in

जगण्याची आणि मोक्षाची, संगीतमय कश्मकश!


माणसाला त्याच्या मृत्यूची, मोक्षाची चाहूल लागत असेल का! काही दिवसांपूर्वी निवर्तलेल्या आशा भोसले यांना त्यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जे काही लिहिलं आहे, ते याकडेच निर्देश करते. आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये आशाताई, इंटरनॅशनल बँड ‘गोरिल्लाज’ सोबत दिसल्यात. पोस्टमधील फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये भारतीय वस्त्या, हत्ती आणि जीर्ण झालेल्या वस्तूंची दृष्टीस पडतात. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय -“The Shadowy Light’ या गाण्याचा माझ्यासाठी अत्यंत सखोल अर्थ आहे. वाराणसीला भेट देऊन आणि पवित्र गंगा नदीच्या काठानं प्रवास करून, तसेच तिथे मला जे काही दिसलं, त्याचं बारकाईनं निरीक्षण करून आणि ते समजून घेऊन, मला जीवनाचा खरा अर्थ उमजला, मी कोण आहे आणि या पृथ्वीवर माझे काय प्रयोजन आहे. ‘द शॅडोई लाइट’ (The Shadowy Light) मध्ये, या खोल नदीचा पैलतीर गाठणं हे माझ्या जीवनप्रवासाचं प्रतीक आहे, माझा जन्म, माझे नातेसंबंध, संगीताप्रतीची माझी निष्ठा, माझी कर्तृत्व आणि एक कन्या, माता, भगिनी, पत्नी आणि एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्य. या प्रवासात, ‘संगीत’ हाच माझा नावाडी आहे, तो मार्गदर्शक, जो मला या जीवननदीच्या पैलतीरी घेऊन जातो. जेव्हा मी त्या पैलतीरावर पोहोचेन, तेव्हा माझा हा प्रवास पूर्ण होईल. तेव्हा मला ‘मोक्ष’ प्राप्त होईल, आपल्या सभोवताली सतत तरंगणाऱ्या अगणित नादांमध्ये मी विलीन होईन. जेव्हा त्यातील काही नाद एकत्र गुंफले जातात, तेव्हा त्यातून एक सुंदर सुरावट निर्माण होते. त्याचप्रमाणे, मी देखील त्या नादांपैकीच एक नाद बनेन, असा नाद, जो अंतिमतः एका सुंदर गीतातील सुराचं रूप धारण करेल. असं गीत, जे पिढ्यानपिढ्या, हजारो वर्षे सातत्यानं ऐकलं जात राहील. हेच स्वातंत्र्य, निसर्गाशी एकरूप होण्याचं स्वातंत्र्य, नदीच्या पलीकडील तीरावर माझी वाट पाहत आहे…”

आशाताईंना अखेरच्या प्रवासाविषयी काही जाणवलं असेल का? की हा निव्वळ योगायोग असेल. कळायला मार्ग नाही. गावाकडे जुनी जाणती माणसं म्हणतात की, काहींना आपला अंतिम काळ जवळ आल्याचं कळत असतं. ती माणसं तशा अर्थाचं काही सूचक बोलून जातात. ते जेव्हा बोलतात तेव्हा आपल्याला कळत नाही, त्यांच्या पश्चात आपण अन्वयार्थ लावत राहतो. ही एक हूरहूर लावणारी भासयुक्त चाहूल आहे! एकीकडे आशाताई त्यांच्या गीताद्वारे मुक्ती मोक्ष मिळेल असे सांगत असताना दुसरीकडे सामान्य चाहत्यांच्या वर्तुळात मात्र त्यांच्या आणि लताबाईंच्या गीतांवरून घमासान सुरु होते. वास्तवात दोघीही महान गायिका आहेत त्यांची तुलना करणे अतिशय अप्रस्तुत बाब होय. तरीही लोक त्यांच्या गाण्यांची तुलना करत राहिले आणि त्यायोगे डान्सबार आणि संगीताच्या दुनियेतली एक विलक्षण घटना आठवली!

अनिशा रोझीनचे स्टेजवरचे नाव उषा डॉली होतं. डॉली कॅब्रे सिंगर होती. मुंबईतल्या नामचीन डान्सबारच्या सुरुवातीच्या काळात ती गायची. तिचा आवाज मादक नशीला होता. तिच्या अदा अशा काही कातिल असत की पाहणाराच नव्हे तर ऐकणारा घायाळ होई. उडत्या चालीची भिरभिरती गाणी ती लीलया गात असे. जतीन ललित या ड्युओने तिचा आवाज ऐकून प्लेबॅकसाठी बोलवलेलं. त्यानंतर आठवडाभर तिचे पाय मातीवर नव्हते! ती हवेत होती. तिच्या दिसण्यालाही लोक भुलायचे. गत काळातील मुंबईमधील गुन्हे पत्रकारिता कव्हर करणाऱ्या पत्रकारांना तिचे नाव आणि तिचे किस्से ठाऊक असतील. तिच्या आवाजात काही तरी खास होतं. सुरूप उपाध्यायच्या डान्सबँड ग्रुपमध्ये ती गायची. त्यांच्या टीममध्ये बेला नावाची नर्तिका होती, अगदी नखरेल आणि लटक्या झटक्यांची कमसीन तरुणी. बारबालांच्या केशसंभार झटकत नाचण्याचे जनकत्व तिच्याकडे जाईल. आखीव रेखीव अंगाची ही पोरसवदा तरुणी विजेच्या चपळाईने नाचत असे.


तिच्या शृंगाराला भुललेले वीर तत्काळ शहीद होत, तिच्यावर दौलतजादा करत. 1974 सालच्या ‘हाथ की सफाई’मधलं तू क्या जाने ओ बेवफा हे तिचे आवडते गाणे! या गाण्यावर ती नाचायला लागली कि स्टेज अक्षरशः पेटून उठे! गाण्यातला ठेका तिच्या काळजातून कंबरेत उतरे आणि तिच्या हेमांगी गुलाबी पायातल्या पैंजणांना त्याची झिंग येई. हेमामालिनीने हे गाणे लिटरली वाया घालवले आहे. अतिशय टुकार कोरिओग्राफी आहे. नेभळट शेळपट दिसणारा नाकाखाली मिशीची कॉलरामाशी बाळगणारा रणधीर कपूर या गाण्यात लीड रोलमध्ये होता. गाण्याच्या मध्यात तगड्या विनोदखन्नाची एंट्री झाल्यावर गाणं पीक लेव्हलला जातं. इथे बेला स्टेजवर नाचताना असे काही लटके झटके द्यायचे आणि डोळे राखून पाहायची की, बघणाऱ्याला वाटावे ही बया आपल्यालाच उद्देशून नाचतेय! वन्समोअरचा रतीब चाले.

अतिशय उदास चेहऱ्याने त्या वातावरणात मिसफिट असणारी नयना सहाय नावाची पोक्त बाई हे गाणं गायची. त्या ग्रुपमध्ये उषाची एंट्री झाली आणि तिने हे गाणे प्लेलिस्टमधून उडवले! याचे कारण उषा ही कट्टर आशा भोसले भक्त होती! डान्स बारच्या फ्लोअरवर फक्त आणि फक्त आशाताईंच्या गाण्यांची हुकूमत चालली पाहिजे असं तिचं ठाम मत होतं. आणि तिची गायकीही त्या दर्जाची होती. तिच्या धमन्यात जणू आशाताईंच्या डान्स सॉंग्जचा कैफ वाहत असावा इतकी ती कट्टर आशा भक्त होती! तिच्याकडे सिंगिंग ग्रुपचा ताबा येताच तिने हे गाणे उडवले कारण लताबाईंनी गायलेले सर्वात भन्नाट कॅब्रे सॉन्ग म्हणून याची ख्याती होती आणि आहे! उषा डॉलीचे आणि लता बाईंच्या गाण्याचे वाकडे होते! तिने एका पाठोपाठ हिट्सची नवी प्लेलिस्ट बनवली. त्या दोघीत भांडण झाले. बेला ग्रुप सोडून नईम खानच्या ग्रुपमध्ये गेली. उषा वाकली नाही. सुरूपनेही तिला खूप समजावून सांगितले तरी तिने ते गाणे ऍड केले नाही.

तिने जी लिस्ट बनवली होती त्यात ‘मुकद्दर का सिकंदर’चं ‘प्यार जिंदगी है’ हे गाणं पहिल्या क्रमांकावर होतं! कल्याणजी आनंदजींचं मेंदूला झिंग आणणारं संगीत सिंथेसायझरवर वाजू लागलं की तिच्यातली आशा सचेत होई! हेलनवर चित्रित केलेली एकापेक्षा एक सरस गाणी सादर होत, फ्लोअरवरच्या पोरी देहभान हरपून नाचत असत. उषाच्या जीवावर सुरूपने मोकार पैसे कमावले. असेच काही महिने गेले आणि बेलाने बंगालमधील मिदनापूर (आताचे मेदिनापूर) मधील राहत्या घरी गळफास घेतल्याची बातमी कानावर आली. सगळा ग्रुप सुन्न झाला. उषाला अधिक दुःख झाले. काही दिवसांनी दुपारच्या प्रहरी एक देखणा तरुण पोरगा मधुबनमध्ये सुरूपला भेटायला आला. लाख मिनतवाऱ्या करून त्याने उषाच्या भेटीची परवानगी मिळवली. तिच्या खोलीचा दरवाजा खटखटवला तेव्हा ती गाढ झोपेत होती, त्याने आणखी दोन तीन वेळा दार वाजवले तेव्हा तिचा नाईलाज झाला. दार उघडले. त्याच्याकडे पाहत केस सावरत एक दीर्घ जांभई देत नजरेनेच सवाल केला की, कोण पाहिजे!

तिच्या नजरेतला सवाल, त्याने उभ्यानेच वाचला आणि तो बोलता झाला. तो बराच वेळ बोलत होता, बोलता बोलता तो धाय मोकलून रडू लागला. तिचा चेहरा फिकट पडत गेला. जाताना तिच्या पाया पडून गेला. ती गोठून गेल्यागत सुन्न उभी होती. त्या नंतरचे काही दिवस ती गाऊ शकली नाही. तिची शेवटची भेट झाली तेव्हा कळले की तिने प्लेबॅक बंद केलेय. तरीही मधुबनमध्ये तिला स्पेस होती. तिची भेट घेऊन लाख प्रश्न केले पण तिने ब्र शब्द उच्चारला नाही. रूममधील कॉर्नरला असलेल्या तिच्या टेबलावरचा आशा भोसलेंचा फोटो उदास वाटत होता. तसे तर ती जितक्याही मीनी पर्स कॅरी करायची त्यात आशा भोसलेंचाच फोटो असायचा. तिच्या अशा भान हरपलेल्या काळातच तिला बॉलिवूडमधून बुलावा आला होता. मात्र ती पुरती खचून गेली होती. तिने ताडदेवला जायचे टाळले. काही दिवसांनी कळले की चिठ्ठी मागे ठेवून ती निघून गेली. ती बेपत्ता झाली. तिचा पत्ता कसला म्हणून तो लागलाच नाही.

डान्सबार बंद झाल्यानंतरच्या काळात झालेल्या शेवटच्या भेटीत खूप विनवण्या केल्यावर सुरूपने सांगितले की, उषाचा जो यार होता, जो तिला अभय देऊन तिचा सांभाळ करत होता. त्याच व्यक्तीने कधी काळी बेलाला फसवले होते. त्याच्या शोधात तिने स्वतःला हरवले होते त्यामुळेच ‘तू क्या जाने..’ या गीतांवर नाचताना तिचे प्राण पायात येत असत! ही सर्व हकीकत ज्याने उषाला सांगितली होती, तो तरुण बेलाचा धाकटा भाऊ होता. सुरूपच्या फ्लोअरवरचे तिचे काम सुटले आणि तिचा नूर हरवत गेला. कारण सुरूपच्या ऑर्केस्ट्राला तो इसम यायचा आणि त्याने बेलाला नादी लावले. तिचे सारे पैसे लुबाडले, तिचे शोषण केले. तिला कमजोर केले. हे सर्व उषाच्या अपरोक्ष घडले होते कारण तेव्हा मालाडच्या काका बारमध्ये उषा सिंगर म्हणून गायची. आपल्या भडव्याने बेलाला लुबाडले आणि आपल्या गायकीमुळे तिचे काम सुटले. पुढे जाऊन तिने जीव दिला या सर्व गोष्टींचा भयानक गिल्ट तिच्या मनात निर्माण झाला.

त्यात ती खचली, डिप्रेशनमध्ये गेली ती कधीच बाहेर आली नाही. आणि एके दिवशी बेपत्ता झाली. डान्सबारच्या दुनियेतली ही गोष्ट अचंबित करणारी अशीच होती. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर आशाताई आणि लताबाई यांच्या चाहत्यांची त्यांच्या गायकीवरून टशन सुरु आहे. त्या दोघीही आपापल्या जागी ग्रेटच आहेत. तरीही चाहते आपले मत सांगून थांबत नाहीत तर समोरच्या माणसाच्या बोकांडी मारू इच्छितात. या पार्श्वभूमीवर या घटनेचे वेगळेपण उठून दिसते. गायकी केवळ करमणूकीपुरती न राहता जिवाशी खेळू शकते हे बॉलिवूडच्या अनेक गाण्यांनी दाखवून दिले आहे मात्र दोन महान बहिणींच्या गाण्यांवरून भांडणाऱ्या सभ्य खोटारड्या लोकांच्या दुनियेत न बसणारी निष्ठेची काही सच्ची तत्वे चुकीच्या जागी चुकीच्या पद्धतीने समोर येतात तेव्हा नकळत जीव कासावीस होतो! एकीकडे श्रोत्यांसाठी गाणी जीव लावतात आणि जीवाला घोरही लावतात, तर दुसरीकडे हीच गाणी आशाताईंसारख्या ओजस्वी लोकांना संगीताच्या माध्यमातून मोक्षाचा मार्ग दाखवतात! अतिव्यवहारी झालेले जग त्यातही जगण्याची कश्मकश शोधत राहते!   

– समीर गायकवाड

Read More 

What do you think?

39 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

श्री दत्त बावनी

‘‘मोहॉकची रणदुंदुभी‘‘चे कथानक ज्या प्रदेशात घडले त्याची थोडीशी माहिती आज देतो आहे