in

गोष्ट किन्नरांच्या लग्नाची नि वैधव्याची!


तामिळनाडूमधील कुवग्गम या छोट्याशा खेड्यात 22 एप्रिल ते 6 मे दरम्यान यंदाच्या वर्षीचा, किन्नरांचा इरावन (कूथांडवर) सोहळा संपन्न झाला. आयुष्यात एकदाच किन्नरांचा विवाह होतो! हे लग्न एक दिवसाचे असते. या विवाहाची कथा महाभारताशी निगडीत आहे. पांडवांना वनवासात जावे लागले त्या काळातली ही गोष्ट. या कथेनुसार वनवासात भटकत असणारा अर्जुन नागलोकात जातो. गंगा नदीतील जलसर्पांचा राजा कौरव्य, याची मुलगी उलूपी ह्या नागकन्येशी त्याचा विवाह होतो, अर्जुनापासून उलूपीच्या पोटी जन्मलेला पुत्र इरावन होय. इरावन हा किन्नरांचा देव! ही उलूपी अर्जुन सदेह स्वर्गाच्या मार्गावर जाईपर्यंत त्याच्या सोबत होती. महाभारतानुसार कुरुक्षेत्रात 18 दिवस चाललेल्या पांडव – कौरव युद्धात पांडवांचा विजय व्हावा म्हणून इरावनने स्वतःला कालीमातेस अर्पण केले, आपले गुप्तांग दान केले. शिवाय आपले शिर धडापासून अलग केले. त्याच्या या वज्रनिश्चयामुळे श्रीकृष्णाने त्याला जीवदान दिले. मात्र इरावनने ते वरदान नाकारत मरण्याआधी कृष्णासोबत विवाहाची इच्छा व्यक्त केली. त्याच्या या इच्छेला कृष्णाने मान दिला पण त्यासाठी स्वतःच्या स्त्रीरुपाला पसंती दिली. याकरिता कृष्णाने स्त्रीरूप धारण केले ते म्हणजेच मोहिनी ! (कृष्णाने धारण केलेले हे स्त्रीरूप इतके देखणे होते की आजही मोहिनी या शब्दाचा अर्थ एखाद्यावर गारुड होणे असा घेतला जातो)

धडावेगळे शिर झालेल्या जखमी अवस्थेतील इरावनास, कृष्णाने आणखी एक वरदान देत अशी दिव्य दृष्टी दिली होती की ज्या योगे त्याला कुरूक्षेत्रातील घटना दृष्टीस पडत होत्या. जसजसे युद्ध पुढे जात राहिले तसतसे, इरावनच्या निखळून पडलेल्या डोक्याचे भेंडोळे मोठे होत गेले आणि अठराव्या दिवशी पांडवांच्या विजयानंतर जखमी अवस्थेतील इरावनचा मृत्यू झाला. डोक्यावर शिंग असलेले नि जीभ बाहेर असलेल्या स्थितीतले इरावनचे काहीसे भेसूर दिसणारे मस्तक आजही दक्षिणेकडील अनेक देवळात दर्शनी भागात लावलेले आढळते. अनेकांना वाटते की हा कुठल्या तरी राक्षसाचेच दगडात कोरलेले मस्तक असावे जे मंदिरांच्या दर्शनी भागात लावले जाते! वास्तवात ते कोणत्याही राक्षसाचे शिर नाहीये. हे शिर इरावनचे आहे, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर संकटे कमी होतात आणि संततीप्राप्ती होते असे दक्षिण भारतात मानले जाते, त्यामुळे तिथल्या बहुतेक सर्व मंदिरांवर याला स्थान आहे! इरावनने स्वतःच्या सत्वाचा त्याग करून सत्याच्या विजयासाठी देह पणाला लावला आणि त्यानंतर साक्षात कृष्णाने स्त्रीरुपात त्याच्याशी विवाह केला या आख्यायिकेमुळे इरावन हा किन्नरांचा देव मानला जातो. ते त्याच्याशी लग्न करतात. तामिळनाडूमधील कुवग्गम या गावामध्ये तमिळ नववर्षाच्या पहिल्या पौर्णिमेपासून अठरा दिवसाचा हा सोहळा चालतो ज्यात किन्नर इरावनशी विवाहबद्ध होतात. महाभारतात अर्जुनाने घेतलेले बृहन्नडेचे रूप आणि स्त्री असूनही पुरुषाप्रमाणे वाढलेला शिखंडी ही उदाहरणे किन्नर नेहमीच देत असतात.

कुवग्गम येथे होणाऱ्या लग्नविधीस आताशा जगभरातले किन्नर येतात. अठरा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात पहिले सोळा दिवस नाचगाणे चालते. त्यात गोल रिंगण बनवून सगळे किन्नर ठेक्यात टाळ्या वाजवत सामील होतात. आनंदाने नाचगाणे करत करत लग्नाची तयारी केली जाते. या काळात हसून खेळून आणि विविध चित्कार करून आपल्या मनातील खुशी ते प्रकट करतात. या संपूर्ण सोहळ्यात सुगंधी कापराचा आणि मोगऱ्याचा गंध सर्व वातावरणाला भारून टाकतो. सतराव्या दिवशी मंदिराचे पुजारी इरावनच्या मूर्तीशी लग्न लावताना किन्नराच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून, इरावनास नारळ चढवतात. किन्नराचे विधिवत लग्न लागते. अठराव्या दिवशी इरावनच्या मूर्तीला गावातून मिरवले जाते.

गावभर मिरवल्यानंतर मृत्यूचे प्रतिक म्हणून ही मूर्ती भग्न केली जाते. त्यानंतर इरावनची पत्नी झालेला किन्नर आपले मंगळसूत्र तोडतो. त्याच्या चेहऱ्यावरचा सर्व शृंगार इतर किन्नरांकडून पुसला जातो. त्याला पांढरी वस्त्रे परिधान केली जातात. त्यानंतर त्याला छाती बडवून जोरजोराने हमसून रडायला लावले जाते. आधी तो दबावाखाली रडतो, पण रडता रडता एक क्षण असा येतो की त्याचे खरेखुरे रडणे त्यात मिसळते. काळीज हेलावून जाईल, असा शोक तो करतो. या क्षणाला त्याच्या स्वतःच्या आयुष्यभराच्या अपमानाच्या – अवहेलनेच्या वेदना यात एकजीव होत असाव्यात ज्यामुळे आधी नाटकी वाटणारे रडणे नंतर हृदयाला पीळ पाडते. येत्या वर्षी पुन्हा भेटण्याच्या आणाभाका घेऊन दुसऱ्या दिवशी ते सगळेजण आपआपल्या ठिय्याकडे परतीच्या प्रवासाला निघतात. हा सर्व सोहळा विधी करायला लाखोंचा खर्च येतो. दक्षिण भारतातील किन्नरास गुरुपद हवे असेल तर त्याने कुवग्गमला विवाहविधी करणे क्रमप्राप्त ठरते अन्यथा आयुष्यभर तो एक सामान्य किन्नर बनून राहतो. 

आयुष्यभर अपमान आणि दुःख सहन करणाऱ्या किन्नरांची दुवा लागते असा आपल्याकडे समज आहे. त्यामुळे एखाद्या घरी मुल जन्मले किंवा एखादा विवाहसमारंभ असला की किन्नर बोलावले जातात. त्यांना ओवाळणी दिली जाते. ते आपल्या दुवा देतात. कधीकधी याच्या उलट चित्रही पाहायला मिळते. ज्याने आपले जीवन दुःखात तळतळाटात काढले आहे, त्याचा तळतळाट लागतोच या समजापायी अनेक लोक यांची बददुवा नको म्हणून ते काय मागतील ते देऊन आपली सुटका करून घेतात. अशी कमाई वगळता किन्नरांना भीक मागून पोट भरण्याशिवाय वा देहविक्रय केल्याशिवाय गुजराण करणं अशक्य होऊन बसतं. अशा वेळी हतबल झालेले काही किन्नर दमदाटी करून वा अब्रू चव्हाटयावर आणण्याची भीती दाखवून पैसे उकळतात. त्यांचे समर्थन कुणीच करू शकणार नाही पण त्यांना रोजगाराचे साधन नसते हेही नमूद करावे लागेल. एकतर त्यांचे रक्ताचे नातेवाईक त्यांच्याकडे पाठ फिरवून असतात आणि समाज तर त्याची आजीवन कुचेष्ठा करतो. मग त्यांनी पोट कसे भरायचे तरी कसे हा प्रश्न उरतोच.

भरीस भर त्यांचे अज्ञान, रीतीरिवाजांचे जोखड, शिक्षणाची अनस्था वा आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे बरेचसे किन्नर व्यसनाधीन होतात. काहींना आजार जडतात आणि त्यांची अधिकच परवड होऊ लागते. तमिळनाडू वगळता अन्य राज्यात किन्नरांच्या विकासाचे प्राधिकरण आढळून येत नाही. त्यांना कुणी नोकरीस ठेवून घेत नाही की त्यांना कुठे समान हक्क मिळत नाहीत, त्यामुळेच न्यायालयाने जेव्हा त्यांना तिसऱ्या लिंगघटकाचा दर्जा दिला तेव्हा अनेक किन्नरांना आनंदाश्रू अनावर झाले होते.

अशी दारूण अवस्था असूनही, बहुसंख्य किन्नर आपल्या आत्ममग्न आनंदात स्वतःला जखडून टाकतात. लोक त्यांना नाचगाण्याला बोलावतात तेव्हा त्यांना फार बरे वाटते. तिथे क्वचित त्यांच्या अंगचटीलाही काही लोक जातात. साधारणत: त्यांच्याशी मनमोकळी मैत्री करायला लोक घाबरतात, त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण होणे तर अशक्यच. आजकाल काही किन्नर वेश्यांच्या वा तत्सम स्त्रियांच्या दलालीचे काम करताना आढळतात यातून त्यांना थोडेफार पैसे मिळतात. काही किन्नरांनी अलीकडील काळात राजकीय निवडणूका लढवून त्यात यश मिळवल्याची काही उदाहरणे समोर आलीत. यंदाच्या कुंभमेळ्यात किन्नर साधूंनी स्वतंत्र आखाडयाची मागणी केल्याची घटना ताजी आहे. किन्नरांनाही गुरु असतो ते त्याला नित्य दक्षिणा देत असतात. आपल्या कमाईतला चौथा हिस्सा ते आपल्या गुरूला देतात. यामुळे ज्या गुरूचा शिष्य संप्रदाय मोठा असतो तो लक्षाधीश झाल्याची काही उदाहरणे आहेत. स्थानिक भावसार लोकांकडून किन्नर कधीही पैसे घेत नाहीत. भावसार हा बाहुसार या शब्दाचा अपभ्रंश आहे, सहस्त्रार्जुन, भावसार व स्वकुळ ह्या क्षत्रिय समाजातील पोटजाती आहेत. कश्यप ऋषी व दक्ष राजाच्या 17 कन्येपैकी अनिष्टा नामक कन्या यांच्या संबंधातून जन्मास आलेल्या यक्ष, किन्नर, गन्धर्व यांचे रक्षण करण्याचे काम बाहुसारांनी केले अशी किन्नरांची मान्यता असल्याने काही ठिकाणी किन्नर भावसार लोकांकडून पैसे घेत नाहीत.

आयुष्यभर अवहेलना सोसणाऱ्या अनेक किन्नरांना वाढत्या वयात मृत्यूचे वेध लागतात. मानसिक दृष्ट्या ढासळलेले किन्नर खचून जातात. कधी एकदा आयुष्य संपते असे काहींना वाटू लागते. मात्र त्यांचे भोग इथेच संपत नाहीत. गतकाळात किन्नराची अंत्ययात्रा दिवसा न काढता रात्री काढली जायची. अशी प्रथा रूढ झाली असली तरी यामागचे कारण वेगळे असावे. पूर्वीच्या काळी अठरा पगड जातींच्या स्वतःच्या स्मशानभूमी – दफनभूमी होत्या त्यामुळे किन्नरांचा मृत्यू झाल्यावर त्याचे अंत्यविधी आपल्या जातीसमाजाच्या स्मशान वा दफनभूमीत होऊ नयेत असा दम भरला जात असावा. त्यामुळे किन्नरांचे अंत्यविधी अंधार पडल्यावर उरकले जात असावेत. किन्नराच्या अंत्ययात्रेत सामील झालेले कुणीही रडत नाहीत वा दुःख व्यक्त करत नाहीत. नाचगाणं करत प्रसंगी रंग उडवत वाद्यांच्या गजरात ही अंत्ययात्रा निघत असे. किन्नर कोणत्याही धर्मात जन्मलेला असला तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याचे दफनच केले जाते. पूर्वीच्या काळी काही ठिकाणी किन्नराच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जेव्हा जागेवरून उचलला जाई तेव्हा कपड्यात गुंडाळून तो उभ्याने तिरडीपर्यंत खुरडत आणला जाई. कधी कधी त्याला भिंतीवरही धडकवले जाई, भिंतीवर धडकावण्याचा प्रघात उत्तर भारतात काही ठिकाणी आढळतो. कधी काळी झोळीवजा कापडात त्याला नेले जायचे. एकंदर त्याच्या मृतदेहाची जमेल तेव्हढी विटंबना केली जाई. 

पण आता काळ बदललाय. नव्या विचाराचे किन्नर या अघोरी प्रथांना फाटा देताना आढळतात ही एक चांगली बाब आहे. वय झालेले अनेक किन्नर क्वचित मृत्यूला घाबरतात कारण त्यांनी मृत्यूपश्चातचे हे सोपस्कार इतक्या वेळा केलेले असतात की त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊन जावेत.  माझ्या पाहण्यात एकही वयस्क किन्नर असा आला नाही जो व्यसनाच्या आहारी गेला नव्हता. पूर्वीच्या काळी किन्नराचा मृतदेह जेव्हा तिरडीवरून उतरवला जाई तेव्हा त्याचे दफन करण्याआधी दफनविधीस उपस्थित असणारे सर्व किन्नर त्या कलेवरास आपल्या पायातील चप्पलने मारत. जणू काही ते सूचित करत की, “तुझा जन्म या लायकीचा होता आणि मृत्यूही काही वेगळा नाही. तू आयुष्यभर अवहेलना झेलल्यास आता अखरेच्या अपमानाची ही वेळ आहे. तेव्हढे तर तुला सोसावे लागणारच !” दफनविधीनंतर अन्य कोणतेही विधी केले जात नाहीत. कुणी शोक करत नाही की अश्रू गाळत नाहीत, मयतीला आलेल्या सर्वांना चहा दिला जातो. जे ते आपआपल्या घरी परत जातात. 

घरी परतल्यावर मात्र मेलेल्या किन्नराचा जीवश्च कंठश्च असा जो कोणी स्नेही असतो तो ऊर बडवून असा काही विलाप करतो की पाहणाऱ्याच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागतात, त्याचे हे रडणे सहन होत नाही. मृत किन्नराची जी काही म्हणून संपत्ती असते त्यातील कवडी ना कवडी दान केले जाते. (आजकाल उत्तर प्रदेशातील मुरादाबाद आणि कानपूर व मध्य प्रदेशातील भोपाळ इथे प्रसिद्ध किन्नरांच्या मोठ्या संपत्तीवरून वाद होताना दिसतात ) मृत किन्नराची सर्व संपत्ती दान करून त्याची आठवण मिटवली जाते. स्वतःला पुरुष म्हणवणारे जिवंतपणीची संपत्ती आणि मेल्यानंतरच्या संपत्तीची विल्हेवाट स्वार्थीपणे करतात पण किन्नर इथे पुरुषांना पुरून उरतात. किन्नराच्या मृत्यूनंतर तो ज्या वर्तुळात वा टोळीत राहत असतो त्यातील सर्व किन्नर सदस्य सात दिवस कडकडीत उपवास करतात. हे सात दिवस संपल्यानंतरच ते आपली रोजची जीवनचर्या सुरु करतात. एक प्रकारे त्यांनी अर्पण केलेली ही श्रद्धांजलीच असते. नियतीचा भाग म्हणून कोरडे सुस्कारे टाकत त्यांना असेच सोडून द्यायचे की, माणूस समजून घ्यायचे हे सर्वतः आपल्याच हाती आहे. आता यातल्या सर्व कुप्रथा जवळपास पूर्णतः बंद झाल्या आहेत. 

किन्नरांच्या जगात जसे दुःख आहे, तसा आनंदही आहे. पराकोटीची वेदना आहे तसेच स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगण्याचे समाधानही आहे. समाजाच्या अवहेलनेचे शल्यही आहे. अनेक भावबंधात त्यांची दुनिया गुंफलेली आहे. त्यांच्या जगाबद्दल सांगाव्या अशा काही वेदनादायी आणि तितक्याच रोचक गोष्टी आहेत. त्यांचे विश्व निराळे असते, त्यातील रीती भाती आणि संस्कार वेगळे आहेत. हिजडा किंवा किन्नर म्हणजे शरीर रचना पुरुषाची असणारा आणि त्याची लैंगिक ओळख, वेषभूशा आणि लैंगिक भूमिका स्त्रीप्रमाणे असणारा व्यक्ती, तसेच स्त्रीत्वाची ओढ असणारा व्यक्ती होय. किन्नरांना पारलिंगी असे सार्थ नाव दिले गेलेय. तृतीयपंथी / किन्नर आणि ट्रान्सजेन्डर यात फरक आहे. ट्रान्सजेंडर आपल्या शरीरात स्वतःहून लिंग बदल करवून घेतात, किन्नरांचे तसे नसते त्यांची स्त्रीदेहभावना जन्मापासून बळावत गेलेली असते. किन्नरांना आता तिसरे जेंडर म्हणून कायदेशीर मान्यता देखील मिळाली आहे. किन्नर असणाऱ्या मुलाचा कायद्याने त्याच्या वडीलोपार्जित संपत्तीत समान वाटा असतो पण याची माहिती नसल्याने अनेक ठिकाणी अशा मुलांना घराबाहेर काढून किन्नरांच्या टोळीत त्याला ढकलले जाते. तिथे तो स्वतःचे अस्तित्व आणि ओळख गमावून बसतो. त्यामुळे त्याचा संपत्तीवरील हक्क हिरावला जातो. अल्पशिक्षण, शारीरिक स्वास्थ्याकडे केलं जाणारे दुर्लक्ष आणि अंध:कारमय भवितव्य ही किन्नरांची दुखणी आहेत. 

किन्नर एकमेकाप्रती कमालीची आस्था आणि स्नेहभाव ठेवतात. हे सर्व ते आपल्या हरवलेल्या आत्मसन्मानासाठीच करत असतात. किन्नरांची अपेक्षा धनदौलतीपेक्षा सन्मानाचीच जास्ती आहे. लोकांनी आपल्यावर हसू नये. आपल्याला समजून घ्यावे इतकीच त्यांची अपेक्षा आहे. समाजात जे स्थान अपंग, विकलांग लोकांना आहे ते ही स्थान त्यांना नाही याची त्यांना खंत आहे. चरितार्थ ही त्यांची सगळ्यात मोठी समस्या असल्याने ते समाजातील कुठल्याच घटकाविरुद्ध भूमिका घेत नाहीत. किन्नर जातपात धर्मभेद करत नाहीत या बाबीचाही विचार होत नाही. किन्नर स्वतःला ‘मंगलमुखी’ म्हणवून घेतात कारण ते मंगल कार्यातच बोलावले जातात पण एरव्ही त्यांच्याकडे कुणी ढुंकूनही बघत नाही. सर्वांच्या कुचेष्टेचा विषय बनून राहतात. कधी ना कधी या निर्भत्सनेच्या आयुष्यातून सुटका होण्याची स्वप्ने उराशी कवटाळून जगणाऱ्या लाखो किन्नरांची एव्हढी माफक अपेक्षा पूर्ण करणे सुजाण समाजाला सहज शक्य आहे.

किन्नरांची इतकी दुरावस्था असूनही काही धडधाकट ‘पुरुष’ साडी नेसून किन्नरांची नकल करत लोकांकडून पैसे उकळत फिरतात तेव्हा अशा पुरुषांना जना मनाची जरा सुद्धा लाज कशी वाटत नाही या सवालाने संताप येतो. विशेषतः रेल्वेत पकडले गेलेले निम्म्याहून अधिक किन्नर पुरुष निघालेत. अशा नकली किन्नरांमुळे खऱ्या किन्नरांची जी हानी होते आहे ती कधी भरून निघेल असे वाटत नाही. काही ठिकाणी अशा ‘कर्तृत्ववान’ पुरुषांना किन्नरांनी मारले तेव्हा लोकांनी किन्नरांनाच धमकावले, त्यावेळी त्यांना त्या नकली किन्नराचे कपडे उतरवावे लागले. पुरुषांना सारे काही उपलब्ध होऊ शकते तरीही त्यांना किन्नर बनून किन्नरांच्या हक्कावर हात मारावे वाटतात तेव्हा ती पुरुषांची शोकांतिका आहे की किन्नरांची हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

अलीकडील काळात याकडे सकारात्मक भावनेने पाहणारे लोक वाढत आहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट! ‘किन्नर कस्तुरी’ ही NGO किन्नरांसाठी काम करते तर ‘किन्नरअस्मिता’ ही NGO ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी काम करते. ‘किन्नर मां’ आणि ‘हमसफर ट्रस्ट’ ह्या दोन संस्थाही काम करतात. या शिवाय अलीकडच्या काळात वैयक्तिक स्तरावर काम करण्यासाठी अनेक जण समोर येत असल्याचे चित्र दृष्टीस पडते आहे. लक्ष्मी नारायण त्रिपाठी ही एकटी एका संस्थेच्या बरोबरीचे काम करतेय. आपल्याकडे दिशा पिंकी शेख, शमिभा पाटील ही ठळक नावे उल्लेखनीय स्तरावर काम करताहेत. सकारात्मक दृष्टीकोनातून बदल घडू शकतात. लेखातील अनुभव राज्यानुसार वेगवेगळे असू शकतात किंवा व्यक्तीसापेक्ष त्यात बदलही असू शकतात. किन्नरांचे आयुष्य समोर आणणे हा लेखाचा हेतू नसून अकारण त्यांना कुत्सितपणे टाळले जाते त्या दृष्टीकोनावर प्रकाश टाकणे हा आहे. लोकांनी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा, अनिष्ट रूढी परंपरा पूर्णतः बंद व्हाव्यात हे लेखनप्रयोजन आहे. जमल्यास एकदा तरी कुवग्गमला जायला हवे, आपल्याच दुनियेतील एका बहिष्कृत परिघातला नवरसांचा हा उत्सव पाहिला पाहिजे.

– समीर गायकवाड

Read More 

Report

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

बाबेलचा दुसरा मनोरा

गोष्ट, सरहद्दीची सीमा नसणाऱ्या नद्यांची आणि स्त्रियांची!