in

चिनी गुलाग –

चिनी गुलाग –
…विसाव्या शतकातील सामान्य जनतेचा सगळ्यात भयानक छळ झाला असेल तर तो रशियामध्ये. लेनिनने त्याच्या लाडक्या कामगारांसाठी त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी छळ छावण्या उघडल्या, ज्यात लाखो माणसांचा आणि त्याच्या लाडक्या कामगारांचा मृत्यू झाला. लेनिनने उघडलेल्या या छावण्यांचा स्टॅलिनने मोठ्या कल्पकतेने विस्तार केला ज्यात लाखो माणसे अक्षरशः ठार मारण्यात आली.

१९७३ साली जेव्हा अलेक्झांडर सोलेझेनित्सिनने ‘‘गुलाग आर्किपेलागो’’ हे पुस्तक लिहिले तेव्हा या अत्याचारांची बातमी बाहेर जगाला कळली. त्याने त्यात लिहिले होते, “बेटांसारख्या उगवलेल्या अनेक छळछावण्यांमध्ये अनेक अभागी जिवांच्या आयुष्याचे धागे तुटण्याच्या बेतात असतात. तुम्ही जर एखाद्या दिवशी थंडीत काकडून मेला नाहीत आणि भुकेने तुमची आतडी ओरबाडली नाहीत तर तो तुमचा सगळ्यात चांगला दिवस म्हणायचा’’

सोल्झेनित्सिनच्या गुलाग आणि वन डे इन द लाईफ.. या दोन्ही पुस्तकाचा अनुवाद मी केला आहे.. काहीच महिन्यात उपलब्ध होईल, तेव्हा फेस बुकवर टाकेनच.

आज ना रशिया राहिला, ना रशियाची कम्युनिस्ट पार्टी राहिली, पण त्या छळ छावण्यांचा वारसा चीनमध्ये चालवला जातोय. तेथील मुसलमानांविरुद्ध. हे चांगले आहे का वाईट हे ज्यांनी इस्लामी सत्तेखाली टाचा घासल्या आहेत ते ठरवतीलच. पण तेथे काय चालले आहे ते आधी पहायला पाहिजे –

चीनी सरकारने झिन्जियांग प्रांतात १० लाख लोकांना तुरुंगात डांबले आहे. त्यांना चीनी चिनी संकृतीचे धडे दिले जातात, म्हणजे काय केले जात असावे हे सुज्ञास सांगणे न लगे. या छावण्यांमध्ये इस्लाम धर्मियांना सतत चीनी कम्युनिझमची तत्त्वप्रणाली जबरदस्तीने ऐकवली जाते. स्वतःवर टीका करण्याची जबरदस्ती केली जाते, म्हणजे मी किती मूर्ख आहे, कसा नालायक आहे, बुरसटलेला आहे इ. इ. लिहून काढावे लागते. हे सगळे त्या मुसलमानांच्या डोक्यात नीट शिरावे म्हणून अनेक उपाय अमलात आणले जातात. उदा. काळ कोठडी, एकांतवास, शारिरीक छळ, झोपून न देणे, मारहाण आणि छळ या नित्यनेमाच्या गोष्टी आहेत. या अत्याचारांना बळी पडणारे आहेत झिंजियान प्रांताचे उघूर मुसलमान. ही जनता सुन्नी आहे आणि ते कुराणाचे पालन करतात, पण चिनी सरकारला ही मानसिक विकृती वाटते आणि ती नष्ट करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. अर्थात हा धर्म विकृत आहे का नाही याचा संपूर्ण अभ्यास त्यांनी केला असणार. कम्युनिझम कुठल्याही धर्माला अफूची गोळी मानत असल्यामुळे त्यांनी या मुसलमानांवर अनेक निर्बंध घातले आहेत. उदा. त्यांना दाढी वाढवण्यास बंदी आहे, रमादानमध्ये उपवास करण्यास बंदी आहे, त्यांना जबरदस्तीने डुकराचे मांस खाण्यास आणि मद्य पिण्यास भाग पाडले जाते. (मुसलमानही भारतात हिंदूंना गोमांस खाण्याची जबरदस्ती करत असत.. अर्थात बाटवण्यासाठी. त्या मुळे मुसलमानांना हा छळ नवीन नाही) दोन्ही गोष्टींना शरियामध्ये जबरी शिक्षा आहे. उघूर मुसलमानांनी कित्येक ठिकाणी अतिरेकी हल्ले केले आहेत, पण ते चीनी सरकारने विफल केले आहेत. जगामध्ये ५७ मुस्लीम देश आहेत, पण गंमत म्हणजे दोन तीन देशांनीच याबाबतीत काळजी व्यक्त केली आहे. (फक्त काळजी, निषेध नाही).

हेच जर भारतात झाले असते, किंवा इस्राएलमध्ये झाले असते तर पार युनोपर्यंत जाऊन ठराव मांडण्यात आला असता, पण चीनपुढे सर्व इस्लामी देश नांगी टाकतात. कारण फार सोपे आहे. आणि ते अर्थातच आर्थिक आहे. ५७ इस्लामी देशांपैकी २० ते २७ देशांशी चीनचे व्यापार संबंध आहेत. उलाढाल मोठी आहे. दुसरे कारण म्हणजे चीन या देशांनी आवाज उठवू नये म्हणून या देशांना पैशाच्या मदतीची लालूच दाखवतो. अजून एक कारण आहे आणि ते फार महत्त्वाचे आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे म्हणजेच सरकारचे म्हणणे आहे की अंतर्गत शत्रूंचा काटा काढल्याशिवाय शांतता व सुव्यवस्था नांदू शकत नाही. त्यांचा काटा काढावाच लागेल. हे मुस्लीमांना चांगलेच समजते, कारण ती हुकुमशाही भाषा मुसलमानांचीच आहे. चीनविरुद्ध न बोलण्याचे अजून एक कारण आहे ते म्हणजे चीन पाश्चात्य देशांविरुद्ध आहे आणि इस्लामही युरोप, अमेरिकेच्या विरुद्ध आहे. शत्रूचा मित्र तो आपला मित्र या न्यायाला धरून कोणीही चीनविरुद्ध एक शब्दही काढत नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून इस्लामला लिबरल अमेरिका आणि युरोपमध्ये हातपाय पसरण्यासाठी योग्य वातावरण आहे असे म्हणायला हरकत नाही. युरोपमध्ये फक्त पोलंड नावाचा एकच देश आहे ज्याने इस्लामला अजून शिरकाव करू दिलेला नाही. त्यासाठी त्यांची युरोपियन युनियन सोडण्याचीही तयारी आहे आणि पोलंडमधील जनता आज या मतावर ठाम आहे आणि सुखी आहे.

चीनी कम्युनिस्ट पार्टीने इस्लामला व इस्लामध्ये पाळल्या जाणाऱ्या प्रथांना पद्धतशीरपणे एका विकृत आजाराचे स्वरूप देण्यात यश मिळवले आहे. (झिन्जियान प्रांतात)

मधल्या काही काळात चीनी कागदपत्रे बाहेरच्या जगाला मिळाली, त्यात चीनी सरकारने इस्लाम हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे असे स्पष्ट म्हटले आहे. चीनी सरकारने त्या कागदपत्रात असा दावा केला आहे की मुस्लीमांना धार्मिक अतिरेक आणि हिंसक दहशत माजवण्याचा रोग जडला आहे… आता अशा मानसिक रोगावर चीनमध्ये कसा इलाज केला जातो हे आपल्याला माहीत आहे…

भारतातील मुसलमानांनी आणि कुंपणावर बसलेल्या समाजवाद्यांनी यापासून बोध घेतला पाहिजे, अर्थात ते या मानसिक रोगापासून मुक्त आहेत असा दावा कोणी करू शकणार नाहीत, ही मुक्ती मिळण्यासाठी त्यांना त्यांच्या धार्मिक ग्रंथात (कुराण व रेडबूक) नवीन युगासाठी योग्य ते बदल करण्याचे धाडस करावे लागेल. सोळाव्या शतकात गॅलिलिवर खटला चालवण्यात आला आणि १९९२ साली पोपने त्याची जाहीर माफी मागितली. हे एवढे सोपे आहे. (आणि अर्थातच भयंकर अवघड आहे) आपण केलेल्या काळ्या कृत्यांसाठी माफी मागितली तर बरेच प्रश्र्न सुटतील, पण ते हे करणार आहेत का हा खरा प्रश्र्न आहे… कारण त्याला वैचारिक स्वातंत्र्य लागते.. जे या दोन्ही जमातींकडे नाही.

– जयंत कुलकर्णी 

Read More 

What do you think?

Written by Jayant Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

भाषण देण्याचा प्रकार