in

आयुष्याची लढाई!

संध्याकाळी बागेजवळ एका टोपल्यामध्ये खापराच्या मटक्यात कोळशाचे निखारे ठेवून गरम शेंगा विकणाऱ्या माणसाच्या सर्वच शेंगा विकल्या गेल्या तरी त्यातून त्याला किती रुपये मिळत असतील या प्रश्नाने नेहमीच पिच्छा केलाय!याच्या जोडीने आणखी नोंदी मागोमाग येतात.
गर्दीच्या ठिकाणी दिवसभर फिरस्ती करुन खेळणी विकणाऱ्याचं पोर घरी खेळणीसाठी रडत असतं,
बांधकाम मजूरास पत्र्याच्या वा तत्सम घरात राहावं लागतं,
लोकांची घरे रंगवणाऱ्या रंगाऱ्याच्या घराचे पोपडे उडालेले असतात,
हमाली करणाऱ्याचं ओझं कुणीच उचलत नसतं,
जगाच्या चपला शिवून देणाऱ्याच्या पायतल्या वाहणा झिजलेल्या असतात,
कापडाच्या दुकानात कामास असलेला कामगार कॉलरजवळ विरलेले शर्ट नि कंबरेत अल्टर केलेली विजार वापरतो,
मिठाईच्या दुकानातल्या सप्लायवाल्याच्या घरी वर्षाला देखील नीट गोडधोड होत नसतं,
हॉटेलमधल्या वेटरचा आपलं कुटुंब घेऊन हॉटेलात जेवायला जाण्याचा बेत कधीच तडीस जात नाही,
दिवसभर बाजारात उभं राहून गजरे विकणाऱ्या फुलवाल्याची बायको मोगऱ्याविनाच असते,
वखारीत काम करणाऱ्याच्या घरी सैपाकासाठी इंधन नसतं,
आडत बाजारात शेकडो पोती धान्य वाहून नेणाऱ्याच्या घरी धान्याची भांडी भरलेली नसतात,
चार घरची कामे करणाऱ्या मोलकरणीला आपल्या घरची धुणीभांडी करताना लाख आवंढे गुमान गिळावे लागतात…
या नोंदी काही केल्या संपत नाहीत.

कष्टाच्या अंगमेहनतीच्या कामासाठी जी माणसं राबत असतात त्यातील तळाच्या माणसाचे हात रितेच असतात आणि त्याचं घरही उतरतीला लागलेलं असतं. 

श्रमणाऱ्या हातांचे बक्कळ कमावते असण्याचे एखाद दुसरे अपवाद असू शकतील मात्र अपवाद म्हणजेच सकल सत्य नसतं.

सद्यकाळात कष्टकऱ्यांना, 

अंगमेहनत करणाऱ्याना समाजात कसलेही मानाचे स्थान नाही आणि दिवसेंदिवस श्रमाच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित होत असतानाही जे लोक नाईलाजाने स्वतःला जुंपून घेतात त्यांच्या श्रमास मूल्य नाही!
किती क्लेशदायी विरोधाभास आहे हा!

या माणसांचीही काही स्वप्ने असतील का आणि त्या स्वप्नांचे पुढे जाऊन काय होत असेल?

वास्तवात ही माणसं आपली रोजमर्राची जंग दिवसाढवळ्या हरत असतात तरीही आयुष्याच्या लढाईला ते रोज उठून कशाच्या आधारे सामोरे जात असतील हा प्रश्न नेहमी अस्वस्थ करत आलाय आणि प्रेरणाही देत आलाय!

आयुष्याच्या लढाईच्या न सुटणाऱ्या गुंत्यातल्या नोंदी..

– समीर गायकवाड

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

मनोहर जोशींचा महत्वाचा पण दुर्लक्षित पैलू!

फेक-फेसबुक, फसवणूक आणि गुंतवणूक