in

शिवतत्व – एक कलात्मक अनुभूती

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

शिवोहं शिवोहं , शिव स्वरूपोहं 

नित्योहं शुद्धोहं , बुद्धोहं मुक्तोहं ll 

या शिवधुनीपासून साधारण १ महिन्यापूर्वी आयुष्यात सुरु झाला एक नाविन्यपूर्ण आणि अर्थपूर्ण  अध्याय. या अध्यायातील पहिले पान काल सर्वांसमोर उलगडले गेले आणि एक अध्यात्मिक, कलात्मक अनुभूतीचा  प्रत्यय आला.भरतनाट्य नृत्यांगना उपासना हिच्या एका संकल्पनेतून ‘Understanding Shiva as Natraj’ या स्कंदपुराणातील ‘आनंद तांडव’ या कथेवर आधारित आजच्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. बिंदूंवर कार्य करत असताना आलेला हा प्रस्ताव म्हणजे माझ्यासाठी  एक खूप मोठी संधी…आणि मीही यात चित्रकार म्हणून जोडले गेले. रजतच्या रूपात एक उत्तम सूत्रधार या कार्यक्रमासाठी लाभला. डॉ. प्रणिताच्या सुरांनी या कार्यक्रमाला संगीतमय साथ दिली. आणि असा हा कलांचा मेळा… एक सुंदर अनुभव.  

महाशिवरात्रीचा पवित्र दिवस… खूप सुंदर आणि शांत दालन… विविध फुलांनी , दिव्यांनी सजलेले… समोर मांडलेली नटराजाची मूर्ती हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण… त्यासमोर मांडलेली शुभ्र अशी बैठक आणि त्या शेजारी उभा कोरा कॅनवास सर्वांचे स्वागत करण्यास सज्ज झाले होते. एका ठराविक अंतरावर जवळजवळ २५-३० छोटे गालिचे अंथरलेले… त्या प्रत्येक बैठकीसोबत कागद, रंग असे चित्रसाहित्य मांडलेले. असे हे डोळ्यांना आनंद देणारे दृश्य अगरबत्तीच्या मंद सुगंधात आणि शिवधुनीच्या मधूर संगीतात अधिक दीप्तिमान झाले होते. 

शिवपूजन, आरती आणि नटराजाचा आशीर्वाद घेऊन संध्याकाळी ६.१५ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. दालन उत्स्फूर्त चेहऱ्यांनी भरून गेले होते. प्रत्येकास सुरुवातीस प्रस्तावना आणि कार्यक्रमाची रुपरेषा थोडक्यात सांगितली गेली. श्री गणेशाचे स्मरण करून कार्यक्रम आता स्वरबद्ध झाला होता. या संगीतमयी वातावरणात रंग आणि नृत्य यांचा मेळ कसा आणि कधी होईल याबद्दल प्रत्येकाच्याच मनात उत्सुकता होती. ‘ओम’ची स्पंदने  समोरील चित्र, नृत्य आणि स्वरांतून जाणवू लागली. ती सर्व आता विविध कागदांवर वेगवेगळ्या रूपात उमटत होती. किती तरी वर्षांनी रंगांसोबत खेळताना सर्व सहभागी आपापल्या चित्रात अतिशय मग्न झाले होते. आणि रंगांसोबत प्रत्येकाचे नाते नव्याने निर्माण झाले. 

‘आनंद तांडव’च्या विवरणानंतर सुरुवात झाली मूळ कथेला. यातील पहिले चरण म्हणजे व्याघ्रपाद आणि पतंजली ऋषींचा परिचय. त्यानंतर शाब्दिक आणि तालबद्ध स्वरूपात उपासनाने सर्वांसमोर सादर केलेले शिवाचे तेजोमय रूप त्या मनामनांत शिवतत्व रुजू करण्यात नक्कीच यशस्वी ठरले असेल. ऋषींच्या साधनेची महती समजून येत असताना सर्वानी ‘ओम नमः शिवाय’ नामस्मरणाचा अद्वितीय आनंद घेतला. कानांवर विराजमान झालेला हा पंचाक्षरी मंत्र कॅनव्हासवर उमटू लागला, तसे चित्र शिवमय होऊ लागले. पुराणकथेतील दुसरे चरण सुरु झाले आणि चितसभेचे भव्य-दिव्य रूप एकाच वेळी शब्द ,रंग आणि ताल या विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनांवर कोरले जाऊ लागले.प्रखर शिवतत्व आता सर्वांसमोर निर्माण झाले होते. शंख,घंटा आणि डमरूच्या नादात आनंद तांडवास सुरुवात झाली. यात प्रत्येकाचा असलेला उत्सुर्त सहभाग, हेच शिवतत्व प्रत्येक मनात जागृत झाल्याचे प्रमाण देत होता.हा नाद आणि ताल बिंदूंच्या माध्यमातून कॅनव्हासवर फेर धरू लागला आणि एक अद्भुत चित्रनिर्मिती समोर आली. ‘मागे उभा मंगेश … ‘ या गीतासोबत कथाकार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

शेवटी प्रत्येकास या सर्व कलात्मक प्रवाहातून अनुभवलेले शिवतत्व रंगांच्या माध्यमातून समोर मांडण्याची संधी दिली गेली. प्रत्येकाच्या मनातला भाव रंगरूपात सुंदररित्या रचला जात होता. स्वतःचीच ती कलाकृती पाहून निर्माण होणारा आनंदायी भाव त्यांना नवनिर्मिती साठी प्रोत्साहित करत होता. ना कोणती चढाओढ ना ताणतणाव… तिथे होता फक्त आणि फक्त समाधान देणारा आनंद. सर्वांचे समाधानी चेहरे आणि आनंदपूर्ण प्रतिक्रिया हे आमच्यासाठी लाखमोलाचे.  आणि हेच आमच्या या कार्यक्रमाचे फलित.हे सर्व आमच्यासाठी सुद्धा खूप सुखदायक होते. हा प्रयोग खरेच एक अविस्मरणीय अनुभव आहे. त्यातून नक्कीच अधिक प्रोत्साहन आम्हां सर्वांना मिळाले. समोर जरी आम्ही चौघे दिसत होतो तरी या कार्यक्रमासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. त्या सर्वांचे मनापासून आभार. 

आयुष्यात सुरु झालेल्या या नव्या अध्यायाचे पहिले यशस्वी पान उलटून नवी रचना करण्यास आता मी प्रोत्साहित झाले आहे. नवी संकल्पना , नवे स्वर , नवे रंग ,बिंदूचा नवा विस्तार आणि नवीन कथा… नक्की काय असेल हे जाणून घेण्यास माझेही मन आतुरलेले आहे. तुम्हां सर्वांची सोबत असेल तर हा अध्याय लवकरच पूर्ण होईल यात शंका नाही. 

– रुपाली ठोंबरे. 

 

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Rupali Thombare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

दीक्षितांच्या जगन्नाथाप्रत–

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना !