in

विवाहितेसोबतचं लग्न – कन्नड साहित्यातलं भाष्य!


1988 च्या दरम्यान गिरीश कर्नाड यांच्या ‘नागमंडल’ या प्रसिद्ध नाटकात राणी नावाच्या विवाहित स्त्रीची आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या रमणा ह्या अविवाहित तरुणाची कथा अत्यंत प्रतीकात्मक आणि गूढ पद्धतीने चितारलीय. हे नाटक लोककथांच्या आधारे स्त्री-पुरुष संबंध, विवाहसंस्था आणि स्त्रीच्या भावनिक गरजांवर भाष्य करते. मध्ययुगीन ग्रामीण लोककथेचा कालखंड नाटकाच्या पार्श्वभूमीत आहे.

‘मलेगळल्ली मदुमगळू’ म्हणजे ‘डोंगरदऱ्यांतील नवरी’!. प्रसिद्ध कन्नड साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुवेंपू यांच्या 1967 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अत्यंत गाजलेल्या कादंबरीचे हे शीर्षक. या कादंबरीत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मलेनाडूच्या निसर्गरम्य डोंगरदऱ्यांतील ग्रामीण जीवनाचे, निसर्गाचे, सामाजिक व्यवस्थेचे, रूढी परंपरेने ग्रासलेल्या समाजाचे वर्णन आहे..

कादंबरीतील प्रमुख पात्र असलेला गुत्ती हा तरूण कथानायक, तिम्मी नावाच्या विवाहित तरुणीवर प्रेम करतो. तिच्याशी लग्न करू इच्छितो. तिम्मीचे लग्न झालेले आहे हे त्याला ठाऊक असले तरी त्याच्या घरचे या बाबतीत अनभिज्ञ असतात. तिम्मीदेखील त्याच्याशी संसार करण्यास उत्सुक असते. तिला पळवून आणून तिच्याशी लग्न करण्याचा गुत्तीचा प्रयत्न असतो. यामुळे त्याला स्वतःच्या कुटुंबासह तिम्मीच्या घरच्यांचा, गावातील पंचायतीचा आणि सरंजामशाही व्यवस्थेचा प्रचंड विरोध व रोष पत्करावा लागतो.

याच कादंबरीतील दुसऱ्या एका मुख्य कथानकात मुकुंदय्या आणि चिन्नम्मा यांच्या प्रेमविवाहालाही कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आणि तत्कालीन पारंपरिक विवाहपद्धतीचा मोठा विरोध होतो. ह्या पात्रांचा कालखंड स्वातंत्र्यपूर्व भारतातला आहे.

प्रसिद्ध कन्नड साहित्यिक, गुलवाडी वेंकटराव यांनी 1899 साली लिहिलेल्या इंदिराबाई या कन्नडमधील पहिल्या आधुनिक सामाजिक कादंबरीत बालविधवा असलेल्या इंदिराबाईशी भास्कर नावाचा अविवाहित तरुण लग्न करतो. एका विवाहित स्त्रीचा पुनर्विवाह करण्याच्या या निर्णयाला तत्कालीन सनातनी कुटुंब आणि समाजाकडून तीव्र विरोध होतो. लोक त्याच्या जीवावर उठतात. कादंबरीचा कालखंड अठराशे सत्तावनच्या आसपासचा आहे.

ज्ञानपीठ विजेते लेखक डॉ. के. शिवाराम कारंत यांच्या ‘मूकज्जिया कनसुगळु’ आणि ‘मरळि मण्णिगे’ यांसारख्या कादंबऱ्यांमध्येही समाजाने नाकारलेल्या स्त्रियांचा स्वीकार करणाऱ्या तरुणांचा आणि त्यांना होणाऱ्या कौटुंबिक व सामाजिक विरोधाचा संघर्ष चित्रित केला आहे. ह्या कादंबऱ्यांमधील कालखंड स्वातंत्र्याची चळवळ जोमात असतानाचा आहे.

गिरीश कर्नाड यांच्या 2009 सालच्या ‘वेडिंग अल्बम’ या नाटकात, हेमा ह्या विवाहित स्त्रीबद्दल आकर्षण वाटणाऱ्या विवान या तरुण मुलाचे चित्रण आहे, तर 1994 सालच्या अग्नी मत्तू मळे अर्थात ‘अग्नी आणि पाऊस’ ह्या नाटकांतही विवाहित स्त्रीचे विवाहबाह्य संबंध आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक व कौटुंबिक विरोध प्रकर्षाने मांडलाय.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच की, हे सर्व आज का लिहिलेय? काय कारण असेल? शिवाय प्रत्येक संदर्भाच्या नोंदीत कालखंडही दिलाय!
फार काही उलथापालथ झालेली नाहीये. हे सर्व संदर्भ कन्नड साहित्यातले आहेत. काल घडलेल्या एका घटनेसंदर्भात त्यांची नोंद इथे दिलीय.

घटना अर्थातच कर्नाटकमधली आहे. कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यात एका 55 वर्षीय महिलेने, दुसऱ्या जातीच्या विवाहित महिलेशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे, झोपलेल्या आपल्या पोटच्या तरुण मुलाची धारदार लाकडाच्या ओंडक्याने अतिशय निर्घृण ह*त्या केलीय. ती परित्यक्ता महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत. मुथुराजने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती, ज्याला त्याच्या आईचा विरोध होता.

विशेष बाब अशी की, मुथुराज आणि ज्या महिलेशी त्याला लग्न करायचे होते, त्यांच्यात कोणतेही नातेसंबंध नव्हते! शहरी भागात लोक जसे लिव्ह इन मध्ये राहतात तसेही त्यांचे काही नव्हते. त्यांच्यात फक्त प्रेमभावना होती. मात्र दोन गोष्टींचा त्यात अडथळा होता, एक म्हणजे वैवाहिक स्थिती आणि जात! ह्या दोन भिकार गोष्टींच्या आहारी गेलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व मुथुराजची वृद्ध आई करते! तिच्यातल्या द्वेषमुलक वृत्तीने तिला स्वतःच्या तरुण मुलाचा खून करण्यास भाग पाडले इतकी तिची वृत्ती विकारविलसित झाली!

पोस्टच्या सुरुवातीला जितकेही संदर्भ दिले आहेत त्यातील एकाही नोंदीत विवाहोत्सुक तरुणाचा खून त्याची आई करत नाही! म्हणजे शंभर दिडशे वर्षांपूर्वी इव्हन मध्ययुगातदेखील ह्या छद्म भौतिक गोष्टींपायी कुठली आई आपल्या मुलाच्या रक्ताचे पाट वाहण्यासाठी आसुसली नव्हती! ते आताच्या काळात घडतेय! खरेच आपण प्रगत झालो आहोत! ज्या गोष्टींची लाज वाटली पाहिजे अशा गोष्टी आपण मिरवत आहोत आणि ज्या गोष्टींचा त्याग करुन नव्या दिशेने वाटचाल करणे अपेक्षित आहे, त्या बाबतीत भयंकर उदासीन आहोत!

कदाचित हेच आपले वैचारिक परिवर्तन असावे, उलट्या दिशेने का होईना पण उत्क्रांतीचा वेगवान प्रवास आपण करत आहोत!

– समीर गायकवाड

26/11/2026

​Read More 

What do you think?

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

अशोक कामटे, आम्हाला माफ करा!