in

मनोरंजन-प्रबोधन एक दृष्टिकोन…

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

…जगाच्या पाठीवरचा कुठलाही दिवस घ्या, तुम्हाला दिसेल, पुस्तकाची पाने उलटली जात आहेत, नाटके सादर होत आहेत तर कुठे कथा वाचन होत आहे, चित्रपटांचे चित्रण सुरू आहे, दूरदर्शनवर मालिका अखंड सुरू आहेत, २४ तास बातम्या, वाचल्या जातात आणि ऐकल्या जातात. रात्री मुलांना गोष्टी /दंतकथा सांगितल्या जातात. दारूच्या गुत्त्यांमध्ये गप्पा छाटल्या जातात. मंदिरांमध्ये आख्याने लावली जातात, किर्तनातून कथा रंगवल्या जातात. हे कमी आहे की काय म्हणून आतंरजालावरही चॅट केले जाते. हे पाहिल्यास मनुष्य जातीला कथा, कल्पना आणि गोष्टींची अनावर ओढ असते हे सिद्ध होते. मनुष्याला वस्त्र, अन्न, निवारा, खेळ, व्यायाम आणि झोप या गोष्टींबरोबर कहाण्यांची, गोष्टींची, कथांचीही गरज असते, हेच सिद्ध होते. नाही का? एवढेच नाही मनुष्यप्राण्याला या आवश्यकतेमुळे स्वप्नेही पडत असावीत असं मानायला दाट जागा आहे. आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग ‘‘गोष्टींनी’’ का बरं व्यापून टाकला असावा? आयुष्यातील एवढा वेळ आपण यात का खर्ची घालत असू? हा एक संशोधनाचा विषय आहे. ज्याप्रमाणे व्यायामासाठी काही उपकरणांची गरज असते त्याप्रमाणे आयुष्य सुंदर करण्यासाठी, जगण्यासाठी, मला वाटते, ‘‘गोष्टींची/कथांची’’ आवश्यकता असावी.

प्राचीन काळापासून आपण ॲरिस्टॉटलच्या एथिक्स या पुस्तकातील एका प्रश्र्नाचे उत्तर शोधतोय, पण त्याचा काही थांग लागत नाही: मनुष्याने आपले आयुष्य कसे व्यतीत करायला हवे? या प्रश्र्नाचे उत्तर सतत आपल्याला हुलकावण्या देत आले आहे. भराभर उलटणाऱ्या काळाच्या धुक्यात हे उत्तर हरवून गेले आहे. आपण आपले आपली स्वप्ने पूरी करण्यासाठी झगडतोय, ध्येयाच्या मागे उर फुटेपर्यंत धावतोय आणि आपल्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करतोय. या सगळ्या शर्यतीत आपली काळाबरोबर फरफट होत असते. ही फरफट अचानक थांबवण्याचा आपण जर प्रयत्न केला तर आपली गाडी रुळावरून घसरलीच समजा. मग आपला प्रवास कटकटींचा होतो, कदाचित अति झालं आणि हसू आला अशी परिस्थिती होते, हा प्रवास मध्येच थांबतो, मध्येच वेडापिसा होतो. कधी ही फरफट अर्थपूर्ण असते तर कधी अर्थहीन. जागतिक घडामोडींवर आपले काडीचेही नियंत्रण नसते आणि आपल्या आयुष्याची गाडी हाकत असताना आपल्याला उमगते की आपल्या आयुष्यातील गर्दीच आपल्या गाडीचे नियंत्रण करत आहे.

मनुष्य ॲरिस्टॉटलच्या प्रश्र्नाचे उत्तर परंपरेने, तत्त्वज्ञान, विज्ञान, धर्म, कला या गोष्टींमध्ये शोधत असतो आणि त्यातील काही तत्त्वांची जुळणी करून आपले आयुष्य सुखकारक करतो असे म्हणायला हरकत नाही, पण आजकाल कोण तत्त्वज्ञानावरची पुस्तके वाचतो? ते वाचून काही परिक्षा उत्तीर्ण होता येत नाही. एके काळी विश्र्वाचे गुढ उकलणारे म्हणून विज्ञानाकडे सामान्य माणूस आदराने पाहात होते. आजही पाहतात, पण त्याच्या अकराळ विकराळ स्वरुपाने माणूस अगदी गोंधळून गेलाय. समोर आलेल्या माहितीमुळे तो संभ्रमात पडलाय. अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ किंवा राजकारणी यांच्याविषयी बोलायलाच नको. त्यांच्यावर कोणीही काडीचा विश्र्वास ठेवत नाही. राजकारण्यांकडे तर आता तिरस्काराने पाहिले जाते. उरला प्रश्र्न धर्माचा. अनेकांसाठी धर्म आता केवळ एक ‘कर्मकांड’ म्हणून उरला आहे, ज्याच्या आड दांभिकपणा लपवला जातो. धर्मातील मूळ मूल्ये हरवली असून, आता लोक फक्त वरवरचे विधी करतात, श्रद्धेचा दुरुपयोग एवढ्या प्रमाणावर इतरत्र केला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. ही सगळी अशी परिस्थिती असताना माणूस आधारासाठी एखाद्या गोष्टीकडे वळण्यास संभव आहे आणि मला वाटते वळलाही आहे – कथा आणि कथाकथनाची कला.

जग आता चित्रपट,कथा कादंबऱ्या, नाटक, दूरदर्शन याचा वापर हपापल्यासारखे करू लागले आहे. त्यांची भूक भागण्याची शक्यता मला तरी दिसत नाही, कारण येथे पोट भरणे ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. गोष्टी सांगण्याची कला आता मानवासाठी प्रेरणेचा एक प्रमुख स्त्रोत झाली आहे, ही जी ओढ मानवाला लागली आहे त्याला काही लोक फक्‍त मनोरंजन समजतात. काही लोक टीका करतात, की जीवनाचा शोध घेण्याऐवजी जीवनापासून पळ काढण्याचे हे माध्यम आहे. पण मुळात मनोरंजन म्हणजे तरी काय? एखाद्या कथेत स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन बौद्धिक आणि भावनिकदृष्ट्या समाधानकारक अंतापर्यंत पोहोचणे म्हणजे मनोरंजन. चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी, मनोरंजन म्हणजे अंधारात बसून पडद्यावर लक्ष केंद्रित करण्याचा तो एक यज्ञ आहे, ज्याद्वारे कथेचा अर्थ समजून घेता येतो आणि त्यातून कधीकधी तीव्र वेदना जागृत होतात तर कधी आनंदाचा झरा वाहू लागतो. जसा जसा कथेचा अर्थ खोलवर जातो, तसतसे त्या भावनांच्या सर्वोच्च समाधानाकडे आपण नेले जातो.

कथा म्हणजे वास्तवापासून केलेला पलायन नसून, नुसते मनोरंजन नसून, वास्तवाच्या शोधात आपल्याला पुढे घेऊन जाणारे ते एक महायान आहे; अस्तित्वाच्या गोंधळातून अर्थ शोधण्याचा तो आपला एक आनंददायी प्रयत्न आहे.” आणि कथाकार, लेखक त्या महायानाचा चालक…

मूळ कल्पना मॅकी..

अर्थ आणि अनुवाद – जयंत कुलकर्णी.

Read More 

What do you think?

Written by Jayant Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

डेथ मार्च ऑफ मिरपूर, १९४७