21 मे 1991 रोजी रात्रीच्या अकराच्या सुमारास, तमिळनाडूमधील श्रीपेरंबुदूर येथे राजीव गांधींना जो हार घातला होता त्यातील स्फोटकांचा आणि थनू ह्या आत्मघाती स्त्रीने स्वतःभोवती लपेटलेल्या बॉम्बचा स्फोट झाला, त्या क्षणी संपूर्ण भारताला हादरा बसला! अनेकांचे काळीज विदीर्ण झाले. राजीव गांधी यांच्यासह १४ लोकांचा मृत्यू झाला, ४३ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. देशभरात संताप आणि दुःखाची लाट पसरली!
त्या हत्याकांडात सहभागी असलेल्या LTTE च्या सदस्यांपैकी नलिनी श्रीहरन ही एक मुख्य आरोपी होती. आधी तिला मृत्युदंडाची शिक्षा झाली. मात्र, वर्षानुवर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर, 2008 मध्ये एक अत्यंत भावनिक आणि वादग्रस्त घटना घडली.
एके दिवशी वेल्लोर तुरुंगात नलिनीला भेटण्यासाठी राजीव आणि सोनिया यांच्या कन्या असलेल्या प्रियंका गांधी स्वतः तिथे पोहोचल्या. त्या भेटीची तयारी प्रियंकांनी स्वतः केली होती.
सोनिया गांधींना ह्या भेटीबद्दल माहिती होती, पण त्यांनी प्रियंकांना त्यांच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची मुभा दिली होती. नलिनीला ज्या बराकीत ठेवण्यात आलं होतं तिथे प्रियंका पोहोचल्या. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी व्हिजिटर्स रूममध्ये स्वत: प्रियंका नलिनीसमोर बसल्या.
तो प्रसंग जितका अभूतपूर्व होता तितकाच अनाकलनीयही होता. प्रियंकासमोर बसलेल्या नलिनीने आपले डोळे खाली जमिनीकडे रॊखले होते, तिने नजर वर करुन पाहिलेच नाही.
प्रियंकांनी शांत, पण दृढ स्वरात तिला विचारले, “तुम्ही माझ्या वडिलांना का मारले?”
नलिनीने आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला. त्या क्षणी प्रियंकांनी एक अत्यंत असामान्य आणि हृदयस्पर्शी वाक्य उच्चारले, त्या म्हणाल्या, “मी तुम्हाला माफ करते.”
ही माफी केवळ वैयक्तिक नव्हती. ती एका मुलीने आपल्या वडिलांच्या हत्येच्या आरोपीला दिलेली माफी होती. देशाने ज्यांच्यावर प्रेम केले त्या दिवंगत पंतप्रधानांच्या मुलीने साऱ्या सहिष्णू संवेदनशील स्नेहार्द्र जनतेच्या वतीने दिलेली माफी होती!
नंतरच्या काळात प्रियंकांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “माझ्या वडिलांच्या हत्येच्या आरोपीला मी भेटले हे खरंय. मी तिला माफ केले. कारण मला माहित आहे की, राग आणि सूड घेतल्याने दुःख कमी होत नाही. माझ्या आईंनेही मला याच मार्गावर चालण्याची शिकवण दिली आहे.”
या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली. अनेकांनी प्रियंकांच्या या निर्णयाची प्रशंसा केली आणि त्यांना गांधी कुटुंबातील करुणेचे प्रतीक म्हटले. काहींना हे पटले नाही त्यांनी प्रियंकांना दूषणे दिली. वडिलांसोबत विश्वासघात केल्याचा आरोपही केला.
प्रियंकांनी या टीकेला उत्तर देताना स्पष्ट केले की, ‘ही माफी वैयक्तिक आहे आणि कायद्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणारी नाही.’ दिवंगत वडिलांची मुलगी म्हणून आपण हे करू शकतो, असे त्यांचे म्हणणे होते.
नंतरच्या वर्षांत, २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने A.G. पेरारिवलन या आणखी एका आरोपीला ३१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुक्त करण्याचा आदेश दिला. या प्रकरणातही प्रियंका आणि सोनिया गांधी यांनी कोणताही विरोध दर्शवला नाही.
प्रियंकांनी यावर भाष्य करताना सांगितले की, “न्यायालय जो निर्णय घेईल, तो आम्ही स्वीकारू.”ही घटना राजीव गांधींच्या हत्याकांडातील मानवी दयाभावाचा करुणार्त बिंदू होय. एक विलक्षण भावनिक अध्याय म्हणूनही ह्याकडे पाहता येईल.
प्रियंका गांधी यांनी दाखवलेली क्षमाशीलता ही केवळ एक राजकीय भूमिका नव्हती, तर एका मुलीने आपल्या वडिलांच्या हत्येच्या वेदनेतून बाहेर पडून, सूडाच्या वर्तुळाला तोडण्याचा प्रयत्न होता.
ही घटना राजीवजींच्या कुटुंबात रुजलेल्या ‘करुणा’ आणि ‘क्षमा’ या मूल्यांची साक्ष देते, ज्यामुळे ते भारतीय राजकारणात वेगळे ठरतात.
ही क्षमा निश्चितच सोपी नव्हती. ती अत्यंत कठीण आणि आत्मसंयमाची होती. क्षमा करणं प्रियंकांना जमलं, कारण एखाद्या व्यक्तीने क्रोधाच्या पश्चातापात होरपळत जगणं हे मृत्यूहून अधिक वेदनादायी असते, असं प्रियंकांना वाटतं.
सूडाच्या भावनेने पछाडलेल्या आणि द्वेषाच्या भवसागरात खोल बुडालेल्या आजच्या विषाक्त काळात मानवतेने भारलेल्या अशा गोष्टी समोर येतात तेव्हा हायसे वाटते.
प्रियंका यांचं आपल्या वडिलांच्या खुन्याला माफ करणं हाच राजीव गांधी यांचा संस्कार आहे आणि भारतीय संस्कृतीने जोपासलेली मानवतेची मूल्ये देखील हेच सांगत आली आहेत की, मारणाऱ्या व्यक्तीपेक्षा क्षमा करणारा महान असतो कारण क्षमा करण्यासाठी अतिशय उदात्त अंतःकरण लागतं, मन विशाल असावं लागतं!
आज राजीव गांधी यांचे पस्तिसावे पुण्यस्मरण. ह्या घटनेकडे मागे वळून पाहताना अनेकांच्या मनातला विखार नष्ट झाला आहे, राजीव गांधी ह्यांच्यासाठी ही सर्वोत्तम श्रद्धांजली ठरावी! दर वर्षी ह्या श्रद्धांजलीच्या व्यापकतेत वाढ होतेय ही त्याचीच प्रचिती होय!
– समीर गायकवाड


GIPHY App Key not set. Please check settings