in

माझ्या विधवेस…

साल १९१२

ब्रिटिश नौदलाचा एक अधिकारी, रॉबर्ट फाल्कन स्कॉट हा अंटार्टिकाच्या अज्ञात प्रदेशाच्या शोधासाठी सफरीवर बाहेर पडला. या सफरीची तयारी अनेक वर्ष चालली होती, तरी पण घडायची ती दुर्दैवी घटना घडलीच. १७ जानेवारी १९१२ या दिवशी स्कॉट आणि त्याचे चार सहकारी दक्षिण ध्रुवावर पोहोचली. तेथे पोहोचल्यावर त्यांच्या आनंदावर विरजण पडले, कारण तेथे गेल्यावर त्यांना उमजले, की घ्रुवावर पोहोचण्याची शर्यत एका महिन्यापूर्वीच नॉर्वेच्या मोहिमेने जिंकली होती. या मोहिमेचे नेतृत्त्व करत होता रोआल्ड ॲमुन्डसेन. प्रचंड अडचणींवर मात करून तेथे पोहोचल्यावर या बातमीने ते हताश झाले.. दमलेले भागलेले स्कॉट आणि त्याचे सहकारी लगेचच १२९० कि.मीच्या परतीच्या प्रवासाला लागले. तळावर, झालेल्या पराभवामुळे वातावरण उदास होते. एका महिन्याने, जवळजवळ परतीचा अर्धा मार्ग कापल्यावर त्याचा एक सहकारी, एडगर इव्हॅन्सचा मृत्यू झाला. एका महिन्याच्या अंतराने दुसऱ्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. हळू हळू इतरांवरही मृत्यूने झडप घातली. स्कॉट आणि त्याच्या सहकाऱ्यांचे मृतदेह आणि त्यांच्या मोहिमेचे सामान १२ मार्च या दिवशी सापडले. असे अनुमान काढले गेले, की स्कॉट आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांचा मृत्यू २९ मार्चला झाला असावा.  शेवटच्या दिवसात जेव्हा स्कॉटला या मोहिमेचा अंत काय होणार आहे हे उमगले, तेव्हा त्याने त्याच्या होणाऱ्या विधवेला आणि त्याच्या दोन बर्षाच्या मुलाला एक पत्र लिहिले…

माझ्या विधवेस,

माझ्या लाडके, आज आम्ही भयंकर अडचणीत सापडलो आहोत. या अडचणीवर मात करण्याची आशा आता जवळ जवळ मावळली आहे असे मला वाटते. आमच्या जेवणाच्या वेळेस जी काही थोडीफार उब मिळते, त्याचा उपयोग करून मी ही शेवटची पत्रे लिहितोय. पहिले अर्थातच तुला लिहितोय, कारण तू सदैव माझ्या मनात असतेस, जागेपणी आणि झोपेतही. दुर्दैवाने काही वाईट घडलेच तर हे जग सोडून जाताना मी सांगतो, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्या आठवणींवर मी जगत आहे. तू सुद्धा या आठणींचा आधार घे, म्हणजे तेवढेच तुला बरं वाटेल. आमची सद्द्य परिस्थिती काय आहे हे वाचलेस तर तुला निश्चितच बरं वाटेल. मला वाटतं माझा मृत्यू बहुधा फारसा भयानक किंवा वेदनादायक असणार नाही. जेव्हा आमचा शिधा संपतो तेव्हा आम्ही जवळच्या अन्न साठ्यापाशी थांबतो. हे लक्षात घेतल्यावर तुला पटेल, की उपासमारीने मरण्याची वेळ आमच्यावर येणार नाही. अर्थात आम्हाला कळजी वाटते आहे हे नाकारण्यात अर्थ नाही, पण आमची तब्येत ठणठणीत आहे हे लक्षात घे. नशिबाने आम्हाला भूकही व्यवस्थित लागत आहे. बोचरी थंडी कधीकधी अकराळ विकराळ रुप धारण करते, पण गरमागरम अन्न ही थंडी पिटाळून लावते आणि आम्ही त्या थंडीची मजा घेतो.

आम्ही वर जे लिहिले होते, त्यानंतर आमची परिस्थिती आणखीच ढासळली आहे. बिचारा टायटस ओट्स आपणास सोडून गेला – त्याची प्रकृती अतिशय खालावली होती. आम्ही उर्वरित लोक अजूनही वाटचाल करत आहोत आणि यातून सहीसलामत बाहेर पडू अशी खोटी आशा बाळगून आहोत. परंतु ही जीवघेणी थंडी जराही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आम्ही आता अन्न-सामग्रीच्या डेपोपासून अवघ्या २० मैलांवर आहोत, पण आमच्याकडे अन्न आणि इंधन दोन्ही अत्यंत अल्प प्रमाणात उरले आहे.

लाडके, माझी खात्री आहे, की तू या सर्व परिस्थितीला अत्यंत धैर्याने नि समंजसपणाने सामोरी जाशील आणि माझीही तीच इच्छा आहे. आपला मुलगा तुझ्यासाठी मोठा आधार ठरेल. त्याला मोठे करण्यात, त्याचे संगोपन करण्यात तुला मदत करण्याची माझी खूप इच्छा होती, परंतु तो तुझ्यासोबत सुरक्षित आहे, या भावनेनेच माझे मन शांत होते. मला वाटते, की ज्या देशासाठी आम्ही अत्यंत उदात्त भावनेने धैर्याने आपले प्राण पणाला लावले, त्या देशाने तुझी आणि आपल्या मुलाची विशेष काळजी घ्यायला हवी. या वहीच्या शेवटी मी या संदर्भात काही पत्रे लिहीत आहे. ती सर्व पत्रे त्यांच्या योग्य त्या पत्त्यांवर पोहोचवशील का?

जर वेळ मिळाला, आपल्या मुलासाठीही एक लहानसे पत्र लिहून ठेवेन जेणेकरून मोठा झाल्यावर तो ते वाचू शकेल. प्रिये, माझ्या आठवणींवर जगण्याच्या वेडगळ कल्पनांच्या आहारी जाऊ नकोस. आयुष्यात जेव्हा तुला साथ देणारा योग्य पुरुष भेटेल, तेव्हा तू पुन्हा एकदा तुझे पूर्वीचे आनंदी आयुष्य जगायला हवेस. मी तुझ्या आठवणींत एक गोड स्मृती म्हणून कायम राहावे एवढीच माझी इच्छा आहे. माझा अंत काही लाजिरवाणा नाही. उलट आपल्या मुलाला माझा अभिमानच वाटेल अशी माझी खात्री आहे.

प्रिये,, प्रचंड थंडीमुळे लिहायला फार त्रास होत आहे – तापमान उणे ७० अंशांवर गेले आहे आणि आसरा म्हणून आमच्याकडे फक्त  तंबूचे कापड आहे. माझे तुझ्यावर किती प्रेम होते, हे तू जाणतेसच; माझे विचार अखंड तुझ्याच भवती रेंगाळत राहिले असणार, हेही तुला ठाऊक आहे. आणि तुला पुन्हा पाहू शकणार नाही, हा विचारच या सर्व दुर्धर प्रसंगातील सर्वात भयंकर भाग आहे, पण या अनिवार्य नियतीचा स्वीकार करायलाच हवा. तूच तर मला या मोहिमेचे नेतृत्व स्वीकारण्याचा आग्रह केला होतास, आणि यात किती धोका आहे याची तुला पूर्वकल्पना होती. मी शेवटपर्यंत माझे कर्तव्य पार पाडले आहे! परमेश्र्वर तुला सुखी ठेवो! मी नंतर आणखी काही लिहिण्याचा प्रयत्न करीन — या वहीच्या मागील पानांवर मी माझे लिहिणे सुरूच ठेवतो.

वरील मजकूर लिहिल्यापासून आम्ही आमच्या डेपोच्या अवघ्या ११ मैलांच्या अंतरावर पोहोचलो आहोत. आमच्याकडे आता फक्त एक वेळचे गरम जेवण आणि दोन दिवसांचे सुके अन्न उरले आहे. आम्ही तेथवर पोहोचलोच असतो; पण गेली चार दिवस एका भयंकर बर्फाच्या वादळाने आम्हाला रोखून धरले आहे. मला वाटते की, आता इथून जिवंत सुटण्याची शेवटची संधीही हातातून निघून गेली आहे. आम्ही स्वतःहून जीवन संपवायचे नाही, तर त्या डेपोपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा द्यायचा, असा निर्णय घेतला आहे. पण या लढ्यात आमचा वेदनाविरहित अंत लपलेला आहे, तो शांत असेल याची खात्री बाळग. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस.

मी या वहीच्या सुट्या पानांवर काही पत्रे लिहिली आहेत – ती योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करशील का? तुला समजलेच असेल, मला तुझी आणि आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत आहे. जमल्यास मुलामध्ये निसर्गशास्त्र आणि निसर्गनिरीक्षणाची आवड निर्माण कर. मैदानी खेळांपेक्षा ते अधिक उत्तम आहे. काही शाळांमध्ये या गोष्टीला प्रोत्साहन दिले जाते. तू त्याला मोकळ्या हवेत आणि निसर्गाच्या सानिध्यात वाढवशील, याची मला खात्री आहे. त्याच्या मनात ईश्वरावर श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न कर, श्रद्धा मनाला मोठा दिलासा देते.

माझ्या प्रिये,  त्याच्या भविष्याबद्दल मी किती स्वप्ने पाहिली होती! आणि तरीही, मला ठाऊक आहे, की तू या सर्व आघातांचा अत्यंत धीराने सामना करशील. माझे हृदय जिथे आहे, तिथे माझ्या छातीवर तुझे आणि मुलाचे छायाचित्र सापडेल; तसेच लेडी बॅक्सटर यांनी दिलेल्या त्या लाल मखमली  पेटीतील चित्रही तिथेच असेल.

दक्षिण ध्रुवावर मी जो युनियन जॅक फडकवला होता, त्याचा एक तुकडा, अमुंडसेनचा तो काळा ध्वज आणि इतर काही साध्या वस्तू माझ्या खासगी पिशवीत आहेत. त्या युनियन जॅकचा एक छोटा तुकडा राजाला आणि एक छोटा तुकडा राणी अलेक्झांड्रा यांना भेट दे आणि उरलेला भाग तू माझी आठवण म्हणून सांभाळून ठेव!

या प्रवासाविषयी तुला सांगण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत. घरात आरामात वेळ घालवण्यापेक्षा हा प्रवास कितीतरी पटीने श्रेष्ठ होता! मुलाला सांगण्यासाठी माझ्याकडे किती अद्भुत कथा असत्या, पण दुर्दैवाने यासाठी केवढी मोठी किंमत मोजावी लागत आहे – मला अत्यंत प्रिय असलेल्या चेहऱ्याचे दर्शन आता कधीच मला होणार नाही..

माझ्या वृद्ध आईची चांगली काळजी घे. मी या वहीत तिच्यासाठीही एक छोटी ओळ लिहीत आहे. तसेच एटी आणि इतरांशी जोडलेली राहा. तू जगासमोर अत्यंत खंबीरपणे उभी राहशील, याची मला खात्री आहे -फक्त मुलाच्या भविष्यासाठी  मदत स्वीकारताना फार गर्विष्ठ किंवा मानी होऊ नकोस. त्यात काही कमीपणा नाही हे लक्षात घे! त्याला एक उत्तम आयुष्य घडवायचे आहे आणि या जगात काहीतरी मोठे करून दाखवायचे आहे.

सर क्लेमेंट्स यांना लिहिण्यासाठी माझ्याकडे आता वेळ उरलेला नाही — त्यांना सांग की, मी खूप विचार केलाय आणि त्यांनी ‘डिस्कव्हरी’ मोहिमेची धुरा माझ्या हाती दिली, याचा मला कधीही पश्चात्ताप झाला नाही. लेडी बॅक्सटर आणि लेडी सँडहर्स्ट यांना माझा निरोप दे; त्यांच्याशी मैत्री कायम ठेव, कारण त्या दोघीही अत्यंत चांगल्या स्त्रिया आहेत. तसेच रेगिनाल्ड स्मिथ दांपत्यालाही माझा निरोप दे…

रॉबर्ट..

अनुवाद : जयंत कुलकेर्णी

Read More 

What do you think?

Written by Jayant Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा – ११ : अद्यतनीकरण (Update)