in

वा ! सासूबाई वा !

 वा !  सासूबाई वा !

                 मोहसीन, सासूबाई, यास्मिन, अरमान

           सुनेवर माया कशी करावी, तिला जीव कसा लावावा याचा वस्तुपाठ देणाऱ्या माझ्या सासूबाईंनी सासुरवास हा शब्द माझ्या शब्दकोशात येऊ दिला नाही. पुस्तकी, शिक्षणाचा गंधही नसणाऱ्या माझ्या सासूबाई ‘नव्या पिढीशी कसे जुळवून घ्यावे’ या विषयातल्या मास्टर होत्या. आपल्याला जमेल ते काम सतत, हसतमुखाने, मनापासून, काळजीपुर्वक करत रहाणे हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. नोकरी करणारी शिक्षीका सून हा त्यांच्या अभिमानाचा व कौतुकाचा विषय होता. या अभिमानापोटीच सुनेला घरकामात मदत करण्यात त्यांना कमालीचा आनंद वाटायचा. नोकरीवरून घरी परतल्यावर कपडे चेंज करून आल्याबरोबर चहाचा कप हातात द्यायच्या त्यावेळी मला वाटायचे “माझ्यासारखी भाग्यवान मीच”! हा चहा फक्त चहा नसून माझ्या दृष्टीने तो मला कार्यरत ठेवणारा अमृतमय घोट आहे असं वाटायचं. त्यांच्या हाताला इतकी चव होती की ताकाची कढी व फोडणी घातलेले तुकडे त्यांच्याप्रमाणे चविष्ट करणे मला खूप प्रयत्नानेही जमले नाही. सुनेच्या आवडीचे पदार्थ त्यांना माहित होते त्यामुळे नेमक्या भुकेच्या वेळी ते पदार्थ ताटात यायचे. त्यावेळी वाटायचे परमेश्वराने दुसरी आईच माझ्यासाठी पाठवली आहे. नशिब लागतं अशी सासू मिळायला ! होय ना ? 

          माझ्या सासूबाई आदर्श सासूबाई तर होत्याच शिवाय त्यांच्या लाडक्या नातवंडाच्या आदर्श आजीबाईसुद्धा होत्या. नातवंडे म्हणजे त्यांचा जीव की प्राण ! नातवंडांचा हट्ट पुरविण्यात त्या नेहमीच रमून जायच्या, त्यांचा खोडकरपणा हसत सोसायच्या. त्यांचे चिडणे, रागावणे स्विकारून त्यांना वेळेवर जेवायला वाढण्यास तत्पर असायच्या. त्यांचा सोशिकपणा पाहून मला वाटायचे, कोणत्या विद्यापीठात शिकल्या असतील हा कमालीचा सोशिकपणा? ‘जनरेशन गॅप’ कसा मिटवावा? नव्या पिढीशी कसे जमवून घ्यावे, त्यांच्याशी एकरूप समरस कसे व्हावे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे सासूबाईंच्या जीवनग्रंथात वाचायला मिळाली. त्यांची लाडकी नात अरमान त्यावेळी हार्मोनियमच्या क्लासला जात होती. घरी तिचा सराव सुरू झाला की गाण्याचे ध्रुवपद म्हणून तिला साथ द्यायच्या. ७५ वर्षाच्या आजीबाई व १७ वर्षाची नात यांची गाण्या-वाजविण्याची मैफल कित्येकदा रंगायची. त्या दोघींच्या मैफलीत जेव्हा मोगरा फुलला ऽ मोगरा फुलला हे गाणे ऐकू यायचे  त्यावेळी आमच्या संसाररूपी मोगऱ्याच्या वेलीवरही आनंदरूपी कळ्या उमलायच्या. त्या अविट परिमलाने आम्ही सर्वजण सुगंधित होऊन जायचो. त्यांचा नातू मोहसीन. सी.डी. प्लेअरवर मोठ्या आवाजात गाणी लावायचा. त्यावेळी त्याला आवाज कमी कर म्हणत ‘तालसे ताल मिला’ हे गाणे लावायला सांगायच्या व त्याच्याबरोबर ते गाणे गुणगुणायच्या. मोहसीन सीडी प्लेअर बंद करून आजीला गाणे म्हणायचा आग्रह करायचा. नातवाच्या आग्रहास्तव जेव्हा त्या गाणं म्हणायच्या तेव्हा आम्ही टाळ्या वाजवून त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद द्यायचो. त्या गोड हसायच्या. त्यांची धाकटी नात यास्मीन त्यांना वन-टू-थ्री-फोर म्हणायला शिकवायची. घड्याळ वाचनही आजीला शिकवायची. त्या दोघींचा काही मिनीटांचा हा शिकवण्याचा क्लास संपला की एडव्हरटाईज म्हणण्याचा त्या दोघींचा सराव असायचा. नातीबरोबर त्या म्हणायच्या ‘दो बकेट पाणी अब रोजाना है बचाना’ या ओळी म्हणताना त्या ७५ नव्हे ५ वर्षे वयाच्या वाटायच्या. आहे की नाही कमाल माझ्या सासूबाईची! माझ्या सासूबाईंप्रमाणे समाजातील सर्व आजीबाई नातवंडात रमल्या तर त्यांना घर सोडून जाण्याची पाळी येणारच नाही. नातवंडांना आजीचा लळा लागेल. आजींचा उर्वरित जीवनप्रवास निश्चित सुखाचा होईल. आमच्या संसारावर मायेची पाखर घालणाऱ्या माझ्या सासूबाईंनी माझ्या माहेरच्या माणसावरही मायेची पाखर घातली होती. माझ्या माहेराशी लग्नापुर्वीचे नाते नसूनही केवळ सासूबाईंना भेटायला माझी आई, बहिणी, वहिणी, भाऊ येतात. येणाऱ्या प्रत्येकाजवळ त्या दुसऱ्याला येण्याबद्दलचा निरोप द्यायच्या. अशा मातृतुल्य सासूबाईंचे गुण सांगताना शब्दही अपुरे पडतील.

       माझ्या सासूबाईंचे गांव घर सोडून माझ्या संसारातील रमणे, काळाबरोबर बदलणे, सदैव कामात मग्न असणे, सुनेवर-नातवंडावर मायेचा वर्षाव करणे आठवले की म्हणावेसे वाटते वा ! सासूबाई वा !

       १० डिसेंबर २००९ साली त्या देवाघरी गेल्या. आज प्रत्येक क्षणी त्यांची आठवण येते. डोळे पाणावतात, हृदय गहिवरते. त्या स्वर्गातूनही आमच्यासाठी आशिर्वाद देत असतील. त्यांच्या आशिर्वादामुळेच आज आमचा संसार सुखासमाधानात नांदत आहे.

Read More 

What do you think?

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

नियतीचा मार्ग

नियतीचा मार्ग