in

ऑर्केस्ट्रामधल्या डान्सर्सचा मागोवा!

हे थोडेसे गंभीर आणि महत्वाचे आहे.

बिहार निवडणुकांत प्रचार सुरू असताना मतदानापूर्वीच्या दिवसांत मी एक लेख लिहिला होता, जो सारन जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा डान्सर मुलींविषयीचा होता. बिहार, बंगाल, झारखंड या तीन राज्यांमधून मुली एस्कॉर्ट केल्या जातात आणि त्यांना एकतर जबरदस्तीने नाचवले जाते नाहीतर लालूच दाखवली जाते.

एकदा का शीलभ्रष्ट(!) झाले अथवा पैशाची चटक लागली की या मुली यातून बाहेर पडत नाहीत हे वास्तव आहे. या संपूर्ण धंद्याची सूत्रे सारन जिल्ह्यातील छपरा शहरामधून हलवली जातात. यात महिन्याकाठी कोट्यवधीचे व्यवहार होतात.

छपरामध्ये आरजेडीकडून खेसरीलाल यादव हा लोकप्रिय गायक अभिनेता रिंगणात होता मात्र तो पराभूत झाला. या क्षेत्रातील मुलींना यातून बाहेर काढून त्यांच्यासाठी दुसरा सन्मानजनक पर्याय उभा करण्याचा त्याचा मानस होता मात्र आता तो विषय मागे पडला आहे.

या क्षेत्रात स्टेजवर असणाऱ्या मुलींचे वय आता तेरा चौदावर आलेय. ऑन रेकॉर्ड अल्पवयीन मुलींना अटक करून सोडून दिल्याची संख्या शंभरहुन अधिक आहे. ऑफ द रेकॉर्ड, हजारो अंडरएज मुली या गाळात रुतल्या आहेत. आगामी वर्षात मुलींच्या आर्थिक व्यवहारामधून इथे माफिया टोळ्या उदयास येण्याची चिन्हे दिसत आहेत. हा पैसा आणि या मुली हे कॉम्बिनेशन नरड्यात हाडूक अडकावे तसे अडकून बसेल असे आगामी चित्र असेल. अर्थातच बिहार पोलीस याचीच वाट पाहत आहेत.

पोस्टचा मुद्दा हा नाहीये. उत्तराखंड आणि छत्तीसगढमध्ये जे मोठ्या प्रमाणात जंगलकटाई सुरु आहे त्याच्या काही वेगळ्या पैलूंकडे लक्ष वेधायचे आहे. सरकारने इथे जे प्रोजेक्ट लादले आहेत त्याच्या वादग्रस्ततेविषयी बोलण्यात काही अर्थ नाही. अनेक आदिवासींना आपली जमीन सोडून जाणे मान्य नाहीये, ते संघर्ष करताना दिसत आहेत. तर काही जणांनी सरकारने जमिनीच्या बदल्यात दिलेले मूल्य स्वीकारले आहे. ज्यांनी ही मदत स्वीकारली आहे त्यांना त्या पैशाचे काय करायचे आहे या विषयीचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.

या भागातील मुलींना विविध आमिष दाखवून भुरळ पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात एस्कॉर्ट एजंट सक्रिय झाले आहेत. शून्य सुविधांमधून थेट स्मार्ट फोनच्या चकाकत्या जगात त्या मुलींना आणताना त्यांना भुलवलं जातंय! त्यांच्या पालकांनाही स्वप्ने दाखवली जाताहेत. येत्या दशकात इथल्या मुली मोठ्या संख्येने ट्रॅफिकिंगमध्ये बळी पडण्याची भीती या क्षेत्रात काम करणारे व्यक्त करत आहेत.

त्यातही छत्तीसगढमधील स्थिती चिंताजनक होऊ शकते. या खेरीज गुजरात राजस्थान ते थेट एनसीआर पर्यंत जाणाऱ्या अरवली पर्वतरांगांवरही जेसीबी चालवला जाणार आहे अशा बातम्या कालच प्रसिद्ध झाल्यात, तिथेही बाधित होणारे आदिवासीच आहेत.

या आदिवासींना आर्थिक साक्षरतेचा गंध नाहीये, जगात सुरु असलेले विनाशकारी छक्केपंजे ठाऊक नाहीत. एक प्रकारे हे निष्पाप लोक दुहेरी जात्यात पिसले जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

छत्तीसगढ सरकारला याविषयी वैयक्तिक पत्रव्यवहार केला आहे, एनजीओंनीही ही चिंता कानी घातली आहे मात्र त्या दृष्टीने कोणता समन्वयक आराखडा आखलेला दिसत नाही. जे लोक विस्थापित होत आहेत त्यांच्या उपजिविकेच्या साधनांची योजना आखून त्यांचे पुनर्वसन केले जाणे अपेक्षित आहे. खरेतर त्यांच्या जमिनी बळकावून त्यांना देशोधडीला लावणे हीच मुळात मोठी चूक आहे मात्र सरकार आणि समर्थक या बाबतीत जराही मागे हटायला तयार नाहीत. असो.

या मुली थेट बिहारमध्ये नेण्याऐवजी मध्यप्रदेशलगतच्या सीमाभागातून अन्यत्र फिरवून बंगाल बिहारमध्ये नेल्या जातात. आधी ट्रेन रूटचे सर्किट आणि त्यानंतर बाय रोड बंगाल बिहारमध्ये नेल्या जातात. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील नागरिकांना आवाहन आहे की रेल्वे स्टेशन्स, बस स्थानकात (सरकारी नव्हे, खाजगी लांब पल्ल्याच्या बसेस) संदिग्ध आदिवासी मुली दिसल्या तर पोलीस यंत्रणेस कळवावे. तुम्ही एक अश्राप जीव वाचवू शकता. आपल्या घरीही मुलीबाळी आहेत, या मुलीही आपल्याच आहेत! आपल्या परीने प्रत्येकाने यात दक्ष राहिले तर काही आयुष्ये बरबाद होण्यापासून वाचू शकतील.

– समीर गायकवाड

Read More 

What do you think?

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

शनी जयंती