लोलक

महाराष्ट्र टाईम्सच्या आजच्या विश्वभान पुरवणीतील माझा

लेख.

लग्न ठरल्यावर ’काय बुवा आता एकदम अमेरिका’ असं जो तो ज्या अप्रुपाने म्हणायचा त्याचंच अमेरिकेपेक्षाही मला जास्त अप्रुप वाटायचं. लग्न ठरताना नवर्‍याच्या नोकरीमुळे अमेरिकेत जायला मिळेल हे कळलं तेव्हा मला भारत सोडायचा नाही हे मी ठामपणे सांगितलं होतं. दोन वर्षच जायचं आहे म्हटल्यावर अर्थातच अमेरिका बघायला मिळेल असं जो – तो म्हणायला लागला आणि अमेरिकेत जायचं नाही या एकाच कारणाकरता  हटून न बसता बघावी तरी ही अमेरिका असं मलाही वाटायला लागलं. लग्न झालं आणि वर्षभरातच नवर्‍याला कामानिमित्त अमेरिकेला जायची संधी चालून आली. अमेरिकेबद्दल  उत्सुकता होती तशीच छुपी भितीही. तिथे जाऊन करायचं काय,  निभाव कसा लागेल ही शंका अधूनमधून डोकं वर काढत होती. अमेरिकेबद्दल माहिती होती ती पुस्तकी, ऐकीव. शाळेतल्या भूगोलात शिकलेली माहिती आणि आपली माणसं आहेत भरपूर तिकडे हेही ऐकलेलं. एवढ्या तुटपुंज्या बळावर १९९५ साली २ वर्ष अमेरिकेत राहायचं म्हणून अमेरिकेला जाणार्‍या विमानात आम्ही बसलो.

नापा कौंटीतल्या सॅन्टारोझा नावाच्या गावात पाऊल ठेवलं तेव्हा कोकणातल्या एखाद्या निसर्गरम्य खेड्यात आल्यासारखं वाटलं पण जेमतेम ८ – १० भारतीय कुटुंबच गावात आहेत समजल्यावर कितीतरी प्रश्न मनात उभे राहिले. गजबजलेल्या गावातून, घरातून, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यातून कोणीतरी शिक्षा दिल्यासारखं एका कोपर्‍यात मुकाट बस सांगितल्यासारखी अवस्था सुरुवातीला अनुभवली. कायद्यानुसार मला काम करता येणार नव्हतं हे इथे येताना ठाऊक होतं आणि दोनच वर्ष म्हणून त्याबद्दल काही वाटलं नसलं तरी इथे आल्यावर मात्र वेळ अंगावर यायला लागला. आठवड्यातून एकदा या ८-१० कुटुंबाच्या भेटींनी माणसांत मिसळण्याचं समाधान अपुरं वाटायला लागलं, संध्याकाळी मुलाला बाबागाडीत टाकून २-२ तास निर्मनुष्य रस्त्यावर फिरायला जाणं कंटाळवाणं व्हायला लागलं, घरी परत आलं की आई – वडील, भावंडांच्या, मित्रमैत्रिणींच्या आठवणींनी संध्याकाळ उदासवाण्या जायला लागल्या.  

भारतात मी अभिनय, लेखन यात मग्न असायचे, त्याबरोबर आकाशवाणीत हंगामी निवेदिका म्हणून काम करायचे. यातलं इथे फक्त लेखन शक्य होतं. मला दिसणारी अमेरिका कधी हलक्याफुलक्या लेखांतून तर कधी तात्कालिक प्रसंगांवरील लेखनातून मी मान्यवर वृत्तपत्र, मासिकं यातून लोकांपर्यंत पोचवत होते पण तरी चैन पडत नव्हतं. इथे राहायचं तर या समाजात आपण मिसळलं पाहिजे असं वाटायचं पण मार्ग सापडत नव्हता. मार्ग दाखवला रोजच्यारोज दारात फुकट येणार्‍या  वर्तमानपत्रातल्या जाहिरातींनी. त्यातूनच  सरकारतर्फे माफक दरात चालवल्या जाणार्‍या छंदवर्गाबद्दल कळलं.  जाजम विणण्याचा तो वर्ग म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या इंग्रजीची कसोटी होती. आम्हाला दोघींना एकमेकींच्या इंग्रजीचा एक शब्दही समजत नव्हता. ’I don’t understand what you are saying’ हेच दोन – तीन वेळा ऐकलं की समजत होतं पण आमची दोघींची चिकाटी दांडगी. वर्गात पूर्ण झालं नाही म्हणून मी तिच्या घरी जाऊन जाजम विणलं आणि जसंजसे उच्चार कळायला लागले तसंतसं अमेरिकन लोकांमध्ये मिसळण्याचं वेडच लागलं. त्यांच्या स्वभावाचे पैलू जाणून घ्यायला आवडायला लागलं.  

पाहता पाहता २ वर्ष उलटली. त्याचवेळी नव्या नोकरीच्या संधीही चालून येत होत्या. काय करावं समजत नव्हतं.  गावाकडून शहराकडे गेलेला माणूस जसा तिथंच गुंततो तसं होत असावं. आमचंही तेच झालं. मला नेहमी वाटतं की, हे सारे निर्णय त्या-त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे घेतले जातात. पैशाचा मोह सोडवत नाही, सोयीसुविधांची सवय होते, भारतात आर्थिक मदत करायची असते, बसत चाललेली घडी विस्कटणं नको वाटायला लागतं, मिळालेली संधी गमवायची नसते, हुशारीचं या देशात चीज होतं हा विश्वास वाढायला लागलेला असतो. प्रत्येकाची कारणं म्हटलं तर सारखीच किंवा म्हटलं तर खूप वेगळीही असतात. काहींना सासरच्या माणसांशी संबंध ठेवायचे नसतात तर काहींना अमेरिकेत राहतो म्हणजे स्वर्गाला हात पोचले असं वाटत असतं. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी अविश्वसनीय पण त्या- त्या कुटुंबाच्या दृष्टीनं सगळीच कारणं महत्त्वाची असतात आणि कशासाठी? पोटासाठी हे  मुख्य कारण तर असतंच असतं.

इथे राहण्याची जशी सवय होत गेली तशी नवर्‍याच्या नोकरीमुळे वेगवेगळ्या राज्यात फिरण्याचीही सवय झाली. हळूहळू भारतात महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं अनुभवविश्व व्यापक झालं. महाराष्ट्रातल्याच वेगवेगळ्या भागातल्या, भारतातल्या इतर राज्यातल्या लोकांशीही मैत्री व्हायला लागली. विचारातला संकुचितपणा कमी व्हायला लागला. देश आपला वाटायला लागला. इथल्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी लागणा-या शिक्षणाचे वेध लागले. 

वयाच्या तिशीनंतर पुन्हा महाविद्यालयात पाऊल टाकायचं या विचारानंच बेचैन व्हायला झालं होतं. अस्वस्थ मनानं वर्गात प्रवेश केला आणि क्षणात तो पळालाही. माझ्या आई-वडिलांच्या वयाचे विद्यार्थी पाहून मी अगदीच बालवयात महाविद्यालयात आल्याची खात्री झाली आणि एक वेगळाच आत्मविश्वास आला. नंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांमुळे तो टिकलाही. इथल्या शिक्षणाचा ढाचा वेगळा आहे. प्रात्यक्षिकांवर भर, विषय समजण्याला महत्त्व, शिस्तीपेक्षा मित्रत्व, अडचणींना उपयोगी पडण्याचा प्रयत्न अशा काही गोष्टी विशेष नमूद कराव्याशा वाटणार्‍या. अजूनही एक आठवण मनात ताजी आहे. मुलाला सांभाळणारी मुलगी येऊ शकली नाही तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून मुलगा माझ्याबरोबर आला तर चालेल का असं मी स्मिथना घाबरतच विचारलं.  त्यांनी तात्काळ होकार भरला. मुलाला घेऊन वर्गात पाऊल ठेवलं आणि  स्मिथनी प्रथम आज आपल्या वर्गात एक छोटा दोस्त आला आहे अशी मुलाची सर्वांना ओळख करुन दिली. ६ वर्षांच्या माझ्या मुलानं लाजतलाजत ‘हाय’ केलं. वर्ग होता महाविद्यालयाचा आणि मुलं होती वय वर्ष १८ ते ६५ च्या आसपास. तो दिवस त्याच्यासाठी आणि माझ्यासाठीही कायमचा स्मरणात राहिला.

शिक्षण चालू असतानाच नोकरीसाठी लागणारी कागदपत्रं आली. मी शिकताशिकता बदली शिक्षिकेची नोकरी करायचं ठरवलं. रितसर प्रक्षिक्षण घेऊन मी कामाला सुरुवात केली. तिथेही उच्चार ही अडचण होतीच. छोटी, छोटी मुलं गोष्ट ऐकताना एकदम चिडीचूप बसत याचं मला खूप आश्चर्य वाटायचं. इतकी आज्ञाधारक? पण लवकरच ते कोडं सुटलं. मी बोललेलं त्यांना काही कळतंच नव्हतं म्हणून ती मुकाट बसून राहायची. मग ओठांच्या हालचालींवरुन कसं समजतं हे मीच त्यांना शिकवल्यावर त्यांना माझं बोलणं समजायला लागलं. दुसरी अडचण म्हणजे मला सुरुवातीला सगळी मुलं सारखीच वाटायची.  एकदा खेळाच्या तासाहून परत येताना मी वेगळीच मुलं घेऊन आले. अर्थात मला कळलं नव्हतंच. मुलंच म्हणाली, ‘यु आर नॉट अवर टिचर.’ आता? त्यांची शिक्षिका शोधून ती मुलं तिच्या ताब्यात दिली आणि भांबावलेली माझी मुलं मी परत आणली. आता सारं गमतीचं वाटतं, पण तेव्हा गडबडून आणखी गोंधळ घातला जायचा.

आम्ही  इथं आलो त्या काळात भारतातून इथं येणा-यांची संख्या तुलनेनं कमी होती त्यामुळे स्थानिकांनाही आमच्यासारख्यांची सवय पटकन होत नव्हती.  आता इथं येणा-या तरुण मुलांना जागतिकीकरणामुळे अशा अडचणी येत नाहीत.  पिढीपिढीमध्ये पडलेला फरकही  ठळकपणे जाणवतो. काही ठरवून लवकरच परत जातात तर काही भारत सोडायचा या विचारानंच आलेले असतात. भारतातली तरुण पिढी  ‘जिप्सी’ होत चालली आहे असं वाटतं कारण यांच्यासाठी कोणता देश हे महत्त्वाचं राहिलेलं नाहीच. कर्तृत्वाला वाव मिळवण्याची,  कामाची, फिरण्याची, संधी त्यांना महत्त्वाची वाटते . पूर्वीच्या मानानं हे सहजसाध्यही आहे. याचं कारण तंत्रज्ञान, संपर्कात राहण्याची साधनं, बदललेला भारत, सुधारलेली आर्थिक स्थिती हे असावं आणि पालकांची बदललेली दृष्टीही. मला आठवतंय जेव्हा आमची मनःस्थिती दोलायमान होती, तेव्हा दोन्हीकडच्या पालकांनी आम्हाला ‘तुमच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घ्या’ असा सल्ला दिला होता. इथं येणा-या तरुण मुलांचे पालक मात्र मुलांना परदेशातच राहा असा सल्ला देतात. परिस्थिती आणि कारणं अशीही बदलत जातात हे आजूबाजूची स्थित्यंतरं पाहताना, भूतकाळात डोकावताना जाणवतं.

मनुष्य जिथं जातो तिथं आवडीनिवडी जपत मुळं रुजवतो. आपलं असं काहीतरी टिकवण्याची धडपड करतो, नवीन गोष्टी स्वीकारतो. तरुण वयात आपण कुठं आहोत याला खरंच फार महत्त्व दिलं जात नाही आपल्याकडूनच. आमचंही तेच झालं. उत्साह होता, आव्हानं पेलण्याची ताकद होती, स्वत:ला सिद्ध करण्याची खुमखुमी होती. आपण कोणत्या देशात आहोत हे महत्त्वाचं नव्हतंच. जीवलगांची दोन वर्षांनी होणारी भेट त्या वेळेस पुरेशी वाटायची.  इथंच स्थायिक होण्याचा निर्णय घेताना नक्की काय विचार असावा ह्याचा विचार केला तर एकच एक मुद्दा निश्चितच सांगता येणार नाही.  पैसा आणि आराम ह्या दोन गोष्टींसाठी मायदेश सोडतात असं भारतात म्हटलं जातं पण तेही कारण नाही. खूप सा-या कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे हे स्थलांतर असं म्हणेन मी. हे सर्वांच्याच बाबतीत होत असावं. आम्ही भारत सोडताना तात्पुरताच सोडला होता मग तरीही आम्ही इथंच का राहिलो, या प्रश्नाचं एकच एक असं ठोस  उत्तर आम्हाला अजूनही सापडलेलं नाही असंच म्हणावं लागेल.

Read More 

What do you think?

39 Points
Upvote Downvote

Written by Mohana Joglekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

या संस्थेबद्दल इतरांना कळवा ही विनंती

श्री_महादबा_पाटील_महाराज_ह्यांचे_संक्षिप्त_चरित्र