आताशा,
पाऊस अजूनही पडतो,
माती अजूनही हुळहुळते, धुमारे फुटतात,
सृजनाची ओढ अजूनही आपलं अस्तित्व
राखून आहे…
पण….
‘पावसाशी हितगुज मांडणारी ती ओळख
कुठेतरी हरवून बसलीये….’
आताशा,
रस्ते तेच आहेत, चालतं होण्याची सारी प्रलोभनं जशीच्या तशीच आहेत
आपापल्या जागी,
एखादी वळणवेडी पाऊलवाट ओळखीचं स्मित करतेही कधी,
पण….
‘पावलांना गती देणारी ती हाक
हरवलीये कुठेतरी….’
आताशा,
अजूनही थरारते मन कातरवेळी सांजवात लागताना,
नकळत हात वेढले जातात समईची ज्योत झाकोळताना,
पण….
‘आत कुठेतरी ‘ज्योतीचं’ क्षणभांगुरत्व मान्य करण्याचं पोक्तपणही
येऊ लागलंय मनाला आताशा….’
– श्रद्धा
GIPHY App Key not set. Please check settings