in

दानधर्म व औदार्याचे सारसर्वस्व

दानधर्म व औदार्याचे सारसर्वस्व

          दयेच्या पोटी औदार्याचा दानधर्माचा जन्म होत असतो. अंतःकरणात दयेचा पाझर असल्याशिवाय दानधर्माची मूळ कल्पना तग धरू शकत नाही. आपला पैसा आपल्याकरिताच खर्च न करता त्याचा उपयोग गरीबांच्या व गरजूंच्या कल्याणाकरिता खर्च करणे हे दानशूर, औदार्यवान आपले कर्तव्य समजतो. अशाप्रकारे पैसा खर्च करणाऱ्या व्यक्तिस अल्लाहकडून त्यांचा मोबदला जरूर मिळतो.


         पवित्र कुरआनमधील सूरह बकरच्या दुसऱ्या खंडातील दोनशे चौऱ्याहत्तराव्या श्लोकात म्हटले आहे. ‘जे लोक अहोरात्र गुप्तपणे व जाहीरपणे आपली धनदौलत अल्लाहच्या मार्गात, दानधर्मात खर्च करतात. त्यांना त्याचा मोबदला अल्लाहकडून प्राप्त होतो. पुनरूत्थानाच्या दिवशी त्यांना कोणत्याही प्रकारचे भय रहात नाही व ते दुःखीही होणार नाहीत. म्हणून आपण मानवाच्या कल्याणासाठी खर्च केला तर तो वाया गेला असे समजू नये. आज ना उद्या अन्य मार्गाने तो पैसा पुन्हा आपल्याजवळ येतोच. दानधर्म करणाऱ्याला अल्लाह कधीच काही कमी पडू देत नाही.


        आपण सच्चे मुसलमान असा दावा कोण करत असेल? या प्रश्नाचे उत्तर देताना पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे ‘जे खरे नितीमान असतात ते अल्लाहना प्रसन्न करण्याकरिता आपल्या पैशातून नातेवाईकांना मदत करतात, अनाथ मुलांचा सांभाळ करतात, गरजवंताच्या अडचणी दूर करतात आणि प्रवासी व गरजू व अन्यायाने तुरूंगात पडलेल्या बंदीवानास सोडविण्याकरिता पैसा खर्च करतात आणि जे कर्ज भागविण्यास असमर्थ आहेत त्यांचे कर्ज फेडतात हेच लोक प्रत्येक मुसलमान म्हणविणाऱ्याच्या दाव्यात खरे आहेत.’


          प्रत्येक मुस्लिम बंधू-भगिनीने दानधर्म करून, औदार्य दाखवून दुसऱ्यांची दुःखे कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकांना दाखविण्याकरिता पैसा खर्च करणे म्हणजे दानधर्म व औदार्य नव्हे. गरजूंना पैसा देताना त्यांना निंदास्पद रितीने वागणूक देणे हे देखील धर्मशास्त्रास सोडून आहे. निंदा करून, मन दुखावून किंवा लोकांना दाखविण्याकरिता पैसा खर्च करून दानधर्म व औदार्याची किंमत कमी करू नये.


          संपत्ती असून त्याचा सदुपयोग न करता किंवा लोकांच्या कल्याणाकरिता खर्च न करता मनुष्य कंजूषपणे वागतो. कंजूषपणा इस्लाम धर्मात निषेधार्ह आहे. कंजूष मनुष्य अत्यंत तुच्छ समजला जातो. कुरआनमध्ये म्हटले आहे ‘वे जो स्वयं कंजूषी करते हैं और फज्ल से जो कुछ उन्हे दे रख्खा है उसे छिपाते हैं ऐसे कृतघ्नोंके लिए हम ने अपमानजनक योजना तैय्यार रख्खी है।’ या श्लोकाचा अर्थ असा आहे ‘जे कंजूष आहेत आणि दुसऱ्यास कंजूष बना असा उपदेश करतात त्यांचा शेवट लाजिरवाणा होत असतो.’ अपार संपत्ती अल्लाहने दिली असता कंजूष मनुष्य आपल्याजवळ फुटकी कवडीही नाही असे सांगतात अशा कंजूष मनुष्याचा शेवट कधीच चांगला होत नाही. आपल्या स्वतःविषयी, कुटूंबातील मंडळीविषयी आणि सर्वसामान्य जनतेविषयी उदासीन राहून कवडी कवडी साठवून ठेवणाऱ्या कंजूष मनुष्याचा शेवट लाजीरवाणा व्हावा हे साहजिकच आहे.


         निष्कांचन मनुष्यानेही औदार्य दाखविले पाहिजे अशी इस्लाम धर्माची आज्ञा आहे. पण औदार्य पैशाचे नसून कृतीचे आहे. प्रत्येक सत्कृत्य है औदार्य ठरते. म्हणून हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैवस्सलम म्हणतात, ‘औदार्य हे मुस्लिमांचे कर्तव्यकर्म आहे. ज्याच्याजवळ पैसा नाही, त्यांनी सत्कृत्य करणे किंवा अपकृत्यापासून दूर राहणे म्हणजेच औदार्य होय.’ गरीब मुस्लिम गृहस्थाने सत्कृत्य करून औदार्याचे पुण्य पदरी घेतले पाहिजे.


         लोकांना सन्मार्गावर आणण्याकरिता उपकार करणे, चुकलेल्या वाटसरूस वाट दाखविणे, अपंगांना दानधर्म करणे, रस्त्यावर पडलेले काटेकुटे काढून टाकणे, तहानलेल्यांना पाणी देवून तृप्त करणे, दोन लोकांमधला न्याय करणे, अशक्त लोकांचा बोजा उचलणे, मुक्या प्राण्यांना दयाळूपणे वागविणे, आपल्या बंधूंचे स्मितपूर्वक स्वागत करणे, आनंदाने. स्नेहसोबत्यांना भेटणे व त्यांना मेजवाणी देणे, शेजाऱ्यांना भेटी पाठविणे, वाटसरूला जेवण घालून तृप्त करणे, लहान मुलांना लडिवाळपणे वागणूक त्यांचे प्रेमाने चुंबन घेणे, पत्नीस-पतीस ममतेने वागविणे म्हणजे औदार्य होय. हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांचे हे विचार ऐकले म्हणजे इस्लाम धर्मात औदार्याची व्याप्ती किती मोठी आहे हे कळून येते. हे विचार प्रत्यक्ष अंमलात आणण्याचा प्रयत्न या रमजानमध्ये करू या.

Read More 

What do you think?

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

माँ बाप राजी, तो खुदा राजी