in

अष्टावतार श्रीगणेशाचे भाग ६ : विकट

विकटो नाम
विख्यात: कामासुर्विदाहक: ।

मयुरवाहनश्चायं
सौरब्रह्मधरा स्मृत:
|| 


(अर्थ : श्रीगणेशाचा विकट हा अवतार सौरब्रह्माधारक
असुन, कामासुर संहारक आणि मयुर / मोर या वाहनावर आरुढ असा आहे
)

श्रीगणेशाने अष्टावतारापैकी ‘विकट’ हा सहावा अवतार कामासुर या राक्षसाच्या संहाराकरीता घेतला होता.

श्रीगणेशाच्या शापामुळे एका वृंदा नामक कन्येने राक्षसकुळात जन्म घेतला. विष्णूभक्त असल्याने
ती बालपणापासूनच श्रीविष्णूंची नित्यनेमाने पूजा करीत असे. उपवर झाल्यावर तिचा
विवाह राक्षसकुळातीलच
जालंधर नामक महापराक्रमी अशा असुराशी झाला. विष्णूभक्त वृंदा ही
अत्यंत धर्मशील व पतिव्रता होती. वृंदाशी विवाह झाल्याने तिचे महापातिव्रत्य व
पावित्र्याच्या तेजाने जालंधरास अधिक शक्ती प्राप्त झाल्या व तो सर्वत्र विजय
प्राप्त करु लागला.

जालंधरास समस्त पृथ्वीवर विजय मिळविण्याची अभिलाषा होती. वृंदेच्या
पावित्र्याने व पुण्याईने जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरु लागला. त्याने समस्त
राक्षस व पृथ्वीलोकांवर विजय तर मिळवीलाच पण आता तो देवदेवता व ऋषीमुनींनाही त्रास
देऊ लागला. स्वर्गाचा अधिपती होण्यासाठी उन्मत्त जालंधराने देवदेवतांशी युद्ध
पुकारले.

जालंधर व देवतांमध्ये घनघोर युद्ध सुरु झाले. वृंदेच्या पातिव्रत्याच्या
प्रभावामुळे
जालंधरावर देवदेवता विजय
प्राप्त करु शकत नव्हते. वृंदेचे पातिव्रत्याचा प्रभाव कमी केल्यास जालंधराचे
सामर्थ्य आपोआप कमी होईल हे श्रीविष्णूंनी ताडले. परंतु, वृंदा ही निस्सीम
विष्णूभक्त असल्यामुळे श्रीविष्णूंसमोर मोठा पेच निर्माण झाला.
यावर सर्व देवांनी श्रीविष्णूस जालंधरामुळे
तिन्ही लोकांवर कशा प्रकारे संकट ओढवले आहे व धर्म कर्म नष्ट होऊन कशा प्रकारे अधर्म
माजत आहे हे पुन:श्च सांगितले. तसेच लोककल्याणाकरीता वृंदेचे पातिव्रत्य भंग
करण्याशिवाय आता कोणताही पर्याय नाही हेदेखील पटवून दिले. शेवटी श्रीविष्णू
देवदेवतांना मदत करण्यास तयार झाले व जालंधराचे रुप धारण करुन ते वृंदेचे
पातिव्रत्य भंग करण्यास निघाले.

जालंधराचे रुप घेऊन विष्णू वृंदेच्या महालात पोचले. जालंधररुपी विष्णूंस
पाहताच आपला पती युद्धात विजयी होऊन परत आला आहे या विचाराने वृंदा त्यांच्या
चरणास स्पर्श करण्यास गेली. वृंदेने विष्णूंच्या चरणास स्पर्श करताच तिचे
पातिव्रत्य भंग पावले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रताभंगामुळे
जालंधराभोवतीचे संरक्षणकवच नष्ट झाले व त्याक्षणी युद्धात देवांनी जालंधरावर विजय
मिळविला व जालंधराचे शीर धडापासून वेगळे केले. ते शीर वृंदेच्या महाली येऊन पडले. सोबत
जालंधररुपी श्री‍विष्णू असताना जालंधराचे शीर अचानक समोर येऊन पडलेले पाहून वृंदा अत्यंत
क्रोधीत झाली व तिने जालंधररुपी श्रीविष्णूंस जाब विचारला असता विष्णूं आपल्या मूळ
रुपात प्रकट झाले.

श्रीविष्णूंना पाहताच सारा प्रकार वृंदेच्या लक्षात आला. आपल्या पतीस पराभूत
करण्यासाठी कपटीपणाने व खोट्या वागणूकीतून आपले तप आणि पातिव्रत्याचा भंग करण्यात
आलेला आहे हे समजताच क्रोधीत वृंदेने श्रीविष्णूंना दगड बनण्याचा शाप दिला. वृंदेच्या
शापाने श्रीविष्णूचे तत्काळ एका दगडामध्ये रुपांतर झाले. यामुळे श्रीविष्णूंना
शाळीग्राम या नावाने ओळखले
जाते. श्रीविष्णूंना श्रापातून मुक्त करण्यासाठी लक्ष्मीसह सर्व देवदेवतांनी
वृंदेकडे प्रार्थना केली.
वृंदेने
श्रीविष्णूस श्रापातून मुक्त केले व जालंधरासह सती गेली.

श्रीविष्णूंनी जालंधराच्या विनाशाकरीता जालंधरपत्नी वृंदेचे सतीत्व भंग
केल्याने
कामासुर नामक एक तेजस्वी दैत्य निर्माण झाला. त्याने दैत्यगुरु
शुक्राचार्यांकडून दिक्षा घेतली आणि वनात जाऊन महादेवांची घोर तपश्चर्या सुरु
केली. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्यास तिन्ही लोकांवर विजय
मिळविण्याचे वरदान दिले. कामासुर परत दैत्यलोकात आला. त्यास दैत्यांचा अधिपती
करण्यात आले व महिषासुरनाम असुराची कन्या
तृष्णा हिच्याशी त्याचा विवाह झाला. कामासुरदेखील इतर दैत्यांप्रमाणे महादेवांकडून मिळालेल्या
वरदानाने उन्मत्त झाला व देवदेवतांवर अत्याचार करु लागला.

कामासुराच्या त्रासातून मुक्तता मिळविण्याकरीता सर्व देवदेवता मुद्गल ऋषींकडे
गेले. मुद्गल ऋषींना त्यांना मयुरेशक्षेत्री जाऊन विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे ध्यान करण्यास
सांगितले. सर्व देवदेवता मयुरेशक्षेत्री जाऊन आपल्यावर ओढवलेले कामासुररुपी विघ्न
दूर करण्यासाठी विघ्नहर्त्या श्रीगणेशाची आराधना करु लागले. त्यांच्या आराधनेवर
प्रसन्न होऊन श्रीगणेश मोरावर विराजमान होऊन विकट स्वरुपात प्रकट झाले. अर्थात, कामासुराच्या
संहाराकरीता श्रीगणेशाने
विकट या रुपात अवतार घेतला व कामासुराच्या त्रासातून सर्वांची
मुक्तता होईल असा आर्शिवाद दिला.

देवदेवतांचा नायक बनून श्रीगणेशाने कामासुरासोबत युद्ध पुकारले. देव व
दानवांमध्ये तुंबळ युद्ध सुरु झाले. विकटरुपातील श्रीगणेशाने कामासुरास ललकारले,
महादेवांच्या वरदानाने तू तिन्ही लोकांवर सत्ता प्राप्त
करण्याच्या प्रयत्नात सगळीकडे अधर्म माजवलास. त्यामुळे आता तुझा अंत निश्चित आहे.
मला शरण येण्याशिवाय तुला पर्याय नाही.
यावर कामासुर
क्रोधीत झाला व त्याने आपली गदा विकट श्रीगणेशास फेकून मारली. गदेचा विकट गणेशावर
काहीही परिणाम झाला नाही उलट विकट गणेशाच्या केवळ एका दृष्टिनेच कामासूराच्या सर्व
शक्ती लोप पावल्या व तो धाडकन मुर्च्छा येऊन पडला. सचेतना आल्यानंतर कामासुरास
कळून चुकले की विकट गणेशाच्या केवळ एका दृष्टिनेच कोणत्याही शस्त्राविना आपली ही
अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यास शरण गेलेलेच चांगले. घाबरलेला कामासुर विकटाच्या
पायावर डोके ठेवून त्याची माफी मागू लागला. विकट गणेशाने कामासुरास माफ केले.

महादेवांच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या आणि सर्व
देवदेवता व ऋषि-मुनींना त्रास देणाऱ्या असुराच्या  अहंकाराचा नाश करुन त्यास सरळ
मार्गावर आणणाऱ्या विकट गणेशास प्रणाम असो
!!!

~*~

‘अष्टावतार श्रीगणेशाचे भाग ५ : लंबोदर’ ही पोस्ट वाचण्यासाठी क्लीक करा
‘अष्टावतार श्रीगणेशाचे भाग ७ : विघ्नराज’ ही पोस्ट वाचण्यासाठी क्लीक करा

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Sheetal Kachare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

अष्टावतार श्रीगणेशाचे भाग ७ : विघ्नराज

नयनरम्य बाली – भाग ११ – अलविदा बाली Beautiful Bali – Part 11 – Goodbye Bali