in

नवीन पुस्तक – फ्रेंच राज्यक्रांती

नमस्कार! वाचक मित्र आणि मैत्रिणींनो,

सांगण्यास आनंद वाटतोय, की फ्रेंच राज्यक्रांती हे पुस्तक छापून हाती आले आहे. एकूण पाने ५३३ झाली आहेत. किंमत आहे. रु. ६३०.०० याबरोबर माझे २५० रुपये किंमतीचे एक पुस्तक ‘‘ गुलामीची १२ वर्षे ’’ हे सप्रेम भेट देण्याचे ठरवले आहे.

उत्कृष्ट प्रतीचा कागद वापरला आहे.

फ्रेंच राज्यक्रांती, हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला भारतातील राजकारणाबद्दल वाचतोय की काय असा कदाचित भास होईल. यातील कित्येक परिच्छेद आपण उदाहरणे म्हणून वापरू शकतो. खाली या पुस्तकातील मनोगताचा काही भाग टाकला आहे..

मनोगत..

फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल जे साहित्य लिहिले गेले आहे किंवा उपलब्ध आहे त्या साहित्याचा प्रवास टप्प्याटप्प्याने झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. सुरुवातीच्या लेखकांनी त्यांच्या लिखाणाला आणि निष्कर्षासाठी आधार घेतला, तो लिहून ठेवलेल्या आठवणी, पत्रके (त्या काळात या पत्रकांमध्ये जनमत हलवण्याची ताकद होती), वर्तमानपत्रे, ऐकीव कहाण्या आणि सामाजिक आणि राजकीय पूर्वग्रह असलेली मते; त्यानंतरच्या लेखकांनी मात्र संदर्भ गोळा केले आणि इतिहास लिहिला. उदा.पॅरिस कम्युनच्या दप्तरांचा त्यांनी अभ्यास केला आणि सत्यावर आधारलेला इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला जो आजच्या इतिहासकारांनाही उपयुक्त आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेस आणि नंतर जी मते मांडण्यात आली ती इतिहासाच्या मुशीत नष्ट झाली असे ॲक्टनसारखे इतिहासकार म्हणतात ते काही खोटे नाही, कारण जी मते मांडण्यात आली, जे काही निष्कर्ष काढण्यात आले, त्याची आजही पुनर्मांडणी चालू आहे. त्या काळातील होणारे विध्वंस आणि नंतर होणारी उभारणी हा क्रम आजच्या काळातही सुरू आहे. त्या काळात मांडलेले तत्त्वज्ञान वेगवेगळ्या स्वरुपात तग धरून आहे आणि हे तत्त्वज्ञान आजही राजकारणी, अर्थतज्ञ, आदर्शवादी मंडळींना जेरीस आणते. किंबहुना आजच्या आधुनिक जगातील जटील प्रश्र, अडचणी आणि संकटे याची पूर्वसूचना फ्रेंच राज्यक्रांतीने दिली होती असे म्हणायला जागा आहे. अर्थात, इतिहास जसाच्या तसाच परत घडतो असे नाही, त्यात थोडाफार फरक पडतोच, त्यामुळे सध्या जे घडते आहे त्याचा इशारा फ्रेंच राज्याक्रांतीत कसा मिळतो यासाठी वाचकांना जरा अभ्यास करावा लागेल. एका इतिहासकाराने म्हटल्याप्रमाणे आपल्याला फ्रेंच राज्यक्रांती समजणार नाही जोपर्यंत ही क्रांती सामान्य कायद्याला धरून होती आणि सामान्यांनी घडवून आणली होती हे आपण समजून घेत नाही. या क्रांतीत भव्य दिव्य काही नव्हते, ना ती एकमेवाद्वितीय होती. (अर्थात हे खोटे आहे. यामागे समाजवादी व अराजकवादी मंडळींचा हात होता हे आता सिद्ध झाले आहे). त्यामुळे काही लेखक ज्याप्रमाणे या घटनेने अत्यंत भारावून गेले होते तसे भारावून जाण्याचे आपल्याला कारण नाही. आपण जे घडले होते त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल.

या पुस्तकात त्या काळातील महत्त्वाच्या व्यक्तिंचा मानसशास्त्रीय प्रभाव त्यांच्यावर आणि समाजावर कसा पडला याचा ऊहापोह केला आहे. त्यांचे आयुष्य, ते कसे जगले आणि ते मृत्यूला कसे सामोरे गेले हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एके काळी उत्तुंग स्थानावर पोहोचलेली ही माणसे एका क्षणात कशी धुळीस मिळाली, ज्यांच्या अंगावर भरजरी पोषाख होते ते नंतर भणंग कसे झाले याचीही ही कहाणी आहे. या माणसांच्या चरित्रामधून उलगडत जाणारा हा फ्रेंच राज्यक्रान्तीचा इतिहास वाचकांना मनोरंजक वाटेल, पण त्याच वेळी त्यांच्या अंगावर काटा उभा राहील याची मला शंका नाही. दोन व्यक्तिचित्रांमध्ये ऐतिहासिक घटना दिल्या आहेत ज्यामुळे या कथेमध्ये सुसंगती राहील अशी काळजी घेतली गेली आहे. या व्यक्तिचित्रांना जोडणारी ही पाने नसती तर कदाचित हा इतिहास समजणे अवघड गेले असते. जगाचा इतिहास म्हणजे त्यातील थोर माणसांचे चरित्रच असते असे उगाच म्हणत नाहीत. या पुस्तकातील नायकांचा असा विश्वास होता, की ते समाजाचे नेतृत्व करत होते आणि ते खरेही होते, पण त्यांचेही नेतृत्व कोणीतरी करत होते हेही स्पष्ट आहे. या पुस्तकात या क्रांतीची कथा सांगितली आहे ती तुम्ही इतरत्र वाचली असेल, पण माणसांचा क्रांतीवरील प्रभाव आणि माणसावर पडलेला क्रांतीचा प्रभाव या बद्दल तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल.

क्रांतीमध्ये जी उलथापालथ झाली त्यात माणसांचे अनेक गट निर्माण झाले. या गटात असंख्य नागरिक विभागले गेले तर काही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मिहाबूच्या भोवती जी माणसे जमा झाली होती ती होती, ‌‘लाफायेत, बार्नेव्ह, सियेस, यांच्यासारखी नॅशनल असेंब्लीमधील राजकारणातील आदर्शवादी आणि कारस्थानी राजकारणी. तर दुसरीकडे व्हर्निऑ, कॉन्डोसे, ब्रिस्सॉट, रोलँड, दातो इ. इ. हे जिहाँ (Gironde)गटात होते. ही मंडळी एक विचारधारा असलेली होती. यात अर्थतज्ञ होते, अहंगंड असलेले पुरोगामी लोक होते. अजून एका गटात रॉबस्पिअर, सेंट जस्ट, कुथाँ हे कमिटीचे सदस्य , दहशतीचे पुरस्कर्ते होते. ज्यांचा नंतर जाग्या झालेल्या फ्रान्समध्ये नाश झाला. बर्रास, ताल्येहाँ, फुशे आणि त्यांचे पाठिराखे ज्यांनी वरील दहशतीनंतर राज्य सांभाळले आणि एका सिसेरियन हुकुमशहाचा मार्ग मोकळा केला (नेपोलियन). फ्रेंच राज्यक्रांती या गटांभोवती हेलकावे खात राहिली. या सगळ्या माणसात तीन माणसांनी मात्र इतरांना आपल्या प्रभावाखाली झाकाळून टाकले. ‌‘मिहाबू, दातो आणि बोनापार्ट. तुम्ही परमेश्वर म्हणा, नशीब म्हणा किंवा इतर काही म्हणा, परमेश्वराने या तिघांच्या हातून अराजकाच्या परिस्थितीतून सुव्यवस्था आणण्याचे प्रयोग केले. या तीन वास्तववादी माणसांचे कार्य जर पाहिले, तर त्यात खूपच साम्य आहे.

फ्रेंच राज्यक्रांतीवर हे पुस्तक लिहिताना मला मोबियसच्या पट्टीची आठवण झाली. या पट्टीवर जर आपण फ्रेंच राज्यक्रांतीतील घटना टाकल्या तर आपण जेथून सुरुवात केली तेथेच परत येऊन पोहोचतो. ही राज्यक्रांती फसली असे म्हणायचे का? हा एक वादाचा मुद्दा आहे. समाजवादी, कम्युनिस्ट आणि इतर डाव्या विचारांची मंडळी असे कधीच म्हणणार नाहीत आणि मान्यही करणार नाहीत. ही राज्यक्रांती घडवून आणण्यात आली ती खालील कारणांसाठी – राजेशाही नष्ट करणे, चर्चचा प्रभाव कमी करणे, सत्ता नाहीरे वर्गाकडे देणे, प्रजातंत्राची स्थापना करणे, संविधानाची स्थापना करणे..इ.इ.इ. पण काय झाले हे आपण थोडक्यात बघू – नेपोलियनने परत राजेशाही प्रस्थापित केली, चर्चचा प्रभाव काही कमी झाला नाही. चर्च नष्ट करून रॉबेस्पियरने नवीन धर्माची स्थापना केली पण तो थोड्याच कालावधीत नष्ट झाला, सत्ता गरीबांकडे राहीली नाही. नेपोलियन राजा झाला आणि संविधान लोप पावले. नेपोलियन सत्तेवर आला आणि प्रजातंत्राचे बारा वाजले. हे पाहिल्यास, ही क्रांती फसली असेच म्हणावे लागेल. जो धर्म जनमानसात रुजलेला आहे, त्याची जागा नवीन धर्म पूर्णपणे घेऊ शकत नाही. उदा. हिंदू धर्मावर एवढी आक्रमणे झाली, तो नष्ट करण्याचे एवढे प्रयत्न झाले पण हा धर्म काही नष्ट झाला नाही. ज्यूंडाइझम ख्रिश्चन नष्ट करू शकले नाहीता आणि इस्लाम ख्रिश्चन धर्म नष्ट करू शकला नाही, मग त्यांची मूलभूत तत्त्वे काही असोत…

आता जे पुस्तक ‘‘गुलामीची १२ वर्षे’’ मी सप्रेम भेट देणार आहे, त्याबद्दल थोडेसे..

आयुष्यातील तीस वर्षे स्वतंत्र राज्यात स्वातंत्र्य उपभोगल्यावर सॉलोमन नॉरथप या माणसाचे अपहरण झाले व तो गुलाम म्हणून विकला गेला. त्या भयंकर गुलामीतून १८५३ साली त्याची नशिबाने सुटका झाली तेव्हा एक तप उलटून गेले होते. त्या भयंकर काळाबद्दल किंवा एकंदरीतच त्याच्या आयुष्याबद्दल लिहिले तर वाचकांना त्यात रस वाटेल असे मित्रमंडळींना वाटल्याने हा लेखन प्रपंच.

…हा इतिहास मोठा विचित्र आहे. त्यातील सत्य हे काल्पनिक गोष्टीपेक्षाही अद्भुत आहे. जरा विचार करा, तीस वर्षे या माणसाने स्वातंत्र्यात काढली. साधे का होईना त्याच्या डोक्यावर छप्पर होते ज्यातून त्याला हाकलण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. दुर्दैवाने त्यानंतर १२ वर्षे तो गुलाम झाला, दुसऱ्याची मालमत्ता झाला. अक्षरश: एखादे खेचर, घोडे असतात तसे आणि त्याचा दर्जा त्यांच्यापेक्षाही हीन होता. त्यांनी त्याला त्याच्या घरादारापासून तोडले, त्याच्या बायकापोरांपासून तोडले. त्यांच्या तोंडातील घास हिरावून घेतला व दक्षिणेत भाजत्या उन्हात, शेतात, ज्याचा शून्य मोबदला मिळतो अशा कष्टप्रद कामाला जुंपले आणि ते सुद्धा एका क्रूर मालकाच्या चाबकाखाली. भयंकर ! अशी माणसे जगात असतात हे वाचून तुमचे रक्त तापेल…

– फ्रेडरिक डग्लस.(८१८-१८९५)

हे पुस्तक वाचल्यावर वाचकांना प्रश्न पडेल की सॉलोमन नॉरथपचे पुढे काय झाले. खरे सांगायचे तर त्याचा मृत्यू हे शेवटपर्यंत रहस्यच राहिले. त्याच्या पत्नीचा, मुलांचा शोध लागला पण सॉलोमन नॉरथपच्या थडग्याचा साधा उल्लेखही कुठे सापडला नाही. आश्चर्य म्हणजे त्याचा अमेरिकेत त्या काळात झालेल्या जनगणनेतही उल्लेख सापडत नाही. पण सुटल्यानंतर तो अमेरिकेत सगळीकडे गुलामगिरीच्या विरुद्ध भाषणे देत हिंडत होता. शेवटी तो कॅनडात गेला होता. तेथे त्याच्या सभेत काहीतरी गोंधळ झाला . त्यानंतर मात्र त्याचा पत्ता लागला नाही….

नॉरथपचे पुढे काय झाले. खरे सांगायचे तर त्याचा मृत्यू हे शेवटपर्यंत रहस्यच राहिले. त्याच्या पत्नीचा, मुलांचा शोध लागला पण सॉलोमन नॉरथपच्या थडग्याचा साधा उल्लेखही कुठे सापडला नाही. आश्चर्य म्हणजे त्याचा अमेरिकेत त्या काळात झालेल्या जनगणनेतही त्याचा उल्लेख सापडत नाही. पण सुटल्यानंतर तो अमेरिकेत सगळीकडे गुलामगिरीच्या विरुद्ध भाषणे देत हिंडत होता. शेवटी तो कॅनडात गेला होता. तेथे त्याच्या सभेत काहीतरी गोंधळ झाला. त्यानंतर मात्र त्याचा पत्ता लागला नाही….

ज्यांना हे पुस्तक घ्यायचे आहे त्यांनी कृपया मला रु ६३० + रु ५० = रु ६८० gpay करावेत. फोन नं : ९८२३२३०३९४. दुसऱ्या कुठल्याही क्रमांकावर gpay करू नये.

काही वाचकांना पुस्तकावर माझी सही पाहिजे होती पण मी पुस्तक अगोदरच रवाना केले होते. हे टाळण्यासाठी कृपया जेव्हा आपण पैसे पाठवाल तेव्हा त्यावर signed copy असे लिहिलेत तर बरं होईल..

ही भेटीची ही सवलत भेटपुस्तकाच्या प्रती संपेपर्यंतच उपलब्ध असेल. कारण नंतर परत छापून ही योजना चालू ठेवणे शक्य नाही.

Dear Friends and Readers,

Forgot to make one request. Kindly share this post with your friends and relatives..

Warm Regards,

Jayant Kulkarni

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Jayant Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

शॉप्पिझ्झी । भेटवस्तू । गृह सजावट आणि बरेच काही..

डबल-क्रॉस (भाग २६)