in

माझे माझ्या पत्नीवर प्रेम आहे. ती आज या जगात नाही…

रिचर्ड फाईनमनचे त्याच्या पत्नीस पत्र.

रिचर्ड फाईनमनबद्दल जास्त लिहिण्याची काही गरज नाही. पदार्थविज्ञानातील एक बाप माणूस!

१९४० अणुबाँबच्या प्रकल्पात त्याने महत्वाची भूमिका निभावली होती.

१९८४ मध्ये रॉजर्स कमिशनचा सदस्य म्हणून त्याने स्पेस शटल चॅलेंजरच्या अपघाताच्या कारणाचा शोध घेतला.

१९६५ मध्ये त्याला आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स या विषयात मूलभूत तत्वांवर काम केल्याबद्दल नोबेल मिळाले. त्याला ज्यात रस वाटेल त्याच्यावर तो काम करे. आवडते म्हणून तो ड्रम वाजवायला शिकला. शेवटी तो ’’आऊट ऑफ बॉडीचे अनुभव’’यावर प्रयोग करत होता. तो विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होता.

जून१९४५ मध्ये त्याची पत्नी ॲर्लीनचा टी. बी मुळे मृत्यू झाला. त्यावेळी तिचे वय होते फक्त २५. ते शाळेपासून एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

१६ वर्षांनंतर फाईनमनने आपल्या निवर्तलेल्या पत्नीस एक पत्र लिहिले, जे त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे १९८८ साली उघडण्यात आले.

पत्राचा शेवट फारच हृदयद्रावक आहे..

१७ ऑक्टोबर १९४६

प्रिय ॲर्लीन,

लाडके, मला तुझे किती कौतुक आहे ते मी शब्दात सांगू शकत नाही.

मला कल्पना आहे, की तुला हे ऐकण्यास फार आवडेल, पण मी हे तुला आवडेल म्हणून लिहीत नाही, तर हे लिहिताना एक प्रकारची उर्मी माझ्या नसानसातून वाहते आणि त्या भावनांनी मला फार बरं वाटतं.

मी तुला शेवटचे लिहिले त्याला आता दोन वर्षे उलटून गेली. भयंकर दोन वर्षे, पण मला खात्री आहे की तू मला क्षमा करशील, कारण मी किती आडमुठा आणि वास्तववादी आहे हे तुला चांगलेच माहीत आहे. आता पत्र लिहिण्यात काही अर्थ नाही असं मला वाटलं होतं खरं! पण, लाडके ज्याला मी एवढा उशीर केला ते आता करायची योग्य वेळ आली आहे असे मला वाटतंय. फारच उशीर झालाय हेही खरे आहे… मला तुला सांगायचंय, लाडके माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्यावर प्रेम करायचंय. मी तुझ्यावर निरंतर प्रेम करणार आहे.

आता तू गेल्यावर तुझ्यावर प्रेम करण्याचा अर्थ काय हे मी माझ्या मनाला सतत विचारतोय..पण मला अजूनही तुझी काळजी घ्यायची आहे आणि तुला साथ द्यायची आहे आणि तूही माझ्यावर तसेच प्रेम करावेस, माझी काळजी घ्यावीस अशी माझी इच्छा आहे. मला प्रश्न पडावेत आणि तुझ्याबरोबर मला पडलेल्या प्रश्नांची चर्चा करावी, तुझ्याबरोबर छोटे मोठे प्रयोग करायचे आहेत. खरे सांगायचे तर ते आपण एकत्र करू शकतो हे मला या क्षणापर्यंत वाटत नव्हते. काय करावे आपण? आपण एकत्र कपडे शिवायला शिकलो. चीनी भाषा शिकलो किंवा कुठला प्रोजेक्टर घ्यायचा यावर चर्चाही केल्या. आता तसेच काहीतरी आपण का करू शकत नाही? नाही गं! तुझ्यावाचून मी एकटा पडलोय. माझ्या सर्व कामामागची प्रेरणा तूच आहेस.

जेव्हा तू आजारी होतीस, तेव्हा तुला पाहिजे ते तू मला देऊ शकत नाहीस म्हणून तू दुःखी व्हायचीस. मलाही ते पाहिजे असेल म्हणून तू अजूनच दुःखी व्हायची. तुला दुःखी व्हायचे काही कारण नव्हते, कारण मी मनापासून सांगतो तुला, माझे तुझ्यावर प्रेम होते आणि त्याच्यापुढे कशालाही किंमत नव्हती. हे तर आता सिद्धच झालंय. आता तर तू मला काहीच देऊ शकत नाहीस, पण माझे तुझ्यावरचे प्रेम एक तसूभरही कमी झालेले नाही. मी तुझ्याशिवाय कोणावर प्रेम करूच शकत नाही. तू त्याच्या आड येतेस, पण मला मनापासून वाटते, की तू तेथे अशीच उभी राहावीस. मृत्यूनंतरही तू इतरजनांपेक्षा मला जास्त जवळ आहेस. इतर कोणत्याही जिवंत माणसापेक्षा, तुझा मृत्यू झाला तरीही तू सर्वोत्तम आहेस. मला माहीत आहे तू मला बावळट म्हणशील आणि तुला मला आनंदात जगताना पाहायचे आहे हेही मला समजावून सांगशील. माझ्या सुखाच्या आड तुझ्या आठवणींना येऊ देऊ नकोस हेही मला तू एकवेळ पटवून देऊ शकशील. दोन वर्षांनंतर मला एकही मैत्रीण नाही हे ऐकून तुला आश्चर्य वाटेल,पण त्याला माझा नाईलाज आहे आणि तुझाही, कारण मी या दोन वर्षात अनेक मुलींना भेटलो, सुंदर मुलींना भेटलो, पण दोन तीन वेळा भेटल्यावर त्या सगळ्या मला मृत्तिकेसमान वाटू लागल्या. इतर कोणीही तुझी जागा घेऊ शकत नाही हे वास्तव आहे आणि मी वास्तववादी आहे हे तुला चांगले माहीत आहे.

लाडके माझे तुझ्यावर प्रेम आहे.

मी माझ्या पत्नीवर प्रेम करतो. माझी पत्नी आज या जगात नाही.

रिच.

ता.क. हे पत्र मी पोस्टात टाकले नाही त्यासाठी मला क्षमा कर, पण मला तुझा नवीन पत्ता माहीत नाही..

– अनुवाद – जयंत कुलकर्णी

See less

Read More 

What do you think?

Written by Jayant Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

बाबा पद्मनजी – यमुना पर्यटन आणि धर्मप्रसार : एक चिकित्सा !