in

आओगे जब तुम साजना..


2007 साली ‘जब वी मेट’ हा सिनेमा आला होता. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या प्रेमाची केमिस्ट्री त्यात जबर जमली होती. सिनेमा हिट झाला होता आणि गाणीही गाजली होती, बाकी गाण्यांच्या तुलनेत ‘आओगे जब..’ हे गाणं जास्त गाजलं नव्हतं; ते माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक! असो.

 
हे गाणं फर्माईश म्हणून अनेक प्रेमभंग झालेल्या तरुण पोरांनी गायला सांगितलेलं अजूनही पक्कं स्मरणात आहे. त्याहीआधी 1991 मध्ये नाना पाटेकर, डिम्पल, माधुरी यांच्या ‘प्रहार’मध्ये शुभा गुर्टू यांनी गायलेली ‘याद पिया की आये..’ ही ठुमरी खूप जीव लावून ऐकलेली! तिच्याशी जसे एकरूप होता येत होतं तसेच ‘आओगे जब तुम साजना’बाबतीत व्हायचे!

या दोन्ही गाण्यांची वीण वेगळी असली तरी ही एकमेकाशी गुंफलेली वाटत. यांच्या आठवणी मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरमधील मुजरा गायिकांच्या आठवणींशी निगडीत आहेत. बुऱ्हाणपूरच्या मुजऱ्याचा इतिहास औरंगजेबकालीन नसून जहांगीरच्या काळातला आहे. त्याआधी इथे मुजरा मैफली होत नव्हत्या. जहांगीरने जयपूरमधील डेरेदार समाजातील दोन तवायफ इथे आणल्या आणि त्यांचे कोठे वसवले. त्यानंतर इथे परंपरागत मुजरा अदा होऊ लागला.
सध्या भारतात शालीन कुलीन परंपरेचा मुजरा बुऱ्हाणपूर आणि आग्रा इथेच साजरा होतो. डेरेदार समाजात साठ प्रकारची घराणी आहेत त्यातील तब्बल बावीस घराणी अजूनही गाणं बजावणंच करतात. बुऱ्हाणपूरच्या बायकांचं एक वैशिष्ठय आहे. यांचा धंदा कितीही कमी होवो जी काही कमाई होईल त्यातील एक तृतीयांश हिस्सा दानधर्मासाठी दिला जातो.

इथे बोरवाडी नावाचा इलाखा आहे, इथल्या बायकांनी मात्र मुजरा सोडून गझल कव्वालीचा आसरा शोधलाय त्याला कारण कदरदान मंडळींची बिघडत चाललेली नियत. नाचणारी बाई अंगाखाली झोपणारी नसते याचा विसर लोकांना पडत चालल्याने मुजरा करणाऱ्या स्त्रियांत घट होऊन त्या निव्वळ गायकीकडे वळत आहेत. बुऱ्हाणपुरच्या मूळ डेरेदार समाजाच्या नर्तिका अत्यंत देखण्या आणि विनम्र आहेत. आपल्या ग्राहकांशी त्यांचा व्यवहार आदरयुक्त आणि प्रेमपूर्वक आस्थेचा असतो. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या तिन्ही राज्यातून लोक इथे येतात.

या बायकांपाशी आल्यावर आपलं काळीज रितं करताना काहीजण कोलमडून पडत, त्यांची फर्माइश या दोन्ही गाण्यांची असे! आपल्या मयखान्यात विग्ध होऊन पडलेल्या या पुरुषांना यातीलच काही बायका आधार देत असत.

आपल्याकडे रंगपंचमीला रंग खेळतात. उत्तरेकडील राज्यांत होळीच्या दिवशी रंग खेळतात. तर या रंगोत्सवासाठी आजही मध्यप्रदेशच्या बुऱ्हाणपूरच्या बोरवाडीत मैफली सजतात. मात्र यातली गाणी धांगडधिंग्याची नसतात. बेगम अख्तर, शुभा गुर्टू, शुभा मुद्गल, गौहर जान, गिरिजा देवी यांच्या स्वरांवर इथे जीव लावला जातो.
बिहारच्या पूर्णिया शहरातील गुलाबबाग भागात काही बैठ्या घरांतही अशा मैफली सजतात. वाराणसी, आग्रा, लखनौ या शहरांतील काही विशिष्ट भागांतही मैफली सजतात. बंगालमध्ये गोमिरा नृत्य सादर केले जाते, आजकाल रंगोत्सवाच्या दिवशी गोमिरानंतर मुजराही सादर होतो. रंगेल माणसं रंग खेळत वेगळ्याच रंगात न्हाऊन निघतात.

नवरसातला शृंगार हा महत्वाचा रस आहे. रंगोत्सवातला शृंगार एकेकाळी निखालस देखणा, सौंदर्यासक्त नि सच्चासीधा होता. रंग, रंगेलपण आणि रंगीन मिजाज या गोष्टींचे आपसात कनेक्शन आहे. आताशा हाताला गजरा भले बांधला जात नसेल परंतु थोडासा का होईना पण लाल पिवळा रंग गालावर लावला जातो नि मैफल रंगत जाते!

उत्तरेकडे होळीच्या दिवशी साजना वेळ काढून येतो हे यांना ठाऊक असतं. त्यामुळे तो येताच ‘आओगे जब तुम साजना..’ आधी सादर होतं नि नंतर मग ‘तुम आये तो गली में आज चाँद निकला..’ सादर होतं! कदरदान माणसाच्या जिवाचे काही खरे नसते! एकच हृदय का दिलंय असा सवाल त्याला न पडला तर त्यात नवल ते काय!

हे विश्वही अतिव सुंदर आहे; जगाचे चित्र रंगदार करताना इथल्या बायका बेरंग होतात तरीही रंग खेळतानाच्या दिवशी त्या नेहमीपेक्षा अधिक जोशात नि हसतमुखच दिसतात! आय लव्ह देम ऑल!

– समीर गायकवाड

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

गावाकडचे उन्हाळ्यातले दिवस..

खोटी प्रतिष्ठा काय कामाची !