अभिनेत्री पूनम पांडे जिवंत आहे की मरण पावली आहे हे अजून नेमके कळलेले नाही. परंतु लोकांनी सवयीप्रमाणे तिची ‘अब्रू’ चव्हाट्यावर आणलीय! आता तिची अब्रू म्हणजे काय? तिचं शरीर, तिचे लैंगिक अवयव की तिच्या सेक्स विषयक भावना? तसं तर तिने तिचे सारं शरीर पूर्वीच दाखवलेलं आहे. देहावरचे सर्व कपडे पूर्वीच काढलेत! मागून पुढून, वरून खालून लोकांनी तिला पाहिलंय! कुणी एकांतात बंद खोलीत वा लपून छपून पाहिले असेल, कुणी मित्रांबरोबर मिटक्या मारत पाहिले असेल तर कोणी थेट ग्रुप करून एन्जॉय करत पाहिले असेल पण तिला पाहिलेलं आहे हे नक्की! ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट नाही त्यांनी नसेल पाहिले. पण त्यांची संख्या किती हे सांगता येणार नाही. आता हेच पहा की, ती मरण पावलीय असं नुसतं सुतोवाच केलं गेलंय तरी तिच्या पोस्टवरती लोक तुटून पडलेत! जणू तिच्या देहावर पडण्याचे सुख त्यात अनुभवता आलेय. कदाचित ती जिवंतपणी यांच्यासमोर एकांतात अशीच विवस्त्र येती तर यांच्या सुखभावना प्रत्यक्षात अंमलात आणल्या असत्या! तिचा दोष काय होता? काय अपराध होता? तर ती एक पॉर्नस्टार होती. सेक्सविषयी तिच्या भावना आणि तिचं राहणं, जगण्या विषयीचे तिचे दृष्टिकोन कथित सभ्य लोकांच्या पांढरपेशी परिघाबाहेरचे होते! सर्वांनी तसेच असले पाहिजे असेही काही नाही मात्र जो परिघाबाहेर राहून बंधने तोडतो त्याला त्याची किंमत मोजावी लागते हा आपला ‘न्याय’ आहे!
ती जे काम करत होते होती ते चांगले की वाईट याची व्याख्या व्यक्तीच्या नैतिक अनैतिकतेच्या परिभाषा कोणत्या आहेत त्यावर अवलंबून आहे. तसे तर आपण सर्वच नागवे असतो, आपल्या सर्वांनाच लैंगिक भावना असतात, आपण सर्वचजण सेक्स करत असतो परंतु ते बंद खोलीत असतं! त्यामुळे या गोष्टी खुल्यावर करणाऱ्या माणसाविषयी व्यक्तीविषयी समाजामध्ये जसा संताप असतो तसेच सुप्त आकर्षणही असतं. या व्यक्ती जे काम करत असतात ते आपण करू शकत नसतो, आपण जे अनुभवलेलं नसतं, ज्याची केवळ कल्पना केलेली असते अशाचं आपल्याल आकर्षण असतं. त्यातही या गोष्टी लैंगिक भावनांशी निगडीत असल्या की अशा गोष्टींना आपल्याला मनातल्या मनात एन्जॉयही करायचं असतं आणि त्याच वेळेस दांभिक सभ्यतेचा बुरखा पांघरून त्याचा धिक्कारही करायचा असतो! हेच आपण पुनम पांडे बरोबर करत होतो!
आता ती मेली आहे असं म्हटलं जातंय! ती किती नीच होती, छिनाल होती, बेफाम अनैतिक होती, किती बदचलन होती, तिचे चरित्र किती खालच्या पातळीवरचं होतं याच्या चर्चा लोक करताहेत. अर्वाच्च शब्दांमध्ये तिला दूषणे देताहेत. दोष देणे, गुन्हेगार ठरवणे हे समाजाचे सर्वात सोपे नि आवडते काम आहे कारण याच्यासाठी आपल्या अंगी ते चांगले पण असायलाच हवे असे काही नसतं! मात्र त्या व्यक्तीला दोष देऊन आपण तसे नाही हे सांगण्याची ती एक नामी संधी असते! कदाचित पूनम पांडे जिवंतही असेल. हा सर्व एक पब्लिसिटी स्टंटही असू शकतो कारण जेमतेम काही दिवसांपूर्वी आपल्या बजेटमध्ये सर्वाइकल कॅन्सर विषयी मोठी आर्थिक तरतूद केली गेलेली आहे आणि हा आजार काही तडकाफडकी मरण देणारा आजार नसून जी मुलगी काही तासांपूर्वी नीट होती ती केवळ यामुळे मरण पावली असावी असं छाती ठोकपणे सांगता येत नाही त्यामुळे हा एक बनाव असू शकतो. अर्थात हाही एक अंदाज आहे. अशा बनावाद्वारे त्या आजाराविषयी जागृती करायची असू शकेल किंवा ज्या कंपनीला यावर व्हॅक्सिन्स बनवायचे असतील त्या कंपनीबरोबर जाहिरात करायचे असेल. काहीही तर्क असू शकतात. ती जिवंत असो वा मृत असो तिला शिव्या घालून लोकांना हे दाखवून देण्याची संधी मिळालीय की आम्ही किती नैतिकतावादी सभ्य आहोत, आम्ही किती चांगले आहोत आणि ती किती छिनाल होती, वाईट होती!
आपण जेव्हा एखाद्याला असंस्कृत, अनैतिक ठरवत असतो तेव्हा आपण मात्र सभ्य सच्चे आहोत असं आपल्याला बिंबवायचे असते. मात्र समाज म्हणून आपलं वर्तन तसं नसतं हे अशा घटनांवर व्यक्त होणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहून लक्षात येते!
बेसिकली आपण नालायक असतो, स्वार्थी असतो. काल-परवापर्यंत ज्या वृत्तीविषयी वा जी गोष्ट आपल्याला अपराध वाटत असते, गुन्हा वाटत असते तीच गोष्ट किंवा तो अपराध करणारी व्यक्ती आपल्या बाजूच्या माणसांमध्ये येऊन बसली की तिच्याविषयी आपल्याला कसलाच संताप येत नाही! कारण ती व्यक्ती आता आपल्या बाजूने आलेली असल्यामुळे आपली कथित शक्ती वाढलेली असते! आपला संताप त्या अपराधाबद्दल, गुन्ह्याबद्दल वा वाईट प्रवृत्तीबद्दल नसतो किंबहुना ती व्यक्ती आपल्या विरोधात आहे याचा तो चडफडाट असतो. त्यामुळे दिवसांपूर्वी आपण ज्या व्यक्तीला शिव्या दिलेल्या असतात ती व्यक्तीसुद्धा आपल्याला गोड वाटू लागते! आपलं चरित्र हे असं दोन तोंडी गांडूळासारखं आहे आणि तरी देखील आपण प्रत्येकाला उपदेश करत असतो. समोरच्याला वाईट किंवा चांगला या दोन्हीपैकी एका तराजूमध्ये हमखास टाकत असतो कारण त्याशिवाय आपला चांगुलपणा सिद्ध होणार नसतो. पूनम पांडे विषयी आपण तेच करत आहोत कारण तिला छिनाल रांड कुलटा बदचलन म्हणल्याशिवाय आपण सभ्य चांगले आहोत याचे दाखले देता येत नाही ही आपली मजबूरी असते!
तिचं स्वतःचं आयुष्य आहे. ते ती कशी जगली, तिचे जगण्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन काय होते यावर शेरे मारण्याचा आपल्यापैकी कोणालाही अधिकार नाही. तरी देखील आपण जज बनतो आणि तिच्याविषयी अश्लाघ्य शेरेबाजी करतो. ती चांगली आहे असेच म्हटले पाहिजे असंही काही नाही. आपण कुठल्याच गोष्टीकडे तटस्थ दृष्टीने पाहू शकत नाही हा आपला मोठा लोचा झालेला आहे किंबहुना समाजामध्ये जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा आपली वर्तणूक कशी असते त्यावरून आपण स्वतःला जज करायला हवे. मग आपल्याला कळेल की आपल्यामध्ये काय दडलं आहे! बुरा जो देखने मै चला, मुझसे बुरा न कोय ही आपली सर्वांचीच अवस्था आहे मात्र आपण ती स्वीकारत नसतो! अर्थात आताच्या व्हॉटसअपबाधित काळातले लोक कबिरांनाही शिव्या घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत तिथे पूनम पांडे काय चीज आहे!
सोशल मीडियामुळे एक नक्की झालं की लोकांना थेट माणूस चघळण्याचा एक विकृत प्लॅटफॉर्म मिळाला! एखादी घटना, एखादा जिवंत / मृत व्यक्ती लोक हाती घेतात आणि त्याला ते निवांतपणे निगुतीने चघळत राहतात! अगदी निर्भया नाव देऊनही आपण चघळू शकतो! अथवा कुठली एखादी घटना असू शकते, कोणतीही व्यक्ती चघळण्यास पुरशी असते. चघळून चघळून तिचा लगदा झाला की ती फेकून देतो! थोडक्यात आपल्याला एक नित्य नवे हाडूक हवे असते जेणेकरुन त्याद्वारे आपण किती चांगले आहोत याचा आपल्याला केवळ देखावा करायचा असतो! माणसाने आपल्या संवेदना, भावना हडूक चघळण्याच्या टप्प्यावर आणून ठेवल्यामुळे आपण एक श्वापद आहोत हे नव्याने सिद्ध झालेय. पूनम पांडे हे ताजे हाडूक आहे, त्यातला रस संपला की नवे हाडूक आपण हाती घेऊ!
जर आपण खरेच चांगले, सदवर्तनी असू तर वाईटाचा, वाईटपणाचा आणि वाईट वागणाऱ्या लोकांचा आपल्याला सदैव संताप यायला हवा आणि आपलं वागणंही चांगलं असावं! दुर्दैवाने या दोन्ही गोष्टी आपण गमावून बसलो आहोत त्यामुळे केवळ देखावा करणे हेच आपल्या हाती उरलेय! आणि आपल्यापैकी बहुतेकजण हेच तर करत असतात!
हे वाचताना काही दोषलिप्त चेहरे तुमच्या डोळ्यापुढे तरळले असतील आणि आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून बसत आहोत याची आपल्याला लाजशरम वाटत नाही इतके आपण कोडगे झालो आहोत हे कळलेही असेल पण वळले नसेल! म्हणून पूनम पांडे त्यातल्या त्यात थोडी बरी तरी, कारण ती जशी होती तशी राहत होती. ती दोनतोंडी गांडूळ नव्हती! तरीही तिचे एक चुकलेच की सवंग प्रसिद्धीचा शिक्का बसेल अशा पद्धतीने तिने कॅन्सरच्या जागृतीच्या नावाखाली हा सर्व मेलोड्रामा केला. तिचा हा मार्ग नक्कीच चुकीचा होता. चुकीला माफी नसते हा नियम काहींना लागू असतो, काहींना नसतो! जनतेला नैतिकता शिकवायला आवडत असल्याने पूनमसारख्या कथित चीप व्यक्तिरेखा सहजी ठोकून काढणे हा सर्वांचा आवडता छंद असतो! इतरांना शहाणपणा शिकवण्यासाठीचा नैतिकतेचा दंडुका आपल्या हाती शोभतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे हे खरे!
– समीर गायकवाड
GIPHY App Key not set. Please check settings