in

हा बिहार पूर्वी असा ‘विकृत’ नव्हता!


हा बिहार पूर्वी असा नव्हता, मात्र त्या काळातला बिहार कसा होता हे जाणून घेण्याआधी आताच्या बिहारमध्ये काय घडतेय याचा एक धांडोळा घेतला पाहिजे. त्याची एक चुणूक दिल्याशिवाय बदल लक्षात येणार नाही. असो.
बिहारमधील जमुई येथे 22 सप्टेंबरच्या दिवशी अल्पवयीन मुलीच्या शोषणाची घटना घडली, देशभरात आक्रोश झाला. काही आरोपींना पकडले गेले. त्याचा ‘नीट’ तपासही होईल अशी आशा वाटत नव्हती. कोर्टबाजी होईल असे मात्र वाटत होते. मात्र मूळ समस्या ‘जैसे थे’च राहणार हे नक्की, कारण शासकांची शोषण वृत्ती!

जमुईच्या लोकप्रतिनिधीपदी, म्हणजे आमदार म्हणून एक स्त्री काम पाहतेय याचे समाधान वाटले होते मात्र त्यांचे  विचार ऐकल्यावर इथे अशा घटना का घडत असाव्यात याचे उत्तर मिळते. श्रेयसी सिंह हे ह्या महिला आमदारांचे नाव. त्या म्हणतात की, ‘मॉरल पोलिसिंग ठीक आहे, त्यात काही गैर नाही. मात्र ते थोडेसे डिसेंट आणि एलिगंट पद्धतीने व्हायला हवे!’
खरे तर त्यांनी अशा पद्धतीच्या मॉरल पोलिसिंगचे क्लासेस घेतले पाहिजेत, सम्राट चौधरी त्यासाठी निधी नक्की देतील!

इराण, अफगाणिस्तान, नायजेरिया, सुदान, लिबिया ह्या कर्मठ 

मुस्लिम देशांत अधिकृत रित्या मॉरल पोलिसिंग चालते. श्रेयसी सिंहच्या डोक्यात नक्कीच मध्ययुगीन संस्कारी किडे असणार; त्यामुळेच त्यांनी ही विचारपुष्पे उधळली आहेत. भारताचा अफगाणिस्तान, इराण व्हावा असे ज्यांनाही वाटते त्या प्रत्येकाचा ह्या मध्ययुगीन विचारांना नक्कीच पाठिंबा असेल, आणि आपल्याकडे अशांची कमी नाहीये!

बिहारमधील जमुई येथील प्रचंड यशस्वी ठरलेल्या जबरी लैंगिक शोषणाच्या प्रयोगानंतर, दोनच दिवसांत 24 तारखेस बिहारमध्येच समस्तीपूर येथे अगदी तसाच यशस्वी प्रयोग साकारण्यात आला! उलट थोडी प्रगती देखील केली गेली, जमुई मधील घटना रात्रीच्या वेळेसची होती, समस्तीपूरची घटना दिवसाढवळ्याची आहे!

जमुईच्या भाजप आमदार आणि बिहारमधील मंत्री श्रेयसी सिंह ह्या घटनेचीही भलावण करू शकतात, मॉरल पोलिसिंगला त्यांची हरकत नाहीये ते थोडेसे डिसेंट आणि एलिगंट असले पाहिजे असे त्यांनी म्हटले होते! समस्तीपूरमध्ये ती अट स्थानिक ‘लाडक्या’ भावांनी मानलेली दिसत नाही! मराठी भैय्ये याचेही समर्थन करू शकतात, त्यांच्या घरच्या बायका पोरींवर हात टाकेपर्यंत ते काही केल्या समर्थन थांबवणार नाहीत! आपला देश सुसाट निघाला आहे. तो आता थांबत नसतो! ह्यावर कुणीही संताप व्यक्त करू नये, कारण तसेही आपल्या द्वैमासिक रागाचे पुढे जाऊन अळूचे फदफदेच होत असते!

ह्या घटनेनंतर एक जादू घडली. खरेतर जादूवर पोस्ट लिहायचा 

योग कधी येत नाही. मात्र काल एक अभूतपूर्व जादू घडली, जी तुम्हाला सांगावी वाटत्येय! इच्छा असल्यास कदाचित तुम्हीदेखील ती जादू अनुभवू शकाल! ह्या जादूचे श्रेय बिहार पोलिसांना आहे! त्यांच्यासाठी कौतुक आणि टाळ्या! ही जादू काय होती हे वाचून तुमची शुद्ध हरपू शकते!

बिहारमध्ये एखाद्याच्या पायात आरपार गोळी झाडली असेल तर तो व्यक्ती फक्त एकच दिवस लंगडतो! दुसऱ्या दिवशी त्याचे बँडेज बंद होते, जखम भरून येते आणि तो पहिल्यापेक्षा अधिक खणखणीतपणे चालू लागतो! समजा एखाद्याला लाठीकाठीने ठोकले असेल त्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला असेल तर त्याचे बँडेज दुसऱ्या दिवशी निघून येते!

हा चमत्कार तुम्हालाही अनुभवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बिहारमधील जमुईला जाऊन छेडखानी करावी लागेल. मग पोलिस तुमचा कथित एनकाउंटर करतील म्हणजे पायात गोळी घालतील किंवा तुमचा पाय फ्रॅक्चर केला जाईल! तुम्हाला अटक केली जाईल, पायातून गोळी काढली जाईल, ड्रेसिंग केले जाईल. तुमचा पाय कथित रित्या फ्रॅक्चर झाला असेल तर त्यावर प्लास्टर केले जाईल! त्या दिवशी तुम्ही पोलिसांच्या खांद्यावर हात ठेवून लंगडत चालू शकता. बिहार पोलिस तुम्हाला चांगल्या अर्थाने खांदा प्रोव्हाइड करतील.

दुसऱ्याच दिवशी तुमच्या सोबत ती खास जादू घडेल. तुमची जखम भरून आलेली असेल. ड्रेसिंग काढले जाईल आणि तुम्ही पहिल्यापेक्षा अधिक वेगाने चालू शकाल! काही नतद्रष्ट याचाही पुरावा मागतील! त्यांनी गुगल सर्च करावे खंडीभर फोटो आढळतील. जमुई येथे मुलीच्या लैंगिक शोषणासाठी पकडला गेलेला आरोपी हरेराम यादव हा या चमत्काराचा प्राप्त्यर्थी आहे, हा चमत्कार त्याच्या सोबत घडला आहे! हरेरामचे पाय पहिल्यापेक्षा अधिक तंदुरुस्त झाल्याचे तुम्ही पाहू शकता! इथे ओशाळले वैद्यकीय ज्ञान आणि इथे ओशाळले पिस्तुल, प्लास्टर! जय बिहार! जय गंगा मैय्या! जय श्रीराम आणि हरेराम! पुनश्च असो.

25 तारखेस बिहारमध्ये ह्या दिशेने आणखी प्रगती झाली. जमुई, समस्तीपूर नंतर बांका शहराच्या परिसरात बिहारमध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा मुलीच्या सार्वजनिक छेडखानीची आणि जबरदस्तीची घटना घडली. तिथल्या सरकारमधील लोक याला मॉरल पोलिसिंग म्हणू शकतात. किंवा मराठी भैय्ये देखील सवयीप्रमाणे याचेही समर्थन करू शकतात.

ह्या अनुषंगाने अगदी क्षणाचा जरी विचार केला तर बिहारी जनतेमध्ये मोठा विरोधाभास दिसतो. इथे कौटुंबिक कार्यक्रमात देखील बायका आणून नाचवणे आम झालेय. अतिशय अश्लील हावभाव करणाऱ्या आणि पांचट अर्थाच्या भोजपुरी गाण्यावर घरातल्या बायकांसमोर बाजारू बायका आणून नाचवल्या जातात. कावड यात्रा असो वा होळी, नवरात्र असो कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात गलिच्छ नाचगाणी केली जातात, एकंदर बायकांना विवस्त्र करुन नाचवण्यापर्यंत त्यांनी सारे न्यू नॉर्मल केले आहे. याचा यांना कसलाही राग येत नाही.

विशेष म्हणजे धर्माच्या नावावर धर्मद्वेष करणारे आणि आपली पोळी भाजून घेणारे देखील ह्याबाबतीत मूग गिळून गप्प असतात! तेव्हा अशी अडवणूक कुणी करत नाही. उलट याला छुपे प्रोत्साहन दिले जाते, यासाठी राजकीय, धार्मिक व्यवस्था पैसा पुरवते! सद्यकालीन बिहारच्या भूमीला प्रेमाचे वावडे असावे असे दिसते! कुणीही एकटे जोडपे अथवा एखादा मुलगा मुलगी मग ते भाऊ बहीण, मित्र मैत्रीण असले तरी त्यांच्याकडे वक्रदृष्टीने पाहिले जाते. मुलीला बदचलन ठरवून मारहाण केली जाते, तिच्या अब्रूच्या रक्षणासाठी हे सर्व करत आहोत असे भासवणारेच तिला नकोसे स्पर्श करतात!

मात्र ही भूमी पूर्वापार अशी कधीच नव्हती! वैशालीची प्रसिद्ध नगरवधू आणि महान नृत्यांगना आम्रपाली हिच्या सौंदर्याची ख्याती ऐकून मगधचा सम्राट बिंबिसार तिच्या प्रेमात पडला, ही प्रेमगाथा इथलीच! मगध आणि वैशाली ही एकमेकांचे कट्टर शत्रू राज्ये होती. शत्रू राज्यातील असल्यामुळे बिंबिसार थेट आम्रपालीला भेटू शकत नव्हता.

आम्रपालीला केवळ पाहण्यासाठी आणि तिला भेटण्यासाठी सम्राट बिंबिसारने आपला जीव धोक्यात घातला आणि तो वेष बदलून वैशाली नगरीत दाखल झाला. जेव्हा बिंबिसारच्या सेवकाने याला देशद्रोह म्हटले, तेव्हा बिंबिसार म्हणाला होता की, “प्रियकराने त्याच्या प्रेमिकेला भेटणे हा देशद्रोह नाही, कारण प्रेम राजकीय बंधने मानत नाही.” ही प्रेमकथा आजही बिहारच्या इतिहासात अमर आहे!

मात्र हा दृष्टिकोन आता लयास गेला आहे! म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वीचा बिहार परिपक्व आणि विचारी विवेकी होता! सम्राट बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू आणि आम्रपाली यांच्या प्रेम संबंधांच्याही कथा बिहारमध्ये अजूनही सांगितल्या जातात! वडिलांप्रमाणेच अजातशत्रू देखील आम्रपालीच्या सौंदर्यावर आणि कलागुणांवर मोहित झाला होता.

सुमारे 2500 वर्षांपूर्वी प्राचीन महाजनपद काळातील वत्स देश आणि मगध यांच्यातील संबंधांमध्ये राजा उदयन आणि राणी वासवदत्ता यांची प्रेमकथा अजरामर आहे. महाकवी भास यांनी लिहिलेल्या ‘स्वप्नवासवदत्तम’ या प्रसिद्ध नाटकात या प्रेमाचे वर्णन आहे. उदयन हा वत्स म्हणजेच कौशाम्बीचा राजा होता. राजकीय कारणांमुळे उदयनाचा विवाह मगधची राजकुमारी पद्मावती हिच्याशीही झाला होता, परंतु त्याचे वासवदत्तावर निस्सीम प्रेम होते!

ह्या प्रेमाचा दाखला बिहारमध्ये मोठ्या अभिमानाने दिला जातो. म्हणजेच इतिहासातील प्रेम बिहारी बाबूंना मान्य आहे आता मात्र त्यात त्यांना विकृती दिसतेय कारण त्यांच्या मनातच विकार विकृती पैदा केली गेलीय! 1530 च्या सुमारास बिहारचा शासक शेरशाह सुरी, ज्याने पुढे मुघलांचा पराभव केला होता तो राजा आणि चुणार किल्ल्याची विधवा राणी, लाड मलिका यांची प्रेमकथा राजकीय आणि सामाजिक आकर्षणाचे उदाहरण आहे.

बिहारच्या भोजपूर आणि मिथिला भागात अत्यंत लोकप्रिय असलेले ‘लोरीकायन’ हे लोककाव्य वीर लोरीक आणि त्याची प्रेयसी चंदा यांच्यातील उत्कट प्रेमावर आधारित आहे. या कथेची तुलना थेट ‘रोमियो आणि जुलिएट’शी केली जाते. बिहारचे लोककवी भिखारी ठाकूर यांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेले ‘बिदेसिया‘ आजही बिहारी लोकांच्या हृदयात वसले आहे. कोलकत्यात नोकरीला असलेला प्रेमी आणि बिहारमधली त्याची प्रेयसी यांची ही कथा. यावर भोजपुरीमध्ये खूप काही लिहिलं गेलंय.

हे लोक प्रेमाचा दु:स्वास पूर्वापार करत आले आहेत अशातलीही गोष्ट नाही. गायपट्ट्यात जी राज्ये गणली जातात त्यात युपी खालोखाल बिहारचे नाव येते मात्र हे राज्य आणि इथली जनता आधी अशी नव्हती! इथला प्रेमभाव समूळ नष्ट करुन वासना विकार मात्र निगुतीने रुजवले जाताहेत, हे करणारेच मुळात विकारग्रस्त लोक आहेत, आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी एक अख्खी पिढी हे लोक नासवत आहेत, हे त्यांना स्वतःला ठाऊक आहे. मात्र जे यांच्या कारस्थानास बळी पडून वाहवत जात आहेत त्यांना कदाचित कधीच कळणार नाही की, त्यांनी काय गमावलेय!

इतके सारे असूनही आपल्याकडील काही लोकांना या प्रवृत्तीचे विलक्षण आकर्षण आहे! विकृतीला परस्परांची ओढ असते असे उगाच म्हटले जात नाही!

– समीर गायकवाड.

​Read More 

What do you think?

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

‘स्पिनचा सरदार’ ज्याने बीसीसीआयचे तळवे चाटले नव्हते!