in

Quantum Canvas…एक सुंदर अनुभव

Quantum Canvas…एक सुंदर अनुभव काल जीवनात आलेला. C Cube आर्ट गॅलरी यांच्या वतीने ठाणे येथील ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन’ येथे हे चित्रप्रदर्शन आयोजित केले गेले होते. 

२५ जून पासून हे कलाप्रदर्शनआमंत्रित कलाप्रेमींसाठी सुरु झाले. मी या कलादालनास प्रथमच भेट दिली आणि इतकी सुंदर वास्तू ठाण्यातील कलाप्रेमींसाठी उपलब्ध आहे हे जाणून खूप आनंद वाटला.C Cube आर्ट गॅलरी यांच्या या पूर्वीच्या चित्रप्रदर्शनासही मी भेट दिली होती आणि तो अनुभव सुद्धा आल्हाददायक होता. त्यामुळे यावेळी येताना असलेली उत्सुकता द्विगुणित होती. उदघाटन सोहळा RJ मानसी हिच्या उत्कृष्ट निवेदनामुळे आणि कथक नृत्यांगना कल्याणी यांच्या गणेश वंदना आणि ठुमरीच्या सादरीकरणामुळे विशेष रंगला. पद्मश्री अच्युत पालव आणि चित्रकार किशोर नांदावडेकर यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या या प्रदर्शनाचा आस्वाद घेत असताना प्रदर्शनाबद्दल कुतूहल तर होतेच परंतु ते प्रदर्शन ज्या सुव्यवस्थितरित्या आयोजित केले होते त्यासाठी CCube आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक करावेसे वाटते.

वरच्या मजल्यावर ३ विविध दालनांमध्ये ३ कलाकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. पहिले दालन म्हणजे समकालीन भाववाचक अभिव्यक्तीचे केलेले अचूक चित्रण जिथे भावना , पोत आणि वातावरण या प्राथमिक विषयांवर विशेष भर दिला गेला आहे. चेतन शेट्टी या कलाकाराच्या कलाकृतींतून दृश्य जगाचे दर्शन अगदी क्वचितच घडते पण यातून हळूहळू समन्वेषण होत जाते आणि अंतर्मनातील स्मृती , स्तब्धता, परिवर्तन आणि नव्या भावना असे विविध पदर उलगडले जातात. विशिष्ट पोत निर्मितीसाठी केली गेलेली थरांची आवर्तने, विस्कळीत आकृत्या आणि सांकेतिक पद्धतीत चिञभर फिरलेला कुंचला या सर्वांमुळे त्या प्रत्येक चित्रात असलेली एक हालचाल दृष्टीस पडते जी मानसिक खोलीचा ठाव घेते. यात वापरल्या गेलेल्या रंगसंगतींमुळे शांतता आणि ऊर्जा या दोन्हींचे एक नाजूक संतुलन पाहावयास मिळते जे अधिक सुखद वाटले. यात चित्रकाराला काय दाखवायचे आहे त्यापेक्षा दर्शकाला काय अनुभवता येईल यावर भर दिला गेला आहे जणू एखादी कविता… कवीने साकारलेला त्याचा अनुभव अर्थ, अलंकार, शब्दांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आपल्या पद्धतीत पोहोचते आणि त्याची अनुभूती ही आपली स्वतःची असते.

दुसरे दालन म्हणजे एका पुत्राने पित्याकडून निर्माण झालेला, वर्षानुवर्षे सांभाळून ठेवलेला खजिना जो आज सर्वाना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.  स्वातंत्रोत्तर भारतीय कला आधुनिकतेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे चित्रकार P L राणे. चित्रे, रेखाटने, छायाचित्रण, रेखाचित्रे आणि प्रायोगिक अभ्यासातून राणे यांनी एक विशिष्ट दृश्य भाषा विकसित केली जिचा मूळ पाया निरीक्षण, शिस्त आणि प्रयोग हाच होता. त्यांच्या साधनेतून आधुनिकतेमुळे येणारी क्लिष्टता , सामाजिक बदल, मानवी भावना , मनाचा थांग अशा अनेक गोष्टींचे दर्शन घडते. वास्तव आणि चित्र यांचा अनोखा मेळ त्यांच्या चित्रांतून नजरेस पडतो. कमीत कमी रेषांमधून जास्तीत जास्त भाव प्रकट करण्याचे सामर्थ्य त्यांच्या कुंचल्यात होते.त्यांचा हा ठेवा फक्त कलात्मक नव्हे तर इतिहासाचा एक अमूल्य वारसा आहे ज्यातून नव्या भारत जन्माचे चित्र उमटत जाते.

या प्रदर्शनातील तिसरे म्हणजे शेवटचे दालन केवळ अप्रतिम . अद्भुत हा एकच शब्द समर्पक वाटतो ते अनुभवताना. आजपर्यंत मी तरी अशा प्रकारचे चित्रप्रदर्शन यापूर्वी पाहिले नव्हते. नेहमीच्या चित्रांपासून हे काहीतरी खूप वेगळे होते. शांत अशा काळोखातून ती एकेक दैवी कलाकृती दृष्टीसमोर येते. प्रत्येक कलाकृती प्राचीन चिन्हे , मंदिरांतील वास्तुशास्त्र , आणि पवित्र भौमितिक आकृत्या यांपासून प्रेरणा घेऊन चितारलेले आहेत. चित्रांतील दोलायमान रंगसंगती आणि उत्तम प्रकाशयोजना यामुळे ध्यानाचे एकेक पदर उलगडत जातात. पाहणारा त्यात स्वतःला शांत करत , आसपासच्या वातावरणापासून अलिप्त होत, तल्लीन करून घेत हरवत जातो. तिथे जरी शांती असली तरी एक मूक संवाद होता,भावनांच्या गदारोळातही अनुभूती देणारी स्तब्धता ,एक वेगळेच मानसिक संतुलन होते. अशाप्रकारे प्रत्येक चित्र दृश्य अविस्मरणीय असा ध्यानानुभव प्रदान करण्यास समर्थ ठरते. एक कलाकार म्हणून कलेचा एक नवा अविष्कार आज समोर आला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार ध्यान पासिका यांची हि कलाकृती म्हणजे कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. 

या सर्वांसोबत चित्रकार योगेश शिंदे यांची मांडण्यात आलेली चित्रे हा सुद्धा एक सुंदर अनुभव होता. प्रत्येक चित्र एकमेकांपासून वेगळे पण तरी एकमेकांसोबत बांधलेले. खूप छान ! आजपर्यंतचा Ccube चा इतिहास पाहता मला सांगावेसे वाटते कि यांचे सारेच उपक्रम खूप सुनियोजित आणि उत्तम असतात. अशीच प्रगती पुढेही होत राहो. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

हे संपूर्ण प्रदर्शन माझ्यासाठी विशेष प्रेरणादायी ठरले. CCube च्या प्रांजली शिंदे यांचे विशेष आभार ज्यांनी या प्रदर्शनासाठी आमंत्रित केले आणि एक संस्मरणीय असा अनुभव आज माझ्या आयुष्यात आला. नक्कीच यातून प्रेरित होऊन माझ्याही कामात वेगळे बदल घडून येतील.

– रुपाली ठोंबरे 

Read More 

What do you think?

Written by Rupali Thombare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

सुनीताबाईंचा ‘डोडी’