in

Post Title


एक नोंद पाकिस्तानच्या विख्यात गायिका फ़रीदा ख़ानम ह्यांच्याविषयीची. सोबतचा फोटो त्यांचाच आहे. त्याच त्या, – “आज जाने की जिद न करो…” फेमवाल्या, एक महान चितचोर नार !नव्वदच्या दशकात विख्यात शायर मुनीर नियाजी यांनी, ‘हमेशा देर कर देता हूँ..’ ही त्यांची बेमिसाल नज्म ऐकवली होती तेव्हा श्रोत्यांमध्ये बसलेल्या फ़रीदा ख़ानमना अश्रू अनावर झाले आणि नकळत त्या रडू लागल्या. त्यांना दिवंगत बहिणीची आठवण झाली होती!

त्यांची बहीण मुख्तार बेगम एकाएकी आजारी पडली आणि तिचा आजार बळावत गेला. विविध ठिकाणी म्युझिक टूरवर गेलेल्या फ़रीदा वेळेवर आपल्या आजारी बहिणीकडे पोहोचू शकल्या नाहीत. त्यांच्या बहिणीचा इंतकाल झाल्यावरच त्या पोहोचल्या. एकुलत्या बहिणीच्या शेवटच्या क्षणी आपण हजर राहू शकलो नाही ह्या गोष्टीची त्यांना कायमची खंत राहिली.

फ़रीदा ख़ानम ह्यांचा संसार सुखाचा होता. गायन हा त्यांचा प्राण! पतीच्या निधनानंतर त्यांनी गायन सोडलं होतं मात्र केवळ चाहत्यांच्या प्रेमाने त्यांना पुन्हा माईकपुढे उभं केलं. 2015 साली पाकिस्तानस्थित कोक स्टुडिओमध्ये त्यांनी, ‘आज जाने की जिद ना करो..’ ही नज्म अशी काही गायली की, आताची पिढी देखील त्यांची आशिक झाली.

1934 मध्ये अमृतसर येथे जन्मलेल्या फ़रीदा फाळणीनंतर घरदार सोडून आपल्या मातापित्यां समवेत लाहोरला गेल्या. ह्या घटनेचा आघात कित्येक वर्षे राहिला. फ़रीदा दिसायला सुंदर असल्याने त्यांनी सिनेमामध्येही काम केले मात्र त्यांची ओळख गायिकेची राहिलीय.

‘आज जाने की जिद ना करो..’ ह्या नज्मची आणखी एक खास बात आहे! ही नज्म फ़य्याज़ हाशमी ह्यांनी लिहिलीय. त्यांचा जन्म कोलकत्यातला. त्यांच्या षोडशवर्षीय प्रेयसीला उद्देशून हे काव्य लिहिलेलं. त्यांनी ते जतन करून ठेवलं आणि एके दिवशी ते सोहेल राणाच्या हवाली केलं. फाळणीनंतर त्यांचं आयुष्य कराचीत गेलं आणि तिथेच त्यांचा इंतकाल झाला.

सोहेल राणांचं कुटुंब फाळणीनंतर पाकिस्तानात गेलं तेव्हा त्यांचं वय फक्त 9 वर्षांचं होतं! त्यांचा जन्म आग्रा इथला! विख्यात संगीतकार नौशाद ह्यांचा विलक्षण प्रभाव त्यांच्यावर होता. राणांनी फ़य्याज़ हाशमींच्या रचनेला स्वरसाज चढवण्यासाठी हबिब वली मुहम्मद यांना पाचारण केलं आणि इतिहास घडला! विशेष गोष्ट म्हणजे पाकिस्तानात वाढलेल्या, हबिब वली मुहम्मद ह्यांचा जन्म म्यानमारमधील रंगून इथला! ह्या गीताला फेमस करण्याचं श्रेय फ़रीदा ख़ानम ह्यांना जातं, ज्यांचा जन्म भारतातला. त्या जिथेही म्युझिक शो करत, तिथे हे गीत असत!

हे गीत लिहिणारे गीतकार, ह्याला संगीत देणारे संगीतकार आणि ह्या गीताला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या गायिका हे तिघेही जन्माने भारतीय आहेत! आणि विशेष म्हणजे हे गीत पाकिस्तानपेक्षा भारतात अधिक लोकप्रिय आहे!

फ़रीदा ख़ानम यांना पाहताना लीलाबाई आठवते. तिच्यावरचे आर्टिकल काहींनी वाचले असेलच. एका पावसाळ्या रात्रीस लीलाबाईने जीव दिलेला. मन भरून जगल्यानंतर कुठलीही इच्छा बाकी राहिली नाही म्हणून बाजारात उभी असलेली एखादी रंगेल बाई क्वचितच मरते! लीलाबाई ह्यास अपवाद होती.
पूर्वाश्रमीच्या अलाहाबादच्या मीरगंजमध्ये आपलं रसिलं आयुष्य जगल्यानंतर मेरठमधील कबाडी बाजारमधल्या रेड लाईट एरियात ती स्थिरावली होती. खरे तर तिला देशभरात फिरायचं होतं. मात्र 1996 मध्ये तिने आत्महत्या केली.

ती मूळची समस्तीपूरची. तिच्या टोळीवाल्या मातापित्यांनी तिला कानपूरमधील जुगनू बख्त या बाईकडे सोपवलेलं. तिने तिला नाचगाणं शिकवलं. पहाडी सौंदर्याला कलेची जोड मिळाली. मात्र तिची जिन्दगानी एका रेषेत कधी चालली नाही. वाराणसीच्या शिवदासपूरमधून सुरु झालेला तिचा प्रवास मेरठमध्ये संपला.

कबाडीबाजारमध्ये अखेरीस वास्तव्यास असणाऱ्या लीलाबाईने आपल्या देहाचे कबाड कधी होऊ दिले नाही. चेहऱ्याला कुठलेही लेप न फासता केवळ आपल्या कलेच्या, अदाकारीच्या आणि सौंदर्याच्या जोरावर तिने सर्व भौतिक सुखे मिळवली होती. दर्दभरा पहाडी कानपूरी आवाज असलेल्या लीलाबाईची दास्तान जीवाला चटका लावेल अशीच होती… असो.. पोस्टविषय तिचा नाहीच आहे मूळी!

स्त्रीने शृंगार करताना जर गळ्यात कधी कुठला दागिना घातला नाही, नाक कानात केसांत देखील कुठली आभूषणे घातली नाहीत, भाळावर काही ल्यालं नसलं तरी तिचे मोहक सौंदर्य तसूभरही कमी होत नाही उलट नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून समोर येतं..
“सादगी में भी कयामत की अदा होती हैं…” ही पंक्ती अशावेळी खूप चपखल वाटते..

काही माणसं लवकर जाऊ नयेत असं वाटतं, त्यामागे कधीकधी स्वार्थ असतो. फ़रीदा ख़ानम आज सत्त्याण्णव वर्षांच्या आहेत, आगामी काळात जेव्हा जमेल तेव्हा एकदा पाकिस्तानाला जायचंय, हिरा मंडी पाहायचीय आणि लाहोरमध्ये जाऊन फ़रीदाजींची भेट घ्यायचीय. तोवर आणि नंतरही गात्रे साथ देईपर्यंत त्यांना राहावंच लागेल.

‘आज जाने की जिद ना करो..’ विषयीची आणखी एक विस्मयकारक नोंद करून थांबतो. न्यूयॉर्कचे मेयर जोहरान ममदानी ह्यांची आई, विख्यात निर्मात्या दिग्दर्शक मीरा नायर ह्यांच्या ‘मॉन्सून वेडिंग’ सिनेमामध्ये हे गाणं शेफाली छायावर चित्रित करण्यात आलं होतं आणि त्याला संगीत दिलं होतं ए आर रहमान ह्यांनी! ते गाणं भारतात फारसं हिट झालं नाही मात्र फ़रीदा ख़ानम ह्यांनी गायलेलं ‘आज जाने की जिद ना करो..’ आजही ऐकलं जातं.

आपण सारेच सूरसंगीताचे घटक असतो तर किती बरे झाले असते, कारण संगीताला कोणत्याही सीमा नसतात!

– समीर गायकवाड

Read More 

What do you think?

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

आकलनाच्या कलाने…

थोरोचा मृत्यू