ह्या फोटोमधला राजा आणि त्याचा घोडा ह्यांची गोष्ट दोन हजार वर्षांपुर्वीची आहे मात्र आजच्या काळात तिचे पुनरुज्जीवन झाल्यासारखे वाटतेय! त्याची ही नोंद.
त्याच्या राज्यात लैंगिक अत्याचार अशा काही टोकाला गेले होते की त्याविषयी बोलणाऱ्यास देखील शरम वाटावी! त्याने त्याच्या पत्नीवर देखील असेच विकारी अत्याचार केले होते. आपली बहीण, पत्नी आणि सहकाऱ्यांच्या बायका, राज्यातील स्त्रिया ह्यापैकी कुणावरही त्याचं मन मानेल तेव्हा तो जबरदस्ती करत असे आणि ती देखील सार्वजनिक रित्या!
त्याच्या राज्यात जनतेला काय-काय सहन करावे लागत असेल याचा विचारही केल्यास अंगावर काटा येतो. कुख्यात रोमन किंग, गाएस ज्युलिएस सीझर जर्मेनिकस उर्फ ‘कॅलिगुला’ची ही नोंद. कॅलिगुला हा रोमचा तिसरा सम्राट होता. काही लोक त्याला सर्वार्थाने दिवाळखोर इसम म्हणत. त्याच्या कारकिर्दीला दोन हजार वर्षे उलटून गेली आहेत तरीदेखील त्याच्या अन्याय अत्याचाराच्या कहाण्या आजही सांगितल्या जातात. अलीकडील काळात त्याचे नाव पुन्हा चर्चेत आलेय कारण त्याच्या गुणलक्षणांशी साधर्म्य असणारे पुष्कळ राष्ट्रप्रमुख देशोदेशी उदय पावले आहेत! त्यांच्या राज्यकारभारात कॅलिगुलाच्या व्यवहाराची गडद छटा आहे!
कॅलिगुला राजाला आपल्या साम्राज्यात कुणी लांब केस ठेवलेले अजिबात खपत नव्हते. एखाद्या व्यक्तीचे लांब केस दिसल्यास त्याला पकडून केस उपटण्याची शिक्षा तो देत असे. कॅलिगुलाला घोड्यांची विशेष आवड होती. त्याचा आवडता घोडा इनसिटॅटसवर तो खूप प्रेम करायचा. त्याने आपल्या या घोड्यासाठी महाल बांधले होते. जेणेकरून घोडा आरामात राहू शकेल. त्याच घोड्याला आपल्या दरबारात मंत्री पद देऊन त्याने हद्दच केली होती.
कॅलिगुलाला त्या घोड्याला कौन्स्युलर बनवायचे होते. रोमन सत्तेमधले ते सर्वोच्च राजकीय पद होते, जे राजाच्या खालोखाल मानले जाई. खरेतर ह्या विकृत राजाच्या डोक्यात घोड्याची लीद साठलेली होती, जसे अलीकडे काहींच्या डोक्यात शेणमूत्र साठलेले दिसते, अगदी तसेच! कॅलिगुला रोमन सिनेटचा द्वेष करायचा, त्याचा लोकशाहीवरती काडीमात्र विश्वास नव्हता, मात्र सिनेटपुढे त्याचे चालत नसे. सिनेटमधली विद्वान, व्यासंगी मंडळी त्याचा तिरस्कार करत हे तो जाणून होता! इतकेच नव्हे तर त्याच्या समकालीन काळातले सर्व बुद्धिमंत ज्ञानी लोक त्याच्यावर तीव्र नाराज असत!
केवळ काकतालीय योगाने आणि फसवाफसवी करून सत्तेत आलेल्या कॅलिगुलाला हे लोक आपल्यापेक्षा हुशार, विवेकी आणि ज्ञानी आहेत ह्याचा भयंकर राग होता. तो त्यांच्यावर चडफडत असे. इनसिटॅटस नावाच्या तगड्या घोड्याला मंत्रीपद देण्यामागे त्याचा हेतु हाच होता की, सिनेटर्स आणि लोकशाही ह्यांची किंमत त्याच्या लेखी काय आहे हे त्याच्या जनतेला कळावे! रोमन सिनेटची खिल्ली उडवण्यासाठी आणि एक घोडाही त्यांची कामे करू शकतो हे दाखवण्यासाठी, त्याने केलेली ही मोठी थट्टाच होती!
सध्या जगभरात अनेकांना लोकशाही नकोशी झालीय, मग त्यांनी अतिशय भिकार आणि निर्बुद्ध मंद माणसं मंत्रीपदी ठेवून लोकशाही आणि त्यांच्या देशातील राज्यव्यवस्थेचा सूड घेत आहेत! स्वतः फसवाफसवी करून निवडून आलेले आणि काकतालीय न्यायाने खुर्चीवर चिटकून बसलेले हे नेते आधुनिक काळातले कॅलिगुलाच आहेत! तो जसा विक्षिप्त, चक्रम आणि लहरी होता तसेच आताची काही कर्ती मंडळी आहेत!
कॅलिगुला जनतेशी थेट संवाद साधायला भ्यायचा! तो अतिशय शूर विक्रमवीर असल्याचा आव आणायचा मात्र वास्तवात तो विलक्षण भेदरट आणि घाबरट होता! मात्र तो तितकाच धूर्त आणि कपटी कारस्थानी होता. त्याला ज्यांनी सत्तेची राजवस्त्रे दिली त्यांची गरज संपल्यावर निर्दयी पद्धतीने त्याने त्यांचा काटा काढला. त्याच्या महालात सेक्सचे विकृत वर्कशॉप चाले ज्यात तो स्वतः लक्ष देई!
कॅलिगुलाची विकृती ह्या स्तरावरची होती की, त्याच्या राज्यात पुरूषांचे लैंगिक शोषण करणाऱ्यास तो बढावा देई! अनेक कोवळ्या देखण्या मुलांचे त्याने हृदयद्रावक पद्धतीने शोषण केले होते. एपस्टीनचा खऱ्या अर्थाने पूर्वज जर कुणी असेल तर तो कॅलिगुला होता! आपण कल्पनाही करू शकणार नाही असे त्याचे लैंगिक चाळे चालत, खेळ चालत आणि शोषणही चाले! त्याचा त्याला अभिमान होता. खरेतर त्याच्या अंगी शौर्य नव्हते आणि ज्ञानी लोकांचा मुकाबला करता येईल अशी बुद्धीमत्ताही नव्हती. लोक आपल्या नियंत्रणात रहावेत म्हणून तो एकतर त्यांना ह्या चिखलात सामील करून घेई अथवा ह्याचे भय दाखवत असे!
तो काही मजबूत शरीरयष्टीचा धिप्पाड इसम नव्हता. उंच मध्यम बांध्याचा कॅलिगुला आपल्या अजब आदेशांमुळे बदनाम होता. त्याचे डोळे बारीक आणि खोबणीमध्ये आत गेल्यासारखे दिसायचे. त्यामुळे, लोक त्याची थट्टा मस्करी करताना बकरी म्हणायचे. त्याचा त्याला इतका राग होता की, बकरी शब्दावर त्याने जणू बंदीच घातली होती. चुकून एखाद्या व्यक्तीने त्याच्यासमोर बकरी असे नाव काढल्यास तो आपल्यालाच चिडवत असल्याचे समजून त्या व्यक्तीचे मुंडके छाटण्याचे आदेश तो द्यायचा.
आपण कुणी तरी दैवी पुरुष आहोत आणि प्रजेने, सिनेटने आपल्याला प्रश्न करू नयेत, आपल्याला वचकून राहिले पाहिजे असे त्याला मनोमन वाटे. आपण चिरतरुण आणि देखणे दिसावे म्हणून तो अस्सल मोती विरघळवून त्याचे अर्क प्यायचा. लोकांच्या जिवावर त्याने अफाट ऐश केली. आपल्या बाथटबमध्ये सोन्याचे दागिणे आणि नाणी टाकून तो आंघोळ करायचा. आपण फार शक्तिशाली दिसले पाहिजे ह्यासाठी तो सतत काही ना काही फंडे आजमावत असे! इतके करूनही त्याचे वागणे असे असायचे की, आपण राज्यकारभार करत आहोत म्हणजे प्रजेवर जणू उपकारच करत आहोत. त्याचे अंधसमर्थक आणि त्याच्यापासून उखळ पांढरे करून घेणारे भामटे मात्र तोंड फाटेस्तोवर त्याचे कौतुक करत असत!
कॅलिगुलाच्या विकृतीशी एक महत्वाची समानता जगभरातील बऱ्याच शासकांमध्ये आहे आणि ती म्हणजे आपल्याच प्रजेवर अत्याचार होताना पाहणे! त्याचा अप्रत्यक्ष आनंद घेणे! कॅलिगुलाच्या राज्यात आखाड्यातील जंगली प्राण्यांच्या खेळांसाठी पुरेसे दोषी गुन्हेगार नसत, तेव्हा कॅलिगुला गर्दीतील कोणत्याही प्रेक्षकांना श्वापदांसमोर फेकण्याचा आदेश देत असे! ती व्यक्ती तडफडून मरत असे आणि हा शांतपणे बसून राही! त्याचे समर्थक मात्र चेकाळून जात! अशा व्यक्तींना कोणताही धरबंद उरत नाही तेव्हा त्यांच्याच कर्माने त्यांचा अस्त होतो! जो वर्तमान त्यांचे गोडवे गात असतो तो वर्तमान भूतकाळात परावर्तित झाल्यावर मात्र त्याचे खरे मूल्यमापन काळ आपल्या निष्ठुर कसोट्यांवर करतो, त्याचे खरे स्वरूप जगापुढे आणतो! अशा व्यक्तींच्या अपरोक्ष काळात लोक त्यांचे नामोच्चारदेखील टाळू लागतात हा इतिहास आहे!
नीतिमान असण्याचा आव आणणाऱ्या कॅलिगुलाचा अंत अखेरीस विश्वासघातानेच झाला, मात्र त्या क्षणापर्यंत तो आणि त्याचे पाठीराखे जगाचा त्राता तोच आहे ह्या विकारभावनेने ग्रासलेले होते! विविध देशातले बिनडोक, कामचुकार आणि निर्बुद्ध मंत्री, तिथल्या राजसत्तांनी केवळ तिथल्या लोकशाहीवर सूड उगवण्यासाठी आणि लोकांना काठेवाडी घोडा लावण्यासाठीच नेमले आहेत! जसा इनसिटॅटस हा घोडा कॅलिगुलाने पदनियुक्त केला होता, तसे हे लोकांचे दमण करण्यासाठी ठेवलेले मानवी घोडे आहेत! आपल्याला ते ओळखता आले पाहिजेत!
– समीर गायकवाड


GIPHY App Key not set. Please check settings