in

पुस्तक परीक्षण – हजरत मुहंमद पैगंबर ( स.अ. ) यांचे चरित्र व कार्य

 पुस्तक परीक्षण



पुस्तकाचे नांव – हजरत मुहंमद पैगंबर ( स.अ. ) यांचे चरित्र व कार्य

लेखिका- डॉ. सौ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी

मुखपृष्ठ व आक्षरजुळणी – सौ. हिना मोहसीन तांबोळी 

प्रकाशक – शॉपिझेन

पृष्ठे -१२२   मूल्य – १५० रू.

प्रकाशन दिनांक – २६ जून २०२६

पुस्तक परिक्षण- यास्मिन नौशाद शिकलगार


‘ हजरत मुहंमद  पैगंबर ( स.अ. ) यांचे चरित्र व कार्य ‘  हे पुस्तक माझ्या वाचनात आले. हे पुस्तक वाचतांना  पुस्तक संपेपर्यंत बाजूला करावे असे वाटले नाही. हजरत मुहंमद पैगंबर ( स. अ. ) यांच्या कार्याचे अनेक पैलू लेखिकेने छोट्या छोट्या प्रसंगातून घटनांमधून अतिशय सोप्या भाषेत मोठ्या  खुबीने वाचकांसमोर मांडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे.


       अशा थोर विभूतींच्या चरित्रे विद्यार्थ्यांनी का वाचली पाहिजेत याविषयी थोडसं विवेचन करते. पूर्वी ‘ थोरांची ओळख ‘ नावाचे पुस्तक इयत्ता तिसरीसाठी अभ्यासक्रमात होते. त्यामध्ये नरसी मेहता, दादाभाई नौरोजी, येशू ख्रिस्त, हजरत मुहंमद पैगंबर ( स. अ. ), भगवान महावीर, गौतम बुद्ध, गुरू नानक, महात्मा गांधीजी,पंडीत नेहरु इ. थोर विभूतींच्या कार्याची माहिती शालेय विद्यार्थ्यांना होत होती. सद्या ते पुस्तक अभ्यासक्रमात नाही त्यामुळे थोरांची ओळख संवेदनशील वयात विद्यार्थ्यांना होत नाही. त्याचा परिणाम कसा होतो पहा. एके ठिकाणी महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटो शेजारी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा फोटो ठेवला होता. दहावीतील एका विद्यार्थ्यांने विचारले ,” हा कुणाचा फोटो ?” 


       ही घटना शिक्षणप्रेमी व्यक्तीला विचार करायला लावणारी आहे. विद्यार्थ्यांसमोर थोरांच्या चरित्रांची पुस्तके ठेवणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून लेखिकेने हा लेखन प्रपंच केला आहे. एके ठिकाणी म्हटले आहे…..

थोर महात्मे होऊन गेले,

चरित्र त्यांचे पहा जरा ।

आपण त्यांच्या समान व्हावे,

हा सापडे बोध खरा ।

या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्यात हे पुस्तक शंभर टक्के यशस्वी झाले आहे असे मला वाटते.


      या पुस्तकाच्या प्रस्तावनेत  लेखिकेने म्हटले आहे की, हजरत मुहंमद पैगंबर ( स.अ.) यांचे जीवन मानवजातीच्या दृष्टीने अतिशय मोलाचे आहे. त्यांच्या जीवित कार्याचे व संदेशाचे खरेखुरे महत्त्व तर आपल्या देशात भावनात्मक ऐक्य निर्माण होण्याच्या प्रक्रियेस मोठी मदत होईल.


       लेखिकेने हे पुस्तक मराठीत लिहिले आहे. त्यामुळे ते मराठी वाचकांना वाचता येईल आणि या वाचनामुळे अनेक हिंदू बंधू भगिनींना पैगंबरसाहेबांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू व इस्लाम धर्माचे आकलन अधिक चांगल्या रीतीने होईल व हिंदू मुस्लिम ऐक्य निश्चितच निर्माण होईल असे वाटते. कारण हिंदू आणि मुसलमान हजारो वर्षांपासून एकत्र रहात आहेत. तथापि एकमेकांच्या थोर पुरूषांविषयी आणि धर्मग्रंथांविषयी एकमेकांना पुरेशी माहिती नसते. ती असणे ही काळाची गरज आहे. कारण एकत्र नांदून विविधतेत एकता आपल्याला निर्माण करायची आहे।


       पैगंबरसाहेबांच्या बालपणाविषयी लिहिताना लेखिका म्हणतात  मोठेपणी  सर्व अनाथांचे मायबाप झालेले पैगंबरसाहेब जन्मतःच वडिलांच्या छत्राला मुकले होते. त्यांची माताही ते सहा वर्षाचे असताना मयत झाली. त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजोबांनी व चुलत्यानी केले. इस्लाम धर्माची स्थापना करतांना त्यांना अनेक दिव्यातून जावे लागले पण त्यांनी कधी शांत वृत्ती सोडली नाही. त्यांना दगड मारण्यात आले. गटारीतील पाणी त्यांच्या अंगावर टाकण्यात आले पण त्यांनी कधी आपल्या मनाचा संताप होऊ दिला नाही.


        पैगंबरसाहेबांनी श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले. त्यांच्या लाडक्या लेकीला फातिमाला घरचे दळण कांडण व स्वयंपाक करावा लागे. पैगंबरसाहेब मदिनेचे सर्वाधिकारी झाल्यानंतरही त्यांनी तिला मदतनीस दिली नाही. ते म्हणत, “हलक्या  किंवा मोठ्या कामावरून मनुष्याचा दर्जा ठरत नाही, तर तो त्याच्या सदाचारी वृत्तीवरुन ठरत असतो.” पैगंबरसाहेबांनी शत्रूवरही प्रेम करण्याची शिकवण दिली आहे. त्यांच्या वचनबद्धतेची व  दानशूरपणाची अनेक उदाहरणे लेखिकेने या पुस्तकात नमूद केली आहेत. ते न्यायाला ईश्वर मानीत. न्यायरूपी तराजूंच्या पारड्याचा समतोल  त्यांनी कधी ढळू दिला नाही. इस्लामच्या पाच स्तंभाविषयी सविस्तर वर्णन लेखिकेने मांडले आहे त्यामुळे हिंदू बांधवाना इस्लाम धर्माची ओळख सहजपणे होते. पैगंबरसाहेबांनी लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली. समता व समानता हा इस्लामचा आत्मा आहे असे ते म्हणत.


      पैगंबरसाहेबांना खदिजाबी या पत्नीची इस्लाम धर्मस्थापनेत भक्कम साथ मिळाली. खदिजाबी त्यांच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठ्या होत्या, शिवाय विधवा होत्या. तेंव्हा अरबस्थानात  बहुपत्नीत्वाची पद्धत होती तरीसुद्धा पैगंबरसाहेबांनी लग्नानंतर पंचवीस वर्षे तिच्या निधनापर्यंत एकपत्नी व्रताचे पालन केले. त्यांनी स्त्रियांना सन्मान दिला. ते मानवसेवा हीच अल्लाहसेवा मानीत. पैगंबरसाहेबांना अंधश्रद्धा अमान्य होती.


       हजरत मुहंमद पैगंबर ( स.अ. ) यांच्याविषयीचे थोर तत्ववेत्यांचे विचार लेखिकेने मांडले आहेत. हे पुस्तक वाचत असताना ‘सल्लल्लाहु अलैहिवस्सलम’ याचा अर्थ  मराठीत समजला. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाच्या कोणत्याही पानावरून वाचायला सुरुवात केली तरी पैगंबरसाहेबांच्या उतुंग व्यक्तिमत्वाचे पैलू सहजपणे समजून येतात. पुस्तकाच्या प्रत्येक पानांवर लेखिकेच्या मुद्देसूद लेखनशैलीचा प्रत्यय येतो. लेखिकेने प्राथमिक शिक्षिका या पदावर अडतीस वर्षे सेवा केली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमके काय वाचायला द्यावे हे प्रदीर्घ अनुभवावरून लेखिकेने जाणल्यामुळे एवढे कसदार लेखन त्यांच्या हातून झाले आहे, असे मला वाटते.

 

      सहज, सोप्या भाषेत लिहिलेले हजरत मुहंमद पैगंबर ( स. अ. ) या  महान, शांतिप्रिय , दयेच्या सागराबद्दल लिहिलेले  हे पुस्तक विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांनी वाचलेच पाहिजे असे आहे. हीच त्यांच्या चरणी एक अपूर्व इबादत म्हणजेच भक्ती ठरेल.

लेखिकेला पुढील लेखन कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा ।

📗पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Read More 

What do you think?

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

फ्रेडरिक डग्लस : अक्षरांच्या प्रकाशातून स्वातंत्र्याच्या क्षितिजापर्यंत

सोळावा लुई- एका राजेशाहीच्या अस्ताची कथा!