in

थोरोचा मृत्यू

थोरोचा मृत्यू

माझ्या मोजक्या आवडत्या लेखकांपैकी एक आहे थोरो. त्याच्या मृत्यूबद्दल हा लेख. ज्यांचे ज्यांचे निसर्गावर प्रेम आहे त्याला चुटपुट लावणारी ही श्रद्धांजली..

… तो मरणाच्या दारात होता आणि त्याच्या मागचे कारण होते त्याला झालेला क्षयरोग. हे त्याला आता कळून चुकले होते. आता तो भटकण्यासाठी जाऊ शकत नव्हता. तेवढी शक्तीच त्याच्या अंगात उरली नव्हती. पण त्याने पूर्वी भटकताना, हिंडताना जी वर्णने लिहिली होती ती वर्णने परत परत वाचून तो तेवढाच आनंद मिळवीत असे. “

मला निसर्गाबद्दल दोन शब्द लिहायचे आहेत. पूर्ण स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य, अफाट गूढ निसर्ग आणि मानवाची संस्कृती या वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे मला समजून सांगायचे आहे…. मी चालण्या बद्दल जे बोलतो तो चालणे एक स्वतंत्र व्यवसायच आहे हे मला लोकांना समजवून सांगायचे आहे… माझा जंगलांवर, त्यांच्या मूक गूढ आफाटतेवर विश्वास आहे… माझा गवताळ कुरणांवर लोभ आहे आणि त्या रात्रीवर ही, ज्यात मक्याची कणसे वाढतात…

मला खात्री आहे त्या काळात तो मनाने परत सर्व जंगले, तळी, डोंगर दर्‍या भटकून आला असणार. तेच आयुष्य परत मनाने का होईना जगला असणार. जुन्या दिवसांचे प्रहर मनाने त्याने परत अनुभवले असणार. जशी तब्येत अधिकाधिक बिघडत गेली तशी त्याच्या बहिणीने त्याला त्याचे लेख तपासण्यास मदत केली. हे सगळे लेख द आटलांटिक मधे छापून येणार होते. त्याचे मित्र त्याला भेटून जात होते. तो जेव्हा तुरुंगात होता तेव्हाचा त्याचा जेलर सॅम स्टेपल्सही त्याला भेटण्यास आला होता. या माणसाने नंतर थोरोला सर्वेक्षणामध्ये मदतनीस म्हणून काम केले होते. नंतर त्याने एमर्सनला सांगितले, “ एवढ्या आनंदाने आणि शांत चित्ताने मरताना मी आजवर एकही माणूस पाहिलेला नाही. त्याच्या बरोबर मी एक तास काढला असेल पण एवढे समाधान मला आयुष्यात कधीही लाभले नसेल.’’

थोरोच्या आत्याने थोरोला विचारले, “ तुझे आणि परमेश्वराचे भांडण मिटले की नाही ? तुमच्यात तह झाला की नाही शेवटी ?” थोरोने उत्तर दिले, “आमचे भांडण होते हे मला आत्ताच कळतंय !”

चॅनिंगला तो जाणार हे पाहून अत्यंत दु:ख झाले. त्याने त्याचे दु:ख बोलून दाखवल्यावर थोरोनेचे त्याचे सांत्वन केले. “चॅनिंग, काही गोष्टींचा शेवट झालेलाच चांगला असतो.”

एक माणूस भेटायला आल्यावर थोरो त्याला म्हणाला, “मरण कोणाला चुकले आहे ? मी लहान होतो तेव्हाच मला समजले होते की सगळ्यांना एक ना एक दिवस मरायचे आहे. त्यामुळे मला आता त्याचा खेद होत नाही आणि मला त्याचा शोक ही नाही. मृत्यू जेवढा तुमच्या जवळ आहे तेवढाच माझ्याही.’’

अजून एक माणूस त्याला भेटायला आला होता. हा बहुधा धार्मिक असावा. त्याने त्याला मृत्यूनंतरच्या जगाबद्दल सांगण्यास सुरुवात केल्यावर थोरोने त्याला रोखले व म्हणाला, “एका वेळी एकाच जगाबद्दल बोललेले बरे !”

६ मे उजाडला. सकाळ सूर्यकिरणांनी उजळून निघाली होती. हवा मस्त पडली होती. शेजार्‍याने थोरोला काही हायसिंथची फुले आणून दिली. ती हातात घेत थोरो शांतपणे त्याच्या कोचावर मागे रेलला. त्याने डोळे मिटले व पुटपुटला, “मुस” “इंडियन”.

त्या क्षणी वयाच्या ४४व्या वर्षी त्याने जे डोळे मिटले ते परत कधीही न उघडण्यासाठी..

त्याचा दफन विधी कॉन्कॉर्डच्या पॅरिश चर्चमधे करण्यात आला. त्यावेळी त्याला श्रद्धांजली वाहताना एमर्सन म्हणाला,

“ याच्या एवढा सच्चा अमेरिकन आजवर झाला नाही आणि पुढे होईल असं वाटत नाही.” त्याने त्याच्या निरोगी शरीराचे आणि मनाचे कौतुक केले. तो अचूकपणे सोळा रॉड चालू शकत असे जे इतरांना पट्टीने ही मोजता येणार नाही. तो भर रात्री जंगलात रस्ता चुकत नसे कारण तो नजरेने जंगल पाहात नसे तर पायाने पाहात असे. झाडांचा घेर व उंची तो नुसत्या नजरेने पाहून सांगू शकत असे. कुठल्याही प्राण्याचे अचूक वजन तो नजरेने पाहून सांगत असे. डब्यातून पेन्सील काढायच्या वेळी प्रत्येक वेळा तो एक डझन पेन्सिली बरोबर काढायचा. तो उत्कृष्ट पोहायचा, बोट वल्हवायचा. पळायचा, स्केटींग करायचा आणि मला वाटते पायी प्रवास करण्यामध्ये त्याचा हात धरणारा या राज्यात सापडणार नाही. त्याचे शरीर आणि मन जणू एका अज्ञात धाग्याने बांधले गेले होते.

त्याने नंतर म्हटले, “ एवढे तारतम्य बाळगणारा माणूस माझ्या पाहाण्यात नाही. त्याचे हात कणखर होते तर इच्छाशक्ती प्रबळ होती. त्याच्या बुद्धिमत्तेविषयी तर बोलायलाच नको.” भाषणाचा शेवट त्याने एखादी भविष्यवाणी करावी तसा केला.

“आपल्या देशाने किती महान पुत्र गमावला आहे याची अजून आपल्या देशवासियांना कल्पना नाही. त्याने जे काम सुरु केले आहे ते पूर्ण करणे कोणाला शक्य होईल की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. हे काम अर्धवट टाकून या माणसाने विश्वाच्या रंगभूमी वरून निघून जावे हे कोणाच्याही मनास न पटणारी गोष्ट आहे. चीड आणणारी गोष्ट आहे. त्याने त्याच्या कामाची ओळख त्याच्या एवढ्याच थोर माणसांना करून दिली असती तर बरं झाले असते एवढेच म्हणणे आपल्या हातात आहे. पण मला खात्री आहे तो समाधानातच गेला असणार. त्याचे ह्रदय विशाल, प्रेमळ व अनुकंपेने सदा भरलेले असायचे. जेथे सद्गुण आहेत, सौंदर्य आहे, निसर्ग आहे तेथे त्याला त्याचे घर सापडो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना !

ही प्रार्थना झाल्यावर थोरोचे शव ‘न्यु बरिईंग ग्राऊंड” वर नेण्यात आले. ही दफन भूमी बेडफोर्ड स्ट्रीटच्या शेवटी आहे. काही वर्षांनंतर त्याचे अवशेष स्लीपी हॉलो सेमेटरी येथे सन्मानाने परत दफन करण्यात आले. कॉन्कॉर्डने आपला सर्वोत्तम पुत्र गमावला होता आणि देशाने एक सच्चा माणूस व त्या काळातील एक अद्वितीय लेखक गमावला होता….

हेन्री डेव्हिड थोरो

जन्म : जुलै १२, १८१७

मृत्यू : मे ६, १८६२

एकूण आयुष्य : ४४ वर्षे.

एक श्रद्धांजली (उशीर झाला आहे.. पण तो मला क्षमा करेल.)

– जयंत कुलकर्णी

Read More 

What do you think?

Written by Jayant Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

Post Title