in

फ्रेडरिक डग्लस : अक्षरांच्या प्रकाशातून स्वातंत्र्याच्या क्षितिजापर्यंत

अमेरिकेच्या इतिहासात काही माणसे अशी आहेत की त्यांच्या आयुष्याकडे पाहताना एखाद्या व्यक्तीची चरित्रकथा वाचत आहोत की एका समाजाच्या दीर्घ संघर्षाचा इतिहास, हेच उमगत नाही. फ्रेडरिक डग्लस हे असेच एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. गुलाम म्हणून जन्मलेला, स्वतःच्या जन्मतारखेचीही खात्री नसलेला हा मुलगा पुढे लेखक, पत्रकार, वक्ता, संपादक, समाजसुधारक, स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कर्ता, कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्कांचा लढवय्या आणि अमेरिकेच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचा आवाज बनला. त्याच्या हातात सुरुवातीला बेड्या होत्या; नंतर त्याच हातात लेखणी आली. गुलाम म्हणून ज्याला स्वतःच्या जीवनावर अधिकार नव्हता, त्याने पुढे स्वतःच्या शब्दांनी अमेरिकेच्या लोकशाहीला तिच्याच अंतरात्म्याचा आरसा दाखवला.

फ्रेडरिक डग्लस यांचा जन्म मेरीलँडच्या टॅलबॉट काउंटीतील टकाहो परिसरात 1818 मध्ये झाला. फ्रेडरिक ऑगस्टस वॉशिंग्टन बेली हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांच्या जन्माची अचूक जन्मतारीख त्यांनाही माहीत नव्हती; पुढे जाऊन 14 फेब्रुवारी हा दिवस आपला जन्मदिवस म्हणून निश्चित केला! आजघडीला बहुतांश ऐतिहासिक नोंदीमध्ये 1818 हेच त्यांचे जन्मवर्ष मानले गेलेय. त्यांच्या आई हॅरिएट बेली या गुलाम होत्या आणि वडील कोण होते याबद्दल डग्लस यांनी स्वतःच्या आत्मचरित्रांत ठाम माहिती दिलेली नाही; मात्र त्यांच्या वडिलांबद्दल गोऱ्या मालकाशी संबंधित असण्याची शक्यता त्यांनी नोंदवलीय. गुलामांच्या कुटुंबव्यवस्थेला गुलाममालकांची सत्ता कशी मोडून काढत असे, याचे पहिले दर्शन त्यांना स्वतःच्या बालपणातच झाले. आईपासून त्यांना जवळजवळ दूरच ठेवण्यात आले; त्यांच्या आईला ते आयुष्यात फारच थोड्या वेळा भेटले. त्यांचे बालपण मुख्यतः आजी बेट्सी बेली यांच्या झोपडीभोवती आणि नंतर मालकांच्या इस्टेटवर गेले.

गुलामगिरीची क्रूरता केवळ चाबकाच्या फटक्यांत नसते हे त्यांनी अतिशय टोकदारपणे अनुभवले; माणसाला स्वतःच्या जीवनाची कथा सांगण्याचा अधिकार नाकारणे ही गुलामगिरीची सर्वोच्च हिंसा असते असं डग्लसनी म्हटलंय. बालपणात याची अनुभूती त्यांनी नित्य घेतली. गुलाम मुलाला शाळेत जायला अनुमती नव्हती, त्याच्यासाठी पुस्तके नव्हती, त्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता. पण नियतीने फ्रेडरिकला एका विलक्षण वळणावर आणून उभे केले, आणि ते म्हणजे बाल्टिमोर.

1826 मध्ये, साधारण आठ वर्षांचे असताना, फ्रेडरिक यांना बाल्टिमोरमधील ह्यू आणि सोफिया ऑल्ड यांच्या घरी पाठवण्यात आले. तेथे त्यांना ह्यू ऑल्ड यांच्या लहान मुलाची देखभाल करण्याचे काम करायचे होते. त्यांना बाल्टिमोरला का पाठवण्यात आले, याची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. हा प्रवास शिक्षणासाठी किंवा कुटुंबाच्या इच्छेने झालेला नव्हता; मुळात गुलामांचा प्रवास त्यांच्या मर्जीने कधीच होत नसे! फ्रेडरिकला त्याच्या मालकाच्या नातेवाईकांच्या घरी कौटुंबिक सेवेसाठी पाठवण्यात आले होते. ह्यू ऑल्ड हे त्यांच्या मालकाच्या कुटुंबाशी संबंधित होते आणि फेल्स पॉइंट या जहाजबांधणीच्या परिसराशी त्यांचा संबंध होता. त्यामुळे ग्रामीण गुलामशेतीच्या जगातून शहरातील वेगळ्या वातावरणात प्रवेश करण्याची संधी डग्लसना मिळाली.

ह्याच बाल्टिमोरमध्ये त्यांच्या आयुष्याचा सर्वांत निर्णायक अध्याय सुरू झाला. ह्यू ऑल्ड यांची पत्नी सोफिया ऑल्ड यांनी सुरुवातीला डग्लस यांना वर्णमालेची अक्षरे शिकवली. तीन-चार अक्षरी शब्द वाचण्यापर्यंत त्यांना मदत केली. त्या वेळी सोफिया यांना गुलामाला शिक्षण देणे किती धोकादायक आणि कायद्याच्या विरोधात आहे, याची पूर्ण जाणीव नव्हती. ह्यू ऑल्ड यांना हे कळताच त्यांनी तिला ताबडतोब थांबवले. गुलाम वाचायला शिकला तर तो गुलाम राहणार नाही, असे ठणकावून सांगितले. ज्ञान आणि स्वातंत्र्य यांच्यातील हे नाते डग्लस यांच्या मनात याच प्रसंगातून घट्ट बसले. त्यांनी नंतर लिहिलेय की, ह्यू ऑल्ड यांनी शिक्षणाविरुद्ध केलेला युक्तिवाद त्यांच्या मनात शिक्षणाची इच्छा अधिकच तीव्र करून गेला.

इथे सोफिया ऑल्ड आणि फ्रेडरिक डग्लस यांच्या आयुष्यांची तुलना विलक्षण अर्थपूर्ण ठरते. सोफिया एका गुलामाला माणूस म्हणून पाहण्याची सुरुवातीची क्षमता बाळगून होती; पण ती क्षमता गुलामगिरीच्या सामाजिक-सत्तात्मक रचनेने हळूहळू कुंठित केली. डग्लस यांनी स्वतःच्या लेखनात, तिच्या परिवर्तनाचे अत्यंत तीक्ष्ण चित्रण केले आहे. सुरुवातीला मृदू असलेली स्त्री गुलाममालकीच्या सवयीने कठोर होत गेली, असे त्यांनी दाखवले. म्हणून सोफिया ऑल्ड यांची कथा केवळ, ‘दयाळू स्त्रीने डग्लसला अक्षरओळख करून दिली’ एवढी साधीसरळ नाही. गुलामगिरीच्या नैतिक विडंबनेचे ती जिवंत उदाहरण ठरते, ज्या व्यवस्थेत दयाभावालाही स्वामित्वाच्या हक्कापुढे शरण जावे लागते. डग्लस यांनी त्यांच्याविषयी आयुष्यभर भावनिक गुंतागुंत जपली; मात्र पुढील काळात त्यांच्यात पूर्वीसारखी आत्मीयता कायम राहिली, असे सरसकट म्हणणे अचूक ठरणार नाही.

सोफियाने शिकवणे थांबवले, पण फ्रेडरिकची अक्षरांशी मैत्री थांबली नाही. त्यांनी बाल्टिमोरच्या रस्त्यांना आपली शाळा बनवले. गरीब श्वेत मुलांना भाकरी देऊन त्यांच्याकडून वाचनाचे धडे घेतले, नजरेस पडणारी प्रत्येक अक्षरे टिपून घेतली, जहाजांवरील शब्द आणि सांकेतिक अंक, खुणा लक्षात ठेवल्या, भिंतीवर खडूने लिहिण्याचा सराव केला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना ‘द कोलंबियन ऑरेटर’ हे पुस्तक त्यांच्या हाती पडले. भाषणे, वादविवाद आणि नैसर्गिक हक्कांवरील लिखाणाने भरलेले हे पुस्तक त्यांच्या वैचारिक आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरले. गुलामगिरीत जन्मलेल्या मुलाच्या हातात हे पुस्तक आले आणि त्याला प्रथमच शब्दांच्या मागे ‘स्वातंत्र्य’, ‘हक्क’, ‘मानव’ आणि ‘न्याय’ या संकल्पना दिसू लागल्या.

मात्र शिक्षणाची ही तहान गुलामगिरीला सहन होणारी नव्हती. 1833 मध्ये फ्रेडरिक यांना पुन्हा पूर्व मेरीलँडमध्ये, थॉमस ऑल्ड यांच्या ताब्यात पाठवण्यात आले. पुढील काळात त्यांना एडवर्ड कोव्ही ह्या, गुलामांचे खच्चीकरण करणाऱ्या कुप्रसिद्ध शेतकऱ्याकडे काम करावे लागले. सततच्या मारहाणीने आणि अमानुष श्रमाने त्यांचा आत्मविश्वास मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला. पण 1834 मध्ये एडवर्ड कोव्हीशी झालेल्या झटापटीत डग्लस यांनी प्रतिकार केला आणि त्यानंतर कोव्हीने त्यांना पुन्हा चाबकाने मारण्याचे धाडस केले नाही. या प्रसंगाचा अर्थ त्यांच्या आत्मकथेत फार मोठा आहे. गुलामगिरीच्या चाबकाच्या वादीवर पहिल्यांदाच एखाद्या मनुष्याद्वारे प्रतिकाराची खूण उमटवली होती.

1836 मध्ये त्यांनी सहकाऱ्यांसह पलायनाचा प्रयत्न केला; तो उधळला गेला आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. मात्र या अपयशानंतर त्यांना पुन्हा बाल्टिमोरला पाठवण्यात आले. तेथे त्यांनी जहाजबांधणीशी संबंधित काम शिकण्यास सुरुवात केली. या काळात त्यांची भेट अॅना मरे या मुक्त कृष्णवर्णीय तरुणीशी झाली. अॅना मरेने त्यांच्या स्वातंत्र्याच्या प्रयत्नात अत्यंत महत्त्वाची साथ दिली. 3 सप्टेंबर 1838 रोजी डग्लस यांनी खलाशाचा वेश धारण करून रेल्वेने उत्तर दिशेला पलायन केले. चोवीस तासांच्या आत ते न्यूयॉर्कमध्ये पोहोचले. जगाने त्यांची ओळख गुलाम म्हणून निश्चित केली होती मात्र त्या पलायनाच्या त्या क्षणापासून त्यांनी स्वतःच्या नावाचा आणि आयुष्याचा अधिकार परत मिळवण्याची जिद्द बाळगली.

पलायनानंतर न्यू बेडफर्ड येथे अॅना मरेशी त्यांचा विवाह झाला. फ्रेडरिक डग्लस यांच्या चरित्रात त्यांच्या प्रखर सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाच्या सावलीत अॅनाचे योगदान अनेकदा हरवून जाते. अॅना मुक्त विचारांची कृष्णवर्णीय स्त्री होती; डग्लस सार्वजनिक जीवनात व्यस्त असताना त्यांच्या घराच्या देखभालीचे, मुलांच्या संगोपनाचे आणि सततच्या प्रवासाचे ओझे तिने वाहिले. या दांपत्याला रोझेटा, लुईस, फ्रेडरिक ज्युनियर, चार्ल्स रेमंड आणि अॅनी अशी पाच मुले झाली; त्यांची मुलगी अॅनी हिचे वयाच्या दहाव्या वर्षी निधन झाले. त्याचा त्यांना विलक्षण धक्का बसला. डग्लस यांच्या पुढील सार्वजनिक आणि पत्रकारितेच्या कामात त्यांच्या मुलांनीही सहभाग घेतला.

1841 मध्ये डग्लस यांना मॅसॅच्युसेट्स अँटी-स्लेव्हरी सोसायटीच्या वतीने व्याख्याने देण्याची संधी मिळाली. त्यांच्या आवाजात गुलामगिरीच्या वेदनांचा कारुण्यभाव होता; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे स्वतःच्या भीषण अनुभवांना सार्वजनिकरित्या नैतिक प्रश्नात रूपांतरित करण्याची विलक्षण क्षमता होती. सुरुवातीच्या काळात, काही श्रोत्यांना इतक्या प्रभावी भाषेत बोलणारा कृष्णवर्णीय माणूस पूर्वी गुलाम असू शकतो, यावरच विश्वास बसत नसे. त्यांच्या वाणीने त्यांच्या वर्णाविषयी लादलेल्या पूर्वग्रहांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी स्वतःला ‘अपवाद’ म्हणून सिद्ध करण्याऐवजी संपूर्ण गुलाम समाजाच्या माणूसपणाचा दावा केला.

याच अनुभवातून 1845 मध्ये ‘नॅरेटिव्ह ऑफ द लाइफ ऑफ फ्रेडरिक डग्लस, अॅन अमेरिकन स्लेव्ह, रायटन बाय हिमसेल्फ’ हे त्यांचे पहिले आणि सर्वाधिक प्रभावशाली आत्मचरित्र प्रकाशित झाले. हे पुस्तक केवळ आत्मकथन नव्हते; गुलामगिरीविरुद्ध साकारलेला तो एक जिवंत दस्तऐवज होता. विल्यम लॉयड गॅरिसन यांच्या प्रस्तावनेसह प्रकाशित झालेल्या या ग्रंथाने अमेरिकन साहित्याला नवा आवाज बहाल केला.

डग्लस यांच्या लेखनाचे सामर्थ्य त्याच्या अनुभवाच्या सत्यतेत होते. गुलामगिरीवर श्वेतवर्णियांनी लिहिलेल्या सहानुभूतीपूर्ण पुस्तकापेक्षा स्वतः गुलाम राहिलेल्या व्यक्तीने स्वतःची कथा सांगणे, हा मूलभूत राजकीय विद्रोह त्यांनी केला होता. ‘गुलामाला बुद्धी नसते’, ‘गुलामाला स्वातंत्र्याची कल्पना नसते’, ‘गुलामगिरी ही गुलामांच्या हिताची आहे’ हे त्या काळचे वांशिक पूर्वग्रह होते; त्यांच्या आत्मचरित्राने त्यावर थेट प्रहार केला. म्हणूनच ह्या पुस्तकाची दखल साहित्य म्हणून जशी घेतली जाते तसेच राजकीय दस्तऐवज म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. पुस्तकाच्या यशामुळे डग्लस यांना पुन्हा जेरबंद केले जाण्याचा धोका वाढला; परिणामी 1845 मध्ये ते ब्रिटन व आयर्लंडला गेले. ब्रिटनमधील समर्थकांनी पुढे त्यांची कायदेशीर मुक्तता मिळवण्यासाठी पैसे उभे केले; 1846 मध्ये त्यांना औपचारिकरीत्या मुक्त करण्यात आले.

परदेशातून परतल्यानंतर डग्लस यांनी आपला आवाज बुलंद केला. 1847 मध्ये रोचेस्टर, न्यूयॉर्क येथे त्यांनी *द नॉर्थ स्टार* हे वृत्तपत्र सुरू केले. ‘Right is of no Sex : Truth is of no Color, God is the Father of us all, and all we are Brethren’ हे त्याचे घोषवाक्य होते. पत्रकारिता त्यांच्यासाठी केवळ बातम्यांचे माध्यम नव्हते; गुलामांच्या आवाजाला सार्वजनिक क्षेत्रात स्थान मिळवून देण्याची ती अक्षर शस्त्रसज्जता होती. पुढे त्यांनी ‘फ्रेडरिक डग्लस’ पेपर’, ‘डग्लस’ मंथली’ आणि ‘द न्यू नॅशनल एरा’ यांसारख्या प्रकाशनांतून आपला वैचारिक प्रभाव विस्तारला.

याच काळात त्यांचे विचारही विकसित होत गेले. सुरुवातीला विल्यम लॉयड गॅरिसनच्या गुलामगिरीविरोधी चळवळीशी त्यांची जवळीक होती; पण पुढे अमेरिकेच्या संविधानाबाबत त्यांची भूमिका गॅरिसनपेक्षा वेगळी झाली. 1851 मध्ये त्यांनी संविधानाचा अर्थ गुलामगिरीच्या बाजूने नसून तिच्या विरोधात वापरता येऊ शकतो, असा आग्रह धरला. हा मतभेद केवळ वैयक्तिक नव्हता; तो डग्लस यांच्या राजकीय परिपक्वतेचा टप्पा होता. त्यांनी चळवळीत काम करताना सोबतच्या एखाद्या नेत्याचे अनुकरण करण्याऐवजी, स्वतःची राजकीय बुद्धी वापरण्यास सुरुवात केली.

1852 मध्ये हॅरिएट बीचर स्टो यांचे ‘अंकल टॉम्स कॅबिन’, प्रसिद्ध झाले. 1855 मध्ये डग्लस यांचे दुसरे आत्मचरित्र ‘माय बाँडेज अँड माय फ्रीडम’ प्रकाशित झाले. त्याच काळात वॉल्ट व्हिटमन यांनी ‘लीव्ह्ज ऑफ ग्रास’चे लेखन करुन अमेरिकन कवितेच्या रूढ चौकटी मोडीत काढल्या होत्या. राल्फ वॉल्डो एमर्सनचा ट्रान्सेंडेन्टलिझम, हेन्री डेव्हिड थोरोचे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि नागरी अवज्ञेचे विचार, हॅरिएट बीचर स्टो यांचे गुलामगिरीविरोधी कथालेखन आणि कृष्णवर्णीय लेखकांच्या गुलाम-कथनांची परंपरा; ह्या सर्वांच्या संगमात डग्लस यांचे लेखन उभे राहते. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्यपूर्ण बाजू अशी की, त्यांनी गुलामगिरीचा अनुभव केवळ करुणेच्या भाषेत मांडला नाही; त्यांनी तो बुद्धी, नैतिकता, राजकारण आणि स्वाभिमान यांच्या भाषेत मांडला.

स्त्रियांच्या हक्कांबाबतही त्यांची भूमिका त्या काळाच्या मानाने पुढारलेली होती. 1848 मध्ये सेनिका फॉल्स येथे झालेल्या पहिल्या महिला हक्क अधिवेशनाला ते उपस्थित राहिले आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा, या मागणीला पाठिंबा दिला. गुलामगिरीविरोधी लढा आणि स्त्रीस्वातंत्र्याचा लढा हे दोन स्वतंत्र प्रश्न नसून समान मानवी हक्कांच्या संघर्षाचे भाग आहेत, अशी त्यांची भूमिका होती. पुढील आयुष्यातही ते स्त्री-पुरुष समानतेच्या बाजूने राहिले.

1859 मध्ये जॉन ब्राउनने, हार्पर्स फेरी येथील शस्त्रागारावर हल्ला केला. गुलामांचा उठाव घडवून आणण्याचा ब्राउनचा प्रयत्न अयशस्वी ठरला. डग्लस यांचे ब्राउनशी संबंध होते; त्यांच्यावरील संभाव्य कारवाईच्या भीतीने डग्लस कॅनडा आणि नंतर ब्रिटनकडे गेले. हा प्रसंग त्यांच्या राजकीय विचारातील आणखी एका गुंतागुंतीचा दाखला आहे. अहिंसक चळवळीच्या सार्वजनिक राजकारणाशी बांधील राहूनही गुलामगिरीसारख्या हिंसक व्यवस्थेविरुद्ध सशस्त्र प्रतिकाराची अपरिहार्यता आणि नैतिकता त्यांना समजत होती.

गृहयुद्ध सुरू झाले तेव्हा डग्लस यांचा आवाज आणखी बुलंद झाला. कृष्णवर्णीय सैनिकांना संघराज्याच्या सैन्यात भरती करून घेण्याची त्यांनी मागणी केली. मॅसॅच्युसेट्सच्या चोपन्नाव्या कृष्णवर्णीय रेजिमेंटसाठी त्यांनी भरती मोहिमेत काम केले. राष्ट्रासाठी रक्त सांडणाऱ्या कृष्णवर्णीय सैनिकांना राष्ट्राच्या नागरिकत्वापासून वंचित ठेवता येणार नाही, हा त्यांच्या विचाराचा गाभा होता. गुलामगिरीच्या समाप्तीनंतरही त्यांचा संघर्ष संपला नाही; कारण त्यांच्या दृष्टीने मुक्ती म्हणजे केवळ बेड्या तुटणे नव्हते. मुक्ती म्हणजे मतदानाचा अधिकार, शिक्षण, नागरी समानता, रोजगार आणि प्रतिष्ठेची संपूर्ण पुनर्स्थापना होती असे ते म्हणत असत.

गृहयुद्धानंतरच्या पुनर्बांधणीच्या काळात त्यांचे सार्वजनिक जीवन अधिक व्यापक झाले. त्यांनी कृष्णवर्णियांच्या मतदानाच्या अधिकारासाठी, नागरी हक्कांसाठी आणि वांशिक हिंसेविरुद्ध सातत्याने आवाज उठवला. त्यांची राजकीय भूमिका आता गुलामगिरीच्या अंतापलीकडे गेली होती. अमेरिकेने गुलामगिरी नष्ट केली असली तरी वंशभेदाची मानसिकता, कायदेशीर असमानता आणि सामाजिक हिंसा कायम होती. म्हणूनच डग्लस यांच्या उत्तरायुष्यातील भाषणे आणि लेखन हे मुक्तीनंतरच्या अपूर्ण स्वातंत्र्याचे दस्तऐवज बनले.

त्यांच्या सार्वजनिक कारकीर्दीत सरकारी जबाबदाऱ्याही आल्या. 1877 मध्ये ते डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाचे यू.एस. मार्शल झाले; 1881 मध्ये ते डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाचे रेकॉर्डर ऑफ डीड्स झाले. 1889 मध्ये हैती ह्या बेटवजा देशासाठी मंत्री आणि कॉन्सुल जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. म्हणजेच ज्या व्यक्तीला तरुणपणी कायद्याच्या दृष्टीने मनुष्य म्हणून पूर्ण मान्यता नव्हती, तोच पुढे अमेरिकन सरकारचा अधिकृत प्रतिनिधी बनला! इतिहासातील हा विरोधाभास त्यांच्या जीवनकथेचे विलक्षण सौंदर्य आणि अमेरिकन लोकशाहीच्या संघर्षमय प्रवासाचे प्रतीक आहे.

फ्रेडरिक डग्लस यांच्या कौटुंबिक जीवनाकडे पाहिले तर त्यांच्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वामागील दुसरीच दुनिया दिसते. अॅना मरे डग्लस चव्वेचाळीस वर्षे त्यांची सहचारिणी होती. तिने त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा भार कौटुंबिक पातळीवर उचलला, परंतु त्यांच्या आत्मचरित्रांत तिचा उल्लेख तुलनेने कमी आहे. 1882 मध्ये अॅनाच्या निधनानंतर डग्लस खोल नैराश्यात गेले. 1884 मध्ये त्यांनी हेलन पिट्स या श्वेतवर्णीय स्त्रीशी विवाह केला. हा आंतरवर्णीय विवाह त्या काळी मोठ्या सामाजिक वादाचा विषय ठरला. हेलन त्यांच्या सचिव म्हणून काम करत होत्या आणि त्या डग्लसपेक्षा वयाने सुमारे वीस वर्षांनी लहान होत्या. या विवाहामुळे त्यांच्या कुटुंबात आणि सार्वजनिक जीवनातही प्रतिक्रिया उमटल्या; तरी दोघांनी आपला निर्णय कायम ठेवला. त्यांना अपत्य झाले नाही.

सोफिया ऑल्डच्या आयुष्याशी डग्लस यांच्या आयुष्याची तुलना इथे पुन्हा वेगळ्या अर्थाने उभी राहते. सोफिया एका गुलामाला अक्षर शिकवणारी स्त्री म्हणून इतिहासात येते; पण तिचे नंतरचे आयुष्य त्या कृतीच्या नैतिक धाडसापेक्षा गुलामगिरीच्या मानसिक संरचनेने बदलले. डग्लस मात्र त्या एका अक्षरापासून पुढे जात राहिले; अक्षरातून शब्द, शब्दातून विचार, विचारातून आत्मभान आणि आत्मभानातून सार्वजनिक प्रतिकार! सोफिया एका व्यवस्थेने बदलली; डग्लस यांनी त्या व्यवस्थेलाच बदलण्याचे आयुष्यभराचे ध्येय स्वीकारले. त्यामुळे या दोघांची कथा ही गुरु-शिष्याची साधी कथा नसून ज्ञान आणि सत्ता, दया आणि मालकी, मनुष्यत्व आणि गुलामगिरी यांच्यातील संघर्षाची कथा आहे ह्यावर अमेरिकन विचारवंतांचे एकमत झाले!

डग्लस यांनी आपल्या आयुष्याची कथा तीन वेळा लिहिली. 1845 चे ‘नॅरेटिव्ह ऑफ द लाइफ ऑफ फ्रेडरिक डग्लस’ हे आत्मचरित्र गुलामगिरीतून मुक्त झालेल्या तरुणाची टोकदार साक्ष आहे; 1855 चे ‘माय बाँडेज अँड माय फ्रीडम’ हे अधिक विस्तृत आणि वैचारिक आत्मकथन आहे; तर 1881 चे ‘द लाइफ अँड टाइम्स ऑफ फ्रेडरिक डग्लस’ हे दीर्घ सार्वजनिक जीवनाकडे मागे वळून पाहणाऱ्या ज्येष्ठ नेत्याचे आत्मपरीक्षण आहे. या तिन्ही ग्रंथांतून एकाच मनुष्याची तीन वेगवेगळी रूपे दिसतात : गुलाम, मुक्तीचा योद्धा आणि राष्ट्रजीवनात स्थान मिळवलेला महान नागरिक! हा अक्षरप्रवास अचंबित करणारा आहे!

20 फेब्रुवारी 1895 रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथे फ्रेडरिक डग्लस यांचे हृदयविकाराने अचानक निधन झाले. त्या दिवशी ते नॅशनल कौन्सिल ऑफ विमेनच्या बैठकीत बोलून परतले होते आणि पत्नी हेलनशी त्या कार्यक्रमाविषयी बोलत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही त्यांचे जग सार्वजनिक प्रश्नांपासून दूर गेले नव्हते ही गोष्ट विशेष आहे!

फ्रेडरिक डग्लस यांच्या जीवनाचा विचार करताना त्यांना केवळ ‘गुलामगिरीतून सुटलेला गुलाम’, म्हणून पाहणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कमी लेखण्यासारखे ठरेल. त्यांनी गुलामगिरीविरुद्ध लढा दिला, पण त्याचबरोबर कृष्णवर्णीय पत्रकारितेला बळ दिले, आत्मकथनाला राजकीय अस्त्र बनवले, स्त्रियांच्या मतदानाच्या हक्कासाठी उभे राहिले, कृष्णवर्णीय सैनिकांच्या भरतीसाठी प्रयत्न केले, कथित समानतेच्या पुनर्बांधणीच्या राजकारणात हस्तक्षेप केला आणि अमेरिकन लोकशाहीच्या अपूर्णतेवर सातत्याने बोट ठेवले. स्वतःविषयी लिहिण्याचा अधिकार त्यांनी प्रथम हिसकावून घेतला ही त्यांनी केलेली अस्सल क्रांती होती!

आणि म्हणूनच बाल्टिमोरच्या एका घरात उच्चारलेली काही अक्षरे त्यांच्या जीवनात इतकी मोठी ठरली आहेत. सोफिया ऑल्डने त्यांना ‘ए’, ‘बी’, ‘सी’ शिकवले; ह्यू ऑल्डने त्या अक्षरसज्जतेवर बंदी घातली; पण त्या निर्बंधानेच डग्लस यांच्या मनात अक्षरांची भूक पेटवली. पुढे त्यांनी शब्दांना आवाज दिला, आवाजाला विचार दिला आणि विचाराला चळवळीचे रूप दिले. गुलामगिरीने त्यांना मौन करायचा प्रयत्न केला; परंतु त्या मौनातून त्यांनी अशी काही ज्वालाग्राही भाषा निर्माण केली की, अमेरिकेला स्वतःच्या इतिहासाचे शब्द पुन्हा वाचावे लागले.

ज्या व्यक्तीला माणूस म्हणून वाचण्याचा अधिकार नाकारला गेला, त्यानेच अखेर संपूर्ण राष्ट्राला माणूसपणाचा धडा वाचून दाखवला, ही फ्रेडरिक डग्लस यांच्या जीवनाची हीच सर्वांत मोठी साहित्यिक, ऐतिहासिक विजयगाथा होय!

– समीर गायकवाड

२५/०८/२०२६. 

आजचा दिवस गुलाम व्यापार आणि त्याचे निर्मूलन स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. आपला विवेक कुणापुढेही गहाण टाकणार नाही याची ग्वाही देण्यासाठी फ्रेडरिकच्या स्मरणार्थ हा अक्षरप्रपंच!

Read More 

What do you think?

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

यू आर वेलकम, मि. चिप्स