in

गडचिरोलीचे खरे राजकीय अजेंडे कोणते?

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील निवासी आश्रम शाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याकडे राजकारणाला ऊत आलाय. काहींनी फडणवीस यांना धोपटण्यास सुरुवात केली कारण ते ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सीएम आहेत. काहींनी स्थानिक प्रशासन व्यवस्थेवर तर काहींनी समाजकल्याण खात्यावर आसूड ओढलेत. ही घटना वरवर वाटते तितकी साधी सरळ नाहीये. ह्या घटनेचे काही वेगळे पैलू.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई या दुर्गम आदिवासी भागातली ही अनुदानित निवासी आश्रम शाळा ‘कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन’ संस्थेची असून, ती काँग्रेसचे स्थानिक नेते व जिल्हाध्यक्ष विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या ट्रस्टअंतर्गत चालवली जाते. आश्रमशाळेला शासनाकडून मागील 25 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अनुदान मिळतेय. म्हणजेच या शाळेची स्थापना 2000 सालाच्या पूर्वी किंवा त्या दरम्यान झालेली असावी. तीन दिवसांपूर्वी ह्या आश्रमशाळेत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. वसतिगृहात खाटा नसल्याने जमिनीवर झोपलेल्या सहा आदिवासी विद्यार्थिनींना मध्यरात्री मण्यार ह्या विषारी सापाने दंश केला. त्यात तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मूलभूत सुविधांचा अभाव आणि सुरक्षेतील प्रचंड हलगर्जीपणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या जपतलाई आश्रमशाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात आलीय. निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून मुख्याध्यापक, अधीक्षक आणि महिला अधीक्षिका यांच्यासह संस्थाचालकांवर धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. म्हणजे पंचवीस वर्षे अनुदान घेऊनही इथे साध्या पलंगांची व्यवस्था होऊ शकली नाही, किती भ्रष्टाचार केला असेल यांनी! इथे मागच्या पंचवीस वर्षांत ज्यांनी इन्स्पेक्शन केलेय त्यांनी नेमके काय तपासले असेल हे उघड आहे! खाबूगिरी आणि अंधेर नगरी चौपट नॉन बायोलॉजिकल राजा! असो!

धानोरा हा गडचिरोली जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका. हा भाग प्रामुख्याने आदिवासीबहुल आणि वनाच्छादित आहे. प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी धानोरा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण. हा भाग घनदाट जंगले आणि नैसर्गिक सौंदर्यान नटलेला आहे. येथे प्रामुख्याने आदिवासी समुदाय निवास करतो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 हा गडचिरोलीवरून धानोऱ्याकडे जातो. धानोरा गडचिरोली हे अंतर फक्त 36 किमी आहे मात्र हे अंतर कापण्यासाठी दोन तास लागतात अशी रस्त्याची अवस्था. धानोरा ते जपतलाई हे अंतर 10 किमी आहे हे अंतर कापण्यास एक तास लागतो. ह्या दुर्गम भागाची अवस्था अतिशय बिकट आहे. कुणी गंभीर आजारी पडलं तर त्याला गडचिरोलीला नेऊपर्यंत वाटेतच त्याचे काम निपटू शकते. असो.

ज्या गावात ही घटना घडली ते जपतलाई गाव येरकड क्लस्टरमध्ये येते. मुंज्यालगोंडी, खेडि अशी अन्य छोटी गावे वाड्या ह्यात समाविष्ट आहेत. येरकडमध्ये पोस्ट ऑफिस आणि रेशन दुकानची सोय आहे. अन्यत्र बहुतेक करुन नाही. पोलीस सुरक्षा दलांचा इथे मोठा वावर आहे. हे गाव देखील राष्ट्रीय महामार्गावर आहे. मात्र याची अवस्था तर अधिक दयनीय आहे. ज्या आश्रमशाळेत सर्पदंशाने मुलींचा मृत्यू झाला तिला कुप्पा लिंगो यांचे नाव दिलेले आहे. पहांदी पारी कुपार लिंगो, स्थानिक भाषेत कुपार लिंगो किंवा कुप्पा लिंगो, हे गोंड आदिवासी समाजाचे आदिगुरु, दैवत आणि धर्मसंस्थापक मानले जातात. त्यांनी गोंड समाज व संस्कृतीला जीवनदर्शन, नियम आणि ‘कोया पुनेम’ हा गोंडी धर्म आचारसंहितेसह दिला.

गडचिरोली आणि लगतच्या गोंडवाना भागात कुपार लिंगो यांना सर्वोच्च स्थान आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत त्यांची पवित्र स्थाने, देवकिल्ले किंवा पेनकडा (देवस्थान) आहेत. धानोरा भागांत त्यांच्या नावाने प्राचीन काळापासून चैत्र पौर्णिमा व इतर विशेष प्रसंगी यात्रा आणि देव जत्रा भरवल्या जातात. सरकारकडून ह्या यात्रांना अधिक निधी मिळाला तरी स्थानिक आदिवासी बांधव खुश होतात. त्यांच्या फार काही मागण्या नसतात. हे लोकप्रतिनिधींच्या पचनी पडते.

कोया म्हणजे गुहा, मन्वाल म्हणजे निवासी. कोया मन्वाल म्हणजे गुहेत राहणारे लोक. पुनेम म्हणजे सत्यमार्ग. कोया मन्वाल पुनेम म्हणजे गुहेत राहणाऱ्या लोकांचा सत्यमार्ग! गोंड आदिवासींची धारणा आहे की बारा हजार वर्षांपूर्वी ह्या भूभागावर गोंड आदिवासींचे राज्य होते. कुपार लिंगो यांनी ह्या लोकांना सत्यमार्ग दाखवला, गोंड धर्माची निर्मिती केली असे ते मानतात. निसर्गपूजा हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य. मूर्तीपूजा ते करत नाहीत. मृत्यूनंतर दफन केले जाते, दहन दिले जात नाही. अलीकडील काळात शिकलेले तरुण स्वतःला हिंदू मानत नाहीत. 2011 साली झालेल्या जनगणनेत अनेक गोंड लोकांनी आपला धर्म गोंड असल्याचे लिहिले होते मात्र तशी कोणतीही तरतूद त्या कोष्टकांत केलेली नव्हती आणि तेव्हा कॉँग्रेसचे शासन होते.

गडचिरोली दुर्गम आणि बिकट ठेवली गेलीय. आता विकासाच्या नावाखाली फक्त खाणींचे उत्खनन सुरु आहे, आदिवासी म्हणतात की आमचा जीव घ्या पण जल जंगल जमीन यांना हात लावू नका. इथला सर्व निसर्ग तसाच ठेवून आणि आदिवासींचे हक्क अबाधित राखूनही विकास करता येतो मात्र सत्ताधीशांची तशी इच्छाशक्ती नाहीये. इथल्या लोकांना हिंदू बॅनरखाली आणायचे आहे ह्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे, त्यासाठी पालकमंत्रीपद सीएमनी घेतलेले असू शकते. कॉँग्रेसने साठ वर्षांत इथे काहीच केले नाही, भाजपला इथे खाणी खोदायच्या आहेत आणि लोकांना हिंदू छत्रछायेखाली आणायचे आहे!

आदिवासींचे खरे कल्याण व्हावे ह्यासाठी कुणाची खरी तळमळ दिसत नाही. अशा प्रकारे मृत्यू होऊ शकतात असा अहवाल काही वर्षांपूर्वी देऊनही सरकारने प्राधान्य कशाला दिले आहे हे आपण सर्वच जण पाहत आहोत! इथे ज्या समाजसेवी संघटना काम करत आहेत त्यांच्यावर सरकार करडी नजर ठेवते ह्यामागचे हेतू उघड आहेत. पत्रकार इथल्या किती बातम्या देतात आणि त्यात बातमीमूल्य किती असते हा संशोधनाचा विषय आहे.

सर्वात वाईट आणि धक्कादायक गोष्ट अशी की, राज्यातील अन्य जिल्ह्यातील लोकांना ह्याविषयी शून्य आस्था आहे! आपल्याच राज्याचे नागरिक असणाऱ्या आदिवासी बांधवांची प्रगती व्हावी मात्र त्यांचे नैसर्गिक हक्क टिकून रहावेत, तसेच त्या भागातील पर्यावरणाचे संरक्षण व्हावे असे किती लोकांना वाटते याचे उत्तर अतिशय निराशाजनक आहे. लोकांचा जोवर ह्यासाठी रेटा वाढत नाही तोवर अधून मधून अशा प्रकारच्या घटना घडत राहतील, कधी मुली मरतील तर कधी माणसं मरतील मात्र आपण फक्त सुस्कारे सोडू!

कारण इथली माणसं आणि त्यांचे हक्क ह्या गोष्टी आपल्या अजेंड्यावर नव्हत्या आणि आताही नाहीत! काहींच्या अजेंड्यावर सत्ता आहे, तर काहींना उद्योगपतींचे हित जोपासायचेय, पैसा कमवायचाय तर काहींचे लक्ष धर्मप्रसारावर! म्हणून हे घडत राहणार आणि आपण पाहत राहणार! नाहीतरी आपण करतो तरी काय?

– समीर गायकवाड

नोंदी – गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गडचिरोली जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली होती. आजोळी आलेल्या दोनभावंडांना ताप आला. अशिक्षित आई- वडिलांनी त्यांना दवाखान्याऐवज तांत्रिककडे नेले अन् तेथेच घात झाला. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर जन्मदात्यांनी दवाखाना गाठला; पण उशीर झाला होता. बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) व दिनेश रमेश वेलादी (साडेतीन वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा, ता. अहेरी) अशी त्या दुर्दैवी भावंडांची नावे. पत्तीगाव हे त्यांचे आजोळ. दोन सप्टेंबरला ते आपल्या आई- वडिलांसमवेत ते पत्तीगावला- आले होते. ४ सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आई- वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी दिली. त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली. सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा मृत्यू झाला, त्यानंतर दोन्ही भावंडांचे कलेवर घेऊन भाबड्या आशेपोटी हे दाम्पत्य जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली; रुग्णवाहिकेस खूप वेळ लागेल अशी चिन्हे दिसताच वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन पत्तीगावची वाट धरली. त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली. त्यानंतर नातेवाइकाची दुचाकी बोलावून त्यावरून ते पत्तीगावला पोहोचले. काही दिवसांनी एका युट्यूबरने याच्या तळाशी जाऊन चौकशी केली तेव्हा रुग्णवाहिकेचे सत्य समोर आले होते. नाले, चिखलाचा रस्ता असल्याने येथून वाहने जाणे शक्य नव्हते ते वाटेत रुतून बसले असते तर सरकारच्या नावाने आणखी बोंब झाली असती म्हणून रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध नाही असे सांगितले गेले. ह्या घटनेतून आपण अनेक गोष्टींचा बोध घेऊ शकतो मात्र त्यासाठीची इच्छाशक्ती हवी.

4 मे 2026 रोजी गडचिरोलीमधल्या एटापल्ली जवळील गावातल्या 23 वर्षीय महिलेने विषप्राशन केले होते. तिला दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका येऊ शकली नाही कारण त्यादिवशी ड्रायव्हर सुट्टीवर होता. थोडा वेळ वाट पाहून बेशुद्धावस्थेतील महिलेला मोटर सायकलवरून नेले गेले. महिला मरण पावली. पाच किमी अंतर कापण्यासाठी किती वेळ लागला हे कुठल्या वाहिनीने बातमीत दाखवले का?

गडचिरोलीमधल्या मेडपल्लीची रहिवासी असणारी 28 वर्षीय सविता साधू परसा मेडपल्ली अनेक दिवसांपासून अज्ञात आजाराने ग्रस्त होती. तिच्या घरच्यांनी अनेकदा उपचारासाठी विविध ठिकाणी भरती केले. मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मागील एक वर्षांपासून लाहेरी येथे ती आपल्या नातेवाहिकांकडे राहून उपचार घेत होती. अखेर 15 सप्टेंबर 2024 रोजी लाहेरी येथे तिचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी लाहेरीवरून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिच्या माहेरी मोरडपार येथे अंत्यविधी करण्याचे ठरविले. मात्र, मोरडपारला जाण्यासाठी कच्चा रस्ता आणि पामुलगौतम नदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिका जाऊ शकत नव्हती. तिचा मृतदेह कसा आणि कधी नेला याची बातमी तुम्ही कुठे वाचली अथवा पाहिली का?

Read More 

What do you think?

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

बुध ग्रह यंत्र