in

श्री_महादबा_पाटील_महाराज_ह्यांचे_संक्षिप्त_चरित्र

.#श्री_महादबा_पाटील_महाराज_ह्यांचे_संक्षिप्त_चरित्र

:-

            श्री दत्त संप्रदायातील राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे गेल्यावर दत्त मंदिराच्या वरील बाजुस, देवस्थानाच्या भक्तनिवासाच्या अगदी जवळ आपल्याला एक भव्य असं मंदिर लागतं ते मंदीर म्हणजे श्रीमहादबा पाटील महाराजांचे समाधी मंदिर आहे.दत्तसंप्रदायातील प सिद्ध अवतारी सत्पुरुष म्हणजे श्री महादबा पाटील महाराज.
#जन्म_कथे_विषयी :- धुळगाव (सोनी) तालुका.तासगाव,जिल्हा सांगली या गावी श्री बाबगोंडा पाटील व सौ.बायाक्का माता या दत्तभक्त दांपत्यापोटी जन्मसिद्ध असलेल्या महादबा पाटील महाराजांनी अश्विन शुद्ध त्रयोदशी सोमवार दि.९ अॉक्टोबर १९१६ साली जन्म घेतला. महाराजांच्या घराण्याला पाटीलकी आधीपासुनच होती आणि त्यांचे संपूर्ण घराणे हे पूर्वापार दत्तभक्त होते.जणु दत्तभक्तांच्या या शुद्ध बिजापोटी महाराजांसारखे सिद्ध अवतारी महात्मे फलस्वरुप त्यांना प्राप्त झाले होते. महाराजांचे वडील श्री.बाबगोंडा पाटील हे अखंड ४० वर्षे प्रत्येक पौर्णिमेला श्रीक्षेत्र नृसिंहवाडीची पायी वारी करीत असत. या सेवेचा परिपाकच जणु महाराजांसारखे सिद्ध त्यांना पुत्ररुपाने प्राप्त झाले. पुढे श्रीमहादबा महाराजांनी सुद्धा ही पौर्णिमेला पायी वाडीला जाण्याची परंपरा अखंडपणे चालु ठेवली.श्रीमहादबा महाराज हे लहानपणापासूनच वाचासिद्ध होते. एकंदर त्यांच्या लहानपणाच्या लिलांवरुन,त्यांच्या दिव्य प्रतिभेवरुन पाटील घराण्यात सिद्ध जन्माला आले याची लोकांना जाणिव होवु लागली होती.महाराज वयाच्या सातव्या वर्षापर्यंत अधूनमधून घराबाहेत जात असत.पुढे बाराव्या वर्षी त्यांनी घर सोडले ते कायमचेच.श्रीमहादबा महाराज हे नैष्ठिक ब्रह्मचारी,स्वेच्छाविहारी,पूर्ण विदेही,एकांतप्रेमी,आत्मानंदात लिन,भक्तांनी आठवण काढताच भक्ताकडे धाव घेणारे असे अलौकिक सत्पुरुष होते.अन्य सत्पुरुष,संतांप्रमाणे साधना करुन आत्मज्ञान व आत्मसामर्थ्य प्राप्त करण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. ते म्हणत, `मी शिकुन आलोय’ ते जन्मसिद्ध असल्यामुळे त्यांना बाह्य गोष्टींची गरज नव्हती.महादबा महाराज हे स्वयंभू सिद्ध व आत्मज्ञानी होते.
#गुरुपरंपरा
खटाव (नांद्रे) येथील प.पू.श्रीरामानंद महाराज खटावकर यांचा महादबा महाराजांवर अनुग्रह झाला होता.तरी महाराजांच्या जिवनात साधकावस्था आढळत नाही.श्रीरामानंद महाराज हे नाथ परंपरेतील असल्यामुळे पाटील महाराज हे नाथ परंपरेशी अनुबंधित असावेत.औपचारिकदृष्ट्या बघितले तर महाराजांचे शिक्षण हे मराठी चौथी पर्यंत झाले होते परंतु आश्चर्य म्हणजे ते भक्तांना दासबोध ,ज्ञानेश्वरीतील एखादा अध्याय काढायला लावून त्यांच्याकडून एखादी ओवी वाचुन घेत आणि आपण त्या ओवीचा अर्थ सोदाहरण समजावुन सांगत.त्यांना अशा सर्व ग्रंथांचे ज्ञान होते व ग्रंथातील सर्व श्लोक,ओव्या ही त्यांना माहीत असत.श्रीमहाराजांचा अधिकार फार उच्च कोटीतील होता.महाराज त्रिकालज्ञानी होते.ते भक्तांना सांसारीक,पारमार्थीक आणि भौतीक मार्गदर्शन करीत व त्यांच्या अडीअडचणी सोडवत असत.क्वचितच लोक त्यांच्या कडे अध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी येत.त्यांनाही महाराज कृतकृत्य करत.महाराजांकडे सर्व जातीधर्माचे लोक येत असत.गरीब श्रीमंत असा भेदभाव त्यांच्याकडे नव्हता.कर्मकांडाचा प्रचार त्यांनी कधीही केला नाही.महाराजांच्या भक्ताबद्दल बोलायचे झाले तर असंख्य लोकांचा ते आधार होते.भक्त त्यांना बस,सायकलवरुन,पायी तसेच मोटारसायकलवरुन किंवा बैलगाडीने महाराजांच्या इच्छेनुसार सोडत असत व त्यांना मिळेल त्या वाहनाने अगदी विमानानेसुद्धा भक्त त्यांना नेत असत. पाटीलबाबा हे योगी पुरुष होते तसेच ते राजयोगी ही होते. महाराजांच्या खिशात सदैव एक डबी ठेवलेली असे त्यात नृसिंहवाडीचा अंगारा सदैव त्यांच्या बरोबर असे.भक्तांनी आपल्या अडचणी सांगीतल्या की महाराज त्या डबीतील अंगारा काढुन भक्तांला लावत आणि त्यामुळे भक्तांच्या अडचणी दुर होत असत. महाराजांनी कधीही पैशाला स्पर्श केला नाही.ते कधीही धनाला शिवले नाही. ते देवावतारी असुन सुद्धा सामान्यासारखे राहिले.अखंड ५० ते ५५ वर्षे ते मिळेल त्या साधनाने भक्तांकडे जाऊन त्यांना आशिर्वाद व अंगारा देऊन अडचणीतुन सुटका करीत.भक्तांचे मनोरथ पूर्ण करणे हेच आपले काम आहे असे ते मानत असत.भक्तसुद्धा महाराजांच्या बरोबर राहुन त्यांची सेवा करण्यात धन्यता मानत असत.महाराज पौर्णिमेस नरसोबा वाडीला व संकष्टीला मिरजेतील थोर संत अण्णाबुवांच्या मठात नेमाने जात व राहत असत.मुंबई,पुणे,बंगळुरु,आंध्रप्रदेश,गुजरात,मध्य प्रदेश अशा लांबच्या गावी सुद्धा भक्तांनी त्यांना नेऊन यात्रा केल्या आहेत.
#श्रींचे_व्यक्ती_दर्शन :- महाराज मितभाषी होते,मोजकेच बोलत.ते शाकाहारी होते.महाराजांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर,शर्ट,करवतकाठी उपरणे,वुलनचा कोट,डोक्याला लाल रुमाल असा त्यांचा वेश असायचा.त्यांच्या हातात सदैव एक काठी असायची.चेहर्यावर लहान मुलासारखी निरागसता होती.ते सदैव धोतराचा सोगा तोंडात धरुन आकाशाकडे नजर लावून आत्ममग्न स्थितीत बसलेले असत.
         त्यांनी अनेक भक्तांना आणि संतांना आपले चैतन्य स्वरुपाचे दर्शन घडविले होते.महाजांच्या समकालीन असलेले अनेक संत म्हणत , `पाटील महाराज हे त्रिकालज्ञानी व चालते बोलते ब्रह्म आहेत.विदेही असुन ज्ञानी व राजयोगी थाटात वागणारे सिद्ध पुरुष आहेत.ते साक्षात दत्तगुरुच आहेत.’ महाराजांचे श्रीसद्गुरु केशवनाथ महाराज,दत्तावतारी श्रीसद्गुरु मामा महाराज  देशपांडे यांच्याशी फार प्रेमाचे नाते होते. महादबा महाराज भक्तांना नामस्मरण करायला,सदग्रंथाचे वाचन,प्रवचन-किर्तन ऐकायला सांगत असत. `सच्चाने वागा,लबाडी करु नका.कुणाला फसवु नका. फुकटचे खाऊ नका,संपत्तीचे प्रदर्शन करु नका.माणुसकीने वागा.’ हाच आपल्या भक्तांना त्यांचा उपदेश असे.बुवाबाजी करणार्यांच्या अंगावर ते धावून जात.समाधी घेण्याच्या वर्षभर आधी ते स्वत: प्रत्यक्ष भक्तांच्या घरी जाऊन अगदी भक्तांना शोधुन काढून त्यांना आपल्या सेवेची संधी दिली.आशिर्वाद व अंगारारुपी सामर्थ्य दिले येथुन पुढे नृसिंहवाडीला या असा आदेश सर्व भक्तांना दिला.भक्ताच्या कल्याणासाठी मी अनंतकाळ अखंड चिरंतन वाडीत वास्तव्य करुन आहे असा भक्तांना भरवसा दिला.महाराजांनी वाडीत स्वत: मठ बांधून घेतला,पण कोणासही शिष्य केले नाही.त्यांनी स्वत: १९८१ साली ट्रस्टची स्थापना केली व मठाची व्यवस्था ट्रस्ट कडे सोपवली.मठामध्ये त्यांनी समाधीची जागा निश्चित करुन या ठिकाणी समाधीस्त करा असा आदेश दिला होता.
#महासमाधी :-
पुढे दिवस व वेळ ठरवून ,सर्वांना अगोदर सांगून व टिपून ठेवून परमपूज्य सद्गुरु श्री महादबा पाटील महाराजांनी नृसिंहवाडीच्या अधिकृत मठात जेष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेस  शके १९०४ रविवार दि.६ जुन १९८२ राजी सकाळी ६ वाजुन ५ मिनीटांनी दत्त मंदिरात घंटानाद होत असतांना समाधी घेतली.अशा या सिद्ध दत्तावतारी श्रीमहादबा पाटील महाराजांची आज पुण्यतिथी .या पावन दिनी त्यांच्या चरित्राचे स्मरण करुन महाराजांच्या चरणी सांष्टांग दंडवत करुयात.महादबा पाटील महाराजांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम.

माहिती संकलन :- श्रींच्या प्रासादिक नित्यपाठ मालिकेतील प्रस्तावना. Loading…

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Amol Kelkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

लोलक

मी अनुभवलेला एक अपूर्व कौटुंबिक सोहळा