in

वरंगलचे काकतीय – एक कोहिनूर

P.C – Kavita Kulkarni

मी पहिल्यांदा हैदराबादला आलो तेव्हा सिकंदराबाद जवळ एका हॉटेलमधे राहिलो होतो. हॉटेलकडे जाताना मला बेगमपेठला भव्यदिव्य असे ITC Kakatiya हॉटेल दिसले. मला ITC हॉटेलविषयी कल्पना होती, परंतु हैदराबादच्या ITC हॉटेलला ‘काकतीया’ असे नाव का दिले? असा प्रश्न मला पडला.  काकतीय नक्की काय आहे? व्यक्ती आहे की विभाग आहे? व्यक्ती असेल तर  काकतीया कोण आहे? असे बरेच प्रश्न पडले. या प्रश्नांमुळे माझे दक्षिण भारत, तिथली संस्कृती, तिथला इतिहास याविषयीच्या अज्ञानाची पूर्ण कल्पना मला आली. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला, राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्याकडे निघाले किंवा तंजावरला शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांनी राज्य केले हाच मला माहिती असलेला दक्षिण भारताचा इतिहास होता. चोळ, चालुक्य, राष्ट्रकूट ही राजघराणी रोमन साम्राज्याशी संबंधित होती असे जर मला कुणी सांगितले असते तर मी त्यावर सुद्धा विश्वास ठेवला असता इतका माझा अभ्यास तोकडा होता आणि आजही आहे. खरतर काकतीयांची राजवट कोहिनूर  हिऱ्याप्रमाणे चमकणारी दहाव्या ते बाराव्या शतकातील महत्वपूर्ण राजवट होती. बहुतेक तेलुगु भाषिक भागावर काकतीयांचे राज्य होते. एकेकाळी उत्तरेला ओरिसापासून खाली तामीळनाडूपर्यंत काकतीयांचे राज्य होते. बहुतेक तेलगु भाषिक भागावर काकतीयांनी जवळ जवळ तीनशे वर्षे राज्य केले. असे असताना मी काकतीय हे नाव देखील ऐकले नव्हते ही माझ्यासाठी खरच लाजेची गोष्ट होती.

काकतीयांचा इतिहास समजावून घेण्याआधी दहाव्या बाराव्या शतकातील दक्षिण मध्य भारतातील एकंदरीत राजकीय परिस्थिती समजावून घेऊ या. दक्षिण भारत, उत्तर भारत अशी विभागणी करणे योग्य नाही. मान्यखेटा किंवा आताचे मालखेड इथून राष्टकूट राजघराणे जवळ जवळ संपूर्ण भारतावर राज्य करीत होते. तरी समजायला सोपे जावे म्हणून दक्षिण आणि मध्य भारताचा म्हणजे महाराष्टाच्या खालच्या भागाचा विचार करु. त्याकाळी सामंत पद्धती होती. प्रत्येक राजघराणे त्यांचे प्रतिनिधी नेमत जे वेगवेगळ्या भागावर राज्य करीत होते. त्या विभागातील महसूलाची वसुली, प्रजेच्या कल्याणाची कामे आणि संरक्षण ही कामे साधरणतः ही सामंत मंडळी करीत असत. या सामंतांना त्यासाठी सैन्य बाळगणे गरजेचे होते. बऱ्याचदा मुख्य राजवट कमजोर झाल्यानंतर सामंत मंडळीतूनच दुसरे राजघराणे जन्माला येत असे. बहुतेक राजघराणे तसेच उदयास आले. काहींनी नंतर ते ज्या राजघराण्याचे सामंत म्हणून काम करीत होते त्या राजघराण्याचाच पाडाव देखील केला. दहाव्या बाराव्या शतकात देवगिरीला यादवांचे राज्य होते, मान्यखेटांच्या राष्टकूटांचा चालुक्यांनी पराभव केला होता. हळूहळू राष्टकूटांचा प्रभाव पूर्ण कमी झाला होता. चालुक्यांनी आपली राजधानी मान्यखेटावरुन कल्याणीला म्हणजे आजचे बसवकल्याणला हलविली होती. कर्नाटकमधे राष्ट्रकूटांचा प्रभाव संपल्यानंतर चालुक्यांचा प्रभाव वाढत होता. पुढे जाऊन कर्नाटक भागात द्वारसमुद्रचे होयसाळ घराणे उदयास आले. कर्नाटक राज्यातील बेलूर, हळेबड्डू येथील प्रसिद्ध एतिहासिक मंदिरे ही होयसाळांची देण आहे. पुढील बरीच वर्षे होयसाळ या राजघराण्याचा कर्नाटक आणि एकंदरीत दक्षिण भारतावर प्रभाव होता. खाली तंजावरला चोळांचे राज्य होते आणि त्यांचा प्रभाव आंध्रमधे नेल्लोरपर्यंत होता. वेंगीला (आताचे Elurur) चालुक्यांचे दुसरे घराणे राज्य करीत होते आणि ते कल्याणीच्या चालुक्यांशी संबंधित होते असे मानतात. वेंगीच्या चालुक्यांचा उल्लेख कुणी पूर्वेकडील चालुक्य असे देखील करतात. चालुक्यांचे चोळांमधे नातेसंबंध होते आणि लढाया देखील होत होत्या. कालांतराने वेलनाटीच्या चोळांनी स्वतःला चालुक्य आणि चोळ दोघांचेही प्रतिनिधी म्हणून घोषित केले. पुढील काळात मदुराईला पांड्या घराण्याचा उदय झाला.  उपलब्ध माहितीनुसार बेतराज हाच वरंगलच्या काकतीय घराण्याचा पहिला राजा असावा अशी मान्यता आहे.  काही इतिहासकारांच्या मते काकतीय हे राष्ट्रकूटांचे सामंत म्हणून या भागात आले असावे जशी जशी राष्ट्रकूटांची सत्ता क्षीण होते गेली तसे त्यांनी चालुक्यांचे मांडलिकत्तव पत्करले आणि चालुक्यांचे सामंत म्हणून काही काळ राज्य केले.   

काकतीयांची कारकिर्द साधारणतः अशी आहे पहिला बेतराज – पहिला प्रोळराज- दुसरा बेतराज – दुसरा प्रोळराज – रुद्रदेव किंवा पहिला प्रताप रुद्र – महादेव – गणपतीदेव – रुद्गमादेवी किंवा रुद्रांबा किंवा रुद्रमांबा – दुसरा प्रतापरुद्र. साधारण कालखंड हा इं.स. १००० ते १३२३ असा आहे म्हणजे जवळ जवळ तीनशे ते सव्वातीनशे वर्षे वरंगल आणि आसपासच्या भागावर काकतीयांचे राज्य होते. बेतराजाची कारकिर्द नक्की कधी सुरु झाली हे सांगणे कठीण असले तरी १००० च्या आसपास काकतीया राजवटीची सुरवात झाली आणि साधारण १३२३ पर्यंत काकतीयांनी राज्य केले. पहिला प्रतापरुद्र हा पहिला राजा होता ज्याने काकतीयांच्या स्वातंत्र्याची घोषणा केली त्याआधी सारे सामंत म्हणून चालुक्य किंवा चोळांचे मांडलिक होते. इ.स. ११६० पासून ते १३२३ पर्यंत म्हणजे पावणे दोनशे वर्षे काकतीयांनी स्वतंत्रपणे राज्य केले. संपूर्ण तेलुगु भाषिक भाग हा काकतीयांच्या अधिपत्याखाली होता. काकतीय हे नाव का पडले असावे याविषयी बरेच तर्कवितर्क आहेत. काकती म्हणजे दुर्गा आणि दुर्गेचे भक्त म्हणून काकतीय असेही काही लोक मानतात. काकतीयांनी दुर्गेचे मंदिर बांधले. काही इतिहासकारांच्या मते काकतीया राष्ट्रकूटांचे सामंत होते त्यामुळे ते आधी जैन धर्मीय असावे. राष्ट्रकूटांच्या काळात जैन धर्म प्रामुख्याने होता. पुढे जाऊन काकतीय राजांनी वैदिक शैव मतांचा स्वीकार केला असावा. काकतीयांनी संपूर्ण राज्यात शिवाची मंदिरे बांधलीत. वरंगलजवळ हनमकोंड्याला त्यांनी शिवाचे मंदीर बांधले. हेच ते सुप्रसिद्ध असे हजार खांबांचे मंदिर.

इ.स. ११९८ ते १२६७ च्या काळात गणपतीदेवाने राज्य केले. गणपतीदेवाची कारकिर्द काकतीयांची सर्वात जास्त वैभवशाली कारकिर्द होती असे म्हणता येईल. गणपतीदेवाच्या काळात संपूर्ण आंध्र भागावर काकतीयांचे एकछत्री राज्य होते. कलिंग, पांड्य या राज्यांवर स्वाऱ्या करुन तेथील राज्यांवरही आपले वर्चस्व गाजवले. जिंकलेला साराच भाग ताब्यात ठेवता आला नाही तरी गणपतीदेवाची कारकिर्द ही स्थैर्याची होती त्यांमुळेच त्या काळात साहित्य, स्थापत्य कला, संगीत अशा सर्वच बाबतीत राज्याची भरभराट झाली. गणपतीदेवाच्या काळापर्यंत दक्षिणेतील चोळांचे साम्राज्य कमजोर होत चालले होते. गणपतीदेवाच्या आधी रुद्रदेवाच्या काळात काकतीयांचा प्रभाव वाढत होता. रुद्रदेवाने आपले वडील दुसरा प्रोळराजा याच्या वधाचा बदला घेण्यासाठी वेलनाटीच्या चोळांवर हल्ला केला. उदयराजे चोळांचा पराभव करुन वेलनाटी चोळांची राजवट संपुष्टात आणली. होयसाळ आणि पांड्या राज्यांनी बहुतेक चोळ राज्य जिंकले होते. तसेच पश्चिमेचे किंवा कल्याणीच्या चालुक्यांनी पण चोळांवर खूप दबाव आणला होता. चोळांचा प्रभाव क्षीण व्हायला लागला होता. त्यामुळे चोळ राजांचे सामंत स्वतःला हळूहळ स्वतंत्र राजे म्हणून घोषित करु लागले होते.

गणपतीदेवावंतर त्याची मुलगी रुद्रांबाने राज्य केले. तिच्या नावाने बऱ्याच दंतकथा प्रसिद्ध आहेत. इतिहासकारांच्या मते रुद्रांबाला संतती नव्हती म्हणून तिने आपली मानलेली मुलगी मुम्मडांबा हिचा मुलगा दुसरा प्रतापरुद्र याचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. गणपतीदेवाला पुरुष संतती नसल्याने त्याने सुरवातीपासूनच आपल्या मुलीला राज्यकारभाराचे शिक्षण दिले. असे असले तरी गणपतीदेवाच्या मृत्युनंतर तिची सुरवातीची कारकिर्द प्रचंड वादळी होती. राज्यात अशांतता पसरली होती. कडप्पा, कर्नूल या भागातील काही सरदारांनी तिच्याविरुद्ध बंड केले. कलिंगच्या राज्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरवात केली. पांड्यांनी नेल्लोर या शहरावर हल्ला केला. रुद्रांबाने न डगमगता अंतर्गत आणि बाह्य आक्रमणाचा सामना केला आणि ही आक्रमणे परतवून लावली. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी म्हणून देवगिरीच्या यादवांनी वरंगलवर हल्ला केला. यादवांच्या सेनानायकांनी रुद्रांबावर हल्ला करुन तिला कैद करण्याचा प्रयत्न केला. तिने यादवांच्या सेनानायकांचा हल्ला परतवून लावला आणि त्यात यादवांचे सेनानायक मारले गेले. यादव राजा महादेव याने वरंगल किल्ल्याला वेढा घातला. रुद्रांबाने हा आपल्या सेनापतींच्या मदतीने वेढा उठवायला लावला आणि यादवांना तह करायला भाग पाडले. रुद्रांबाच्या काळातच प्रसिद्ध युरोपियन प्रवासी मार्को पालो हा वरंगल राज्यात आला होता. त्याने लिहिलेल्या वर्णनावरुन रुद्रांबाच्या काळातील काकतीय राजवटीच्या वैभवाची कल्पना येते. १२९५ साली रुद्रांबाचा मृत्यु झाला. रुद्राबांची कारकिर्द ही परत एकदा भारतीय इतिहासातील स्त्रीयांचे महत्व आणि त्यांच्या तेजस्वीपणाची ओळख करुन देते.

दुसरा प्रतापरुद्र हा शेवटचा काकतीय राजा. त्याला नेहमीच्याच पांड्य राजे आणि अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागलाच पण बलाढ्य अशा खिलजी आणि तुघलक सत्तांचा देखील सामना त्याला करावा लागला. त्याने पांड्य राजांशी लढून कांची शहर जिंकले. प्रताप रुद्राचे देवगिरीच्या रामदेवराय राजाशी देखील युद्ध झाले आणि त्याने रायचूर जिंकले. प्रतापरुद्राने खूप इमारती बांधल्या, तलाव बांधले आंध्रमधील बहुतेक तलाव हे प्रतापरुद्राच्या काळातील असावे अशी समजूत आहे.

अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीवर पहिली स्वारी केली त्यावेळ रामदेवराज राजा तिथे राज्य करीत होता. दिल्लीच्या प्रचंड सैन्यापुढे आपला टिकाव लागणार नाही हा विचार करुन रामदेवरायाने खिल्जीला खंडणी देण्याचे कबूल केले. मोठे खंडणी घेऊन तो उत्तरेत निघून गेला. त्यानंतर काही वर्षांनी त्याचा सेनापती मलिक काफूर याने प्रथम वरंगलवर हल्ला केला. तो बुऱ्हाणपूर मार्गाने देवगिरिला आला. त्याकाळी दिल्लीवरुन महाराष्ट्रात यायला हाच मार्ग असावा. देवगिरीचा राजा मांडलिक असल्याने तिथल्या प्रजेला काही त्रास झाला नाही परंतु रामदेवरायाला मलिक काफूरला प्रतापरुद्राच्या विरु्दध मदत करणे भाग होते. देवगिरीवरुन मलिक काफूर वऱ्हाडात आला. चांदा जिल्ह्यातून पुढे त्याने सिरपूरच्या किल्ल्यावर हल्ला केला व तो किल्ला ताब्यात घेतला. तो वरंगलला पोहोचले. आधी किल्ल्यांची पाहणी करुन त्याने किल्ल्याला वेढा घातला. प्रतापरुद्र आणि त्याचे सैन्य हे किल्ल्याच्या आतून लढत होते. बरेच दिवस युद्ध चालले आणि मलिक काफूरला किल्ल्याची तटबंदी भेदण्यात यश आले. प्रतापरुद्र शरण आला. मलिक काफूर प्रतापरुद्राची मोठ्या प्रमाणात संपती घेऊन दिल्लीला गेला. काहींच्या मते यातच सुप्रसिद्ध कोहिनूर हिरा होता. अल्लाउद्दीन खिल्जीच्या मृत्युनंतर मलिक काफूरने दिल्लीची गादी बळकाविण्याचा प्रयत्न केला. त्यात तो काही काळ यशस्वी झाला परंतु अल्लाउद्दीन खिल्जीचा मुलगा मुबारक खिल्जीने त्याला मारुन सत्ता बळकावली. त्याच्या काळात देविगरीचा राजा शंकरदेवराय याने खंडणी देण्यास नकार दिला तेंव्हा त्यावर आक्रमण करुन त्याने ते राज्य खालसा केले. त्याने प्रतापरुद्रावर हमला केला. प्रतापरुद्राने खंडणी देण्याचे कबूल केले. पुढे मुबारक खिल्जीचा खून झाला आणि दिल्लीत तुघलक घराण्याची सत्ता सुरु झाली. गियासुद्दीन तुघलक याने आपला मुलगा मोहम्मद तुघलक याला वरंगलवर पाठविले. त्याने तिसरी आणि शेवटली स्वारी केली. या लढाईत प्रतापरुद्राचा पराभव झाला आणि तो मुहमद तुघलकाच्या हाती सापडला. प्रतापरुद्राचा मृत्यु कसा झाला याविषयी ठोस काही माहिती नाही तरीही प्रतापरुद्राला कैद करुन उत्तरेला नेत असताना त्याने नर्मदा नदीत उडी घेऊन जीव दिला अशी मान्यता आहे. अशा प्रकारे वरंगलच्या काकतीयांच्या दैदिप्यमान कारकिर्दीचा शेवट झाला.

काहींच्या मते मलिक काफूरच्या स्वारीच्या वेळी प्रताप रुद्राने गनिमी काव्याने युद्ध चालू ठेवण्याऐवजी स्वतःला किल्ल्यात कोंडून घेऊन युद्ध केले. त्यांने आपल्या सरदारांची मदते घेऊन मलिक काफूर वर दुसऱ्या बाजूने गनिमी काव्याने हल्ले केले नाही. त्यामुळे वैयक्तीक शौर्य असले तरी संख्याबळ आणि आधुनिक हत्यारांपुढे त्याला हार मानावी लागली. दुसरी आख्यायिका अशी आहे जेव्हा तुघलक आणि प्रतापरुद्राच्या सैन्यात लढाई झाली त्यात प्रतापरुद्राच्या सैन्याने मुहंमद तुघलकाचा पराभव केला. मुहंमद तुघलक सारे सैन्य घेऊन पळून गेला. त्या विजयानिमित्त वरंगलमधे मोठा उत्सव झाला किल्ल्याचे दरवाजे उघडण्यात आले. अशातच मुहंमद तुघलक परत आला आणि त्याने बेसावध प्रतापरुद्रावर आक्रमण केले आणि प्रतापरुद्राला कैद केले. काही इतिहासकारांना ही दंतकथा वाटते. मुहंमद तुघलक माघारी फिरला होता पण त्याची कारणे दिल्लीच्या राजकारणांशी संबंधित होती असे त्यांचे मत आहे. काहीही असले तरी सत्य हे आहे मुहंमद तुघलकाच्या स्वारीत वरंगलची राजवट संपुष्टात आली. मला तर नेहमी वाटते जेंव्हा पहिल्यांदी अल्लाउद्दीन खिल्जी देवगिरीवर चालून आला तेंव्हा देवगिरीच्या रामदेवरायाने इतर सर्व राजांची मदत का मागितली नाही. त्याने तशी मदत मागितली असती तर ती इतर राजांनी दिली असती का? दिली असती तर चित्र पालटले असते का? इतिहासात अशा जरतरच्या विधानांना काहीच महत्त्व नाही. जे व्हायचे ते होउन गेले.

काकतीयांची आधीची राजधानी ही वरंगल जवळ हनमकोंडा येथे होती. सुरवातीला काकतीय राजांना हनमकोंडेश्वर असे देखील म्हणायचे. हनमकोंड्याचा किल्ला आजही आहे. पुढे रुद्रदेवाच्या काळात राजधानी वरंगल येथे किल्ला बांधला व तेथे हलविली. आज मात्र या जागेवर पूर्वीच्या वैभवाचे फक्त भग्नावशेष शिल्लक आहेत. काकतीय राजांनी हजार खांबांचे देऊळ किंवा Thousand Pillar Temple बांधले. यातील शिलालेखात काकतीयांविषयीची माहिती आहे. याव्यतिरिक्त संपूर्ण आंध्रप्रदेशात काकतीय राजांनी मंदिरे बांधली. पाण्याचे तलाव आणि पाण्याची व्यवस्थापन याबाबतीतही काकतीय राजांनी फार मोठे काम केले. वरंगल आणि आसपासचे बहुतेक तलाव हे काकतीय राजवटीत बांधले गेले आहेत. साधारण पाच हजार तलाव काकतीय राजवटीत बांधण्यात आले. ज्यात प्रामुख्याने पाखला आणि रामाप्पा तलावांचा समावेश होतो. रामप्पा येथील मंदिर हे युनिस्कोच्या वारसा स्थळात येते.

काकतीयांच्या तीनशे वर्षाच्या कारकिर्दिचा परिचय एका लेखात करुन देणे शक्य नाही. ही एक छोटी ओळख. तरीही कधी वरंगल शहराला भेट दिली तर त्या शहराच्या दैदिप्यमान इतिहासाची जाणीव व्हावी म्हणून हा लेख प्रपंच.

संदर्भ:
1. वरंगलचे काकतीय – सेतु माधवराव पगडी
2. विकीपिडिया आणि काही विडियो

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Mitraho

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध)

स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध)