलयात वेश्यांच्या मूलभूत हक्कांसाठी आणि संरक्षणासाठीची याचिका दाखल केली. तब्बल 22 वर्षानंतर न्यायालयाने त्यावर अंतिम निकाल दिला आहे. किती जलद आइण वेगवान न्याय आहे हा!
बुद्धदेव कर्माकरच्या खटल्यात जे निरीक्षण नोंदवण्यात आले होते त्याचीच अपडेटेड आवृत्ती म्हणजे हा निकाल होय. पोलीस जेव्हा धाड टाकतात तेव्हा ज्या स्त्रिया स्वेच्छेने धंदा करतात त्यांना पोलिसांनी त्रास देऊ नये आणि बळीचा बकराही बनवू नये असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं होतं!
प्रज्वला वि. भारत सरकार ह्या प्रकरणातील ताज्या निकालानुसार वेश्या व्यवसाय करणे हा गुन्हा नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. प्रौढ स्त्रियांचे बळजबरीचे पुनर्वसन चुकीचे असून, तसेच त्यांच्या इच्छेविरोधात त्यांना संरक्षण गृहात – सुधार गृहात ठेवण्याची जबरदस्ती करता येणार नाही! या स्त्रियांसोबत संबंध ठेवण्याआधी माहिती देऊन परवानगी घेतलेली अनिवार्य आहे असा महत्वाचा आदेश कोर्टाने दिला आहे.
वैयक्तिकरित्या स्वतःचे पोट भरण्यासाठी एखादी महिला स्वतःच्या घरात राहत असेल, तर ते घर म्हणजे ‘वेश्यागृह’ मानले जाऊ शकत नाही. मात्र, अनैतिक मार्गाने दलाल किंवा कुंटणखाना चालवणे कायद्यानुसार आजही गुन्हा आहे. स्वेच्छेने काम करणाऱ्या अशा महिलांना पोलिसांनी विनाकारण त्रास देऊ नये, अटक करू नये किंवा त्यांच्या कामात ढवळाढवळ करू नये हे महत्वाचे निरीक्षण नोंदवले!
अनेक महत्वाचे मुद्दे अस्पष्ट, अर्धवट ठेवून मोघम निकाल देण्यात आपल्या न्यायालयांचा हातखंडा आहे! दोन तीन दशके सुनावण्या घेत राहणे आणि न्यायाच्या नावाखाली संभ्रमात टाकणार निर्देश देणे ह्याला न्याय म्हणावे का? असो! हा न्याय देखील अनेकांच्या नजरेत सलतोय आणि त्यासाठी ह्या बायकांची यथेच्छ नालस्ती केली जातेय हेच आपल्या समाजाचे खरे चरित्र आहे!
– समीर गायकवाड


GIPHY App Key not set. Please check settings