in

शकुंतलाबाई नगरकर – लावणीची शालीनता लोपली..


शकुंतलाबाई गेल्या आणि लावणीतली उरली सुरली शालीनता त्यांच्याबरोबरच लयास गेली. आता जे काही उरले आहे आणि सादर केले जातेय त्याला लावणी म्हणावे का, हा यक्षप्रश्न आहे! असो! शकुंतला बाईंच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांचा धांडोळा घेतल्यावर लक्षात येते की बाई काटयांच्या रस्त्यावरून आयुष्यभर चालल्या! महाराष्ट्राच्या लोककलेचा आणि विशेषतः बैठकीच्या लावणीचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर यांचा जीवनप्रवास जितका कलात्मक आणि झगमगाटाने भरलेला होता, तितकाच तो वैयक्तिक आयुष्यात संघर्षमय आणि भावूक घडामोडींनी वेढलेला होता. शकुंतलाबाईंचा जन्म 1960 मध्ये अहमदनगर म्हणजेच आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. कला आणि साहित्याची समृद्ध परंपरा लाभलेल्या भटक्या भटू कोल्हाटी समाजात त्या जन्मल्या. त्यांच्या आई छबूबाई नगरकर ह्या त्यांच्या स्वतः त्या काळातील एक नामांकित आणि प्रतिष्ठित लावणी कलावंत होत्या. घरातच घुंगरांचा नाद आणि लावणीचे वातावरण असल्याने शकुंतलाबाईंना लहानपणापासूनच नृत्याची गोडी लागली.


शकुंतलाबाई लहान असताना रेडिओवर गाणे ऐकले तरी नाचू लागायच्या, अगदी शाळेत जातानाही त्यांच्या पायात एक प्रकारची लय असायची. त्यांची ही आवड पाहून आई छबूबाईंनी त्यांना नृत्याचे रीतसर शिक्षण देण्याचे ठरवले. अवघ्या बाराव्या वर्षी, म्हणजेच 1972 च्या सुमारास त्यांनी कलाक्षेत्रात पाऊल ठेवले. आईने त्यांना लावणीसोबतच शास्त्रीय नृत्याचे अंग यावे म्हणून कथक गुरू गोविंदराव निकम आणि पुढे मुंबईतील हनुमान थिएटरमध्ये वसंतराव घाटगे यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवले. त्यांच्या नृत्याचा बाज ठसक्याचा होता मात्र त्यात विलक्षण शालीनता होती! सहकलाकारांना समजून घेऊन त्यांनाही बरोबरीचे स्थान देणाऱ्या मोजक्या लावण्यवतींमध्ये त्यांचा समावेश होतो. बैठकीच्या लावणीला त्यांनी लोकाश्रय मिळवून दिला, नाचताना संपूर्ण रंगमंचाचा वापर त्या क्वचित करायच्या मात्र पूर्ण थियेटरमध्ये त्यांचे अस्तित्व जाणवायचे!

बैठकीच्या लावणीचा यमुनाबाई वाईकर, सत्यभामा पंढरपूरकर, गुलाबबाई संगमनेरकर, कौसल्या कोपरगावकर, गोदावरी पुणेकर ते शकुंतला नगरकर असा एक देखणा प्रवास आहे, ह्यात माया जाधव, मधू कांबीकर, सुरेखा पुणेकर यांचेही टप्पे लागतात! शकुंतलाबाईंचे आयुष्य हे केवळ एका नर्तिकेचे नव्हते, तर पुरुषांच्या राजसत्तेला आणि शोषक व्यवस्थेला स्वतःच्या अटींवर तोंड देत, स्वाभिमानाने जगणाऱ्या एका खंबीर मातेचे आणि राजवर्खी आयुष्याची अनुभूती देणाऱ्या महान कलाकाराचे होते. 2020 मध्ये शकुंतलाबाईंना कर्करोगाचे निदान झाले. डॉक्टरांनी त्यांना परिस्थिती कठीण असल्याचे सांगितले होते, तरीही त्यांनी धीर सोडला नाही. लेखक व दिग्दर्शक भूषण कोरगावकर यांच्या ‘संगीत बारी’ आणि ‘लव्ह अँड लावणी’ यांसारख्या आधुनिक नृत्यनाटिकांच्या माध्यमातून त्या शहरी आणि सुशिक्षित प्रेक्षकांसमोर आल्या. आजारपणाच्या काळातही त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या आणि सादरीकरण सुरू ठेवले. पारंपरिक चौकटीबाहेर पडून मिळालेले हे स्वातंत्र्य आणि सन्मान त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचे क्षण ठरले. त्यांनी त्यांचा शेवटचा जाहीर कार्यक्रम एप्रिल 2025 मध्ये सादर केला होता.

मुंबईमधील पृथ्वी थिएटर, NCPA – नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आणि दिल्लीतल्या कमानी ऑडिटोरियममध्ये त्यांनी लावणी सादर केली होती ह्यावरून त्यांच्या लावणीची कमाल लक्षात यावी. मधू कांबीकर यांच्या समवेत ‘सखी माझी लावणी’ चा प्रयोग त्यांनी राज्यभरात केला. सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात हा शो झाला होता. नाचावे कसे आणि चेहऱ्यावर भाव कसे उमटावेत याची त्या प्रयोगशाळा होत्या! त्या अतिशय चपळ नृत्यकुशल आणि देखण्या होत्या! 1993 मध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज येथील प्रतिष्ठित राज्यस्तरीय लावणी स्पर्धा जिंकली. परंतु, वैयक्तिक कारणांमुळे आणि आईपणाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी 1996 मध्ये त्यांनी घुंगरू काही काळ बाजूला ठेवले आणि त्या घराकडे परतल्या. त्यानंतर काही काळ सोलापुरात बहिणीच्या पार्टीत काम केल्यानंतर 1997 मध्ये त्यांनी ते काम पूर्णपणे सोडले आणि पारंपरिक ‘संगीत बारी’ थिएटरमध्ये पुन्हा कधीही पाऊल ठेवले नाही. त्यांनी बारी का वर्ज्य केली ह्याविषयी त्यांनी क्वचित भाष्य केलेय, मात्र त्यांच्यासोबत घुंगरू बांधलेल्या बायकाही कायम मौन राहिल्या ही गोष्ट मला अधिक बोलकी वाटते. उगाच कुणाची बदनामी करू नये आणि आपण आपली वेगळी वाट धरावी हा विचारच किती थोर होता! हे खूप कमी जणांना जमते, नाहीतर आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचत सहानुभूती मिळवत जगणारे लाखो जीव सर्वत्र दिसतातच! ज्या क्षेत्रात त्या वाढल्या तिथले कल्चर पाहू जाता ही गोष्ट अतिशय उदात्त होती!

शकुंतलाबाईंचे वैयक्तिक आयुष्य ‘संगीत बारी’च्या चौकटीत व्यतीत झाले. संगीत बारीच्या प्रथेनुसार, तेथील कलावंत स्त्रियांचे विवाह पारंपरिक पद्धतीने होत नाहीत. तिथे येणाऱ्या पुरुषांशी त्यांचे भावनिक व कौटुंबिक नाते जोडले जाते, ज्यांना त्या ‘मालक’ किंवा ‘मास्तर’ असे म्हणत, आता काळ 180 कोनात उलटा झालाय! अनेक बायकांनी कैक पुरुषांना देशोधडीला लावल्याच्या बातम्या समोर येतात, त्या तुलनेत फडातल्या बायकांची फसवणूक बऱ्यापैकी घटलीय. संगीत बारी म्हणजे संगीताची पाळी. जिथे लोककला केंद्र असते तिथे पार्ट्या असतात. पार्टी म्हणजे मुख्य नर्तिका आणि तिचा ग्रुप. फडाच्या मालकाच्या परवानगीशिवाय त्या तिथून बाहेरची सुपारी घेत नाहीत. त्यांना फडातच स्वतंत्ररित्या खोल्यात नाचावे लागते किंवा दररोज संध्याकाळी कलाकेंद्राच्या स्टेजवर नाचता येते. फडात जितक्याही पार्ट्या असतात, त्यातील नर्तिका एकेक करुन पाळी पाळीने तिथे नाच सादर करतात, ही पाळी म्हणजे बारी! बारी बारीने नाचायला येणाऱ्या बायकांची नृत्य अदाकारी म्हणजे फडावरची बारी!

त्यांच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांनी त्यांचा विश्वासघात केला. त्यांच्या पहिल्या नात्यात फारसे प्रेम नव्हते. तो पुरुष सलग वर्षभर त्यांच्या शोमध्ये येत राहिला, त्याने शकुंतलाबाईंना प्रेमाची भुरळ पाडली. त्यात वाहवत गेलेल्या बाईंनी त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. मात्र, पुढे जाऊन त्याने शकुंतलाबाईंचा विश्वासघात केला आणि त्यांच्याच बहिणीशी सूत जुळवून तिच्यासोबत निघून गेला. खरे तर तो आधीच विवाहित आणि दोन मुलांचा बाप होता. त्यानंतरच्या पुरुषाने पुढे जाऊन दुसऱ्या एका नर्तिकेशी संबंध प्रस्थापित केले होते. या विश्वासघातावर शकुंतलाबाईंनी नेहमीच अत्यंत खंबीर भूमिका घेतली. त्या म्हणायच्या, “हम आदमी लोगों का टेंशन नहीं लेते!” अशा कठीण परिस्थितीतही जेव्हा शकुंतलाबाई गरोदर राहिल्या, तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला होता. त्यांना स्वतःलाच लवकर मुले हवी होती, जेणेकरून त्यांचे वय वाढण्यापूर्वी मुले तरुण आणि स्वावलंबी होतील. पारंपरिक प्रथेनुसार, त्यांच्या मुलांनी आईचेच आडनाव लावले. मुलांच्या वडिलांना मुलांमध्ये स्वारस्य असो वा नसो, शकुंतलाबाईंना त्याचा फरक पडला नाही, कारण त्यांनी स्वतःच्या हिमतीवर मुलांचे संगोपन केले. प्रत्येक प्रसूतीपूर्वी त्या योग्य काळजी घेण्यासाठी अहमदनगरला आपल्या मूळ घरी जात असत. त्यांना एकूण तीन मुले आहेत. त्यांची मुलगी श्रद्धा नगरकर हिने आईचा लावणीचा वारसा पुढे चालवला असून ती शेवटच्या काळात शकुंतलाबाईंची मुख्य केअरगिव्हर बनली होती. आपल्या मुलांना त्यांनी उत्तम संस्कार दिले आणि स्वावलंबी बनवले. त्यांची तुलना आताच्या पिढीतील कथित लावणी कलावंतांशी (?) करण्याची हिंमत होत नाही!

धोतराच्या धाटणीची, रेडिमेड नऊवारी साडी आणि फुगीर ब्लाऊज घालून नाचणाऱ्या (?) आताच्या बहुसंख्य नाचणगौऱ्यांना अस्सल लावणीनृत्याशी घेणेदेणे नाही कारण आताचा त्यांचा प्रेक्षकवर्गही त्यांच्यासारखाच अधाशी आणि हपापलेला आहे, व्यसनी आणि विकृत वासनांध आहे. गतकाळातला प्रेक्षकही तेव्हाच्या नृत्यांगनांसारखा होता, त्याला कलेची कदर होती. तो कला पाहायला यायचा, त्यांच्या कलेवर फिदा व्हायचा! आता लावणीच्या नावाखाली जो हिडीस नृत्यप्रकार चालतो त्यात लोक बाई पाहायला आलेले असतात, बाईमधली मादी त्यांना खुणावत असते आणि त्या माद्यांना फेम, पैसा यांचे गणित पडलेले असते! अचकट विचकट हावभाव करुन अश्लीलतेकडे झुकणारे नृत्याचा आभास करणारे देहभाव म्हणजे लावणीनृत्य नव्हे! शकुंतलाबाईंची अदाकारी बिजलीची होती मात्र त्यासाठी अंगाला कचाकचा झटके द्यावे लागत नसत! नुसत्या नजरेवर काम भागत असे, चेहऱ्यावरील भाव आणि किमान हालचालीमधून त्यांचा नृत्याविष्कार समोर येई! त्यांच्या सादरीकरणात शालीनता असे, उत्तानतेला थारा नसे! त्यात आवाहन असे मात्र ते लैंगिकतेचे नसे, त्यात शृंगार असे मात्र तो उच्छृंखल नसे!

‘गोऱ्या गालावरी ग माझ्या लाली लागली दिसू गं
अंघोळीला बसले माझं मलाच येई हसू गं
पदर राहिना खांद्यावरी , पिसाट वारं भरलं उरी रावजी..’ ह्या पंक्तीवर नाचण्यासाठी त्यांना पदर पाडायला लागत नव्हता!

‘थोडी झुकून थोडी वाकते
पडला पदर, लाज झाकते
नेम धरून बाण फेकते
तुमचीमाझी हौस इश्काची हळूहळू पुरवा
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा!’
ह्या अजरामर लावणीचे सादरीकरण करताना एका जागी बसूनही समोरच्या रसिकाला पुरते घायाळ करणारे नयनबाण त्यांच्यापाशी होते!

ज्येष्ठ लोककलावंत केशवराव बडगे यांच्यासोबत ‘रंगी रंगला लोकरंग’ या शोमध्ये नाचताना त्या अतिशय तन्मय झालेल्या असत. “लावणी ही कष्टकऱ्याची आहे, श्रमिकाची आहे तिला पैसेवाल्याच्या दावणीला बांधून तिचा बाजार करू नका! ती एक जिवंत कला आहे तिला घुंगरात फुलू द्या आणि शृंगारात रमू द्या, मात्र हा शृंगार बाजारू नसावा तर सलज्ज शालीन असावा!” असं त्या म्हणत! त्या खऱ्या अर्थाने लावणीच्या शालीनतेच्या अखेरच्या पाईक होत्या! त्यांच्या निधनाने लावणीतला महत्वाचा अध्याय संपलाय.

– समीर गायकवाड

Read More 

What do you think?

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

आरोही – विशेष फूल फुलताना!