माझ्या ‘‘मोहॉकची रणदुंदुभी‘‘चे कथानक ज्या प्रदेशात घडते त्याची थोडीशी माहिती आज देतो आहे…
ट्रायॉन काऊंटी
न्युयॉर्क राज्याच्या रक्तरंजित इतिहासात दुष्काळ या शब्दाबरोबर अजून एक महत्त्वाचे नाव घेतले पाहिजे आणि ते म्हणजे ट्रायॉन काऊंटी हे नाव. स्थापनेपासून पुढील १२ वर्षे त्या प्रदेशात रक्तपाताशिवाय दुसरे काहीही घडले नसावे.
ही काऊंटी स्थापन झाली १७७२ साली. त्या पूर्वीपासून न्युयॉर्कच्या (सध्या आपण ओळखतो ते) उत्तरेचा प्रदेश आल्बनी काऊंटीमध्ये मोडत असे. १७७२ साली वसंतऋतूत आल्बनीचे सरकारने तुकडे केले (वसाहतींच्या सरकारने) प्रथम त्यांनी काय केले असेल तर त्यातील एका तुकड्याला ट्रायॉन असे नाव दिले. हे नाव त्या एकत्रित राज्याचा गव्हर्नर विल्यम ट्रायॉन याच्या नावावरून दिले गेले. त्यानंतर त्यांनी शार्लोट या जिल्ह्याची स्थापना केली. हे नाव जॉर्ज तिसरा याच्या शार्लोट नावावरून हिच्यावरून ठेवण्यात आले.
ट्रायॉन काउंटीच्या सीमा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या होत्या:
याची पूर्वेकडील सीमा कॅनडाच्या सीमेवरील सेंट रेजिस या मूलवासियांच्या ख्रिश्चन मिशनच्या प्रदेशापासून सुरू झाली आणि ती थेट दक्षिणेकडे अप्पर सरनाक लेक मधून गेली होती. तिथून ती सध्याच्या इसेक्स, वॉरेन आणि साराटोगा काउंट्यांच्या पश्चिम सीमांना लागून पुढे सरकते आणि शेनॅकटेडी शहराच्या पश्चिमेला सुमारे दहा मैलांवर मोहॉक नदीला जाऊन मिळाली होती. मोहॉक नदीपासून ती नैर्ऋत्येकडे सध्याच्या शेनॅकटेडी काउंटीच्या भोवती वळते आणि पुन्हा दक्षिणेकडे सध्याच्या शोहारी काउंटीच्या मध्यभागातून डेलावेअर नदीच्या मोहॉक शाखेपर्यंत पोहोचते. तिथून प्रवाहाच्या दिशेने खाली पेनसिल्व्हेनियाच्या ईशान्य कोपऱ्यापर्यंत ही रेषा गेली आहे.
या रेषेच्या पश्चिमेला असलेला न्यूयॉर्क प्रांताचा संपूर्ण भाग ट्रायॉन काउंटीमध्ये समाविष्ट होता. या पूर्वेकडील सीमेवर तिची रुंदी दोनशे मैल होती आणि पश्चिमेकडे लेक ईरीपर्यंत ती तब्बल तीनशे मैल पसरलेली होती. तिला काउंटी म्हणण्यापेक्षा ‘एक राज्य’ म्हणणे अधिक सयुक्तिक ठरले असते, कारण कित्येक युरोपीय देशांपेक्षा ट्रायॉनचे क्षेत्रफळ कितीतरी जास्त होते.
शारलोट कऊंटीमध्ये न्युयॉर्क राज्याचा उत्तरेचा प्रदेश अंतर्भूत करण्यात आला होता. याच काऊंटी,मध्ये न्युहँपशायरचा वादग्रस्त प्रदेशही अंतर्भूत झाला होता.
आता ज्यांनी या भागात प्रथम वसाहती केल्या त्यांच्याबद्दल थोडेसे लिहिले पाहिजे, कारण त्यांनी इंडियन जमातीचे मन वळवून, भांडून तेथे बस्तान बसवले आहे.
सर विल्यम जॉन्सन
ट्रायॉन काऊंटीची राजधानी म्हणा किंवा महत्त्वाचे शहर होते जॉन्सटाऊन. हे शहर मोहॉकजवळ होते जेथे सर विल्यम जॉन्सन बार्ट राहात असे.
सर विल्यम त्या काळात एखाद्या सरदारासारखा, त्याच्या प्रासादतुल्य घरात राहात असे. या राजवाडासदृष वाड्याचे नाव होते, ‘‘जॉन्सन हॉल.’’ त्याने एका इंडियन राजकुमारीबरोबर विवाह केला होता, जिचे नाव होते मॉली ब्रँट. या बाईपासून त्याला आठ मुलेही झाली. हा ब्रिटिश सत्तेचा उत्तर अमेरिकेचा एक महत्त्वाचा अधिकारी होता. त्या प्रदेशाचा गव्हर्नरच म्हणा ना!
तो ३५ वर्षांपूर्वी तो आयरलँडमधून निष्कांचन परिस्थितीत या भागात आला आणि त्याने स्वतःच्या काकाच्या जमिनीवर नोकरी पत्करली. या काकाचे नाव होते सर पिटर वॉरेन. हा ब्रिटिशांच्या नौदलात ॲडमिरल होता. याने १७४५ मध्ये फ्रेंचांकडून लुईसबर्ग काबीज केले होते. याने न्युयॉर्कच्या एटीन डी लॅन्सीच्या मुलीशी विवाह केला ज्यात त्याला मोहॉकच्या खोऱ्यात जमिनीचा एक मोठा खंड हुंडा म्हणून मिळाला. ही जमीन मोहॉक नदी आणि शोहारी क्रीकच्या मध्ये होती.
विल्यम जॉन्सन जेव्हा मोहॉकच्या खोऱ्यात आला तेव्हा त्याने तेथील स्थानिक इंडियन जमातीबरोबर फरचा व्यापार सुरू केला. त्याने एक मोठे दुकानही तेथे सुरू केले ज्याने तेथे वसाहत करणाऱ्या गोऱ्या लोकांची आणि इंडियन जमातींची मोठी सोय झाली. विल्यम मोठा धाडसी आणि व्यापारी वृत्तीचा माणूस होता. त्याचा प्रामाणिकपणा आणि सचोटीने व्यापार करण्याच्या वृत्तीने त्याने लवकरच प्रचंड संपत्ती आणि जमिनी गोळा केल्या. १७७५ साली त्याने फ्रेंच सैन्याला पराभूत केले आणि त्याला इंग्लंडच्या राजाकडून सरदारकी मिळाली. विल्यम जॉन्सनचा इंडियन जमातींवर विलक्षण प्रभाव होता, ज्यामुळे त्या काळातील राजकारणात त्याचा मोठा दबदबा होता.
सर विल्यमची सांपत्तिक स्थिती साधारण असताना त्याने एका गरीब जर्मन कुटुंबातील मुलीशी लग्न केले. (ही मुलगी एका जर्मन कुटुंबात वेठबिगार म्हणून काम करत होती. ती तेथून पळून गेली. विल्यम जॉन्सनने तिचा करार विकत घेतला आणि तिला आसरा दिला. या लग्नाची कुठेही कायदेशीर नोफ्लद नाही.) हे कुटुंब मोहॉकच्या खोऱ्यात राहात असे. लग्नाआधी तिचे नाव होते कॅथरीन वायझेन्बर्ग. या बाईचा मृत्यू फार तरुणपणीच झाला. कॅथरीनला एक मुलगा आणि दोन मुली झाल्या. मुलाचे नाव होते सर जॉन जॉन्सन. दोन मुलींनी कर्नल क्लॉस आणि कर्नल गाय जॉन्सन या दोन अधिकाऱ्यांशी लग्न केले.
सर विल्यमच्या दुसऱ्या बायकोचे नाव होते, मेरी ब्रान्ट. ही मोहॉकच्या एका योद्ध्याची बहीण होती. त्याचे नाव होते ‘‘टाएनडानेगा’’ किंवा त्याचे ख्रिश्चन नाव होते ‘‘जोसेफ ब्रान्ट’’ हा जोसेफ ब्रान्ट नंतर त्या खोऱ्यात फारच कुप्रसिद्ध झाला. त्याने मांडलेल्या उच्छादाबद्दल माझ्या ‘‘मोहॉकची रणदुंदुभी’’ या पुस्तकात लिहिले आहे.
त्याच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर, जॉन्सटाउनमध्ये आयोजित केलेल्या ‘मोहॉक व्हॅली’ सैनिकांच्या एका हजेरीत त्याचे लक्ष मॉलीकडे गेले आणि तो तिच्या प्रेमात पडला. त्यावेळी जमलेल्या प्रेक्षकांमध्ये एक अतिशय सुंदर इंडियन तरुणी होती. तेथे उपस्थित असलेल्या घोडदळातील एका अधिकाऱ्याने, केवळ गंमत म्हणून, तिला एका आव्हानाने डिवचले. त्याने तिला आपल्या घोड्यावर खोगीर नसलेल्या भागावर मागे बसून परेड मैदानाभोवती तीन फेऱ्या मारण्याचे आव्हान दिले. तिला हे आव्हान मान्य असेल, अशी त्याला पुसटशी कल्पना नव्हती.
एखाद्या चित्त्यासारखी जमिनीवरून झेप घेत ती त्याच्या मागे घोड्यावर स्वार झाली. तिने त्याची कंबर आपल्या हातांनी घट्ट धरली आणि ते दोघेही वाऱ्याच्या वेगाने मैदानावर धावू लागले. तिचे काळेभोर लांबसडक केस वाऱ्यावर मागे उडत होते; त्या आगळ्यावेगळ्या साहसाच्या आनंदाने तिचा सुंदर चेहरा उजळून निघाला होता.
हे दृष्य सर विल्यम मोठ्या कुतूहलाने पाहात होता. त्याने तिची चौकशी केली. त्याला सांगण्यात आले, की ती एका इंडियन जमातीची राजकन्या आहे आणि तिचे नाव मॉली ब्रान्ट आहे. त्याने नंतर तिला मागणी घालून तिच्याशी इंडियन पद्धतीने लग्न केले, पण त्याने तिला आपली कायदेशीर पत्नी कधीच मानले नाही. त्याने त्याच्या मृत्युपत्रात तिचा उल्लेख ‘‘घरकामवाली मॉली ब्रान्ट’’ असाच उल्लेख केला होता, पण तिच्या नावावर जमिनीचा एक मोठा खंड तिच्यासाठी आणि तिच्या मुलांसाठी सोडला. ही जमीन होती हर्किमर कौफ्लटीमध्ये, पूर्व आणि पश्चिम कॅनडाक्रीकच्या मध्ये कुठेतरी होती. वसाहत वसवणारे या भागाला रॉयल ग्रँट या नावाने ओळखू लागले.
सर विल्यम जॉन्सन जेव्हा सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर होते, तेव्हा त्याचे साम्राज्य घनदाट जंगलातून पार पॅसिफिक सागरापर्यंत पसरले होते. त्याच्याकडे ब्रिटिश राजघराण्यातील मंडळी, अनेक लेखक, राजकारणी आणि तत्सम प्रतिष्ठित मंडळी राहण्यास येत. उदा.लेडी सुसान ब्रायन ही रानटी फुलांचा अभ्यास करण्यासाठी मॉली ब्रान्टबरोबर तिच्या इस्टेटवर नेहमी येत असे. हे केवळ एक उदाहरण आहे.. राजकारण्यांची तर यादी बरीच मोठी होईल.
उन्हाळ्यात सर विल्यम त्याच्या फिश हाउसमध्ये व्यतीत करत असे. हे होते साचोनडागा नदीवर. या जागेत घनदाट जंगल होते, ज्याची त्याला आवड होती.
वर्षातून एकदा सहा इंडियन राष्ट्रांचे प्रमुख मॅनोर हाउसमध्ये भेटायचे आणि कराराचा अग्नी प्रज्वलित करायचे. त्याच वेळी ते सर विल्यम याची गाठ घेत असत. बऱ्याच वेळ सर विल्यम त्यांना भेटण्यास चीफच्या पोषाखात, चेहरा रंगवून जात असे आणि तेही त्याला वडिलकीचा मान देत असत.
जेव्हा ट्रायॉन कौन्टी स्थापन झाली, तेव्हा जॉन्सनचा दबदबा असा होता. १७७४ साली त्याचा मृत्यू झाला ते बरेच झाले असे म्हणावे लागेल कारण राज्यक्रांतीच्या झंजावातात त्याचे साम्राज्य पाचोळ्यासारखे कसे उडून गेले हे त्याला पहावलेच नसते. राज्यक्रांती नंतर सरकारने जॉन्सन कुटुंबीयांची सगळी संपत्ती जप्त केली, कारण ते इंग्लंडच्या राजाशी एकनिष्ठ राहिले..त्या वावटळीत त्याचे सर्व कुटुंब कॅनडाला विस्थापित झाले..
जॉन जॉन्सन
मोहॉक खोऱ्यातील डच वसाहत..
सर विल्यमशेजारी अनेक डच कुटुंबे राहात होती, ज्यांचे वंशज आजही मोहॉकच्या खोऱ्यात राहतात. हे सगळे हडसन नदीचा किनारा सोडून या नवी प्रदेशात वसाहत करण्यासाठी आले होते.
आता हे डच असल्यामुळे ब्रिटिशांच्या राजसत्तेशी त्यांचे काही घेणेदेणे नव्हते. हॉलंडमध्ये मिळणाऱ्या स्वातंत्र्याचे वारे प्यायलेली ही मंडळी हा स्वातंत्र्याचा विचार त्यांच्याबरोबर घेऊन या खोऱ्यात उतरली. ब्रिटिशांनी हॉलंडचा हडसन नदीच्या तोफ्लडाशी असलेल्या न्यू ॲम्स्टरडॅम येथे पराभव केला होता त्याच्या जखमा अजून तशा ताज्या होत्या. असे म्हणता येईल की मोहॉकच्या डच लोकांनी स्वातंत्र्याच्या उठावात जो हिरीहिरीने भाग घेतला त्यामागे हेही एक कारण होते.
पॅलॅटाईन्स
मोहॉकच्या वरच्या बाजूला काही मैलांवर, जर्मन फ्लॅटस्मध्ये (ज्याचे नाव आता हर्किमर आहे) विल्यमचे अजून एक शेजारी राहात होते. पॅलटिन्स जमातीची ही जनता ऱ्हाईन खोऱ्याच्या खालच्या भागातील (पॅलॅटिन) विस्थापित प्रजा होती. हा जर्मन भाग फार प्राचीन काळापासून आल्सेस आणि लॉरेन या प्रांतांशेजारी गुण्यागोविंदाने नांदत होता.
‘पॅलाटाईन’ शब्दाची उत्पत्ती तपासली असता त्या लोकांची बरीच माहिती मिळते.
फ्रान्समधील मेरोव्हिंगियन राजवंशाच्या काळात (५ वे ते ८ वे शतक) कॉमेस पॉलाटी नावाचा एक उच्च न्यायालयीन अधिकारी असे, ज्याच्याकडे राजवाड्यातील महत्त्वाचे अधिकार असत. जेव्हा राजा एखाद्या प्रांताच्या राज्यकर्त्यावर खूश होई, तेव्हा त्यालाही हेच अधिकार दिले जात. त्यावरून त्याला काऊंट पॉलाटीन म्हणत आणि त्याच्या इस्टेटीला पॉलिनेट असे संबोधत.
ऱ्हाइन नदीच्या दोन्ही बाजूंना वसलेला ‘लोअर पॅलाटिनेट’ हा प्रदेश अनेक शतके युरोपीय युद्धांचा रणांगण ठरला. वारंवार होणाऱ्या युद्धांमुळे तेथील लोक बेघर झाले. १७०९ मध्ये, इंग्लंडची राणी ॲन हिने या युद्धग्रस्त लोकांना आश्रय दिला आणि सुमारे ३,००० पॅलाटाईन्सना अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी पाठवले.
अमेरिकेतही या प्रजेला बराच संघर्ष करावा लागला.
सुरुवातीला हे लोक न्यूयॉर्कमधील हडसन नदीकाठी ‘लिव्हिंगस्टन मॅनर’ येथे राहिले. परंतु, तेथील जमीनदारांच्या जाचक वागणुकीमुळे ते वैतागले आणि त्यांनी ती जागा सोडण्याचा निर्णय घेतला. अखेर १७२२ मध्ये, अनेक कुटुंबे तेथून बाहेर पडली आणि त्यांनी न्यूयॉर्कमधील मोहॉकचे खोरे आणि जर्मन फ्लॅट्स यांसारख्या दुर्गम व निर्जन भागात वसाहती स्थापन केल्या.
आपल्या कष्टाळू आणि काटकसरी स्वभावामुळे या जर्मन स्थलान्तरितांनी त्या जंगली प्रदेशाचे रूपांतर एका भरभराटीला आलेल्या वसाहतीत केले. ट्रायॉन काउंटीच्या निर्मितीपर्यंत हे लोक तिथे चांगलेच स्थिरावले. डच स्थलान्तरितांप्रमाणेच, या पॅलाटाईन लोकांनीही अमेरिकेतील आगामी राजकीय संघर्षात (स्वातंत्र्य युद्धात) महत्त्वाची भूमिका बजावली.
पॅलाटाइन्स जनतेने त्यांच्या लाडक्या जुन्या ऱ्इनलँडमधील द्राक्षांच्या बागा सोडून दिल्या होत्या कारण या बागा वारंवार होणाऱ्या क्रूर युद्धांमुळे वारंवार उद्ध्वस्त झाल्या होत्या. ही सुबत्ता सोडून त्यांनी केवळ स्वातंत्र्यासाठी अत्यंत दुर्गम आणि निर्जन प्रदेशात नवीन वस्ती वसवली.
ट्रायॉन काऊंटीच्या निर्मितीवेळी, म्हणजेच वसाहतींच्या सुरुवातीच्या पन्नास वर्षांनंतर, या कष्टाळू, काटकसरी आणि मेहनती जर्मन लोकांच्या कष्टांमुळे ‘जर्मन फ्लॅट्स’ चे मोठ्या आणि भरभराटीला आलेल्या वसाहतीत रूपांतरित झाले होते. डच निर्वासितां प्रमाणेच, त्यांनी नवीन काऊंटीच्या राजकारणात स्वतःसाठी एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या स्वातंत्र्यप्रेमामुळे त्यांना लढाईत अमेरिकन क्रांतिकारकांची बाजू घेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता.
इरोक्वाय जमात..
परंतु ट्रायॉन काऊंटीच्या त्या गुंतागुंतीच्या आणि निष्ठुर राजकारणात इतर सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाचा असा आणखी एक घटक होता. इरोक्वाय जमात!
अमेरिकन क्रांतियुद्धापूर्वी (Revolutionary War), ट्रायॉन काऊंटीमध्येे सर्वात प्रमुख म्हणजे ‘सिक्स नेशन्स’ म्हणून ओळखले जाणारे रेड इंडियन्सचे एक संघराज्य किंवा महासंघ होते. १६०९ शॅम्पलेनच्या युद्धापासून आणि ते १७६३ मध्ये कॅनडाच्या अंतिम विजयापर्यंत, दीर्घकाळ चाललेल्या सर्व रक्तरंजित ‘फ्रेंच आणि इंडियन’ युद्धांमध्ये, इरोक्वाय जमातीचे लोक हे लोक इंग्रजांचे पक्के मित्र राहिले होते. जॉन्सनटाउनमधील सर विल्यम जॉन्सन यांच्या वाड्यापासून ते नायगरा धबधब्यापर्यंत, संपूर्ण ट्रायॉन जिल्ह्याच्या पट्ट्यात या इंडियन लोकांचे किल्ले (वसाहती), पसरलेले होते.
मी आधी सांगितल्याप्रमाणे, उत्तर अमेरिकेतील सर्व इंडियन जमातींमध्ये ही जमात सर्वात शक्तिशाली, सर्वात धूर्त, सर्वात क्रूर, सर्वात रानटी, सर्वात मुत्सद्दी आणि तुलनेने सर्वात सुसंस्कृत (उर्वरित जगाच्या व्याख्येनुसार) होती. पृथ्वीवरील कोणत्याही सत्तेच्या ते आधीन नव्हते, ते फक्त त्यांच्या स्वतःच्या इच्छेचे गुलाम होते; तरीही, सर विल्यम जॉन्सन यांचे त्यांच्यावर जवळजवळ पूर्ण नियंत्रण होते. ग्रेट ब्रिटनसोबतच्या युद्धात, ‘सिक्स नेशन्स’चे योद्धे त्यांच्या जुन्या मित्रपक्षाला सोडून देतील, अशी अपेक्षा करणे चूक होते.
क्रांतीच्या पूर्वसंध्येला, ट्रायॉन जिल्ह्याच्या निर्मितीच्या वेळी, या काऊंटीमध्ये अनेक प्रकारचे लोक, (वरवर शांत भासणारे, पण आतून तीव्र मतभेद असलेले) राहात होते.
लढाया –
१७७४ च्या वसंत ऋतूत, सर विल्यम यांनी जॉन्सटाउनमधील आपल्या वाड्यावर ‘सिक्स नेशन्स’च्या इरोक्वाय शेजाऱ्यांसोबत आपली शेवटची मोठी परिषद घेतली. हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. ‘सिक्स नेशन्स’च्या सर्व वस्त्यांमधून आलेले प्रमुख, योद्धे आणि महिलांचे अनेक दिवसांपर्यंत सर विल्यम यांनी स्वतःच्या खर्चाने आदरातिथ्य केले. परिषदेच्या शेवटच्या दिवशी सर विल्यम यांनी अतिशय प्रभावी आणि ओघवते भाषण केले. परंतु, लवकरच ओढवणाऱ्या युद्धाच्या भीतीचे सावट त्याच्या मनावर पडलेले स्पष्ट जाणवत होते. भाषणाच्या श्रमाने थकलेले सर विल्यम अंथरुणाला खिळला आणि सहा राष्ट्रांनी पेटवलेला कराराचा अग्नी विझण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
सर विल्यम यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांच्या आतच युद्धाचे वादळ मोहॉक खोऱ्यावर कोसळले. ट्रायॉन काऊंटी इतकी ओसाड झाली आणि तिथे इतका रक्तपात झाला की, आजवर कोणीही असे भीषण दृश्य कधी पाहिले नव्हते. या सात वर्षांच्या भयंकर युद्धातील लोकांच्या नशिबाचे तपशीलवार वर्णन करणे खूप मोठे काम ठरेल. ट्रायॉन काऊंटीचा या १२ वर्षांचा इतिहास एखादे जाडजूड पुस्तक भरेल इतका मोठा आहे. त्यामुळे येथे आपण त्या युद्धातील घटनांवर फक्त एक ओझरती नजर टाकूया.
या इतिहासाचा मागोवा घेताना, आपण १७७५ च्या उन्हाळ्यात सर जॉन जॉन्सन, त्यांची अनेक कुळे, शेतकरी, निष्ठावान अनुयायी आणि त्यांचे कायमचे मित्र असलेले ‘मोहॉक’ लोक कॅनडाला पळून गेल्याची कथा वाचली पाहिजे. ११ ऑक्टोबर १७७८ रोजी ‘चेरी व्हॅली’ येथे झालेल्या क्रूर कत्तलीचे वर्णन वाचून अंगावर काटा येतो. सर जॉन जॉन्सनची माणसे आणि त्यांचे हल्लेखोर साथीदार सेंट लॉरेन्स नदीपलीकडच्या त्यांच्या सुरक्षित ठिकाणांहून मोहॉक खोऱ्यातील आपल्या जुन्या शेजाऱ्यांच्या घरावर मधून मधून हल्ले करत असत आणि मागे फक्त जळालेले मृतदेह आणि राख झालेली घरे सोडून जात असत.
या युद्धांचे आणि चकमकींचे वर्णन माझ्या ‘‘मोहॉकची रणदुंदुभी’’ या कादंबरीत वाचताना तुमच्या अंगावर काटा उभा राहील.
५ ऑगस्ट १७७७ रोजी ओरिस्कानी येथील रक्तरंजित युद्ध आपण कल्पनेने अमेरिकेच्या बाजूने पाहिले पाहिले, तर दिसेल की ब्रान्टचे मोहॉक सैनिक आणि बटलरचे सैनिक आपल्याच जुन्या शेजाऱ्यांच्या आणि मित्रांच्या जिवावर उठले होते. जी माणसे मोहॉक नदीच्या काठी एकत्र लहानाची मोठेी झाली होती, तेच आता एका भीषण युद्धात एकमेकांशी समोरासमोर लढत होते आणि एकमेकांच्या हातून मारले जात होते. हे या युद्धाचे विशेष म्हणता येईल आणि याला कारण होते ब्रिटिश राजकारणी.
या घटनांच्या मोठ्या यादीत, १७७९ च्या ऑगस्टमध्ये जनरल सलायव्हन यांनी सेनेका जमातीच्या प्रदेशात केलेल्या स्वारीचे तपशील आपल्याला कदाचित अधिक थक्क करतील. त्यांनी तिथली गावे आणि मक्याची शेते पूर्णपणे जाळून राख केली, ज्यामुळे एकेकाळी शक्तिशाली असलेला हा संघ विखुरला गेला. किती मका जाळला गेला याचा उल्लेख या पुस्तकात आहे.
जेव्हा शेवटी शांततेची बातमी आली, तेव्हा ट्रायॉन काऊंटी फक्त एक ओसाड आणि रक्ताने माखलेले रान बनले होते. हाडांच्या सापळ्यातून झाडे उगवली होती आणि झाडे रक्ताने काळपट पडली होती. येथे मला पानिपतचा काला आम आठवला. १७७५ मध्ये युद्धाच्या सुरुवातीला या काऊंटीची लोकसंख्या १०,००० गोरे लोक आणि २,००० इंडियन योद्धे अशी होती. युद्धाच्या अखेरीस, १०,००० गोऱ्यांपैकी एक-तृतीयांश राजघराण्याशी एकनिष्ठ राहून कॅनडाला पळून गेले होते, एक-तृतीयांश घरांतून हाकलले गेले होते किंवा युद्धात मारले गेले होते.जे उरले होते त्यात ३०० विधवा आणि २,००० अनाथ मुले होती. १०,००० लोकसंख्येच्या या काऊंटीमधील क्रूरता आपल्याला वाचवत नाही, तर मुसलमानांनी कोट्यावधी हिंदूंची कत्तल कशी कसेल?
उद्धविराम झाल्यावर, जुने डच आणि पॅलाटाइन लोक जेव्हा परत आले, तेव्हा त्यांना त्यांच्या घरादारावर, शेतांवर जंगलांनी आक्रमण केलेले दिसले, पण आता ते या खोऱ्याचे खरे मालक होते. १७८४ मध्ये त्यांनी ‘ट्रायॉन’ हे आता तिरस्कारणीय झालेले नाव बदलून आपल्या काऊंटीला ‘माँटगोमेरी’ असे नाव दिले.
त्याच वेळी ‘शार्लोट’ काऊंटीचे नाव बदलून ‘वॉशिंग्टन’ करण्यात आले. ‘ट्रायॉन’ आणि ‘शार्लोट’ ही दोन नावेही आता विस्मृतीत गेली असून ती फक्त जुन्या कागदपत्रांत किंवा इतिहासाच्या पानांवरच सापडतात.
आज जेव्हा एखादा प्रवासी मोहॉक खोऱ्यातून रेल्वेने प्रवास करतो, तेव्हा त्याला ‘फोर्ट जॉन्सन’ या जुन्या वाड्याचे दर्शन होतेे, सर विल्यम यांच्या आठवणींपैकी ती एक ऐतिहासिक खूण आहे. ‘ट्रायबल हिल’ आणि ‘कॅनाजोहारी’ सारखी नावे आजही त्या जुन्या मोहॉक वास्तव्याची आठवण करून देतात. ‘पॅलाटाइन ब्रिज’ हा आजच्या काळाला २०० वर्षांपूर्वीच्या त्या ऱ्हाइनलँडमधील लोकांशी जोडतो. पण या संपूर्ण प्रवासात त्याला ‘ट्रायॉन’ जिल्ह्याचे नाव कुठेही ऐकायला मिळणार नाही.
माझ्या पुस्तकाची – मोहॉकची रणदुंदुभी’’ कथा ज्या प्रदेशात घडते त्या प्रदेशाचा हा भौगोलिक इतिहास आहे. या प्रदेशात कुठून कुठून माणसे स्थायिक झाली, त्यांनी कसा तग धरला आणि कशी प्रगती केली हे समजले म्हणजे अमेरिकेचा इतिहास कसा आहे आणि अमेरिकेने किती व कशी प्रगती साधली आहे हे कळून येते. अर्थात यात जगभरातून आलेल्या सगळ्या जाती जमातींचा सहभाग आहे, जसा ट्रायॉन काऊंटीया प्रगतीमध्ये डच, जर्मन, इंडियन, फ्रेंच आणि ब्रिटिश इ.इ. लोकांचा सहभाग आहे…
– जयंत कुलकर्णी


GIPHY App Key not set. Please check settings