अक्कलखात्यात गेलेले मिळवण्याची युक्ती

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

 मागे अक्कलखाती गेलेले पैसे कसे परत मिळवायचे ते तुम्हा सर्वांना विचारलं होतं तर खूपजणांनी आपलं अक्कलखातं कसं भरलंय तेच सांगितलं, कसे परत मिळवायचे ते कोणी सांगितलं नाही. हे का लिहितेय? मी परत टाकले का पैसे अक्कलखात्यात? तर हो पुन्हा एकदा मी अक्कल खात्यात पैसे जमा केले! थांबा, थांबा पुढचा चमत्कार वाचा. ते गेलेले पैसे मी परतही मिळवले. कसे? ऐका तर माझ्या अकलेची कथा जी कदाचित तुम्हालाही तुमची वापरायला प्रवृत्त करेल!

घरातली दोन्ही कार्टी आपापल्या मार्गाला लागल्याने आम्हा दोघांना अक्कल ’खात्यात’ आता फार जमा करावी लागत नाही. साठलेली अक्कल दोघंही अचानक वापरतो त्यामुळे एकमेकांची अक्कल काढण्यात बरा वेळ जातो. आधी नवरोजींच्या अक्कलखात्याबद्दल. त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं की माझी जखम आपोआप बरी होते म्हणून.

एकाच विमानतळावर वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही बसलो होतो. नवर्‍याला जरा ढिल दिली की जे होतं तेच झालं. एका बाईने त्याला गाठलं. ती ’इंडियन ओरिजिन’ ची होती म्हणून नवरोजींना दया आली. तिने विमान चुकलं म्हणून ३० डॉलर्स मागितले, तिच्या केविलवाण्या विनवण्यांमुळे कळवळून आमच्या ’ह्या’ नी तिला ते दिले. दरम्यान दोन मुलांना, एका बायकोला ’मेसेज’ पाठवला, मी काय करु? आम्ही तिघांनी काही करु नकोस असं कळवलं. पण हाय रे दैवा…. तोपर्यत गेलेसुद्धा३० डॉलर्स. मला प्रश्न पडला की ३० डॉलर्समध्ये कोणत्या विमानात जागा देतात का टपावर बसवतात? विमानतळावरच्या ATM मधून बाईचा हात लागला तर पैसे बाहेर पडत नाहीत की काय? एरवी समोर उभी राहिले तरी मी दिसत नाही पण ’इंडियन ओरिजिन’ वगैरे वर्णन… मी माझे हे विचार मनातच आळवले तर  मुलगी म्हणाली, 

“आमच्या तर १० डॉलर्सचं कुपन वापरा म्हणून मागे लागतो.” तिने कुठल्याशा गोष्टीवर कुपन वापरलं नाही म्हणून तिचा बाबा तिला तिथे परत पाठवत होता. तो बेत तिने हाणून पाडला तरी अजून निखारा विझला नव्हता.

“अगं पण तू गेली कुठे होतीस?”

“ते वेगळं पण १० डॉलर्स वाचवायला आटापिटा आणि कोण कुठल्या त्या बाईला ३० डॉलर्स?” तरुण मुलीचे हे म्हणताना काय हावभाव असतील त्याचा विचार करा. तेवढ्यात तरुण मुलाचा फोन आला,

“असा कसा हा फसतो? खायला गेलं की महाग, महाग म्हणून खाऊच देत नाही आणि इंडियन ओरिजिनला ३० डॉलर्स?”

“बघा, मी कशी राहते तुमच्या बाबाबरोबर. तुम्ही सुटलात तरी. आता काय १०, २०, ३० करत बसलायत. फसू दे फसतोय तर.” प्रत्येकाचं दु:ख आपापल्यापरिने पर्वतमय होतं.

जेवढी शक्य होती तितकी अक्कल आम्ही त्या गरीब नवर्‍याची काढली.  आपापसात मात्र, मरु दे. ३० डॉलर्सच तर होते असंही म्हणायचो. काही महिने गेले, सारं कसं शांत, शांत झालं आणि माझ्यावर ती वेळ आली. अक्कल खातं समृद्ध करण्याची. 

माझ्या संपादक मित्राने (फेसबुकवर नाहीये त्यामुळे कोणत्याही संपादक मित्रमैत्रिणींनी घाबरु नये) whatsapp करुन त्याची दर्दभरी कहाणी कळवली.  

“एका रिसॉर्टचं काम करतोय. कितीही पैसे लावले तरी कमी पडतायत, बायकोला दिवस गेलेयत आणि तिला एकटीला सोडून तिकडे जावं लागतं. १ लाख मिळणार होते पण मिळाले नाहीत. माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत आणि बायकोच्या हातात काही दिल्याशिवाय मला निघता येणार नाही. इतरांनी आधीच खूप मदत केली आहे त्यामुळे मी कोणाला विचारु शकत नाही. तू पैसे पाठवशील का, महिनाअखेरीला देईन.” आकडा पाहिला. ३० डॉलर्स रुपयात केले तरी त्याच्या वरताण होता. कधी फसलं तर नवर्‍यापेक्षा कमी एवढातरी माझा हिशोब पक्का होता. विमानतळावरची ’इंडियन ओरिजिन’ आठवली पण हा तर माझ्या ओळखीचा होता. वेळेला उपयोगी नाही पडायचं तर कधी असं म्हणत रक्कम पाठवून दिली. 

दोन, चार, सहा महिन्यांनी आठवण करुन दिली आणि मग थेट मुंबईतच त्याला भेटले. त्यानिमित्ताने एक भारतवारी.

“पैसे घेऊन ये.” मला हुकुम सोडल्यासारखं वाटत होतं. 

“हो आणतो.” माझ्या डोळ्यासमोर माझ्याच पैशांचं डबोलं नाचायला लागलं. आतुरतेने मी संपादकाच्या वाटेकडे डोळे लावून चहा ढोसत बसले. तो आला, बसला, बोलला आणि निघून गेलाही.  

“तू पैसे आणायला गेलीस आणि तुझ्याच पैशानी त्याला खाऊपिऊ घातलंस?” मैत्रीण गडबडा लोळायची तेवढी बाकी होती. 

“नवर्‍याची अक्कल तू काढलीस तशी नवर्‍याने  काढली की नाही तुझी आणि मुलांनी?” नको तो प्रश्न आलाच.

“मोहिम फत्ते झाल्याशिवाय सांगणार नाहीये त्यांना.” मी पुटपुटले.

“म्हणजे तुझ्या घरात कोणालाच तू सांगितलं नाहीयेस?” मी मान हलवली.

“ही फसवणूक आहे.” मैत्रीण म्हणाली. तिला पुढे बोलू न देता मी म्हटलं,

“सांगणार आहे गं बये. आधी पैसे परत मिळवू. चल घरी जाऊ या त्याच्या.”  

“पत्ता?”

“विचारते.” पत्ता मिळाला की आपण जायचं, धरणं धरायचं, नाही ऐकलं तर पूर्वी भाऊ कसे छेड काढणार्‍या मुलांना तुडवायला जायचे तसं भावाला पाठवायचं असे सगळे बेत मी तिला ऐकवले. मैत्रीण गडबडा लोळत होती ती उठून बसली. 

“पत्ता?” भुवया उंचावत परत तिचं तेच. घाईघाईत माझं पुस्तक पाठवते असा गळ टाकला पण असल्या फुटकळ गोष्टींना दाद लागू देईल तर तो फसव्या कसला?

हात हलवत परतले भारतातून आणि लेखणी सरसावली. रोज उठून संपादकाला छळायचं असा डाव ठरवला.

“गुंडांना पाठवू का?” उत्तर नाही.

“तु्झ्या युट्युब वाहिनीवर शिवीगाळ करु का?” उत्तर नाही.

“बायकोशी बोलू तुझ्या?” उत्तर नाही.  बायकोला घाबरत नाहीस. तुझ्या पापाचा घडा भरला आता अशी गर्जना ठोकत मी त्याच्या वाहिनीवर धडकले पण काही वेडंवाकडं लिहायला होईचना. शरणागती पत्करणं एवढंच राहिलं होतं. नवर्‍यासमोर मानहानी! त्याच्यासमोर ततपप करत उभी राहिले आणि ’इंडियन ओरिजिनच’ दिसायला लागली. तो आणि मी एकमेकांकडे पाहायला लागलो, बोलायला जीभ उचलेना त्यामुळे डोळे भरुन पाहणं चालू होतं आणि माझी पेटली. नवर्‍याच्या डोळ्यांची जादू! मी पळालेच. तो अगं, अगं करतोय तोपर्यंत मी फोन घेतला आणि संपादक मित्राला कळवलं. लिहिण्यात पण आवेश दिसला असता तर त्याने पैसे घेऊन अमेरिका गाठली असती.

“तुझं युट्युब रिपोर्टच करते मी. थांबच तू.” लिहिलं आणि ५ मिनिटं टवकारुन मी लिहिलेली वाक्य वाचली कधी जातात म्हणून बघत बसले. उत्तर नाही. हा बारही फुसका ठरला म्हणून परत नवर्‍याच्या डोळ्यात डोळा घातला आणि फोन वाजला. बॅंकेने कळवलं होतं.

“१५००० रुपये जमा!” 

१५००० रुपये जमा, जमा, जमा असं करत एवढा आरडाओरडा केला की नवरा गडबडून गेला.

“नुसते डोळ्यात डोळे घातलेस, उड्या मारतेस… आता नक्की काय झालं ते सांगणार आहेस का?”

“तुझे अक्कलखाती गेले ना ३० डॉलर्स?” मी आधी मीठ लावून टाकलं. त्याने फक्त डोळ्यात डोळा घातला.

“माझेपण गेले होते तुझ्यापेक्षा खूप जास्त. पण मी मिळवले. जमा, जमा, जमा.” असं म्हणत आधी अक्कल गहाण टाकून पैसे कसे घालवले आणि मग अक्कल वापरुन ते परत कसे मिळवले ते सांगितलं. नवरा हसला आणि म्हणाला,

“पण व्याजाचं काय? ते गेलं की अक्कल खात्यात.” 

जाऊ देत ना. एवढं काय त्यात? १०००० तर परत मिळवले ना. नवर्‍याने दिली नाही पण तुम्ही तरी द्याल ना शाबासकी?

आधीचं अक्कलखातं इथे – https://mohanaprabhudesai.blogspot.com/2018/10/blog-post.html

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Mohana Joglekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

marathi kavita tu bhetshil tenvha | love poem marathi | मराठी प्रेम कविता | प्रेमावर मराठी कविता

असा मी… असा मी (उरलंसुरलं)