in

Post Title

MarathiBlogs - Marathi Bloggers Network
ज्ञानेश्वरीतलं
विज्ञान…

लेखक- नितीन कळंबे.


संत ज्ञानेश्वर माउली
आणि सिनस्थिशिया (Synesthesia)


सर्वप्रथम आपण
सिनस्थिशिया म्हणजे काय ते थोडक्यात पाहूया. आपणा सर्वांना अनस्थेशिया Anesthisia
म्हणजे काय हे माहित असेल. अनस्थेशिया म्हणजे काहीही न जाणवणे (No Feelings). उदा.
शस्त्रक्रियेवेळी भूल दिल्याने अंग बधीर होऊन वेदना जाणवत नाहीत. सिनस्थिशिया
म्हणजे एकत्रितरित्या जाणवणे(Joint Feelings) उदा. तुम्ही जर इंद्रधनुष्य पाहीले
तर ते सुख केवळ तुमच्या डोळ्यांना मिळेल मात्र सिनस्थिशिया असलेल्या एखाद्याला ते
इंद्रधनुष्य सुद्धा दिसेल आणि त्याचसोबत त्याला त्या इंद्रधनुष्याची चव सुद्धा
घेता येईल. आहे की नाही गम्मत !  आपल्याला
हे कदाचित खोटे वाटू शकते मात्र पाश्चात्यांनी वारंवार प्रयोग करून हे सत्य
असल्याचं सिद्ध केलेलं आहे त्यामुळे ते आपल्याला खरं मानणं भागच आहे. किंबहुना ‘जे
जे पाश्चात्य ते ते उदात्त’ अशी आपली बौद्धिक वसाहतवादी वृत्ती आहेच. असो.


सिनस्थिशिया रोग आहे
का ? तर नाही. आपण जग ज्याप्रकारे समजून घेतो त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे सिनस्थिशिया
असणारे लोक समजून घेतात. आपण नाद ऐकतो तर सिनस्थिशिया असणारे नाद पाहतात, त्याची
चव घेतात, इतकेच काय तर काहींना हा नाद रंगांमध्येही दिसतो. विसाव्या शतकात
याविषयी जागृती सुरु झाली आणि मग सिनस्थिशिया असणारे लोक हळूहळू जगासमोर येऊ
लागले. आतापर्यंत आपल्याला काही रोग आहे असे त्यांना वाटत होते मात्र त्यामागचे
विज्ञान समजून घेतल्यानंतर त्यांना हायसे वाटले. मग या यादीत अभिनेत्री मार्लिन
मन्रो पासून कादंबरीकार व्लादिमिर नाबोकोव्ह, संगीतकार फेरेल विल्यम्स, असे
आपापल्या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ आपणांस सिनस्थिशिया असल्याचे उघडपणे सांगू
लागले. मात्र हीच गोष्ट इ.स. १२९० साली संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या
ज्ञानेश्वरी या गीतेवरील टीकेत नमूद केली असेल तर ? होय, हे खरे आहे ! माउली
सहाव्या अध्यायातील पंधराव्या ओवीत म्हणतात,

“ जिये कोंवळीकेचेनि
पाडें | दिसती नादींचे रंग थोडे |

वेधे परिमळाचे बीक
मोडे | जयाचेनि ||६.०.१५||”

म्हणजे, शब्दाला नाद
आहे,रंग, रूप, स्पर्श, गंध आहे. नुसता आहेच नाही तर माउलींनी प्रत्येक शब्द तसा
घडवलाय ज्याने मानवी मनावर अनुकूल परिणाम व्हावेत. माउली म्हणतात, माझ्या या
शब्दांना असा सुगंध आहे की त्यापुढे जगातलं सगळे सुगंध तुच्छ ठरतील. ते पुढे
म्हणतात,

“ऐका रसाळपणाचिया
लोभा | कीं श्रवणिची होती जिभा |

बोलें इंद्रियां लागे
कळंभा | एकमेकां ||६.०.१६|| ”


म्हणजे, “माझ्या
शब्दाला केवळ नाद नाही तर रस, रंग, सुगंधसुद्धा आहे. नाद आला की कान म्हणेल हा
माझा विषय आहे, जीभ म्हणेल, नाही नाही, हा नाद अतिशय रसाळ आहे त्याचे सेवन मीच
करणार, डोळे म्हणतील की या नादाला रूप आहे, रंग आहे त्यामुळे हा माझा विषय झाला
अशाप्रकारे सर्व इंद्रियांमध्ये भांडणे लागतील ” असे माउली म्हणतात.


आपल्या
ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला होणाऱ्या संवेदना ग्रहण करणाऱ्यासाठी मेंदूमध्ये
विशिष्ट केंद्रे वेगवेगळ्या भागांत असतात. सिनस्थिशिया असलेल्या लोकांमध्ये ही
केंद्रे एकमेकांवर पुरेसा प्रभाव टाकतात त्यामुळे समजा कान आणि नाकाची केंद्रे
एकत्र आली तर नाद कानाद्वारे ऐकला की त्याचा गंध यायला सुरुवात होते. कान आणि
जिभेची केंद्रे एकत्र आली तर त्या नादाची चव आपल्याला कळू शकते. आता याचा
अध्यात्माशी काही संबंध आहे का ? तर नाही. 
सिनस्थिशिया असणाऱ्यांचे ग्रहणतंतू असे आच्छादित (Overlap) झाले आहेत याला
विज्ञानाची यथायोग्य कारणमीमांसा आहे. आता यातील महत्वाचा भाग म्हणजे, हे आच्छादन
प्रत्येक वेळी अनुकूल असेल असे नाही, उदा. एक गायिका आहेत त्यांनी सा,रे,ग,म
म्हटलं की त्यांना प्रत्येक सुराचा विशिष्ट असा रंग दिसतो, त्यावरून त्या आपला सुर
बरोबर लागतोय की नाही नाही याचा अंदाज बांधतात त्यामुळे हा सिनस्थिशिया त्यांना
त्यांच्या व्यवसायात फायदेशीर आहे. डेनियल टेन्मेट हा असाच अवलिया माणूस. त्याला
आकडे हे वेगवेगळ्या आकारात आणि रंगात दिसतात यामुळे त्याची स्मरणशक्ती असामान्य
झाली आहे. गणितातल्या Pi च्या दशांशचिन्हाच्या पुढील  तब्बल २२,५१४ इतक्या किंमती त्याने लक्षात
ठेवल्या आणि याची  ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड
रेकॉर्ड’ मध्ये नोंद सुद्धा झाली आहे. मात्र काही लोकांना सिनस्थिशिया तितकासा
अनुकूल असत नाही. काही व्यक्तींची नावे नुसती ऐकली तरी त्यांना तिरस्कार उत्पन्न
होतो, काही अक्षरे त्यांना कडू लागतात, काही रंग त्यांना कर्कश असा आवाज ऐकवतात,
त्यामुळे अशा व्यक्ती सिनस्थिशियामुळे त्रस्त झालेल्या दिसतात. माउलींच वेगळेपण
इथेच आहे असे मला वाटते. ही सिनस्थिशियाची संकल्पना माउलींनी त्यांना हवी तशी
अनुकूल करून वापरली आहे. गीतेला ‘देशीकार लेणे’ चढवून माउलींनी मराठीत नवीन शब्द
घडवले आहेत हे कदाचित त्या शब्दांचा अध्यात्माला अनुकूल असा प्रभाव श्रोत्यांच्या
मनावर पडावा म्हणून आहे असे मला वाटते. ज्याप्रमाणे श्रीभगवंतांच्या विविध नामाची
पुष्पे भीष्मांनी व्यवस्थित रचून मोक्षफल देणारा विष्णुसहस्रनामरुपी गुच्छ तयार
केला आहे त्याचप्रमाणे माउलींनी; श्रोत्यांच्या अंत:करणात भक्तिरसाचा ओलावा
निर्माण व्हावा यासाठी ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर अक्षरश: ब्रह्मानंदातून बुडवून
काढून एक एक ओवी त्याप्रमाणे घडवली आहे आणि त्यासाठी त्यांनी मराठी भाषेत
पर्यायाने नवीन शब्द सुद्धा निर्माण केले आहेत.


(अपूर्ण…)





Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Nitin Kalambe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा २०२३

अभंग-संत तुकाराम महाराज (Abhanga Sant Tukaram Maharaj)