in

ब्लू बॅकची शिकार…

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

मी वाचलेले पहिले पुस्तक होते Drums along the Mohwak. ज्या काळात युरोपियन लोकांनी अमेरिकेची जमीन पादाक्रांत केली, ज्या काळात इंग्लंडच्या राजाच्या सैन्याविरुद्ध अमेरिकन जनता लढली, त्या काळात घडलेली ही गोष्ट.

मी जेव्हा वाचली तेव्हा माझ्या मनात, संताप, दुःख, इ. भावना उफाळून आल्या कारण त्याच काळात मी रेड इंडियन्सची गोऱ्यांनी कशी ससेहोलपट केली यावर पुस्तके वाचली होती. असे असले तरीही हे पुस्तक वाचताना, मला मोठी मौज वाटली हे मला नाकारता येणार नाही. आता एवढ्या वर्षांनंतर या पुस्तकाचा मी स्वैर अनुवाद करायला घेतला आहे.. सहज. त्यातील एका शिकारीचे वर्णन.. यावर एक सिनेमाही निघाला होता, पण पुस्तकाइतका चांगला नाही..

…तो ब्लू बॅक नावाचा म्हातारा इंडियन, नुकताच हॅझेनक्लेव्हरची टेकडी पार करून कॅनडा क्रीकच्या खोऱ्यात उतरला होता. त्याने क्रीकचा पश्चिमेचा काठ धरला आणि तो धबधब्याच्या दिशेने गेला. तेथेच एका खालवटीत असलेल्या रानात त्याला हरिणांच्या पहुडण्याची जागा सापडली. तो तेथेच एखाद्या हाऊंड कुत्र्यासारखा दबा धरून बसला. थोड्याच वेळात त्याला हरिणाचा माग सापडला आणि त्यावरून त्याने त्या हरणाच्या सकाळच्या हालचालीचा मागोवा घेतला.
तो माग ब्लू बॅकला त्या हरणाने जेथे पाणी प्याले, हागले आणि चरले त्या ठिकाणी घेऊन गेला. थोड्याच वेळात तो माग त्याला एका तळ्याच्या काठी घेऊन गेला. काठावर त्या नराने लिलीची रोपे विस्कटलेली त्याला दिसली. त्याच्या पावलटीवरून तोपर्यंत ब्लू बॅकला उमगले होते, की तो माग मोठ्या नराचा होता. खरे तर, त्याला हरणाचा मोठा नर नको होता, कारण तो घरापासून इतका दूरवर आला होता, की अर्धी शिकारही उचलून ओरिस्काला, घरी जाणे त्याला अशक्यच होते. त्याला खरे तर एखादे जवान हरीण किंवा मादी पाहिजे होती. त्याच्या तरूण बायकोने, मेरीने त्याला एखाद्या हरिणीचे कातडे मिळाले तर बघायला सांगितले होते. तिला त्या कातड्याचा एक आखूड स्कर्ट शिवायचा होता. तिला कर्कलँडने नुकताच बाप्तिस्मा दिला होता.

पण आता इतक्या वेळ मागावर राहिल्यावर ब्लू बॅकला ते हरीण सोडायचे नव्हते. शिवाय त्याला त्याच्या शिंगामध्ये जास्त रस होता. एक प्रसिद्ध सापळे लावणारा शिकारी ज्यो बॉलिओ ब्लू बॅकसारख्या माणसांना मांसहावरट म्हणत असे. प्रत्येक हिवाळ्यात रात्री गारठल्या आणि झाडाचे शेंडे रंगीत व्हायला लागले, की ब्लू बॅकला कधी एकदा मोठी शिकार करतो असे व्हायचे. मोठ्या हरणाचे मांस पचायला जड, पण त्याने दिवसभर पोट भरलेले राहायचे, हा एक फायदा होता. या नराला मोठे शिंगेही असावीत.

काल रात्री जेव्हा तो त्याच्या ओरिस्कातील झोपडीसमोर बसला होता तेव्हा त्याच्या कानावर अंधारात वाहणाऱ्या पाण्याचा गुढ आवाज पडला आणि त्याला उत्तरेकडे शिकारीला जाण्याचा अनावर मोह झाला. जेव्हा त्याच्या बायकोने त्याला हरिणाचे कातडे मागितले तेव्हाच त्याने कॅप्टन डिमूथला शिंगे देण्याचा शब्द पाळण्याचा निश्चय केला. हरिणाच्या कातड्याचे नंतर बघता येईल, तो मनाशी म्हणाला.

त्याने पहाटेच घर सोडले, मोहॉकची नदी पार केली आणि मार्टीनच्या लागवडीचा रस्ता पकडला. त्याच्या मनात मार्टीनकडे जाण्याचा विचार आला, पण त्याला लवकरात लवकर उत्तरेकडे पोहोचायचे होते. पाणथळीत त्याची चाहूल लागताच एक घोडी उधळली आणि धुक्यात नाहिशी झाली. त्याला क्षणभर तिची शिकार करण्याचा मोह झाला खरा, पण ती मार्टीनच्या हद्दीत होती, म्हणून त्याने तो विचार सोडून दिला, नाहीतर घोड्याचे मांस रुचकर असते असे त्याचे मत होते.

मार्टिन त्याचा चांगला मित्र होता आणि त्याची बायको सुस्वभावी असावी. त्याने त्या घोडीला सोडून दिले. त्या मोठ्या नर हरणापर्यंत पोहोचण्यास त्याला दूपार झाली. त्याने चिकाटीने दुपारभर त्याचा माग धरला. शेवटी त्याला उमगले की तो गोल गोल फिरतोय. त्याने माग सोडला आणि जवळच्या रस्त्याने त्या हरणाच्या रात्रीची विश्रांतीची जागा जवळ केली. पायाचा आवाज होणार नाही अशी काळजी घेत तो दुडक्या चालीने पळत होता. त्याच्या अंगावरील हरणाचे कातडे धापेने खाली वर होत होते. त्याच्या शिकारीच्या अंगरख्यावर घामाच्या धारा लागल्या होत्या. त्याच्या हॅटभोवती घामाचे वर्तुळ आता स्पष्ट दिसू लागले होते. चालताना त्याने खारवलेल्या मासाचा तुकडा तोंडात टाकला आणि चावून चावून त्याचा रस गिळला. त्याच्याकडे तेवढेच अन्न होते, पण त्याची त्याला फिकीर नव्हती. शिकारीच्या आधी पोट रिकामे असलेले बरे असते. शिकार घरी आणायच्या आधी भूकेने जीव जायची वेळ आलेली अजून चांगले.. मग शिकार खाली फेकून पलंगावर लेटायचे आणि तुमच्या बायकोला ते हरीण सोलताना पाहायचे, यात एक वेगळेच समाधान असते. पोटावर हात ठेवून, पलंगावर पडून तिची धांदल पाहण्याची मजा काही औरच.

त्या वातावरणात हवेला धुरासारखी निळसर छटा आली होती. ती झाक पार क्षितिजापर्यंत पसरली होती. हिवाळा जवळ आल्याची ही अजून एक खूण! या हवेत झाडे मोठी दिसतात आणि जेव्हा तुम्ही जंगलातून बाहेर येता तेव्हा जमीन तुम्हाला जास्त सपाट भासते. या अशा वातावरणात जर तुमच्या दृष्टीस एखादे हरीण पडले तर ते दृष्य मोठे विलोभनीय असते. सावल्या लांबण्याच्या आत ब्लू बॅक मार्टिनच्या पाणथळीत पोहोचला. तेथे पोहोचल्यावर त्याने ऊनवाऱ्याचा अंदाज घेतला. वारा पडला होता आणि चंद्र वर येईपर्यंत वारा सुटेल असे त्याला वाटत नव्हते. त्यानंतर दक्षिण-पूर्वेचे वारे एक दोन तासासाठी वाहू लागेल असा त्याचा कयास होता, पण तोपर्यंत तो नर परत जागेवर चरण्यासाठी येईल असा अंदाज त्याने केला. पहाटेआधी वारा परत एकदा दिक्षिण-पूर्वेकडून उठेल आणि नंतर बहुधा ते वारे पश्चिमेकडे वाहू लागेल.

ब्लू बॅकने पाणथळीपासून अर्धा डझन रॉडवर जागा निवडली जेथे विशाल हेमलॉकचे वृक्ष उभे होते. त्याने तेथेच खाली पडलेल्या हेमलॉकच्या सुयांमध्ये जागा घेतली आणि त्याचे डोके एका मुळावर टेकवले, हातात त्याची ठासणीची बंदुक घेतली, डोळ्यावर त्याचे हॅट ओढली आणि तो शांतपणे निद्रेच्या स्वााधीन झाला.

तो पार संध्याकाळी उठला. उठल्या उठल्या त्याने पाणथळीवर नजर टाकली, पण त्याला ते हरण काही दिसले नाही नाही ना त्याचे कुठलेही चिन्ह. हुंकार भरत त्याने जमिनीला पाठ टेकली. तो एक सच्चा ख्रिश्चन असल्यामुळे त्याने प्रार्थना केली ,‌‘‌‘हे परमेश्वरा, मी भूकेला आहे. मी आजवर सज्जनपणे वागत आलो आहे. मला एक चांगली शिकार मिळू देत. मी त्याची शिंगे कॅ. डिमूथला विकेन आणि त्या पैशाने रम पिईन, पण मी कर्कलँडला हरणाच्या खांद्याच्या मासांचा तुकडा देईन. जर त्याचे वजन कमी भरले तर मी त्याला पायाचा तुकडा देईन आणि त्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मी त्याची तंबाखू एका आठवड्यासाठी तरी खाणार नाही. मी एक सज्जन माणूस आहे आणि कायम सज्जन राहाणार आहे.! आमेन!‌’‌’

एवढी प्रार्थना करून तो परत निद्रेच्या स्वाधीन झाला. ही प्रार्थना ख्रिश्चन प्रार्थना होती. काही कमी राहायला नको म्हणून त्याने डोळे मिटले आणि परत एकदा मनातल्या मनात त्याची नेहमीची इंडियन प्रार्थना म्हटली.

त्याला वायव्य दिशेने, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या हरणाची चाहूल लागली आणि त्याची खात्री पटली, की परमेश्वर त्याला मदत करतोय. त्याने हात उशाला घेतला आणि तो न घोरण्याची काळजी घेत परत झोपला.

वीस फुटावर जांभळ्या रंगाच्या हेमलॉकच्या फांदीवर एक खार चिरकत शेपटी उंचावत धावली. ‌‘‌‘गप्प रहा चोरटे ‌’‌’ ब्लू बॅक मनात म्हणाला. त्याच क्षणी त्या खारीने तिची मान उंच केली. ती खार गप्प झाली, पण रांगणाऱ्या त्या म्हाताऱ्या इंडियनला पाहून तिने चाळीस फुट उंचावरच्या फांद्यांवरून उड्या मारल्या. संधिप्रकाशासारखा प्रकाश त्या पाणथळीवर पसरला होता, जणू काही कालच्या दिवसातील उरलेला प्रकाश. गवताच्या शेंड्यांवर धुके अडकले होते. सूर्याचा अजून पत्ता नव्हता, पण वर उंचावर पक्षांची लगबग चालू झाली. त्यांचा किलबिलाट धुक्यातून खाली आला. तो आवाज त्याच्या कानाला मोठा गोड भासला.
ब्लू बॅक एका तोडलेल्या वृक्षाआड खाली पसरला. त्याने काळजीपूर्वक आपली बंदुक सावरली आणि हरणाच्या जागेवर तिची नळी वळवली. जमिनीवरील वाळलेली तपकिरी पाने आणि तो यांच्यात आता काही फरक रहिला नाही.

जसे धुके वर चढले तसे त्या शांत शिकाऱ्याच्या चेहऱ्यावर तणाव दिसू लागला. त्याचा एक डोळा बंदुकीच्या घोड्यामागे आला. सगळे कसे एखाद्या चित्रात असावे तसे दिसत होते. बंदुक, बंदुकीचा घोडा, त्यामागचा त्याचा डोळा, चापावरचे आवळलेले बोट, आकाशात परमेश्वर आणि धुक्यातून उडणारे पक्षी. आता फक्त कमी होती ती शिकार. हरीण!

त्या नराने आपले सुंदर डोके वर काढले. त्याला त्याच्या पायवरचे ठिपकेही मोजता आले. आता मात्र त्याची मांसाची भूक अजूनच तीव्र झाली. त्याने चापावरचे बोट आवळले, जणू काही त्यात परमेश्वराची इच्छा वसली आहे. पुढच्याच क्षणी आसमंतात त्या बंदुकीचा बार घुमला. धुक्याची वलये उठली आणि वर गेली. पक्षांचा कलकलाट झाला. त्या हरणाने उंच उडी मारली, शेपूट पायात घातली, परत एकदा उडी मारली आणि तो कोलमडून पडला. बंदुकीच्या दारूच्या धूराची माळ ब्लू बॅकच्या राकट चेहऱ्यावर पसरली. धूर ओसरल्यावर ब्लू बॅकचे दिलखुलास हसू दिसू लागले. एखाद्या अस्वलाप्रमाणे ब्लू ब्लॅकने गवतामधून धाव घेतली. तो त्या मेलेल्या हरणावर ओणवा झाला आणि त्याने आपल्या शिकारीच्या चाकूने त्याचा गळा चिरला. मग त्याने ते हरीण उलटे केले आणि त्याचे पोट पार बरगड्यांपर्यंत कापलेे आणि त्या पोटात आपले हात खुपसले. आतड्याचा आणि गरम रक्ताचा वास सगळीकडे पसरला. त्याने ती आतडी साफ केली आणि मग त्याच्या डोक्याकडे नजर टाकली.. सोळा आणे काम झाले होते. परमेश्वर काम करतोय तर, तो मनात म्हणाला.

तो मनापासून हसला. त्याने एवढ्या मोठ्या नराची अपेक्षा परमेश्वराकडे केली नव्हती, पण आता मिळालाच आहे तर त्याने पाद्री कर्कलँडला दोन तीन बरगड्या देण्याचे ठरवले…

– जयंत कुलकर्णी

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Jayant Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

कार्ल मार्क्स…

वेचताना…: जिज्ञासामूर्ती