‘द पोर्ट्रेट ऑफ अ लेडी’ ही लेखक, पत्रकार खुशवंत सिंग यांची गाजलेली कथा. खुशवंत सिंगांच्या आज्जी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर ती बेतलीय. यातले बारकावे अतिशय टोकदार आहेत. कथेची मांडणी कुणालाही आवडेल अशी सरळ सोपी आणि मनाला भिडणारी आहे.
कथेचे नायक असलेले खुशवंत सिंग, आपल्या आज्जीच्या वर्णनाने कथेची सुरुवात करतात. आज्जी, अत्यंत वृद्ध, चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे असणारी आणि कंबरेत किंचित वाकलेली काहीशी थकलेली स्त्री. ती नेहमी शुभ्रधवल वस्त्रे परिधान करायची आणि एका हाताने जपमाळ ओढत घरात वावरायची. तिचे रूपडे विलक्षण देखणे नसले तरी तिच्या चेहऱ्यावर एक दैवी शांतता आणि पवित्रता होती, ज्याची तुलना खुशवंत सिंग, हिवाळ्यातील बर्फाच्छादित पर्वतराजीशी करतात.
त्यांचे आई-वडील नोकरीच्या निमित्ताने शहरात गेल्यामुळे ते लहानपणी गावात आज्जीसोबतच राहत. आज्जी रोज सकाळी त्यांना लवकर उठवायची, आपल्या सायमाखल्या हातांनी आंघोळ घालायची आणि कपडे घालून तयार करताना रोज सकाळची प्रार्थना म्हणायची, जेणेकरून नातवाला ती आपसूक तोंडपाठ व्हावी. त्यानंतर ती नातवाला पाटी, खडू द्यायची . खेरीज शिळ्या चपात्यांवर थोडे तूप आणि साखर लावून सोबत घेऊन शाळेत जायची. शाळा एका मंदिरालगत होती. नातू खुशवंत, मंदिराशेजारच्या शाळेत वर्णमाला शिकत असे, तर आज्जी मंदिरात बसून धर्मग्रंथ वाचायची. दुपारी घरी परतताना खुशवंत, रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना शिळ्या चपात्या खायला घालत. ही त्यांची चौकटबंद दिनचर्या होती!
खुशवंत सिंगांचे आई-वडील कायमस्वरूपी शहरात स्थायिक होतात, तेव्हा ते आपल्या मुलाला आणि आईला, म्हणजेच आज्जी आणि नातवाला शहरात बोलावून घेतात. येथून नातवाच्या आज्जीच्या नात्यात एक मोठा बदल होतो. नातू आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बसने जाऊ लागतो, त्यामुळे आज्जीचे त्याला शाळेत सोडणे बंद होते. शहरातल्या घरानजीकच्या परिसरात कुत्री नजरेस पडत नाहीत, परिणामी आज्जी घराच्या अंगणात चिमण्यांना अन्न भरवण्यास सुरुवात करते.
नातू खुशवंत, हा शाळेतून घरी आला की, आज्जी त्याला उत्साहाने अभ्यासाबद्दल विचारायची. शाळेत आपल्याला इंग्रजी, विज्ञान जसे की गुरुत्वाकर्षण, आर्किमिडीजचा सिद्धांत आदी विषय आणि संगीत शिकवले जाते, असे त्याने सांगताच ती खूप अस्वस्थ व्हायची. तिच्या मते, शाळेत देव आणि धर्मग्रंथांबद्दल काहीही शिकवले जात नव्हते. तसेच, तिच्या काळातील विचारानुसार संगीत हे केवळ भिकारी, दरिद्री लोकांचे किंवा कलावंतीणींचे काम होते, सभ्य घरच्या मुलांचे ते काम नाही. तिने नातवाला विरोध केला नाही, पण ती शांत झाली आणि तिने नातवासोबतचा संवाद खूप कमी केला.
नातू जेव्हा पुढील शिक्षणासाठी विद्यापीठात प्रवेश घेतो तेव्हा अभ्यासासाठी त्याला स्वतंत्र खोली देण्यात येते. त्यामुळे आजी आणि नातवामधला, एकच खोली शेअर करण्याचा राहिलेला एकमेव दुवा देखील तुटतो. आज्जी ही परिस्थिती अत्यंत शांतपणे स्वीकारते. ती दिवसभर चरख्यावर सूतकताई करत बसते. जोडीने प्रार्थना म्हणते. तिचा सर्वात आनंदाचा वेळ म्हणजे दुपारचा तो अर्धा तास, जेव्हा शेकडो चिमण्यांना ती दाणे टाकायची. चिमण्या तिच्या अंगावर, डोक्यावर बसायच्या, पण ती त्यांना कधीही हाकलायची नाही.
विद्यापीठातले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी, पाच वर्षांच्या कालावधीसाठी खुशवंत सिंग परदेशात जायचे ठरवतात. त्यांचा प्रवास सुनिश्चित झाल्यावर त्यांना निरोप द्यायला आज्जी रेल्वे स्टेशनवर येते. नातवाला वाटते की, आपली आज्जी आता खूप वृद्ध झालीय; कदाचित आपली तिची ही अखेरची भेट असावी. तो सेंटीमेंटल होतो मात्र आज्जी बिलकुल भावुक होत नाही. ती शांत उभी असते, तिचे ओठ पुटपुटत असतात, ती प्रार्थना करत असते! खुशवंतला वाटते तसे ती इमोशनल होत नाही, परंतु त्यांच्या कपाळाचे हळुवार चुंबन मात्र घेते. तरुण खुशवंतना वाटते की, कदाचित हा तिचा शेवटचा स्पर्श असेल.
पण तसे काही होत नाही. पाच वर्षांनी विदेशांतले शिक्षण पूर्ण करुन खुशवंत भारतात परततात, तेव्हा आई वडिलांच्या बरोबरीने दस्तुरखुद्द आज्जी त्यांना घ्यायला रेल्वेस्टेशनवर येते. खुशवंत सिंगांना ती पूर्वीसारखीच वाटते, तिच्यात फारसे बदल झाले नाहीत असे त्यांना राहून राहून वाटते. ती शांत चेहऱ्याने त्यांना निरखते. ते सगळे मोठ्या आनंदात घरी परततात तेव्हा त्यांना एक लक्षणीय बदल जाणवतो! आज्जीने कित्येक वर्षांचे दिनचर्येचे नियम मोडीत काढून एक विलक्षण गोष्ट केलेली असते.
त्या दिवशी संध्याकाळी दिनक्रम बदलून प्रार्थना मौन यांना फाटा देत, ती शेजारच्या महिलांना गोळा करते. कोठून तरी एक जुनी ढोलकी आणते आणि अतिशय जोशात कित्येक तास गायन करते, कित्येक गाणी गाते! युद्ध जिंकून यशस्वीपणे घरी परतलेल्या सैनिकांचे गुणगान करणारी गीते ती गाते, हे विशेष! मात्र या अतिउत्साहामुळे दुसऱ्या दिवशी ती आजारी पडते. तिला तपासायला डॉक्टर घरी येतात.
तपासणीअंती डॉक्टर सांगतात की, आज्जीला सौम्य ताप आलाय, फारसे घाबरण्याचे कारण नाही. मात्र आपल्यापाशी आता फार वेळ उरला नाही; आता आपली निरोपाची वेळ जवळ आलीय हे आज्जीने ओळखलेले असते. आता अधिक कुणाशी बोलून वेळ वाया घालवण्यात काही हशील नाही हे तिला कळून चुकते. ती अबोल होते, कुणाशीही बोलत नाही आणि तिचे आवडते काम करत पडून राहते; अंथरुणावर पडून जपमाळेचे मणी हलक्या हाताने ओढत असतानाच तिची प्राण ज्योत मालवते.
आजीच्या मृत्यूनंतर एक अतिशय विलक्षण घटना घडते. हजारो चिमण्या तिथे जमतात. त्या शांतपणे अंगणात उतरतात आणि दुरून आज्जीला निरखत राहतात! त्या समयी त्यांचा चिवचिवाट पुरता लोप पावला होता. खुशवंतसिंगांच्या आईला हे दृश्य पाहून गहिवरून येते. आज्जी जसे धान्य, चपातीचे तुकडे टाकायची तसे तुकडे ती अंगणात टाकते. परंतु एकही चिमणी त्याकडे पाहत नाही. त्या शांत बसून राहतात. दरम्यान, नातलग आप्त मित्र शेजारी जमा होतात आणि आज्जीचे पार्थिव नेण्यात येते, तेव्हा सर्व चिमण्या शांतपणे उडून जातात. त्या मुक्या प्राण्यांना तिच्या जाण्याचे अतीव दुःख झाले होते!
कथेचा शेवट मानवी यंत्रवतता आणि शहरी कोरडेपणाची टोचणी देतो. कथेच्या शेवटी साफसफाई करणारा कर्मचारी रोजच्या सवयीने झाडूकाम करतो. खुशवंत सिंगांच्या अंगणात पडून असलेले आणि पक्षांनी तोंडही न लावलेले चपातीचे सगळे तुकडे गोळा करतो आणि कचराकुंडीत टाकून देतो!
शेवटच्या पंक्ती लिहिल्या नसत्या तर चालल्या नसत्या का, असे आपल्याला वाटू शकते. मात्र व्यवहारी जग आणि भावनाप्रधान माणसं यांच्यात एक मूक संघर्ष कैक शतकापासून जारी आहे. त्याचे हे टोकदार प्रकटन.
या कथेत खुशवंत सिंगांनी त्यांच्या आजीसोबतचे नाते, बदलत जाणारे दिवस आणि काळाच्या ओघात मानवी संबंधांमध्ये येणारे अंतर यांचे अतिशय संवेदनशील चित्रण केलेय. बदलत्या काळाचे आणि मानवी मूल्यांचे अचूक चित्रण ते करतात.
संस्कृती, विचार आणि जीवनशैली बदलल्यामुळे दोन पिढ्यांमध्ये कसा दुरावा निर्माण होतो यावर ते कोणतेही थेट भाष्य करत नाहीत मात्र कथेतून ते आपसूक जाणवते. आज्जी पारंपारिक, धार्मिक विचारांची आहे, तर नातू आधुनिक, वैज्ञानिक शिक्षणाकडे वळतो. शहरात आल्यावर दोघांचे विश्व पूर्णपणे बदलते. त्यांनी शिक्षण पद्धतीतील फरक देखील अधोरेखित केलाय. आजीला वाटायचे की, शिक्षणात अध्यात्म आणि नैतिक मूल्ये असावीत, तर आधुनिक शिक्षण भौतिकवादी आणि व्यावहारिक गोष्टींवर अधिक भर देते.
शहरात आल्यावर एकत्र कुटुंब असूनही वृद्ध आज्जी एकाकी पडते. बदलत्या जगाशी जुळवून घेण्याऐवजी ती स्वतःला देवाच्या चरणी आणि निसर्गाच्या चिमण्यांच्या सानिध्यात झोकून देते. तिचे व्यक्तिमत्त्व अत्यंत खंबीर आहे; ती तिचे एकाकीपण कोणावर लादत नाही किंवा त्याची तक्रार करत नाही.
गावातील कुत्रे आणि शहरातील चिमण्या यांच्या माध्यमातून आजीचे प्राण्यांवरचे निस्सीम प्रेम दिसून येते. कथेचा शेवट, मानवापेक्षा मुक्या प्राण्यांमध्ये सचेत असणाऱ्या संवेदना अधिक तीव्रतेने दाखवतो. चिमण्यांनी अन्नाचा कणही न शिवता पाळलेला शोक हा कथेचा सर्वोच्च आणि भावनिक बिंदू आहे. खुशवंत सिंग यांनी अतिशय तटस्थतेने हा प्रसंग लिहिलाय, वास्तवात ते इथे स्वतःचे, त्यांच्या आई वडिलांचे उदात्तीकरण करू शकले असते मात्र त्यांनी ते पूर्णतः टाळलेय. आपल्यापेक्षा अधिक सच्चा आणि अधिक गहिरा शोक निसर्गाचा होता आणि तसा तो नेहमीच असतो हे त्यांनी ठसवलेय!
ही कथा वाचताना नकळत माझी आज्जी डोळ्यापुढून तरळून गेली आणि लक्षात आले की, दोन पिढ्यांपूर्वीची बहुतेक सगळीच माणसं नात्यांशी आणि निसर्गाशी कनेक्ट असणारी होती. त्यांचं शिक्षण जुनाट आणि विचार कथित रित्या आधुनिक नसले तरी त्यांचे वर्तन अधिक सच्चे आणि गहिरे होते. त्यांची आपली नाळ नेमकी कधी कशी तुटली याचा गुंता काही केल्या नीट उलगडत नाहीये.
– समीर गायकवाड


GIPHY App Key not set. Please check settings