यावर्षीच्या भारतभेटीत माझ्या २१ वर्षांच्या लेकीने; आशुतोष जोशी या गाव, समाज आणि पर्यावरणासाठी निस्वार्थीपणे काम करणार्या युवकाचं काम पाहावं असं मला वाटत होतं. सुदैवाने सगळी गणितं जमली आणि आम्ही गुहागरजवळच्या निसर्गाच्या कुशीत दडलेल्या आशुतोष जोशीच्या मूळ गावी म्हणजे नरवणला पोचलो. दोन पदयात्रांनंतर तो गावात स्थिरावला आहे. गावाचा विकास, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणाचा तोल सांभाळण्यासाठी तो काम करतो आहे.
इंग्लंडमध्ये शिक्षण आणि नोकरी केल्यानंतर आशुतोष भारतात परतला, तेव्हा त्याने गावाकडे केवळ भूतकाळ म्हणून पाहिलं नाही. गावातल्या माणसांकडे, त्यांच्या कौशल्यांकडे आणि उपलब्ध साधनांकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच ‘धरा‘ उभं राहिलं. गावातल्या पारंपरिक कौशल्यांकडे नव्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न त्याने केला. गावातल्या एका तरुणाची सुतारकामाची आवड लक्षात घेऊन छंदालाच रोजगाराचं साधन करण्याची कल्पना मांडली आणि वास्तवात आणली. लाकूड, नारळाची करवंटी अशा गोष्टींचा उपयोग करून विविध वस्तू तयार करणं, त्यांना बाजारपेठ मिळवून देणं म्हणजे गावातल्या कौशल्याला थेट अर्थव्यवस्थेशी जोडणं. इतकंच करुन आशुतोष थांबला नाही निसर्गाशी ओळख करुन देणार्या सहली तो आयोजित करतो त्यामुळे गावातल्याच लोकांना, तरुणांना, स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारे रोजगाराचं साधन मिळालं आहे. फणसाच्या तळलेल्या गर्यांना दरवर्षी प्रचंड मागणी असते. ह्यातून अनेक स्त्रियांना हंगामी काम मिळतं आहे.
नरवणला आम्ही नदीचं काम पाहिलं. नदीत गाळ साचून राहिल्यामुळे वर्षानुवर्ष पावसाळ्यात गावात पाणी भरतं. नाम संस्थेच्या मदतीने आशुतोषने नदी स्वच्छ करण्याचं काम केलं. नरवणची जिल्हा परिषद शाळा आम्ही पाहिली. मुलांना केवळ अभ्यासक्रमापुरतं शिक्षण न देता आपल्या गावाशी आणि निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न इथे केला जातो. कचरा व्यवस्थापन, शेती, स्थानिक पर्यावरण, गावातली साधनसंपत्ती, पारंपरिक कौशल्यं ह्यांची ओळख करून दिली जाते, अभ्यासक्रमातील पुस्तकांच्या पलीकडचं जग विद्यार्थ्यांना प्रयत्नपूर्वक दाखवला जातं. शिक्षिका पद्मजा दिवाडकर या इथे स्वखुषीने विनावेतन काम करतात.
माझी लेक हे सगळं पाहत होती. मला अनुवादाच्या दिवसांत भेटलेली माणसं आठवत होती. ज्याच्या लेखांचे मी अनुवाद करत होते, ज्याच्या पदयात्रेतल्या माणसांच्या कथा वाचत होते, त्याचं काम त्या दिवशी आमच्यासमोर प्रत्यक्ष सुरू होतं. आम्ही तिथे असताना नदीचा गाळ नाम संस्थेच्या मदतीने उपसून तिला वाहती करण्याच्या कामात आशुतोष मग्न होता.
इंग्लडला शिक्षण घेऊनही तिथेच न राहता तो का परत आला आणि चालण्याची उर्मी का निर्माण झाली असावी? लंडनला असताना महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत हे त्याच्या वाचनात आलं. तेही का? तर एक युरोपीयन छायाचित्रकार त्यावर माहितीपट करत होता आणि आशुतोष त्यावर संशोधन करत होता म्हणून. या गोर्या माणसाला एवढ्या आत विदर्भ, मराठवाड्यात जाऊन काम करावंसं वाटलं पण आपण इथलेच असून आपल्याला या वास्तवाची माहिती नाही हे बघून आशुतोष अस्वस्थ झाला. कोकणात त्याने हे कधीच ऐकलं नव्हतं. कदाचित म्हणूनच त्याला भारतात परतायची ओढ लागली आणि त्यानंतर चिपळूणमधल्या पुराच्या अनुभवाने त्याच्या विचारांना एक दिशा मिळाली. आशुतोषची या विषयाला धरूनच पहिली पदयात्रा सुरु झाली. अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर. १८०० किलोमीटर पदयात्रा!
या प्रवासात त्याने अनेक गावं ओलांडली. चालताना, आरामशीर गाडीच्या काचांमधून न दिसणारं एक भयंकर वास्तव त्याला अस्वस्थ करत होतं. ती होती माणसांच्या डोळ्यातली ‘हतबलता’. आभाळाकडे शून्य नजरेने डोळे लावून बसलेला शेतकरी, पाण्यासाठी मैलोनमैल उन्हात चालणार्या बाया, आणि तळाला गेलेल्या, कोरड्याठाक विहिरीत आशेने डोकावणारी पोरं! त्यांच्याकडे पाहून निसर्गाच्या या रौद्र रूपापुढे माणूस किती क्षुद्र आणि लाचार आहे याची जाणीवच त्याला हतबल करुन टाकायची. त्यांच्या कोरड्या पडलेल्या ओठांवर आणि भेगाळलेल्या टाचांवर मूक आक्रोश होता. ‘पाऊस पडेल का?’ या प्रश्नाचं उत्तर ना त्यांच्याकडे होतं, ना आशुतोषकडे. जा जरा पूर्वेकडे हे पुस्तक म्हणजे अशा अनुभवांची नोंद आणि पुढे आशुतोषकडून घडणार्या कामाची नांदी.
१८०० किलोमीटरच्या त्याच्या पदयात्रेबद्दल मी माझ्या ’अभिव्यक्ती’ युट्युब वाहिनीसाठी त्याची मुलाखत घेतली. त्यापूर्वीच ‘जा जरा पूर्वेकडे’ हा अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर पदयात्रेवरचा अनुवाद तयार होता पण त्याने तो प्रसिद्ध केला नव्हता. मूळ इंग्रजी पुस्तक Journey to the East हे मात्र तेव्हा उपलब्ध होतं.
मुलाखतीनंतर, त्यावेळी चालू असलेल्या त्याच्या रेवस ते रेड्डी कोकण पदयात्रेवरील इंग्रजी लेखांचे अनुवाद करशील का? असं त्याने मला विचारलं. त्याला फेसबुकसाठी हे लेख मराठीत करून पाहिजे होते. मराठी लेखांना भरघोस प्रतिसाद मिळाला.
एकीकडे मी रोज त्याच्या चालू असलेल्या रेवस ते रेड्डी कोकण पदयात्रेबरोबर मनाने प्रवास करत होते; दुसरीकडे त्याच्या १८०० किलोमीटर पदयात्रेत गुंतून गेले होते. वर्तमानातला त्याचा प्रवास अनुवादत असतानाच भूतकाळातला प्रवासही माझ्यासमोर उलगडत होता. गावं, माणसं, त्यांच्या अडचणी, निसर्गाशी त्यांचं नातं, बदलत जाणारं ग्रामीण जीवन या सगळ्यातून आशुतोष स्वतःलाच विचारत असलेले प्रश्न आणि त्याच्यासमोर आलेले प्रश्न विचारांना चालना देणारे आहेत.
“तुम्हाला विकास नको आहे का?” कोकण किनारपट्टीवर पायी चालताना आशुतोषला हा प्रश्न अनेकदा ऐकायला मिळाला. गावात रोजगार नाही, मुलांना काम नाही, आजारपण आलं की शहर गाठावं लागतं, शेतीतून पुरेसं उत्पन्न नाही. मग एखादा कारखाना आला, नोकर्या मिळाल्या तर त्याला विरोध का करायचा?
ह्या प्रश्नांभोवती फिरणारी भव्या नावाच्या वृद्धाची गोष्ट. आयुष्यभराची गरिबी, घराची आणि शेतीची झालेली वाताहत, कुटुंबातलं आजारपण आणि गावात वैद्यकीय सुविधांचा अभाव, या सगळ्याचा सामना त्याने केला होता. त्यामुळे उद्योग आला, रोजगार मिळाला, रस्ते झाले तर तो विकासच, असं त्याला वाटत होतं. आशुतोषने त्याचं म्हणणं मन लावून ऐकलं. त्याला विकास नको आहे असं नव्हतं. उलट गावात रोजगार निर्माण व्हावा, मुलांना शिक्षण आणि संधी मिळाव्यात, लोकांचं जीवनमान सुधारावं, हेच त्यालाही हवं होतं. पण त्याचा प्रश्न वेगळा होता.
विकास झाला, पण त्याची किंमत कोण मोजतं आहे? कोकणात चालताना त्याला या प्रश्नाची अनेक उत्तरं मिळत गेली. कुठे शेतजमीन विकली गेली होती, कुठे जुन्या घरांच्या जागी मोठमोठे बंगले आणि रिसॉर्ट्स उभे राहिले होते, मोकळ्या जागा, खारफुटी, क्रीडांगणं आणि मासे वाळवण्याच्या जागा नष्ट झाल्या होत्या. कालपर्यंत स्वतःच्या जमिनीत शेती करणारा माणूस आज त्याच भागात उभ्या राहिलेल्या प्रकल्पात मजूर म्हणून काम करत होता.
एका ठिकाणी आशुतोषला भेटलेलं वृद्ध दाम्पत्य आपल्यालाही अस्वस्थ करून जातं. रस्त्याच्या कडेला मिळणारं लाकूड गोळा करून त्यातून दिवसाला सत्तर-ऐंशी रुपये कमावणं, एवढाच त्यांच्या जगण्याचा आधार होता. मोठ्या प्रकल्पांच्या, विकासाच्या आणि गुंतवणुकीच्या चर्चेला त्यांच्या आयुष्यात जागाच नव्हती. हातावर पोट असणारी ही माणसं.
ह्या प्रवासात आशुतोषला परिस्थितीला कसंबसं तोंड देणार्या व्यक्ती भेटल्या तसंच आयुष्याला वेगळं वळण देऊ पाहणार्याही. शहरात भरपूर राबायचं, कसेबसे दिवस रेटायचे आणि तुलनेने हातात उरायचं काहीच नाही. गावात परतल्यावरही तसा पैसा कमी मिळाला तरी आपल्या माणसांमध्ये राहण्याचं, समाधानाने जगण्याचं सुख अनुभवता येतं हे समजलेला तरुण.
म्हणजे प्रगतीची व्याख्या कुठे चुकली? पैसा आला म्हणजे जीवनमान सुधारलं, असं आपण सहज मानतो. पण मानसिक समाधान, मोकळा वेळ, कुटुंब, समाज आणि निसर्गाशी असलेलं नातं ह्याचा आपण विचारच करत नाही. पण गावात राहायचं असेल तर रोजगाराचं काय? हा मुद्दा आहेच. गावात शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील हेही खरंच.
एका गावात शेतकर्याशी बोलताना आशुतोषसमोर पुन्हा तोच प्रश्न आला. रासायनिक कारखाना आला तर नोकर्या मिळतील, म्हणून तो त्याबाजूने होता. आशुतोषने त्याला विरोध केला नाही. “रोजगार हवा आहेच,” हे त्याने मान्य केलं. पण त्या शेतकर्यालाच विचारलं, “रासायनिक घटकांचा शरीरावर विपरीत परिणाम करणारा, आजार निर्माण करणारा कारखाना हाच रोजगाराचा एकमेव मार्ग आहे का? आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या साधनांवर, उत्पादनांवर आणि कौशल्यांवर आधारित रोजगार निर्माण करण्याचा विचार करता येणार नाही का?” मोठा कारखाना म्हणजेच रोजगार, ही कल्पना आपण इतकी घट्ट धरून बसलो आहोत की छोटे उद्योगही मोठा बदल घडवू शकतात, हे विसरतो.
विकास म्हणजे जुनं नाकारून नव्याचा अवलंब नाही. जुन्या नव्याचा संगम साधणं म्हणजेही विकासच आहे. आशुतोषला भेटलेले जाधव आजोबा याचं उत्तम उदाहरण. खाडी, खारफुटी, झाडं, पाण्याचे बांध, जुन्या शेतीच्या पद्धती, कोणत्या जमिनीत काय पिकतं, पाणी कुठे अडवायचं, निसर्गातला बदल कसा ओळखायचा, याबद्दल ते इतक्या सहजपणे सांगतात की अनुभवाचं विद्यापीठ आपल्यासमोर उभं ठाकतं. पर्यटनाचंही तसंच. कोकणाकडे समुद्र आहे, सह्याद्री आहे, खाड्या आहेत, धबधबे आहेत, किल्ले, लेणी, मंदिरे, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि गावचं साधं जीवन आहे. मग पर्यटनासाठी गावाचा चेहरामोहरा बदलून मोठमोठे रिसॉर्ट्स उभे करण्यापेक्षा गावाचं अस्सलपणच पर्यटनाची ताकद करता येणार नाही का? पण पर्यटनाच्या नावाखाली निसर्गच नष्ट झाला तर? जे सध्या सगळीकडे आपण पाहतो. फोटो आणि चित्रीकरणासाठी वाढणारी गर्दी, reels करण्याचा हव्यास, प्लॅस्टिक, आवाज, ड्रोन, रस्त्यांचा विस्तार यामुळे अधिवासावर परिणाम होतो हे कोणी लक्षातच घेत नाही.
कोकणाला विकास नको असं नाही; पण विकासासाठी जमीन, जंगल, नदी, समुद्र आणि गावच गमवावं लागणार असेल तर थोडं थांबून स्वत:लाच विचारायला हवं. विकास हवा, पण कसा? मोठ्या प्रकल्पातून हजार नोकर्या मिळणं हा विकासाचा एक मार्ग आहे. पण हजार गावांमध्ये छोट्या छोट्या संधी निर्माण होऊन हजारो कुटुंबांना आपल्या गावातच सन्मानाने जगता आलं, तर तो विकास कमी महत्त्वाचा आहे का?
विकास करताना माणूस आणि निसर्ग दोघांनाही बरोबरीने चालता येईल का ह्याचं प्रत्ययकारी दर्शन आशुतोषच्या कामातून होतं. दोन पदयात्रांमधून जवळजवळ ३००० किलोमीटर पायी चालत आशुतोषने भारत पाहिला, ग्रामीण जीवन, त्यांचा रोजचा संघर्ष पाहिला आणि त्यातूनच आता कायमचं नरवणला परतून नरवण गावात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा ध्यास त्याने घेतलेला आहे. एका गावाचं पाऊल आशुतोषमुळे अर्थपूर्ण विकासाच्या वाटेवर पडलं आहे.


GIPHY App Key not set. Please check settings