in

कअबागृहाची संक्षिप्त माहिती

 कअबागृहाची संक्षिप्त माहिती

        मक्का मुकर्रमा अर्थात आदरणीय मक्का हे शहर सऊदी अरेबियाच्या पश्चिमेकडे हिजाजच्या एका अशा खोऱ्यात वसलेले आहे, ज्याच्या चारही बाजूंना उंच डोंगराने वेढा घातला आहे.। मक्का शहराचा सपाट उतार ‘बत्हा’ म्हणून ओळखला जातो. समुद्र सपाटीपासून मक्का शहराची उंची ३०० मीटरहून अधिक आहे. या शहरात दाखल होण्याकरिता तीन दिशांनी मअल्लात, मुसिफला आणि शुबैकर असे तीन रस्ते आहेत. मअल्लातचा परिसर हजून या नावानेही प्रसिध्द आहे. हजून एक पहाड आहे आणि जन्नतुल मअल्लाची प्रसिध्द आणि पवित्र दफनभूमी याच डोंगराच्या उतारावर आहे.

        पवित्र कअबागृह या शहराच्या मध्यभागी विद्यमान आहे. ही वास्तू जवळपास घनाकार असून त्याची उंची चौदा मीटर पूर्वेकडील लांबी १५.८४ मीटर, पश्चिमेकडील लांबी १५ मीटर, उत्तरेकडील रूंदी ९.९० मीटर, दक्षिणेकडील रूंदी ११.५२ मीटर इतकी आहे. पवित्र कअबागृहाचा दरवाजा नेहमी बंद असतो आणि काही विशेष प्रसंगीच तो उघडला जातो. हा दरवाजा केव्हा, कधी आणि कुणाकरिता उघडायचा हे संपूर्णपणे शेबा घराण्याच्या मर्जीवर अवलंबून आहे. कारण कअबागृहाची किल्ली पैगंबर साहेबांनी मक्केवर विजय प्राप्त केल्यानंतर हिजरी सन आठ म्हणजेच इ. स. ६३१ मध्ये उस्मान बिन तल्हाला सुपूर्द केली होती, जी आजतागायत त्याच घराण्यात आहे आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ते घराणे आणि कअबागृहाची किल्ली राखण्याची परंपरा आतमितीला देखील कार्यरत आहे. किल्ली स्वाधीन करण्याच्या कार्याला आज सुमारे साडे चौदाशे वर्षे झाली. मक्केवर राज्य करणारे हजारो राज्यकर्ते आणि बादशहा पृथ्वीतलावर येऊन गेले, लाखो घराणी नामोनिशाण झाली. पैगंबर साहेब आणि त्यांच्या सोबतियांना मदीनेत आश्रय देणारे ‘अन्सारी’ आणि त्यांचे वंशज संपुष्टात आले परंतू उस्मान बिन तल्हाचा ‘शेबी’ परिवार आजपर्यंत कायम आहे. त्यांचे वास्तव्य मक्केतच आहे. एकाही राज्यकर्त्याने त्यांच्याकडून ही किल्ली हिसकावून घेण्याचे धाडस केले नाही. उलट त्यांना सर्व सवलती आणि संरक्षण प्रदान करण्याचे काम सरकार करते. परंपरेनुसार हज यात्रेच्या काळात पवित्र कअबागृहावर आतून व बाहेरून गुलाबाच्या अत्तराने गुस्ल म्हणजे स्नान घालण्यात येते. त्यावेळी मोठ्या इतमामाने कअबागृहाचे दार उघडले जाते. त्याप्रसंगी सौदी बादशहा आणि त्यांचे मंत्री व राज्यपाल इत्यादि तेथे समारंभपूर्वक हजर असतात. परंतू, वास्तूच्या दारावर ‘शेबी’ कुटूंबातील जबाबदार व्यक्तिच्या उपस्थितीत व त्यांच्या मर्जीने कुणाला आत सोडायचे आणि कुणाला आत जाऊ द्यायचे नाही, हे ठरविले जाते. गर्दीला काबूत आणण्याकरिता तेथे प्रचंड बंदोबस्त करण्यात येतो. भेक तास चालू असणारा हा पवित्र सोहळा मनःचक्षुनी पाहण्यासारखा असतो. त्याची क्षणचित्रे व थेट प्रसारण जगभर प्रसिध्द करण्यात येते.

         सूरह अलिइमान मधील सोळाव्या श्लोकात म्हटले आहे की हे पृथ्वीतलावरचे सर्वात पहिले प्रार्थनास्थळ आहे. जे मानवाकरिता बांधण्यात आले. त्याला मांगल्य व समृध्दी दिली गेली होती आणि सर्व जगाकरिता मार्गदर्शनाचे केंद्र बनविले गेले होते. त्यामध्ये स्पष्ट संकेतचिन्हे आहेत. इब्राहिम’ अलैहिस्सलाम यांनी कअबागृहाचे पुननिर्माण केले. त्याआधीही ही वास्तू होती. परंतु, कालांतराने ती लुप्त झाली होती. 

        कअबागृहाच्या आधी ही जागा एक सर्वसाधारण वाळवंटी आणि निर्जल व निर्मनुष्य होती. अधूनमधून उत्तरेकडे जाणारे काफिले येथून प्रवास करायचे. ईश्वरी आदेशावरून प्रेषित ईब्राहिमने जेव्हा आपल्या पत्नी हाजरा आणि तान्ह्या ईस्माईलला येथे सोडले आणि नंतर अल्लाहच्या कृपेने जमजमची विहिर अस्तित्वात आली. तेव्हा तिथे हळूहळू लोकवस्ती झाली. येथे सर्वप्रथम स्थायिक होणारे येमेनचे जुहुम कबिल्याचे लोक होते. नंतर याला एका छोट्याशा शहराचे रूप मिळाले. ज्याची आज इस्लाम धर्माचे एक पवित्र शहर म्हणून जगभर प्रसिध्दी आहे.

       जेव्हा पृथ्वी व आकाशाची निर्मिती होत होती. तेव्हा पाण्याच्या खालून जी भूमी सर्वप्रथम वर आली. त्यावरच कअबागृहाचे स्थान निश्चित करण्यात आले होते आणि नंतर त्याच्या खालून बाकीची जमीन पसरविण्यात आली, अशी हदीसमध्ये नोंद आहे

        कअबागृह नेहमी बंद ठेवण्यात येते आणि त्याच्या भोवतालच्या उघड्या पटांगणात तवाफ करण्यात येतात. इमारतीमध्ये चारही बाजूने कअबागृहाकडे तोंड करून नमाज पठण करण्यात येते. १९९७ मध्ये असे आढळून आले की, कअबागृहाच्या पायात पाणी मुरत आहे आणि छताला आधार देणारे चंदनाचे खांब कुजत आहेत. अभियंत्यांना मुरत असलेल्या पाण्याचा शोध घेण्याकरिता किमान ५०-६० फूट खोल जावे लागले. त्यावेळी कअबागृह दुरूस्तीसाठी चारही बाजूने सील करण्यात आले होते.

       २०१७ साली आम्हा उभयतांना हज यात्रा करण्याचे भाग्य लाभले. कअबागृहाचे नयनरम्य रूप पाहता आले. कअबागृहाच्या पटांगणात तवाफ, नमाज अदा करून उपासना करण्याची संधी अल्लाहकडून आम्हास प्राप्त झाली.

Read More 

What do you think?

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

पुलंनी आपल्या मेव्हण्याना लिहिलेलं हे पत्र..