in

मटक्याची दुनियादारी!


नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन आणि संयुक्त निर्मिती असलेली ‘मटका किंग’ सिरिज पाहिली, मनात अनेक गोष्टींचे मोहोळ जागे झाले. त्या अनेक टपऱ्या आठवल्या आणि त्यांच्या नादाला लागून उध्वस्त झालेले संसार आठवले. मटक्याचे रकाने, काही खास दैनिकात येणारे आकड्यांचे अंदाज, फुल स्केप पेपरचे बरोबर बारा तुकडे करून त्या मध्ये कार्बन पेपर ठेवून दिली जाणारी टीप आठवली. सकाळ संध्याकाळच्या खास नेमक्या वेळी कासावीस होऊन आशाळभुतागत मटका टपरीवर जाऊन ओपन काय आले आहे आणि क्लोज काय आले आहे याचे अदमास घेणारे भुकेच्या डोहात बुडालेले चेहरे आठवले. मटका लागल्यावर ऐश करून पैसे उडवले जायचे आणि मोठी रक्कम हारली की देशी दारूचा गुत्ता जवळ केला जायचा. हारलेला माणूस पुन्हा पुन्हा पैसे लावत राहायचा. कधी तरी एकदा जिंकायचा मात्र बहुतांश वेळी तो गर्तेत जायचा. असं करत करत घरेच्या घरे मटक्याने गिळंकृत केली. पण जे मटका घेत होते त्यांचे काय झाले?

बऱ्याचदा मटका घेणारी माणसं तिशीतली चाळीशीतली असायची. रापलेल्या चेहऱ्याने विस्कटलेल्या केसांची ही माणसं मळकट बिन इस्त्रीच्या कपड्यांवर असायची. टपरीत दोन तीन देवी देवतांची चित्रे असत. साल संपून गेलेले कॅलेंडर असे. शाळेची काळी पाटी एका तारेला अडकवली जायची. पाटीच्या खाली कागदाच्या सुरळ्या असत. कोपऱ्यात कुठे तरी दोन तीन वह्या असत ज्यांची पाने भरलेली असत. सतरंजी अंथरूण त्यावर हा सदगृहस्थ बसलेला असे. गुटखा सुरु होण्याच्या आधीच्या काळात मावा नाहीतर तंबाखू जर्दा यांची गोळी जबड्यात दाबून ठेवलेल्या अवस्थेत तोंडातला तोबरा तसाच धरून ही माणसं येणाऱ्या जाणाऱ्यांचे निरीक्षण करत असत.

मटका बुकी असं यांचं टेक्निकल पोझिशन असलं तरी लोक मात्र त्याला मटक्याचा दलाल म्हणत. सकाळची ओपनची फिगर डिक्लेअर होण्याच्या सुमारास टपऱ्या उघडल्या जात असल्या तरी रात्रीची फायनल फिगर येईपर्यंत टपरी बंद केली जात नव्हती. सुरुवातीला हे केवळ मटक्याचे आकडे घेत असले तरी पुढे जाऊन या लोकांनी जोडधंदे सुरु केले. व्याजबट्टा, जुगाराचे क्लब, टँगो पंचच्या बाटल्यांचा साठा ठेवणे असं करत करत यांच्यातले काही गबरगंड झाले. काहींनी यात अफाट हात मारला.

मटका बुकिंग घेऊन मोठी झालेली धेंडं स्वतःची यंत्रणा राबवू लागले, काहींनी तर स्थानिक लेव्हलवर वैयक्तिक धंदा सुरु केला. पैसा पैशाकडे ओढला जातो असं म्हटलं जातं, त्या उक्तीप्रमाणे ही काही मोजकी माणसं प्रचंड पैसेवाली झाली. पैसा अफाट झाला की पोलिसांना खुश ठेवणं आलं. पोलिसांनी आपल्यावर रोज चढू नये म्हणून राजकरण्यांशी संधान बांधणे हेही ओघाने आलं! यातून आणखी पुढचं पाऊल टाकत काहींनी थेट राजकारणात सहभाग घेऊन स्थानिक निवडणुका लढवल्या आणि पैशाच्या जोरावर ते निवडूनही आले. समाजात आपली पत वाढावी म्हणून ही मंडळी कोणत्याही जातीधर्माच्या उत्सवाच्या मंडळांचे कार्यकर्ते वर्गणीसाठी यांच्याकडे गेले तर त्यांना नाराज करत नसत.

त्यांनी एकीकडे डोकं वापरुन पैसा वाटताना आपापल्या समाजात मात्र चिक्कार पैसा टाकत आपण समाजातले एक मसिहा आहोत हे लोकांमध्ये समाजामध्ये रुजवले. त्यांच्याशी ओळख असणं ही मोठी बाब मानली जाऊ लागली. प्रत्येक जातीतला असा एक धर्मात्मा मोठा होत गेला. त्या त्या जातीच्या लोकांनी त्याला हृदयात स्थान दिलं. पुढे जाऊन या लोकांनी मग आपली दानत आणखी वाढवत गोरगरिबांना मदत ही केली. मात्र ही मदत एकीकडे जारी असताना त्यांचा हा हजारोंचे संसार उध्वस्त करणारा मटक्याचा धंदाही चालूच होता! अशी माणसं प्रत्येक शहरात दिसू लागली. मटक्याने बाळसं धरलं आणि या मोजक्या लोकांना तर जणू अमरत्व लाभलं!

नवीन पोलीस अधिकारी आले की कारवाईचा फार्स व्हायचा. हप्त्याची सेटिंग पक्की व्हायची, वसुलदार नेमले जायचे आणि पुन्हा धंदा सुरळीत चालायचा. जे राजकारणात यशस्वी झाले नाहीत त्यांनी अपराध जगतातले अन्य मार्ग चोखाळून पाहिले. काहींनी बायकांचे कुंटणखाणे उभे केले, लॉजिंगच्या गोंडस नावाखाली मोक्याच्या जागी चादरबदलीचा धंदा सुरु केला. काहींनी हातभट्टीला बळ दिले तर काहीनी नव्या जमान्याचा व्हिडिओ पार्लरचा धंदा खोलला. मोजक्या लोकांना हे साधले बाकी किरकोळ बुकिंग घेणारे कस्पटासमान जिंदगी जगले आणि मेले! त्यांच्याकडे किरकोळ दोन पांच रुपयांची बुकिंग देणारे कंगाल होऊन मेले आणि त्यांच्यापेक्षा थोडेसे बरे आयुष्य जगून हेदेखील खस्ताहाल अवस्थेतच मेले. यांच्या पिढ्या उध्वस्त झाल्या.

मटका चालू राहावा अशी पोलिसांची इच्छा असे. दोन नंबर धंदा सुरु असला की सगळीकडे चलन फिरते, मार्केटमध्ये कॅश फ्लो टिकून राहतो आणि क्रिमिनल एलिमेंट्स पैसा कमवत शांत राहतात, पोलिसांना हप्ता मिळतो! सर्वांनाच बरकत! फक्त जे पैसे लावतात तेच खपतात, पण त्यांची पर्वा कुणी आणि का करावी? त्यामुळे काहीही झाले तरी मटका आपलं स्वरूप बदलून नव्या नव्या प्रकारे स्थापित होत राहिला. मोबाईलचे प्रस्थ वाढल्यावर अनेक ठिकाणी पोलिसांचा पत्ता कट करण्यासाठी वा त्यांची ‘पाती’ कमी करण्यासाठी मोबाइलवर बुकिंग घेतले जाऊ लागले. पुढे जाऊन मटक्यावाल्यांनी आयपीएलचे सट्टे सुरु केले.

हा नवा मटका सट्टा तरुण पिढीला उद्ध्वस्त करत असतानाही साऱ्या यंत्रणा शांत मौन बसून आहेत! यात एक विचित्र विरोधाभास आणि गंमतदेखील आहे- जे कथित पांढरपेशे वा मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांना या संपूर्ण प्रकाराची फक्त उत्सुकता असते मात्र ते त्याविषयी चीड संताप व्यक्त करताना दिसत नाहीत कारण त्याची झळ त्यांना क्वचित बसते. आयपीएलचा सट्टा सुरु झाल्यापासून मात्र या परिघाबाहेर कुणीच राहिले नाही, सर्वांचे वर्तुळ एकच झालेय! तरीही कुणाला त्याची फिकीर नाही!

आता नागराज मंजुळे यांचा मटका किंग पाहिल्यावर अनेकांना ती रोजगारीची संधी वाटेल इतके ते जग त्यांनी भन्नाट पद्धतीने दाखवले आहे. हॉटेल कामगार, बांधकाम मजूर, रोजंदारीचे कामगार, हातावर पोट असणारी लाखो माणसं, काहीही केलं तरी उत्पन्न वाढत नसल्याने चटकन पैसे मिळावेत म्हणून गुंतून पडलेले कनिष्ठवर्गीय, चोरीचपाटी करून वीस पंचवीस रुपये मिळवणारे भणंग, पैशाचा हव्यास जडलेली माणसं अशी लाखों माणसं आणि त्यांचा संसार या धंद्याने उद्ध्वस्त करूनही हा धंदा आजही सुरु आहे!

एक शेवटची नोंद करून थांबतो. रेड लाइट एरियात फिरताना एक गोष्ट जाणवली ती अशी की, या धंद्यातील ऐंशी नव्वदच्या दशकातल्या बहुसंख्य बायका मटक्यावर पैसे लावत. आकडा सांगणारा एक इसम त्यांच्या गुत्त्यात फिरे, हारलेल्या बायका उद्या पैसे जिंकता येतील या आशेने पुन्हा पुन्हा पैसे लावत. त्यांनी जिंकलेले पैसे देखील त्यांना क्वचित दिले जायचे, ही गोष्ट त्रासदायक होती. मटकेवाल्यापाशी उधारी चालत नव्हती. ते या बायकांशी थेट संबंध कधीच ठेवत नसत. नोटबंदीच्या काळात या बायकांचे पैसे ज्यांनी ज्यांनी लुबाडले त्यात मटकेवाले अग्रस्थानी होते!

केवळ या बायकाच पैसे लावत होत्या असे म्हणणे धाडसाचे ठरेल. हॉटेलात भांडी धुणाऱ्या बायकांनाही याचे व्यसन जडलेले असे. झाडलोट करणाऱ्या आणि मोस्टली श्रमाचे काम करणाऱ्या बायकांही यात अडकून पडल्या होत्या. त्यांच्यात आणि रोज उठून आशाळभुतासारखं आकड्याचं जग डोक्यात घेऊन फिरणाऱ्या पुरुषांत एक महत्वाचा फरक होता. तो फरक म्हणजे या बायकांना जिंकलेले पैसे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या निभावण्यासाठी हवेहवेसे वाटत! मटक्यात पैसे जिंकलेली बाई दारूमटणाची पार्टी करताना मी माझ्या आयुष्यात कुठेही कधीही पाहीली नाही!

मटका किंग रतन खत्रीच्या रूपाने देशभरात एकच होता मात्र त्याचे स्थानिक उमराव जमीनदारासारखे मनसबदार मात्र प्रत्येक शहरात निर्माण झाले, त्यांनी व्यवस्थेशी असा काही संग केला की पोटं फुगलेल्या ढेरपोटयांचे खिसे मजबूत भरले, राजकारण्यांचे बँक बॅलन्स वाढवले, खाकी वर्दीला पैशाने गर्वार केले आणि स्वतः मात्र धर्मात्मा म्हणून मिरवून घेतलं! आकडे सांगणाऱ्या बाबा बुवांचे पेव फुटले. भाग्यलक्ष्मी लाभलंक्ष्मी सारख्या लॅाटऱ्यांनी हात धुवून घेतले!

फिरोजखान आणि प्रेमनाथच्या प्रमुख भूमिका असलेला धर्मात्मा हा देखील मटकाकिंग रतन खत्रीच्या आयुष्यावर बेतलेला होता. यात प्रेमनाथचे नाव धर्मदास असतं. हाच धागा ‘कर्ज‘मध्ये होता, त्यात त्याला जे काही महत्वाचे सांगायचे असते, ते तो काचेच्या ग्लासवर टिचकी मारून सांगायचा. त्याने किती टिचक्या मारल्या आणि त्याचा ध्वनीनाद कसा होता यावरून अर्थ लावण्यात यायचा. खऱ्या आयुष्यातला रतन खत्री मटक्यावर टिचक्या मारायचा, त्याने किती टिचक्या मारल्या याची नोंद पत्ते काढणारा घेत असे. अपराध जगताची एंट्री करुन देणाऱ्या या धंद्यातले कोडवर्डस आजही विसरू शकलो नाही.

नागराज मंजुळेंचा मटका किंग पाहताना ते हजारो भकास चेहरे, आणि हताशा हतबलतेने ग्रासलेले खचलेली पिचलेली माणसं आठवली! पोटात कालवलं! पायाखाली मुंग्या चिरडून टाकाव्यात इतक्या सहजतेने समाजाने, सरकारने आणि व्यवस्थेने ही माणसं अशी किड्यामुंगीच्या मौतीने कशी काय मरू दिली याचे शल्य आजही वाटते! माझे बालपण आणि आयुष्यातील बरीच वर्षे ज्या परिसरात गेली त्या भागांतली अनेक माणसं, अनेक घरं आणि तिथल्या विमनस्क चेहऱ्याच्या बायका आठवल्या! याची दोषनिश्चिती कशी करायची हा यक्षप्रश्न आजही छळतो!

मटक्याची दुनिया बेरंगी होती पण इंद्रधनुष्यी स्वप्ने दाखवण्याची त्यात ताकद होती, याच स्वप्नांना गोरगरीब भुलत गेले हे वास्तव टोकदार होतं!

– समीर गायकवाड

Read More 

What do you think?

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

मराठा बंधू आणि भगिनींना खुले पत्र..

आयटी सेलचे – सोशल लिंचिंग